कृष्णात खोत

समाजातल्या विविधस्तरातील काही अपवाद वगळता नंतर आलेल्या आत्मकथनाची वाट या कथेनं निर्माण केली. गावकुसातल्या आणि गावकुसाबाहेरच्या शोषित समाजाची चिकित्सा केली. कोणतेही लेखन आपलं जग विस्तारत नेत असेल आणि त्या विस्तारानं आपलं सामाजिक भान समृद्ध होत असेल तर ते लेखन समाजशास्त्रज्ञाच्या कामापेक्षा कमी महत्त्वाचं नसावं. असं मोजकं लेखन अतिशय गांभीर्यपूर्वक, करुणभावनेनं चारुता सागर या लेखकानं केलं.

upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
21st edition of the third eye asian film festival started in mumbai
चित्रपटसृष्टीत लेखकांना अपेक्षित श्रेय मिळणे आवश्यक; गीतकार, सिनेलेखक जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…
ulta chashma
उलटा चष्मा: असला भुसभुशीतपणा नको!
spread of bogus research papers The proposed regulations mention the UGC Care List pune news
बोगस संशोधनपत्रिकांचे पुन्हा पेव? प्रस्तावित नियमावलीत ‘यूजीसी केअर लिस्ट’चा अनुल्लेख
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!

‘जीवनात खूप भोगलं, सोसलं. जे जे सामान्य माणसाच्या वाटय़ाला येतं, ते ते सामान्य माणूस सहन करतो. बंड करत नाही. करतो तेव्हा डरत नाही. वय वर्षचौदा ते सव्वीस भटकत राहिलो. कुठं असा स्थिर झालोच नाही. पुरं एक तप पाय पाठीशी लावले. जीवनासाठी जीवनाचा मागोवा घेत घेत. त्यानंतरचा दीड तपाचा काळ मी शंभर सव्वाशे वस्तीच्या खेडय़ात कंठला. एका प्रवासात शरदबाबूंची ‘बडी दीदी’ ही लघु कादंबरी वाचली आणि तिच्या वाचनाने गोडी लागली. सगळा शरदबाबू वाचून काढला आणि सारी वंगभूमी पायी पालथी घातली. पुढं साताठ वर्षांनी एक बाई अशीच भेटली. दिशा तुडवत चाललेली आईला भेटायला. ना आईचा ठावठिकाणा. केवळ दिशा कळलेली, त्या दिशेच्या खुणेवर तिची वाट. देश स्वतंत्र होऊनही सामान्य जनाची ही अवस्था. मला त्या बाईचं दु:खं प्रखर वाटलं. हा माझ्या लेखनाचा ‘श्रीगणेशा’.

‘नागीण’ या कथासंग्रहाच्या शेवटी असलेल्या ‘असेही दिवस’ नामक आत्मकथनातील हा उतारा. मूळ आत्मकथन आहे तेरा एक पानांचं. एका तपाचं. आपल्या समोर अनेकांची अनेक आत्मकथनं येतात. पण या तेरा पानांत हा लेखक जे काय आपल्याला देतो की, आपण त्याच्या तावडीतून सुटू शकत नाही. एखाद्या लेखकाचं असं हे तापदायक जगणं त्याच्या जन्मभर लिहिण्याची संगत झाल्यावाचून कसं राहील? त्याच तापात वाचकाला जखडून ठेवणारा हा लेखक आहे असं वाटायला लागलं. म्हणूनच त्यांची कथा ही सामान्य जनाच्या चिरंतन वेदनेची, तापाची झाली. त्यांच्या कथेत सामान्य माणसाच्या वाटय़ाला आलं ते निमूट सहन करणारा आणि बंड केलं तर या व्यवस्थेपुढं शरण गेल्याशिवाय गत्यंतर नसलेला आणि पिचलेला असा माणूस जवळचा वाटत राहतो. 

चारुता सागर यांची कथा अल्पअक्षरी, आशयघन, नितळ आणि कधी कधी थेटपणातून मौनात बोलणारी असल्यामुळं तुम्ही तिच्यात गुंतून पडल्याशिवाय राहात नाही. चारुता सागरांच्या जगण्याची तऱ्हा लक्षात घेतली तर केवढं अनुभवसंपन्न जगणं हा लेखक जगला होता ते कळू शकतं. त्याला हे आयुष्य मांडायला अपुरं पडलं असतं. पण ‘नागीण’, ‘नदीपार’, ‘मामाचा वाडा’ या कथासंग्रहांत मिळून जमतेम पन्नासच्या आत कथा त्यांनी लिहिल्या . पण त्यांच्या ‘नागीण’ कथेचं गारूड सोडून इतर कथांबाबत फारसं बोललं गेलं नाही. त्यातल्या त्यात ‘दर्शन’ कथेचा बोलबाला तिच्यावर चित्रपट आल्यानंतर झाला. पण त्यांच्या अस्सल जगण्याचा आलेख, त्यांच्या अनुभवसंपन्न जगण्याचं द्रव्य बाकीच्या कथेत कोरीव होऊन आलं. ते नागीणच्या दंशानं कोणाच्या फारसं नजरेस आलं नाही.

या कथासंग्रहातल्या कथा लेखकाच्या अखंड पायपिटीचा प्रत्यय दिल्यावाचून राहत नाहीत. भटकंती हा या लेखकाचा स्थायीभाव होता. ही सवय पाय फुटल्यापासून होती. आईच्या निधनानं तिनं एवढा जोर घेतला की गावापासून हिमालय काय आणि रामेश्वरगोपुरांचा प्रदेश ते शरदबाबूंची ‘बडी दीदी’ कादंबरी वाचून सगळी वंगभूमी भटकणं काय. ‘पाय कातडय़ाचे आहेत म्हणून एक बरं. लाकडाबिकडाचे असते तर फुटले असते.’ हे लहानपणी लेखक दिवस उगवल्यापासून बुडेपर्यंत भटकत होता नि आई त्याला शोधत होती तेव्हाचं आईचं बोलणं आपल्याला आठवू लागतं. या भटकंतीच्या उघडय़ा जगात स्वत: भोगलेलं, जगलेलं त्याचबरोबरीनं जगत असलेल्या माणसांच्या आयुष्याचा तळ दिसला. देश स्वतंत्र होऊन एवढी वर्ष झाली तरी या माणसांना परिघाच्या आत कधीच या व्यवस्थेनं घेतलं नाही याचं प्रखर दु:ख बघून लेखकाचं मन विदीर्ण झालं आणि हेच दु:ख उजागर करत आपल्यापुरती वाट शोधत हा लेखक गेला. या भटकंतीत आईसारखी बाई भेटते. साधू भेटतो. त्यानंतर गावात कीर्तन करतो, भजन, पोथीपुराण करतो. परत गाव सोडून भटकत हमाली करतो. फुटपाथवर झोपल्याबद्दल पोलीस धरून नेतो. मिळेल ती कामं करत, एवढंच नाही तर लेखक मुडदेफरासचा दोस्त होतो. मढी पुरायची कामं त्याच्यासोबत करतो. भाजी मंडईत काम करतो. सैन्यात भरती होतो. िशप्याच्या दुकानात, मग मास्तर.. किती जगण्याच्या तऱ्हा. हा सगळा अस्सल ऐवज अनेक कथांत प्रातिनिधिक येतो. हा लेखक अनेक समाज आपल्यात बाळगणारा होता याची खात्री पटते. त्यामुळेच तो एक समाज होऊन ते समाजमन आपल्यासमोर ठेवतो. त्याची नीट समाजशास्त्रीय अंगाने चिकित्सा झाली नाही. या कथेचं नातं गावगाडय़ातल्या आणि गावगाडय़ाबाहेरच्या लोकांशी थेट आहे म्हणूनच त्यांच्या कथेचा केंद्रबिंदू डोंबारी, नंदीवाला, गारुडी, फासेपारधी, जोगती, बेरड, रामोशी, मुडदेफरास, एकूण भटके समूह असा राहिला.

नागीण कथासंग्रहातल्या ‘ढोलगं’ या कथेत हरण्या डोंबाऱ्याची मुलगी शेवंता बाबल्याशी आपला वडील सोयरीक जुळवतो म्हणून एकतर्फी शेवंतावर प्रेम करणारा जगण्या बाबल्याचा खेळात अपघात घडवतो. तरी शेवंता अपंग बाबल्याशी लग्न करते. ‘निवाडा’ कथेत नंदीवाला जमातीतल्या सुभानाच्या पोरानं धुरपीला पळवून नेल्यानंतर जात पंचायत बसून त्यांना बहिष्कृत करून शिक्षा केली जाते. ‘पुंगी’ कथेत नाग मेल्यानंतर घरातला कर्ता माणूस गेल्याचं दु:ख होतं. नव्या सापाच्या शोधात अलिखा भटकतो त्याच्या झटाझोंबीत त्याचाच जीव जातो, पण पोटासाठी घरातल्या कर्त्यां माणसाचा जीव घेणाऱ्या सापालाच सांभाळावं लागतं. ‘वाट’ कथेतली कावेरी ही फासेपारधी स्त्री आईच्या शेवटच्या भेटीसाठी ठावठिकाणा माहीत नसताना वाट तुडवत फिरते, पण तिची आईची शेवटची भेट होत नाही. ‘भूक’ कथेतला बेरड जमातीतला बाबाजी खून, दरोडा असे काम बंद करून कष्टानं पोट भरायचं ठरवतो, पण शेवटी त्याला मोकाशाच्या मळ्यातली कणसं चोरावी लागतात. लोक त्याला पोलिसात देतात. हेच भुकेचं वास्तव ‘वर्दी’ आणि राखण कथेत येतं. पण यातली ‘वर्दी’ कथा भटकंतीत चारुता सागर मढे पुरण्याच्या कामात मुडदेफरासला मदत करतात त्याचा थेट अनुभव आपल्याला देते. या कथेतल्या सत्याप्पाच्या डोक्यात अखंड विचार. ‘मरायला पाहिजे. कोनतरी मरायला हवं. एवढं मोठं चाळीस हजार वस्तीचं शहर. शहरात दोन इस्पितळ. अनेक भिकारी. कैक बेकार. तसे फिरस्ते. रोज एक ना दोन दगावतात. रोज वर्दी येई. असल्या पावसाळी गारठय़ात तर तीन चार पिचकत. क्वचित एखादाच खाडा. पण गेल्या तीन दिवसात कोणीच मेल्याची वर्दी नाही.’ असा विचार करत सत्याप्पा नारायण टेलरिंग फर्मच्या गुणवंतराव मालकाच्या पुढं येतो. मालक सत्याप्पावर घट्ट नजर टाकत त्याला विचारतो, ‘काय सत्याप्पा, काय सापडलं का कुठं एखादं जितराप ?’ पण सत्याप्पाचा जोडीदार बन्या अशा भटकंतीत पोटाला काहीच मिळत नाही म्हणून अंगातल्या तापानं मरतो. आणि सत्याप्पाला हीच वर्दी मालकाला द्यावी लागते हे कुठलं प्राक्तन?  मेलेलं माणूस जिवंत माणसाला जितराप वाटणं ही आणि अशा धक्का देणाऱ्या चारुता सागर यांच्या कथा अक्षरश: पिळवटून टाकतात. भुकेच्या दु:खापेक्षा मरणाचं दु:खं क्षुद्र असणारी ही माणसं बघून आपण हालून जातो.  

त्यांच्या सैनिकी अनुभवावर बेतलेल्या ‘अंघोळ’, ‘पूल’ या कथाही आपल्याला याच संग्रहात वेगळाच अनुभव देतात. त्या काळात अंघोळ सारखी कथा चारुता सागर लिहून  समलैंगिक भूकेची जाणीव अधोरेखित करतात. आणि ‘पूल’ या कथेत तर इथून तेथून माणूस एकच असतो. त्याला कोणत्याही आणि कसल्याही सीमा नसतात. कोणत्याही दोन देशांच्या सैनिकात एक दडून बसलेला निव्वळ माणूस असतो, याचं दर्शन ही कथा आपल्याला घडवते.

याच कथा संग्रहात ‘न लिहिलेलं पत्र’ आणि ‘कुठं वाच्यता नसावी’ या कथा मला त्यांच्या शिक्षकी पेशातल्या अनुभवद्रव्याचा परिपाक वाटतो. ‘कुठं वाच्यता नसावी’ ही  तर आजच्या शिक्षण व्यवस्थेशी थेट पडताळणी करायला लावणारी त्या काळातली कथा म्हणून मला फारच मोलाची वाटते. आजच्या आपल्या या व्यवस्थेत जे आपल्याला दिसते त्याची सुरुवात झाली होती. किंवा बीज तेव्हा पडलेले होतं. त्याचा आता महावृक्ष पावलोपावली दिसतो. या वृक्षाच्या सावलीलाच नाही तर वाऱ्यालाही चारुता सागरांच्या कथेतल्या माणसांना आता उभा राहता येणार नाही. एवढा काळ कठीण आला आहे. लेखक कोणत्याही व्यवस्थेतली सगळ्या जगाला न दिसणारी एक पुसटशी फट आपल्याला दाखवतो. तिला वेळीच डोळा नाही लावला तर ती फट एवढी वाढत जाते की तिचे रूपांतर लोटात होते. हेच आपल्याला आजची शिक्षण व्यवस्था बघून दिसतं.

याच संग्रहात ‘म्हस’ आणि ‘दावं’ या दोन्ही कथा कुणब्याच्या जगण्याशी त्यांच्या दु:ख भोगाशी आपला संवाद घडवून आणतात. दावं या कथेत दुष्काळानं त्रस्त असलेल्या शेतकऱ्याला आपली बैलं सरकारी छावणीत पोहचवता येत नाहीत याचं दु:ख मूकपणे जनावरागत सोसत राहावं लागतं. तर ‘म्हस’ कथेतली मुक्त जनावरांच्या मागणं फिरणाऱ्या काशीचं आणि जनावरांचं भावविश्व लेखक उलघडत जातो आणि तिचं लग्न ठरल्यानंतर तिच्या म्हशीचं मुक्त फिरणं थांबून दावं खुटा एक होतं हे काशीला आपलं मुक्त जगणं संपून गेल्यासारखंच वाटतं.   

या कथा गोठलेल्या समाजमनाची संवेदना जागृत करतातच. शिवाय त्या समाजमनाचं अगतिकपण, पराभूतपण आत्मीयपणे समजून घेऊन त्याच्याविषयीचं ममत्व निर्माण करण्यात निश्चित हातभार लावतात. समाजातल्या विविधस्तरातली काही अपवाद वगळता नंतर आलेल्या आत्मकथनाची वाट या कथेनं निर्माण केली. गावकुसातल्या आणि गावकुसाबाहेरच्या शोषित समाजाची चिकित्सा केली. कोणतेही लेखन आपलं जग विस्तारत नेत असेल आणि त्या विस्तारानं आपलं सामाजिक भान समृद्ध होत असेल तर ते लेखन समाजशास्त्रज्ञाच्या कामापेक्षा कमी महत्त्वाचं नसावं. असं मोजकं लेखन अतिशय गांभीर्यपूर्वक, करुणभावनेनं चारुता सागर या लेखकानं केलं. कोणताही आडपडदा न ठेवता, पांघरुण न घेता ही कथा आपल्याशी मौनात गेली तरी बोलत राहिली. प्रत्येक समाजाची स्वत:ची अशी एक मूल्यव्यवस्था असते ही मूल्यव्यवस्था चारुता सागरांना त्यांच्या जगण्यात, भटकंतीत सापडली असावी. ही मूल्यव्यवस्था ही कथा अधोरेखित करत राहिली.

कोणत्याही लेखनातून गतकालीन

समाजाचं सर्वसामान्य ज्ञान मिळायला हवं, पण ते ज्ञान आहे हेही कळू नये इतकं सामान्य, साधं ज्ञान असावं, त्याचा शोध लेखक म्हणून घेता आला पाहिजे. त्याला जगण्याचे कालातीत संदर्भ असले पाहिजेत आणि त्याच्या वाटेनं पुढच्या शोधकाला काही करता येण्याची ऊर्मी निर्माण झाली पाहिजे. मला या कसोटीला चारुता सागर उतरलेला हा महत्त्वाचा लेखक वाटत आला आहे.

चारुता सागर आपल्या आत्मपर लेखात म्हणतात, ‘‘आता इथं माझ्या सोबतीला वर आभाळ आहे. जे रात्री नक्षत्रांनी फुलून जातं. आधाराला खाली धरती आहे. बोलाय बसाय जवळ माणसं आहेत. रात्रं दिवस पोटा पाटी लागलेली, पण जीवनाला न विन्मुखलेली. त्यांच्या जीवनाचा एक एक पदर उलघडत जावं तर एक एक माणूस ‘महाकाव्य’ आहे.’’

हेच या लेखकानं केलं. त्यानं सामान्य माणूसच नाही तर सामान्य समाज म्हणून कधीही कोणाच्या आस्थेचा विषय नसणाऱ्या काळात तो आपल्या लेखनाचा केंद्रबिंदू म्हणून आस्थेनं जपला. त्यामुळे त्यांच्या कथा एका काळाचा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक दस्तावेज आहे.

नव्वदीनंतरच्या नवभांडवली व्यवस्थेमुळे गावकुसामधील दुविधेचे चित्रण कृष्णात खोत यांनी आपल्या कादंबऱ्यांतून केले. ‘रौंदाळा’, ‘झड-झिंबड’, ‘धूळमाती’, ‘रिंगाण’ या त्यांच्या महत्त्वाच्या कलाकृती.  गावगाडा, शेती संस्कृती आणि तिथल्या राजकारणाचं चित्र त्यांच्या लेखनातून उमटते. ‘रिंगाण’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद नुकताच प्रसिद्ध.

krushnatkhot767@gmail.com

Story img Loader