मधुकर धर्मापुरीकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राना-वनात भटकत राहणाऱ्या एका साधारण आर्थिक स्थितीच्या कुटुंबातला एक मुलगा- त्याचे चौथी ते नववीच्या वयादरम्यानचे अनुभव मांडणाऱ्या प्रथमपुरुषी निवेदनाच्या या गोष्टी. लघुकथेचे दिवस झपाटय़ाने मागे पडत आहेत. मीडियाने आजचे सगळे जगणे ग्रासले आहे. त्यामुळे कथा-स्वरूपात काही समजून घेण्यापेक्षा वृत्तांत वाचून बुद्धीला सतत ‘शार्प’ करायचे हे दिवस आहेत, असे वाटत असताना ‘पिवळा पिवळा पाचोळा’मधील कथा दिलासा देणाऱ्या आहेत.
जीएंच्या ‘यात्रिक’ कथेत उपदेशकाशी चर्चा करताना डॉन शेवटी सांगतो, ‘मी अगदी पूर्ण असाध्य वेडा आहे; पण इतर माणसे कोणत्या बाबतीत शहाणी आहेत, हे मात्र मला कधी उमगले नाही.’ केवळ वयामुळे ढकलून ज्येष्ठ झालेल्या माझ्यासारख्या कथालेखकाला आजच्या कथालेखकाबद्दल लिहायला सांगितले आणि मला डॉनचे हे सांगणे आठवले. लघुकथेचे दिवस झपाटय़ाने मागे पडत आहेत. मीडियाने आजचे सगळे जगणे ग्रासले आहे. सतत भिवया उंचावलेल्या, थक्क होणे, उत्तेजित होणे, धावणे, अंगठय़ाने ‘रिअॅक्ट’ होणे या वातावरणात जुन्या कथांची अडगळ होते- ‘त्याच काळात शोभणाऱ्या’, असे झाले की काय, अशी शंका यायचे हे दिवस. इतकेच काय, कथा-स्वरूपात काही समजून घेण्यापेक्षा वृत्तांत वाचून बुद्धीला सतत ‘शार्प’ करायचे हे दिवस आहेत, असे वाटत असताना प्रश्न पडतो – लघुकथेची खरंच गरज राहिली आहे का? लेखकाला आणि वाचकाला?
मग आताच्या कथेची व्याख्या तरी काय, कथा कशाला म्हणायची, या प्रश्नाला मात्र उत्तर मिळाले नाही. मात्र ‘प्रत्यक्ष घटनेवर आधारित ही कथा आहे अन् तुम्हाला कशी काय नाही आवडली?’ अशी विचारणा अनेकदा समोरून होते तेव्हा प्रश्न पडतो, वास्तवावर आधारित असणे हे उत्तम कथेचे लक्षण म्हणायचे का? फाळणीच्या कथा या फाळणीची हकीकत सांगण्यासाठी लिहिल्या नसून त्या अनुषंगाने माणसाच्या दु:ख, विवंचनेचा शोध घेणाऱ्या कथा होत्या असे समीक्षक सांगतात ते पटले होते; पण इथे कसे पटवून देणार आणि कोण ऐकायला बसला आहे, असे गैरजरुरी मुद्दे..
आधीच्या एकरेषीय कथेला दात फुटून ती आता- कंगव्याने काढावे तसे विंचरून विंचरून काढते आहे. संक्षेपाचे भान राहिले नसल्याने तिचे गोष्टीरूप क्षीण होते आहे या माझ्या समस्येला दोन उपाय आहेत : एक म्हणजे ही कथा समजण्यासाठी डोके ताळय़ावर पाहिजे असा कथेच्या वतीने, तर या दिवसांत दैनंदिन व्यवहारात असो वा कला-साहित्याच्या प्रांतात; वर्तमान आणि त्याच्या वास्तवाचा प्रकाश एवढा प्रखर होत चालला आहे, की आता थोडय़ा छाया-प्रकाशात राहायची मनाला ओढ लागलेली आहे, असा माझ्या वतीने उपाय आहे. एका हिंदी समीक्षकाचे हे मत.
अशी ओढ घेऊन कथा वाचन चालू असताना ‘नव-अनुष्टुभ’ मासिकात अनिल साबळे नावाच्या नव्या कथालेखकाची एक कथा वाचण्यात आली आणि तशा छाया-प्रकाशात आल्याचा अनुभव आला. ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा संग्रह हाती आला आणि संग्रह झपाटल्यासारखा वाचून काढला.
कथासंग्रहातल्या आठही कथा उपरोक्त निकषावर उतरलेल्या असल्याने वेगळय़ा अशा वातावरणात आपल्याला घेऊन जातात. राना-वनात भटकत राहणाऱ्या एका साधारण आर्थिक स्थितीच्या कुटुंबातला एक मुलगा- त्याचे चौथी ते नववीच्या वयादरम्यानचे अनुभव मांडणाऱ्या या प्रथमपुरुषी निवेदनाच्या कथा. (कथेत संवाद येतात, ती भाषा माडगूळकरांची आठवण करून देणारी.)
साबळे यांच्याकडे शालेय जीवनातले अनुभव, रानातल्या भटकंतीचे, शिकारीचे अनुभव, आठवणी, सूक्ष्म निरीक्षण या सगळय़ांचं (बैलगाडीच्या चाकाएवढय़ा मोहोळाएवढं) भांडार आहे. या निरीक्षणातल्या शब्दांचा दंश (शेरांची कुपाटनी, सावरीचा काटा लावलेली आळपणी) वाचकाला होतो आणि तो या वातावरणाचा हिस्सा बनून जातो. प्रत्येक कथेत निसर्गाच्या परिसराचे असे जिवंत वर्णन (का चित्रण?) आजवर कुठे वाचण्यात आले नव्हते. साबळे यांची पहिली कथा (घोरपड) वाचताच ती लक्ष वेधून घेते. निवेदक पोरगा, मांडीवर अर्धमृत घोरपड घेऊन सायकलच्या मागे बसलेला आहे आणि ओबडधोबड रस्त्यावरून जातो आहे, हे वर्णन बेचैन करणारे आहे. ‘आग्या मोहळाच्या चवताळलेल्या माशा वडावरच्या हिरव्या पोपटांनाच चावून मारून टाकतात’ असं वाचून आपण अस्वस्थ होतो. आपण वेगळय़ा कथन-परिसरात आलो आहोत हे लक्षात येते. संग्रहातल्या कथा वाचत जाताना, सरडे मारणे, मासे पकडण्यासाठी गळाचा वापर, मधमाशांना हुसकावणे, कोंबडी पकडताना कोंबडीच्या हालचाली, असे तपशील वाचताना निवेदकाच्या ‘स्वस्थ चित्ता’चे आश्चर्य वाटते, मग स्वाभाविक वाटत जाते.
प्रसंगाची जडणघडण, त्याचा विस्तार आणि शेवट, असे लेखनाला कथारूप देणारे टप्पे बाजूला सारून तपशिलाचे सूक्ष्म वर्णन लेखक करतो. हे वर्णन एवढे छान आहे की वाटतं, काही सांगायची तीव्र इच्छाच कथेचा उगम असते. (त्या उलट, तीव्र इच्छेशिवाय लिहिलेली कथा रेंगाळते. मग तिला जोर देण्यासाठी लेखक स्वत: डोकावतो आणि कथा बिघडतच जाते.) शिवाय असंही वाटून जातं- कथा ही कथन शैलीत तरी असते किंवा अनुभवाच्या तल्खीत.
संग्रहातल्या कथा तशा आकाराने मोठय़ा. लेखकाला निरीक्षण आणि तपशीलवार आठवणींचे वरदान लाभल्याने त्याच्या तलम वीण असलेल्या वर्णनाचा अचंबाही वाटतो आणि कौतुकपण. कथा-विस्तारामुळे गोष्टीरूप विरळ होऊन लेखाकडे कथा झुकते की काय असे वाटते, पण तसे होत नाही. तपशीलवार निवेदन आणि निरीक्षणाच्या पटातून धूप-छाव कापड मध्येच झळाळी दाखवून जातं, तशी या लेखनातून कथात्मकता जाणवत राहते- जरीच्या रेषेची ती चमक. संग्रहाच्या शीर्षकाची कथा हे एक उदाहरण. कथानायक नापास झालेला, कडक उन्हात चालला आहे. पाचोळा होऊन गेलेले त्याचे मन.. अशा वातावरणात अधूनमधून येणारे आई-मावशी, बहिणीचे संदर्भ, लग्न झालेल्या त्या पोरीचे, मायेचे अन् आपुलकीचे संदर्भ असा कथात्मकतेचा एक धागा यातून विणत जातो. कथेच्या आंतरिक आवेगात लपून असणारी ही स्पंदने टिपण्यासाठी आपल्यालाही लेखकाइतके सावध असावे लागते.
‘हिरव्या चुडाआड बुडालेलं’ या कथेतही क्रौर्य आणि सोशीकतेच्या तपशिलामागे अस्वस्थतेचा एक सूर लावून धरलेला जाणवत राहतो. निवेदक हे सगळे तटस्थपणे सांगत जातो; तथापि या कथेचा नायक चौथी नापास झालेला- त्याच्या वयाच्या मानाने निवेदन जड झालेले आहे. ही कथा तृतीयपुरुषी निवेदनाने अधिक परिणामकारक झाली असती असंही वाटून जातं. मोठय़ा आईचा, बैलांच्या पाठीवर चाबकांच्या व्रणांवर हळदीचा हात फिरवणे आणि माठातल्या लोणच्यांना तिचा हळदीचा हात फिरवलेला असणे या बाबींचा जो संयोग आहे, तो लेखकाच्या लहानपणाच्या निरीक्षणाचे संपादन आहे असे म्हणता येईल.
या संग्रहातली, ‘मच्छा’ ही व्यक्तिचित्रणात्मक कथा महत्त्वाची आहे. लेखकाने मच्छाचे वर्णन ज्या तटस्थतेने केले, ती विलक्षण हकीकत वाचून मन सुन्न होऊन जाते. कथेतले, मच्छाच्या कक्षेबाहेरचे वर्णन वगळले असते तर हा सुन्नपणा अधिक तीव्र झाला असता. मच्छाच्या अपघातानंतर रक्ताचं थारोळं साय धरू लागलं, नंतर ते भाकरीसारखं जाड झालेलं, मच्छाचं विस्कळीत झालेलं दप्तर पोलिसाने छतावर- मेलेल्या मांजरासारखं फेकावं.. काय विलक्षण उपमा आहेत या. केवढी दृश्यात्मकता येते यामुळे. आजच्या कथालेखनात उपमा-प्रतिमा कमी दिसतात याचे कारण मीडिया आणि तशा दृश्यांची सवय झालेली आहे, हे असावे का.. डोळय़ांसमोर दृश्यांचा सपाटा चालू असताना नजरेसमोरच्या दृश्यांची गरज नसावी?
घोरपड, सरडा, मासे यांची अगदी स्वस्थ चित्ताने हत्या केलेली वर्णने वाचताना लेखकाच्या स्वस्थ चित्ताचा अचंबा वाटतो, लेखन-व्यवहाराचे त्याला असणारे भान आणि त्याची सजगता पाहून कौतुक वाटते. (आणि असेही वाटते, घटना कमी, वर्णन जास्त असल्याने ‘कथेची’ घुसमट होत आहे की काय..)
‘मोहोळ’ही कथा, विविध झाडांवर असलेल्या मोहोळांच्या शिकारीची कथा. तीच ईर्षां, तीच धावपळ आणि मोहोळाचा ‘कांदा’ हाती आल्यावर चाटून-पुसून भरपूर मध खाण्याचा तो आनंद. थरारक असे अनुभव आहेत हे. (मनगटाला माशी चावली आणि हात बेडकासारखा फुगला- काय निरीक्षण आहे हे!) विविध प्रकारच्या लालसेनं झपाटलेली पोरं-माणसं आहेत या कथेत. निवेदकाला तो थरारक अनुभव घ्यायची लालसा, मेंढय़ा राखणाऱ्या छबूला त्याचा मालक शिळय़ा भाकरी आणि मिरचीचा गोळा देतो- पाणीही मिळत नाही त्याला. अशा वेळी मोहोळाची पोळी हीच अन्न-पाणी होते त्याच्यासाठी. हौस म्हणून मोहोळाला छेडायला गेलेला प्रकाश, मधमाशांच्या दंशाने सात-आठ दिवस घरी पडून असतो अन् त्याची मजुरी बुडते. ठाकरवाडीच्या लोकांसाठी मोहोळ विकणे हा पोटापाण्याचा व्यवसाय असतो. इथेही मोहोळ काढण्याच्या विविध प्रसंगांतून कथेचा ‘कांदा’ निसटून गेला असे वाटत जाते.
संग्रहात प्रत्येक कथेत निवेदकाचे चालणे आहे. शेताकडे, शाळेकडे, मावशी-आजीच्या घराकडे. कच्च्या रस्त्यावरून, नाही तर लांबलचक डांबरी रस्त्यावरून. त्याच्या अशा भटकंतीसोबत अनेक नवीन शब्द आपल्याला भेटत जातात- कधी न पाहिलेली रानफुलं असावीत तसे. ‘गळ’ या एकाच कथेतले हे शब्द उदाहरण म्हणून देता येतील- घशाची घाटी, गलोलीचं फडकं, पाण्याचा मोघाळा, गाठण, टोकर, गबाळ, खोडवा.. झाडाझुडपातून जाताना अंगाला चिकटणाऱ्या बोंडासारखे, कुपाटय़ांसारखे हे शब्द; अशा ‘वाळलेल्या’ शब्दांना लेखकाने जिवंत केले आहे. लेखकाच्या निरीक्षणाची ही उदाहरणंसुद्धा लक्षात राहून जातात- कोंबडी धरताना कुपाटीतून ती ‘वाकडीतिकडी’ पळायची, वेगाने कंबर हलवत रस्त्यावरून जाणारी घोरपड, दाताने काडय़ाची पेटी ‘करंडत’ असणारा भुंगा. माशांचा घोंगाव खाली पडणे, दोन्ही डोळे गेलेले असल्याने जागरण करणारा वाघ्या, धनगर आळीतून मुरवणी (विरजण) आणणारी आई, किती तरी दिवसांनी घरातल्या माणसांच्या कातडीचा वास माझ्या काळजाला भिडला.. एखादं जित्राप हातात धरून ठेवावं तसं लेखकाने या कथा ‘धरून’ आपल्याला दाखवल्या आहेत. सावध-चित्त निरीक्षण आणि तल्लख-सूक्ष्म अशा आठवणींच्या या कथा वाचकाला खिळवून ठेवतात, त्या वेळी वाचकाला कथात्मकतेची निकड वाटत नाही. आजच्या मीडिया-धारी वाचकाला डांबरी रस्त्यावरून अनवाणी चालायचा अनुभव देणाऱ्या, मात्र ऊन-सावल्यांचे कवडसे धरून असणाऱ्या साबळे यांच्या या खूप चांगल्या कथा आहेत.