मनस्विनी लता रवींद
बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर हा भाऊ पाध्येंचा एक तटस्थ नायक. जो खरं तर कशालाच जबाबदार नाही. तो काहीच घडवत नाही. तो वैश्विक निष्क्रिय नायकांची परंपरा सांगतो. पण त्याच्या आयुष्यातल्या घटना मात्र ड्रॅमॅटिक आहेत. हा नायक जगावर रागावलाय, का रागवलाय? त्याला काय खटकतं आहे? मध्यमवर्गीय थोतांडपणा? हा कुठून येतो? लेखक कशाबद्दल बोलू बघतोय?
भाऊ पांध्येंचं कादंबरी आणि कथालेखन साठीच्या दशकापासून ते नव्वदच्या मध्यापर्यंत गाजावाजा करीत मराठी मध्यमवर्गाला दचकवत राहिलं. हयातभर त्यांच्या लिखाणावर प्रचंड टीका झाली. एका विशिष्ट- उच्चभ्रू जाणिवेच्या समुदायाने ते सरळसरळ नाकारलं. त्यांनी केवळ भाऊ पाध्येंनाच नाकारलं असं नाही, तर दलित पँथर, अनियतकालिकांची चळवळ या सगळय़ाशी फटकून राहण्यात समाधान मानलं. पण भाऊ पाध्येंच्या प्रतिभेचा आवाका इतका प्रचंड होता की, त्याकडे मध्यमवर्गाला पूर्णपणे दुर्लक्ष करता आलं नाही. आजच्या साहित्यावर साठोत्तरी साहित्य चळवळीचा प्रभाव नक्कीच आहे. प्रभाव किंवा त्यामुळे झालेला बदल- म्हणजे जशाच्या तशा शैलीशी निगडित प्रभाव नाही, तर हे सगळं साहित्य निर्माण झाल्यामुळे आज बेधडक लिहित्या लेखकांच्या आशय-विषयात आलेली विविधता आणि वैश्विकता अशा अर्थी तो प्रभाव.
साठ-सत्तरीच्या दशकातल्या बऱ्याच कथा-कादंबऱ्या मला आवडतात. ज्या लेखकांनी मराठी साहित्याची दिशा बदलली, त्यांचं लेखन आवर्जून पुन्हा वाचावंसं वाटतं. कमल देसाईंची ‘काळा सूर्य – हॅट घालणारी बाई’, श्री. दा. पानवलकरांचा ‘जांभूळ’ हा संग्रह, विलास सारंगांची ‘एन्कीच्या राज्यात’. बाबूराव बागुलांचा ‘जेव्हा मी जात चोरली होती’ हा कथासंग्रह, अण्णा भाऊ साठेंच्या सर्वच कादंबऱ्या आणि बरंच.. मी इथं काहीच प्रातिनिधिक नावं लिहितेय, माझ्याकडूनच खूप नावं राहून जातील, इतकी ती आहेत. त्यातलीच एक माझी प्रचंड आवडती कादंबरी म्हणजे ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’.
‘व्यभिचारी नाहीस, हाही तुझ्या स्वभावातला खोटेपणाचाच भाग आहे’ – अनिरुद्ध धोपेश्वरकर आपल्या बायकोबद्दल हे म्हणतो. या बॅरिस्टर असलेल्या मुळात अभ्यासात हुशार अनिरुद्ध धोपेश्वरकरला प्रॅक्टिस मात्र करता येत नाही. बिचारे अशील अत्यंत आशेनं येतात, पण हा सतत केस हरतो. त्याच्या खोटेपणा नाकारायच्या अट्टहासाचा हळूहळू अतिरेक होऊ लागतो. आधी तो प्रॅक्टिस सोडतो, मग तो त्यांच्याकडे कधी तरी काम करत असलेल्या आयव्ही नावाच्या ख्रिश्चन मुलीला भेटतो, तिच्यासोबत क्लारा असते. एक सेक्सी (उत्तान) सुंदर स्त्री. आयव्ही शांत, शामळू आणि सोज्वळ, तर क्लारा दिसायला बोल्ड आणि बिनधास्त. दोघींच्या घरी याचं जाणं-येणं वाढतं. कारण नायकाला त्याच्या आजूबाजूच्या जगाचा कंटाळा आलेला असतो. तो एक निष्क्रिय नायक बनतो, एका वैश्विक निष्क्रिय नायकांची परंपरा सांगणारा. एक समान आकृतिबंध आशयाची मोळी बांधायची झाली तर सात्रं, काम्यू, काफ्का यांच्या अस्तित्ववादी नायकाशी नातं सांगणारा.
तिथं प्रियंवदा- त्याची बायको आणि त्याचे वडील आणि सोसायटीमधले उच्चमध्यमवर्गीय शेजारी, स्नेही. सोसायटीच्या कार्यक्रमात तीच तीच गाणी गाणारे, थोडी झाली की समोर आपल्या बायका चिवडा-फरसाण खात असताना कोपऱ्यात ‘मी कसा वेश्येकडे जातो’ हे मिरवून सांगणारे पुरुष. मध्येच भावनिकतेचे उमाळे आणत सामाजिक कार्य करून स्वत:च्या चंगळवादी वृत्तीच्या ‘गिल्ट’चं परिमार्जन करणारे लोक, स्वत: मॉडर्न असल्याचा आव आणून सतत इतर स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल गॉसिप करणाऱ्या महिला मंडळातल्या स्त्रिया. हे जग सोडून अनिरुद्ध हा क्लारा आणि आयव्हीच्या घरी सिगारेटी ओढत पडून राहू लागतो. त्यांच्याबरोबर जोक्स कर, क्लारासोबत थोडं फ्लर्ट कर. लेखक लिहितो, ‘क्लाराच्या डोळय़ातल्या निखाऱ्याशी डोळे भिडवावेत आणि आपली कधी शिकार होते त्याची वाट पाहावी.’ इथंदेखील नायक शिकार करत नाही, तो शिकार होण्याची वाट बघतोय. तो स्वत:हून केवळ माकडचाळे करतो, सिगारेटी ओढतो आणि वेळ दवडतो. कारण त्याला त्याशिवायच्या व्यवहारात खोटेपणा वाटतो. अगदी बायको मूल व्हावं म्हणून मागे लागते आणि डॉक्टरकडे घेऊन जाते, त्यातदेखील तिच्या त्या अट्टहासातला फोलपणा त्याला जाणवत राहतो..
त्या आयव्ही आणि क्लाराच्या घरी एक रायसाहेब, क्लाराचा बॉस येऊ लागतो. त्याचं आयव्हीबद्दल मत आहे, की ती चांगली मुलगी आहे, शांत- साधी. क्लाराबद्दल मात्र तसं मत नाही. कारण तिच्यातला मोकळेपणा.. क्लाराबद्दल रायसाहेबला आकर्षण आहे, त्याचमुळे तो या घरात सतत येत-जात राहतो. या बॉसचं येणं-जाणं वाढतं आणि एक दिवस कळतं की आयव्ही गरोदर आहे. रायसाहेबामुळे..
एक तटस्थ नायक, जो खरं तर कशालाच जबाबदार नाही. तो काहीच घडवत नाही. तो निष्क्रिय आहे. पण त्याच्या आयुष्यातल्या घटना मात्र ड्रॅमॅटिक आहेत. भाऊ पाध्येंच्या लिखाणाचं हे वैशिष्टय़. एखाद्या सिनेमाच्या पटकथेसारखं त्यांचं लिखाण असतं. ‘राडा’ कादंबरी तर जशीच्या तशी एक ‘स्क्रीनप्ले’च आहे असं वाटतं.. जसं एकीकडे भाऊ पाध्येंचं लिखाण अस्तित्ववादी छटा घेऊन चालतं, तसंच दुसरीकडे चित्रपटाच्या (मुख्यत: हिंदी ) फिल्मी आकृतिबंधाशी पण जवळचं नातं सांगतं.. ते सिनेपत्रकार होते आणि त्यांची चित्रपटखादाडीदेखील खूप होती, हेदेखील त्याचं कारण असू शकतं.
दुर्गा भागवत यांसारख्या अपवादात्मक विदुषीनं भाऊ पाध्येंच्या लिखाणाला प्रोत्साहन दिलं असलं तरी त्या काळी स्त्रियांना भाऊ पाध्येंचं लिखाण फारच पुरुषी वाटे. हिंसक वाटे. अगदी अलीकडे माझ्या एका मैत्रिणीनं मला ‘तू स्त्री असूनदेखील तुला भाऊ पाध्येंचं लिखाण कसं आवडतं’, असा प्रश्न केला होता. भाऊ पाध्येंच्या नायकाला, अनिरुद्ध धोपेश्वरकरला त्याच्या बायकोच्या वागण्यानं जो मनस्वी संताप येत असेल, तो काय असेल, हे मी समजू शकले. कारण स्त्रियांचं चांगलं- तूप-साखरेतलं (मध्यमवर्गाला हवं तसं) चित्रण म्हणजे योग्य चित्रण नव्हे, हे कसं समजावून सांगावं, तेदेखील आजच्या काळातल्या स्त्रियांना. पुरुषी मानसिकतेनं लिहिणं आणि पुरुषी मानसिकतेबद्दल लिहिणं या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत. पण अशा वेळी अनिरुद्ध या नायकासारखं तिथून निघून जाणंच योग्य.
रायसाहेब जेव्हा आयव्हीसाठी अनिरुद्धकडे दोन पपया देतो आणि तिला ते मूल पाडून टाकायला सांगतो, तिथला संवाद विशेषत: पुरुषी मानसिकतेचं विलक्षण चित्रण करतो. रायसाहेब सांगतो की, आयव्हीसोबत त्यानं जे केलं ते क्लारामुळे केलं. कारण क्लारा त्याला लाइन देत होती. मग ती त्याच्याशी फटकून वागू लागली. त्यामुळे त्याचा बदला घ्यायला किंवा त्याचा राग काढायला त्यानं आयव्हीसोबत असं केलं. त्याला याची खंत नाही, उलट तोच कसा बिचारा होता आणि क्लारा कशी त्याला खेळवत होती असं तो बोलत राहतो. त्यातून त्याचा दुटपीपणा दिसतो. नायकाला हे बोलणं समजतं आणि तो कंटाळून जातो. आणि मग तिथून निघूनच जातो..
तर हा तटस्थ नायक, जगावर रागावलेला, का रागावलाय? त्याला काय खटकतं आहे? हा मध्यमवर्गीय थोतांडपणा? हा कुठून येतो? लेखक कशाबद्दल बोलू बघतोय?
ब्रिटिशांच्या राजवटीत पहिला शिक्षणलाभ झाला उच्चभ्रू आणि उच्चवर्णीयांना. त्यातून आपल्या देशीयांत नवा मध्यमवर्ग अवतरला- जो सर्वार्थाने इंग्रजांचं अनुकरण करणारा होता. ब्रिटिशांच्या आमदानीत नाटक- मनोरंजनाची भाषा त्याची धाटणी आणि संवेदना ही एका विशिष्ट वर्गाला पूरक होती. एका मराठी मध्यमवर्गीय भावनांचं उदात्तीकरण करणारी एक व्यवस्था निर्माण झाली. नाटक, मराठी साहित्य यातलं भावनांचं सुलभीकरण आणि उदात्तीकरण, शाब्दिक कोटय़ा ही परंपरा पुढे बराच काळ सुरूच राहिली. आजही टेलिव्हिजन, काही प्रमाणात व्यावसायिक नाटक त्याच परिघात अडकलेलं दिसतं. यानं झालं काय की, जागतिक संवेदनेपासून मराठी साहित्याला अजूनच लांब नेलं. काही ठोकताळे निर्माण केले जे अजूनही आहेत. आदर्श स्त्रियांची प्रतिमा, सेक्शुअॅलिटीला दिलेली सोयीस्कर बगल, ग्रामीण शहरी असा भेदभाव. ग्रामीण सगळं कसं सुंदर, शहर कसं वाईट. वाया गेलेली तरुण पिढी.. हे नॅरेटिव्ह तर अजूनही संपतच नाही.
ही एक सामाजिक पार्श्वभूमी समजू. याचा समाजजीवनावर मोठा परिणाम झाला. चित्रपटांचादेखील झाला आणि एक मध्यमवर्गीय उचंबळलेपणाची खऱ्या प्रश्नापासून लांब स्वत:च्याच गोष्टींना कुरवाळण्याची एक वृत्ती तयार झाली. ती झिरपत राहिली. या वृत्तीचा बळी असलेला हा समाज, जो थोतांड आहे, दुटप्पी आहे. तो जगतो एक आणि बोलतो दुसरंच. त्या समाजाची मनस्वी चीड भाऊ पाध्येंच्या प्रत्येक वाक्यागणिक जाणवते. आयव्ही गरोदर झाल्यावर नायक तिचं मूल माझं आहे सांगतो, पुढे त्याचा प्रवास एका शोकांतिकेकडे जाणारा असला तरी रोचक आहे.
भाऊ पाध्ये भाषेची लई गम्मत करतात, त्यांच्या पात्रांच्या नावांच्या- आडनावांच्या प्रयोजनातदेखील त्यांची विनोदबुद्धी जाणवते. हातवळणे, भुजबळ, अनुसुयाबाई, प्रियंवदा, चक्रपाणी, कस्तूर, इंगळहळ्ळीकर, अभिमन्यू. खरोखरच इथं जो संगीत नाटकांचा उल्लेख केला त्यात शोभावी अशीच सर्व नावं त्यांनी पात्रांना दिलेली दिसतात. एखाद्या प्रसंगाचं वर्णन करायला भाऊ पाध्येंना कमीत कमी शब्द लागतात. मी मजेस आलो होतो, हिडीस समागम, शत्रुत्व हीसुद्धा एक नशाच.. यांसारखी अनेक उदाहरणे घेता येतील. यात येणारी मुंबई, त्यातली मुंबईची विविध पार्श्वभूमी असलेली पात्रं. ख्रिश्चन मुली, रायसाहेबासारखा बिझनेस मॅन, उच्चभ्रू समाजात पॉश सोसायटीत राहणारी उच्चवर्णीय स्त्री, जिने नवरा परदेशात शिकलाय हे बघून लग्न केलंय, विविध रेस्टॉरन्ट्स, सिनेमा हॉल्स, बस थांबे. मुंबई डोळय़ासमोर तरळून जाते. फार मोठी लांबलचक वर्णनं नसली तरी भाऊ पाध्येंच्या बऱ्याच लिखाणात मुंबई एक पात्र बनून आलेली दिसते.
बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर हा एक सणकी तरुण, उच्चमध्यमवर्गीय प्रिव्हिलेज्ड कुटुंबातला. जसा ‘राडा’मधील नायक होता तसाच. त्याला आपण प्रस्थापित असल्याची मनस्वी चीड आणि खंत आहे, आणि त्यापेक्षा जास्त चीड आहे ती इतर आजूबाजूचे प्रस्थापित त्यांच्या प्रस्थापितपणाचा कसा गवगवा करत आहेत याची. त्यांच्या मनात सिस्टीममधल्या विषमतेबद्दल जराही विषाद नाही याची. या सिस्टीमची मोडतोड करायची उत्कट ऊर्मी भाऊ पाध्येंच्या नायकाला सतत होत असते. बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर मध्येदेखील ती होते. घरात आलेली फुलपुडी उघडून, त्यातला हार गळय़ात घालून मग जुनं मेडल घेऊन त्यावर ‘आयडियल हसबंड’ असं कागदावर लिहून ते मेडल घालून हा शेजारच्यांकडे जातो.. अनिरुद्ध सतत या अशा वेगळय़ाच गोष्टींतून मजेशीर पद्धतीनं व्यक्त होताना दिसतो. हळूहळू त्याचा हाच स्वभाव पुढे त्याला मोठे निर्णय घ्यायला भाग पाडतो. एखाद्या शेक्सपिअरच्या ट्रॅजेडीत असतो तशी स्वभावातली उतरण अनिरुद्धचं आयुष्य ठरवत जाते. कादंबरीचा शेवट जरी पूर्ण शोकात्म नसला तरीदेखील त्यानं स्वत:ला बरबाद करायचं ठरवलं आहे, असा हा नायक बनतो..
आयुष्य फुंकून टाकणाऱ्या साहित्यातील कित्येक अभिजात व्यक्तिरेखांप्रमाणे भाऊ पाध्येंच्या नायकाची बंडखोरी आणि स्वत:ला बरबाद करून घ्यायची वृत्ती अधिक समर्पक वाटते. त्यातली गुंतागुंत, तिरकस विनोद आणि अपरिहार्यता त्याच्या वागण्याचं समर्थन करते. कारण ज्या गोष्टीची चीड आहे, त्याच्याच विरोधात बोललं जातं. त्यात पाध्ये मुळीच गफलत होऊ देत नाहीत. आणि ते ढोबळदेखील होऊ देत नाहीत.
उच्चमध्यमवर्गीय उच्चवर्णीय जाणिवेच्या समाजात अजूनही पुलं, दि. बा. मोकाशी अशा काही मोजक्याच लेखकांची नावं घेतली जातात. अगदी त्याच वकुबाचे असूनही श्री. दा. पानवलकर, विलास सारंग यांनादेखील डावललं जातं. अण्णा भाऊ साठे, लक्ष्मण गायकवाड, ऊर्मिला पवार यांना तर अर्थात वेगळा कप्पा करून त्यात बसवलं गेलं. या धर्तीवर स्वत:ला बरबाद करू पाहणारा भाऊ पाध्येंचा हा बंडखोर, विदूषकी गमत्या आणि खोटेपणाची अॅलर्जी असलेला नायक सगळय़ांनी मुद्दाम अनुभवावा, वाचावा- त्यातल्या भाषेसाठी, पात्रांसाठी, नाटय़मय प्रसंगांसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका चांगल्या कलाकृतीची अनुभूती घेण्यासाठी!
रंगकर्मी, कथाकार, दिग्दर्शिका आणि लोकप्रिय टीव्ही मालिकांची लेखिका ही मनस्विनी लता रवींद्र यांची ओळख. गेल्या दीड दशकातील साहित्यात पठडीबाहेरच्या कथांमुळे लोकप्रिय. ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’, ‘हलते-डुलते झुमके’ हे लक्षवेधी कथासंग्रह प्रसिद्ध. अमर फोटो स्टुडिओ, सिगारेट्स, डावीकडून चौथी बिल्डिंग ही काही नाटके. दिल दोस्ती दुनियादारी या टीव्ही मालिकेचे लेखन.manaswini.lr@gmail.com