चार दशकांहून अधिक काळ नाटकांत सर्वार्थाने रमल्यामुळे डॉक्युमेण्ट्रीमधील काम नजरेआड झालेल्या दिग्दर्शकाच्या कामाचा हा आवाका. डॉक्युमेण्ट्रीमधून माहिती देणे यापलीकडे जाऊन काही शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याने केला. नाटक करताना कॅमेऱ्याच्या सतत ऋणाईत राहिला…
मी स्वत:ला ‘नाटकवाला’ म्हणून घ्यायला जितका पात्र आहे, तितका ‘डॉक्युमेण्ट्रीवाला’ म्हणून लायक आहे असे मला मन:पूर्वक वाटत नाही. याची कारणे दोन- एक तर मी या क्षेत्रात सर्वस्व पणाला लावले नाही; आणि दुसरे असे की मी तितके पुरेसे काम केले नाही, ही नम्र भावना आहे. शिवाय वयाच्या या टप्प्यावर लक्षात येत आहे की कुठलेही क्षेत्र विस्तीर्ण आणि खोल असते. ते आपल्याकडून जीवघेणे काही मागत असते. ते तसे दिले तरच किंचित आकलन होऊ शकते. आपल्या इच्छा ढीगभर असू शकतात. पण शक्ती टीचभर असते. कॅमेरा म्हणजे मोठी भानगड असते. त्यात डोळा घालून जग पाहणे हे विलक्षण असते. माझ्या प्रवासात मला कॅमेरा सहज भेटला. काही ‘डॉक्युमेण्ट्रीज’ मी केल्या. त्यातून फक्त माहिती देणे यापलीकडे जाऊन काही शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे माझ्यासाठी तरी ‘माहितीपट’ यापेक्षा मला ‘शोधपट’ हा शब्द बरा वाटतो.
मला नाशिकच्या मुक्त विद्यापीठात ‘दृक्-श्राव्य विभागा’त १९९० मध्ये नोकरी लागली. अभ्यासक्रमावर आधारित ध्वनिचित्रफिती आम्ही तयार करत असू. कॅमेरा तिथे हाताळायला मिळाला, त्यापूर्वी कॅमेरासमोर नट म्हणून जुजबी काम केले होते. पण ते काही पुरेसे नव्हते. चित्रीकरण आणि संकलन हा विलक्षण भाग इथे प्रथम अनुभवायला मिळाला. या माध्यमाचे कुठलेही पद्धतशीर प्रशिक्षण मला नव्हते. माझ्या सोबत तिथले बहुतेक सारे तरुण असेच नवागत होते. आम्ही आमची खटपट करायचो. त्यात फार मजा यायची. फार भारी लोक तिथे भेटले. त्यात शेती अभ्यासक्रम होता. द्राक्षमहर्षी श्री. अ. दाभोलकर, राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि तूरतज्ज्ञ डॉ. राजाराम देशमुख, बोरतज्ज्ञ डॉ. वि. ग.राऊळ असली अस्सल ज्ञानसंपन्न माणसे भेटली. त्यांच्या सोबत कॅमेरा घेऊन अनेक गावे, शेते आणि विविध संशोधन केंद्रे पाहिली. त्या वेळेस मी ‘तूर’ या विषयावर सहा चित्रफिती केल्या होत्या. तसेच ‘लेथ मशीन’ वगैरेही चित्रफिती केल्या. बहुसंख्य वेळा मुलाखती हेच त्याचे स्वरूप असे. त्यात आम्ही दृश्यजोडणी करून संकलनाचे अनेक खेळ करायला लागलो. पेपर आणि मूर्ती अॅनिमेशन करून पाहिले. मला नाटक काहीसे माहीत होते, पण हे क्षेत्र सर्वस्वी नवे होते. जे दिसले, जे चित्रित झाले त्याची जोडणी विविध पद्धतीने होताच त्याचे अर्थ आपल्या सोयीने पूर्णत: बदलू शकतात ही ‘भ्रमविद्या’ थक्क होऊन अनुभवत असे.
हेही वाचा – वेड्या दोस्तीतील शहाणीव…
…तर या खेळात मजा येऊ लागली. मग मी ‘एफटीआयआय’चा दीड महिन्याचा चित्रपट रसग्रहण अभ्यासक्रम केला. तिथे डोळे उघडले. तिथे मणी कौल, श्याम बेनेगल, सईद मिर्झा, पं. भास्कर चंदावरकर, अरुण खोपकर, सतीश बहादूर, पी. के. नायर, केतन मेहता, आनंद पटवर्धन असले अभ्यासू तज्ज्ञ लोक शिकवायला होते. तिथे चित्रविश्वदर्शन झाले. श्याम बेनेगल यांच्याकडे काही महिने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून शागिर्दी केली. त्यातून मला चित्रपट करायची किक् बसली. श्याम मनोहर यांच्यासोबत ‘आनंदाच्या तीन तऱ्हा’ आणि भाऊ पाध्ये यांच्या ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’ या कादंबरीवर आधारित सतीश तांबे यांच्या सोबत पटकथा लिहिली. पण माझ्याकडे चित्रपट करायला पैसे मिळवायचे काडीचेही तंत्र अवगत नव्हते. स्वत:चे पैसे घालून काटकसर करून कमी पैशांत नाटक करण्यात मी पारंगत होतो. त्यामुळे चित्रपट प्रकरण तिथेच थांबले. मग त्यातल्या त्यात माझ्या ‘एकला चलो रे’ या वृत्तीला साजेसे ‘डॉक्युमेण्ट्री फिल्म’ क्षेत्र आपलेसे वाटले. त्यात कधीतरी विजय तेंडुलकर यांच्यामुळे कॅमेरा विकत घेतला. मग नाटकासोबत अहोरात्र डॉक्युमेण्ट्रीचीही गुणगुण सुरू झाली. तोवर मी नाशिकची नोकरी सोडून दिली होती.
जगायला मला अर्थपूर्ण काम हवे होते. याच काळात संजय संगवई आणि उल्का महाजन यांच्यामुळे मी ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ या त्या वेळच्या ज्वलंत प्रश्नावर ‘एनसीएएस’ या संस्थेकरिता शोधचित्रपट बनवला. त्यात प्रथम ‘मुळशी पॅटर्न’ म्हणजे काय ते आले होते. हा तयार करताना विलक्षण धगधगते अनुभव आले. अंगावर एजंटांची माणसे मारायला आली, गाडी घेरली आणि कॅमेरा फोडायची धमकी मिळाली. भरडल्या जाणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचा थरारक मोर्चा अनुभवला. अनेक गावांत फिरलो. कॉ. सीताराम येचुरी, मेधा पाटकर, गजानन खातू, सुरेखा दळवी आणि वंदना शिवा असे लोक प्रत्यक्ष भेटले. विस्थापन, आर्थिक फसवणूक, जमिनीचे राजकारण आणि नव्या जगाच्या गुंतागुंतीच्या समस्या मला दिसल्या. ‘एसईझेड- अराजकाची नांदी’ हा तीन भाषांत केलेला शोधपट अक्षरश: लाखो लोकांनी पाहिला. या विषयावरील भारतातील हा पहिला शोधपट होता.
तो पाहून मला पुणे महानगरपालिकेच्या कॉ. मुक्ता मनोहर यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या जगण्यावर आधारित फिल्म करण्यासाठी विचारले. मी होकार दिला आणि नकळत आत आत खेचला गेलो. शहरातील सुरक्षित मध्यमवर्गीय वस्तीत राहणारा मी गटारात उतरलो, घाणीने बरबटलो आणि वासाने आजारी पडलो. हे दर्शन कानफटात मारणारे होते. जातव्यवस्था आणि शोषण म्हणजे काय याचा थोडा स्पर्श झाला. माझी दृष्टी नाही, तर स्वरच बदलला!
‘कचराकोंडी’ हा शब्द त्या घुसमटीतून आला. मी हा शोधपट कित्येक महिने करत होतो. सर्व ऋतू आणि प्रहर कॅमेरा स्वत:च्या डोळ्याला चिकटवून शहरातील कचऱ्याचे ढिगारे पालथे घालत होतो. अंगाला वास यायचा. ओकाऱ्या व्हायच्या. एक दिवस असे आकळले की बघणाऱ्या लोकांना हा वास यायला हवा. नाक दाबून गटारात शिरणे म्हणजे नरकाची पायरी उतरणे हे जाणवायला हवे. या प्रवासात कितीतरी कामगार भेटले. धुरंधर मिठबावकरसारखा विलक्षण कवी-कार्यकर्ता भेटला. ‘नरक सफाईची गोष्ट’ चे लेखक महंमद खडस आणि अरुण ठाकूर भेटले. थोर छायाचित्रकार सुधारक ओलवे भेटले. त्यांची सुन्न करणारी छायाचित्रमालिका मी त्यात वापरली. या शोधपटाने मला सोलवटून काढले. भारतातील जातवास्तव याबाबत मला अधिक भान आले. माझ्या चौकटीतून मुक्त व्हायचा प्रामाणिक प्रयत्न मी करू लागलो. इथेच मला समीर शिपूरकर या माझ्या संकलन करणाऱ्या मित्राने घेतलेले श्रम आठवतात. या विषयावरील आमच्यातल्या चर्चांचा शेवट हा नेहमी डोळे ओले होऊन नि:शब्द होण्यात व्हायचा. सर्वप्रथम आमच्यातच बदल झालेले आढळले. हा शोधपट विजय तेंडुलकर यांनी संकलन जागी येऊन पाहिला. ते अस्वस्थ झाले होते. मग ते बोलू लागले आणि आम्ही कानाचे द्रोण करून ऐकू लागलो. हा कधीही न विसरता येणारा समृद्ध काळ! हा शोधपट तीन भाषांत तयार झाला. तो लाखो लोकांपर्यंत आम्ही पोहोचवला. कामगारांचे जगण्याचे ज्वलंत प्रश्न लोकांना आणि राज्यकर्त्यांना कळायला किंचित मदत झाली.
‘एसईझेड’ आणि ‘कचराकोंडी’ यांमुळे अनेक संघटना मला शोधपट करायला बोलवू लागल्या. आपल्या समाजात प्रश्नांची कधीही न संपणारी भेंडोळी आहेत. त्यातील अनेक प्रश्नांना सोडा, पण काही प्रश्नांना भिडणेदेखील मला तरी शक्य वाटेना. दमायला व्हायला लागले. शिवाय या प्रकारचे काम हे व्रत घेतल्यासारखे होते. ते अवकाश मला झेपत नाहीसे झाले.
एक दिवस अमेरिकेच्या ‘कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन’च्या अभय पाटील या आमच्या मित्राचा फोन आला. विजय तेंडुलकर यांच्यावर शोधपट करायचा होता. नाटककार विजय तेंडुलकरांच्या साहित्याला भिडणे अर्थातच अवघड काम होते. या कामात मकरंद साठे या माझ्या लेखक मित्रासह चर्चा झाल्या. तेंडुलकरांच्या नाटकात ‘हिंसा आणि लैंगिकता’ हे दोन मुख्य विषय असतात. त्यातील हिंसा या विषयाला शोधपटाच्या केंद्रस्थानी तपासून पाहायचे ठरवले. तेंडुलकरांना आणि त्यांचे नाटक करणाऱ्यांना प्रश्न विचारायचे ठरले. सोबत विचारवंत राम बापट आणि नाटककार गो. पु. देशपांडे यांचे ‘तें’ च्या कामाबद्दलचे आकलन आणि मूल्यमापन घ्यायचे ठरवले. आमच्या आधीच्या काळातील नाटककाराची मुलाखत आजच्या काळातील नाटककार घेत आहे अशी योजना केल्याने तेंडुलकरांची मुलाखत मकरंद साठे यांनी घ्यायचे ठरले. चित्रीकरणावेळी तेंडुलकरांच्या घरातील परिस्थिती नाजूक होती. स्वत: तेंडुलकरही थकलेले होते. पण मुलाखत सुरू होताच हा माणूस तेजाळून जात असे. अत्यंत निर्भीड आणि स्वच्छ विचार त्यांनी मांडले. त्यांना माणसात आणि समाजात हिंसा का, कुठे आणि कशी दिसली या प्रश्नांवर आम्ही खूप बोलते केले. इतर लोकही स्पष्ट आणि थेट बोलले. त्यात तेंडुलकरांवर प्रखर टीकाही होती. अर्थातच हा शोधपट महत्त्वाच्या नाटककारावर असल्याने तो त्यांच्या कामाइतकाच निर्भय असावा असा आमचा प्रयत्न होता. त्यात दिवेओवाळणी कार्यक्रम आम्ही मुद्दामून टाळला. आणि तेंडुलकरांचे मूल्यमापन नाही करायचे तर मग कोणाचे करायचे? अर्थात हे आमचे असे वागणे नेहमीच्या परिचित प्रकाराला सोडूनच होते. ‘तेंडुलकर आणि हिंसा (काल आणि आज)’ हा सघन चर्चेचा शोधपट प्रथम अमोल पालेकरांनी तेंडुलकर महोत्सवात दाखवला. अनेक लोकांना धक्का बसला. बऱ्याच लोकांनी आमची पाठही थोपटली, पण एकूण प्रतिसाद सावध राहिला. आता प्रत्यक्ष तेंडुलकर यावर काय प्रतिसाद देतील ही मनात धाकधूक होती. पण तेंडुलकरांनी आम्हा सर्वांना हॉटेलात चक्क पार्टी दिली. गप्पा मारल्या. तेंडुलकर हा लेखक दशांगुळे वर होताच. मात्र माझ्या लेखी तो आदरस्थानी अजूनच वर गेला!
यानंतर मी दुसरे महत्त्वाचे नाटककार सतीश आळेकर यांच्यावर शोधपट केला. आळेकर आणि त्यांच्या नाटकातील विश्व, भवताल, विनोद आणि दृष्टिकोन मला आतून-बाहेरून माहीत होता. त्यात मी त्यांची ‘महानिर्वाण’ आणि ‘बेगम बर्वे’ अशी प्रगल्भ नाटके जशी पाहिली तसेच त्यांच्या ‘प्रलय’ आणि ‘अतिरेकी’ नाटकांतून कामेही केली. माझा लेखक मित्र राहुल पुंगलिया याच्यासोबत आम्ही आळेकर, त्यांची नाटके आणि त्यातून दिसणारा समाज याचा अभ्यास केला. त्यातून १९९० सालाच्या आधीचा आणि नंतरचा काळ आणि आळेकरांची बदललेली नाटके यांची संगती लावायचा आम्ही प्रयत्न केला. आळेकरांच्या लेखनाचा अन्वयार्थ लावताना या बदलत्या ऱ्हासमूल्यांचा शोध आम्ही घेतला. या शोधापटाला हेमंत जोशी यांनी थोडे अर्थसाहाय्य दिल्याने काही नाटकांचे चक्क परत चित्रण मला करायला बळ मिळाले. एक दृश्य मीच तीन अँगलमधून चित्रित करायचो. मला या दोन फिल्म्स करताना आलेला आपल्या समाजातील अभ्यास साधनांचा अभाव, सुयोग्य समीक्षा, किमान दस्तऐवजीकरण आणि एकूण सांस्कृतिक दारिद्य्राचा दाहक अनुभव आला. प्रसिद्ध नाटकांचे फोटो मिळवायलाही फार वणवण करावी लागली. पण सरतेशेवटी मला नाटकवाला म्हणून या दोन मोठ्या लेखकांचे उतराई होता आल्याचे समाधान आहे.
यानंतर मी सुप्रसिद्ध उद्याोगपती भवरलाल जैन यांच्या बोलण्यावरून जळगावात गेलो. त्यांच्या सांगण्यावरून प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर शोधपट केला. बहिणाबाई म्हणजे शहाणपणाचे झाड! तिच्या परिसरात मी शंभू पाटीलसह हिंडलो. तिथे कविवर्य ना. धों. महानोर आणि ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे भेटले. या दोघांनी बहिणाबाईंच्या कवितांचे मर्म उलगडवून दाखवले. ‘बहिणाई’ या शोधपटात आम्ही यानिमित्ताने ‘कवीचे असणे म्हणजे काय?’ याचा शोध घेतला. बहिणाबाईला प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्ती आम्ही शोधून काढल्या. त्यांच्या कथानातून तिच्या जगण्याचा, मूल्यांचा, संवेदनशीलतेचा आणि माणूसपणाचा शोध घेतला. प्रसिद्ध चित्रकार जयंत भीमसेन जोशी यांनी याकरिता चित्रे रेखाटली. अशोक आणि आशाताई जोंधळे या दाम्पत्याने सांगीतिक भाग सांभाळला. बाईचे जगण्यातील कष्ट आणि त्यातून उगवलेली ही कविता याचा अनुबंध लावायचा प्रयत्न केला. या वेळी मला कविता ही गोष्ट किती भव्य असते याचे दर्शन झाले. अजिंठ्याची लेणी आणि बहिणाबाईंची कविता समांतर दिसली.
माझ्याकडे स्वत:चा कॅमेरा असल्याने आणि तो मीच चित्रण करायला शिकल्याने मला या तिसऱ्या डोळ्याने अनेक गोष्टी दिसू लागल्या. मी नंदुरबार येथे डॉ. मोहन देशपांडे आणि वैशाली वैद्या यांच्यासोबत ‘आरोग्य संवाद कार्यशाळा’ घेत असताना ‘डिरा’, ‘पोयराले जन्म’ हे शोधपट केले. तसेच अणदूर येथील ‘हॅलो मेडिकल फाऊंडेशन’च्या डॉ. शशिकांत आणि शुभांगी अहंकारी यांच्या कामावर आधारित ‘गावगुंफण’ हा शोधपट केला. आरोग्यसंवाद साधणे म्हणून ते उपयुक्त ठरले. पुढे मी भाषातज्ज्ञ अशोक केळकर, पर्यावरणतज्ज्ञ के. आर. दाते यांच्यावर अतिशय अल्प खर्चात शोधपट केले. मी अशा ज्ञानमार्गी, पण अर्थातच दुर्लक्षित लोकांवर ‘ऐवज’ ही अशी मालिका बनवण्याचे ठरवत होतो. पण हे काम किमान पैशाविना होऊ शकत नाही याचा प्रत्यय आला. असेच मी ‘भारतीय मुस्लीम महिला – अल्पसंख्याकातील अल्पसंख्य’ हा शोधपट सुरू केला. अनेक तासांचे ध्वनिचित्रमुद्रण झाले, पण तोही असाच थांबला.
बारा वर्षांपूर्वी मी ‘मुंबई इंटरनॅशनल डॉक्युमेण्ट्री फिल्म फेस्टिव्हल’चे परीक्षण करायला दीड महिना मुंबईत राहिलो. किमान ८०० शोधपट पाहिले. डोळे विस्फारले आणि दुखलेही. त्यातील काही तर अतिशय दाहक होते. आपल्या आजूबाजूचे जग पाहताना दमून जायला झाले. हे शोधपट कधीही कोणाहीपर्यंत पोहोचत नाहीत याचे अपार दु:ख झाले. पण ते सर्व प्रयत्न लाखमोलाचे आहेत. त्यातून आत्ताच्या काळाचे महाकथन उभे ठाकते. मात्र याच काळात प्रतिमांचा महापूर सोशल मीडियावर वाहू लागला. काम करताना चित्रविचित्र अनुभवांनी मला विषण्ण केले. मला नकोसेपण यायला लागले आणि माझ्या हातून माझा कॅमेरा गळून पडला! मला वाटले, मी जे काही या क्षेत्रात केले ते माझ्यापुरते पुरेसे आहे. मला हे क्षेत्र काहीसे कळले.
मग मी परत फिरून प्रायोगिक नाटक करू लागलो. लक्षात आले की, माझे आजचे नाटक आजवर केलेल्या या कामाने आंतर्बाह्य बदलून गेले आहे. आज नाटक करताना मी माझ्या कॅमेऱ्याचे ऋण मान्य करत आहे.
atulpethe50 @gmail.com