मंगला गोडबोले
या संग्रहामधलं वास्तव हे मुख्यत्वे महानगरी आणि आधुनिक आहे. मराठीतल्या लोकप्रिय कथाविश्वामध्ये त्याचा मुख्यत्वे उच्चभ्रू, सुखवस्तू लोकांचा तोंडवळा दिसतो तर या कथांमध्ये त्याची उदास-कुरूप किंवा प्रसंगी बीभत्सही मुद्रा समोर येते. महानगरी जीवन उपभोगणाऱ्यांचं हे जग नाही.
तर त्याने येणारी फरपट भोगणाऱ्यांचं हे जग आहे. गरिबी- टंचाई- जातवास्तवाचे चटके-शरीरमनाची उपासमार-विश्वासघात-प्रतारणा यांच्याशी सतत सामना करणाऱ्यांचं जग आहे.
माझ्या नंतरच्या पिढय़ांमधले लोक विशेषत: स्त्रिया काय लिहिताहेत, त्यांचा साहित्याकडे आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांचं-आपलं याबाबतीत कुठे काही नातं उरलंय की नाही, हे समजून घ्यायला मला आवडतं. त्या दृष्टीने मी प्रयत्नपूर्वक मिळवून आजच्या पिढीचं लेखन वाचत राहते. काही वेळा ते माझ्यापर्यंत पोचतं, तर काही वेळा पोचत नाही. या सगळय़ा शक्यता गृहीत धरूनच शिल्पा कांबळे यांचा ‘नऊ चाळीसची लोकल’ हा कथासंग्रह मी वाचला. जेमतेम सव्वाशे छापील पृष्ठांचा ऐवज असणारं हे ‘प्रकरण’ मला अनेक अंगांनी महत्त्वाचं वाटलं.
शिल्पा कांबळे यांचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील धारावाहिक मालिकेशी जोडलं गेल्याचं मला माहीत होतं. पण ती मालिका मी अधूनमधून धावती पाहिली होती. तशाच अधूनमधून ‘अक्षर’, ‘अंतर्नाद’ या मासिकांमधल्या त्यांच्या कथाही वाचनात आल्या होत्या. पण सलग वाचनानुभव फक्त या पुस्तकाबाबतच घेतला आणि अस्वस्थ झाले.
पुस्तकाच्या मलपृष्ठावर सतीश आळेकर यांनी दिलेला इशारा मी वाचला होताच. त्यात आळेकरांनी म्हटलं होतं, ‘‘या काही सरळ चालीच्या कथा नाहीत. यात सुफल संपूर्ण होणारी राजाराणीची गोष्ट नाही.. यामध्ये निश्चित असे सामाजिक भान आणि ठाम अशी राजकीय भूमिका आहे. आर्थिक उदारीकरणानंरच्या सामाजिक आणि राजकीय घुसळणीतून आलेल्या या नागमोडी वळणाच्या पण अत्यंत वाचनीय अशा कथा आहेत.. नीट डोकावून बघितले तर हा कथाऐवज म्हणजे आंबेडकरी विचाराच्या साहित्य चळवळीचा पोस्ट मॉडर्न धागा आहे.’’
हा धागा घट्ट धरून ठेवणं, या कथा लिहिणं, आपल्यासाठी अपरिहार्य होत गेलं हे सांगताना पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखिका म्हणतात, ‘‘कधी मनासारखे लिहून होते. कधी लिहिलेले परत उसवावे लागते. कधी आपणच लिहिलेले आपल्यासमोर दात उचकावत अदृश्य हडळीसारखे उभे राहते. आपण घाबरतो, सावध होतो, पण लिहिण्यापासून पळता येत नाही.’’ असं जखडून ठेवणारं या संग्रहामधलं वास्तव हे मुख्यत्वे महानगरी आणि आधुनिक आहे. पण मराठीतल्या लोकप्रिय कथाविश्वामध्ये त्याचा मुख्यत्वे उच्चभ्रू, सुखवस्तू लोकांचा तोंडवळा दिसतो, तर या कथांमध्ये त्याची उदास – कुरूप किंवा प्रसंगी बीभत्स मुद्राही समोर येते. महानगरी जीवन उपभोगणाऱ्यांचं हे जग नाही. तर त्याने येणारी फरपट भोगणाऱ्यांचं हे जग आहे. गरिबी – टंचाई- जातवास्तवाचे चटके – शरीरमनाची उपासमार – विश्वासघात -प्रतारणा यांच्याशी सतत सामना करणाऱ्यांचं जग आहे.. यात स्त्रियांचं पुरुषांनी केलेलं शोषण आहे तितकंच पुरुषांचंही व्यवस्थेने केलेलं शोषण आहे. बी. एम. सी.च्या, भीमनगरच्या ‘रूम’ मध्ये राहणारे यातले बहुतांश लोक पंजाला ‘व्होट टाकणारे’ आहेत. बेकारी – गुंडागर्दी – रंडीबाजी – व्यसन – नशा – लैंगिक कुचंबणा तिच्यापायी लैंगिक कल्पनाविलास अनेक पुरुषांच्या वाटय़ाला आलाय. तर नाकात तपकीर टाकणाऱ्या चौपाटीवर फुगे – माळा विकणाऱ्या काळं दातवण लावणाऱ्या नवऱ्याचा मार खाणाऱ्या, आंटीशी गुफ्तगू करणाऱ्या, आपण फक्त मुलगेच जन्माला घातले म्हणून तोऱ्यात राहणाऱ्या, सहज शिव्या देणाऱ्या अनेक बाया पुस्तकात ठिकठिकाणी आहेत. याखेरीज गाय – कुत्री – मांजरं – अस्वल – सटवाई अशी मानवेतर पात्रंही पुष्कळ आहेत. गरजेनुसार शुद्धोदन राजा, तेंडुलकर, त्यांनी निर्माण केलेली कमला, मुराकामी यांचीही आवजाव आहे. मराठी साहित्यविश्वाचे उल्लेख तर खूपच येतात. त्याचं नलीपण, खुजेपण, प्रसिद्धीलोलुपता, अल्पसंतुष्टता, साहित्य चळवळींचं बेगडीपण, हलक्या मनोरंजनाची सवय वगैरेंवर अनेकदा भाष्य येतं. त्यापेक्षा खूप वेगळं, खरं काहीतरी सांगण्याची आस जाणवल्याशिवाय राहत नाही.
दररोज ‘नऊ चाळीसची लोकल’ पकडून सरकारी नोकरीसाठी जाणाऱ्या एका महिलेला लोकलमध्ये एक सहप्रवासिनी भेटते. तिनं तिचं आत्मचरित्र एका बाडामध्ये लिहून ठेवलंय, जे बाड ती रोज स्वत:बरोबर बाळगते आणि कथेची नायिका ते दुरून चोरून वाचते. तिला त्या सहप्रवासिनीचं नावगाव कधीच कळत नाही, पण नवतरुणी असताना तिचं काहीसं विचित्र वाटणारं भावनाविश्व, स्वत:चं लग्न झाल्यावर – गरोदर राहिल्यावर, नकळत परिचित वाटायला लागतं. बाईपणाचा प्रवास हा समांतर असल्याचं जाणवतं.
‘प्रवास’ नावाच्या कथेत मुंबईत लोकलने कामाचं ठिकाण गाठणाऱ्या चाकरमान्यांच्या अनुभवांचा एक प्रकारचा कॅलिडोस्कोपच आहे. त्यात पुरुषस्पर्श व्हावा म्हणून मुद्दाम जेण्ट्स डब्याने प्रवास करणारी प्रौढ कुमारिका आहे. गाडीला लोंबकळून जाऊनही जीव वाचवू शकणारा प्रवासी आहे. अचानक पगारवाढ झाल्याने तावातावाने फलाटावर जाऊन वर्षांचा फस्र्टक्लासचा पास काढणारा ‘आदर्शवादी’ आहे. रोज सकाळी ‘विरार ते चर्चगेट’ हा सेकंडक्लासचा रेल्वेप्रवास करण्याची शिक्षा सुनावलेला तरुण आहे. लोकलच्या चेंगराचेंगरीत डब्यात शिरण्याच्या प्रयत्नामुळे गर्भपाताला सामोरं जावं लागणारी एक अश्राप नोकरदार आहे. निवृत्तीनंतर घरात शांतता मिळत नाही म्हणून मन रमवायला, वेळ घालवायला, दररोज ठरलेल्या ट्रेनने ऑफिसची वारी करणारे साटमकाका आहेत. या छोटय़ा कथेत महानगरी जीवनाचं सीमित करणारं दर्शन घडतं.
‘मांजरींनाही घर असतं’ या कथेत महानगरी जीवनात स्वत:चं घर असणं ही केवढी दुष्प्राप्य आणि मौलिक गोष्ट आहे हे ना ना प्रकारे सांगितलं जातं. ‘बहू’ या कथेत पोटासाठी तरुण वयात शहरात आलेल्या माणसाच्या शारीरिक गरजांची एकूण फरपट आणि त्यांची मोजावी लागणारी किंमत, दोन मित्रांच्या दोन वेगळय़ा प्रकारच्या कुचंबणांमधून समोरयेते. अशीच दोन मैत्रिणींची गोष्ट ‘आय लव्ह यू किटी’मध्ये सांगितली आहे. बिट्टूकडे चापटी मारल्यावर ‘आय लव्ह यू’ हे इंग्रजी गाणं म्हणणारी बाहुली आहे. निवेदिकेकडे ती नाही. दोघींमध्ये दिसण्या – असण्यापासून बरेच फरक आहेत. तरीही दोघींची जीवन, वेगवेगळय़ा वाटावळणांनी, वेगवेगळय़ा माणसांबरोबर जाऊनही त्यांच्या चापटी मारल्यावर ‘आय लव्ह यू’ म्हणणाऱ्या बाहुल्या व्हाव्यात हे त्यांचं भागधेय आहे.
या कथा लिहिताना तपशिलांचा जो बारकावा ही लेखिका दाखवते तो लक्षणीय आहे. बारीकबारीक तपशील एखाद्या कॅमेऱ्याने टिपावेत तसे लेखणीने टिपले जातात- मग ते भीम नगरातल्या रूममधले असोत, उच्चभ्रू परांजपे गार्डनमधले असोत, नाटक लिहिण्याच्या प्रोसेसचे असोत, रेल्वे फलाटावरचे असोत, गांजा – सिगरेट ओढणाऱ्यांच्या हालचालींचे असोत. कृतक् ग्रामीण किंवा कृतक् प्रादेशिक साहित्य वाचून कंटाळलेल्या वाचकांसाठी हा सच्चेपणा निश्चितच स्वागतार्ह ठरतो. ‘फालतू कल्पित कथा-कवितांचा तुच्छ उल्लेख पुस्तकामध्ये आहेच. लेखिका त्या वाटेला अर्थातच जात नाही आणि खरोखरीचं सच्चं, विश्वासार्ह अधोजग शब्दातून दाखवू शकते, ही मोठी ताकद तिच्यापाशी आहे.
तिच्याचबरोबर थोडा भडकपणाचा सोसही मला कुठेकुठे जाणवला. ‘दोछी’ या कथेत चळवळीत काम करणारी कमला (कमला १), तेंडुलकरांची नायिका कमला (कमला २) त्यांची भविष्यं लिहिताना तारांबळ उडालेली सटवाई (देव आपल्याला इनोव्हेटिव्ह काम करू देत नाही ही हिची तक्रार आहे!) या सगळय़ांची मोट वळू बघणारी केके नावाची लेखिका यांची खूप उलटसुलट ये-जा सुरू असते. त्या आपापसात बोलताना मध्येच वाचकांशी बोलतात. कोणी अचानक हवेतून अवतरते. कोणी पुतळय़ाच्या रूपात समोर येते. कधी केके हीच कमला होते. त्यात लेखिकेच्या पुरस्कारवापसीचाही उल्लेख येतो. एवढी सगळी उलाढाल एका कथेत हवीच होती का? का आहे तोच आशय जरा भडक – सनसनाटी करण्याचा मोह झाला? असा प्रश्न वाचकाला पडू शकतो.
‘बिर्याणी’ या कथेतही मंदिराची गाय घुली हिला पाळून गुजारा करणारी नायिका आहे. साहजिकच गो हत्येसारखा अतिसंवेदनशील विषय पुढे आणण्याची तयारी करून ठेवलेली आहे. कुरमुरी ही नायिका सकीनाच्या घरी राहते. सकीनाच्या नातवाचा जन्म नेमका ६ डिसेंबरचा आहे. सकीनाला भाभीने टी.व्ही. देऊन टाकला आहे. ज्याचा आवाज बंद पडलाय. एका कथेत किती म्हणून स्फोटकं कोंबणार? की असा ना तसा, वाचकाला दचकवायचाच चंग बांधलाय? अति दचकण्यानेही वाचकांच्या संवेदना बोथट झाल्या तर अर्थात ही माझी व्यक्तिगत आवड असू शकेल.
मात्र ही सगळी दुनिया रंगवताना लेखिकेने रचनेचे खूप प्रयोग केले आहेत. सरळ सांगावा असा कथाभाग अनेक कथांमध्ये मुळातच नाही. जो काही आहे तो कधी फ्लॅशबॅक तंत्राने, कधी दोन पात्रांच्या दोन स्तरांवरच्या निवेदनातून, कधी उपकथानकांच्या साखळीमधून अशा ना ना प्रकारे सांगितला आहे. कथांमधून मध्येच बाहेर येऊनही वाचकांशी थेट संवाद साधण्याची सवयही निवेदकाला आहे. तिच्यामुळे, माझं म्हणणं तुम्हाला पटतंय ना? माझी कथा पूर्ण वाचल्याबद्दल आभार. माझं अमुक पात्र तुम्हाला भेटलं तर त्याला असं असं सांगा, यासारख्या सूचना आहेत. खरं तर प्रत्येक कथा ही लेखिकेच्या दृष्टीने, वाचकांना काही जाण किंवा भान देण्याचं साधन आहे. पात्रांच्या आकस्मिक एन्ट्रय़ा व एक्झिट टाकल्याने ही जाण अनेकदा टोकदार होते. नुकतंच मरून दोन मिनिटं झालेलं पात्र आनंद व्यक्त करतं. तसंच एखादी कथा एकाच वेळी तीन-चार व्यक्तींचीही असल्याची सूचना आरंभी दिलेली दिसते. अशा अनेक ‘चित्त चक्षुचमत्कारिक’ बाबींनी हे पुस्तक भरून गेलेलं आहे.
मला विशेष महत्त्वाचा वाटला तो यामधला फॅण्टसीचा वापर. मुळातच मराठीमध्ये फॅण्टसी कमी लिहिली जाते. (मराठी माणूस परंपरेने वास्तवाच्या ‘कर्दमा’मध्ये इतका रुतलेला असतो की तो फॅण्टसीपर्यंत सहसा पोचत नाही, असं यावरचं भाष्य ऐकलेलं आहे.) त्यातही जी लिहिली जाते ती बालसाहित्यात किंवा विनोदनिर्मितीसाठी जास्त वेळा आढळते. वास्तवाची दाहकता दाखवण्यासाठी असा फॅण्टसीचा वापर क्वचितच केला गेला असेल. वास्तवाची असह्यता, भीषणता अधिक टोकदार करण्यासाठी, समाजभाष्याकडे नेण्यासाठी फॅण्टसी लिहिणं यातली प्रयोगशीलता लक्षणीय आहे.
हरवलेल्या गोष्टी शोधून देण्यासाठी एखादं सेवा केंद्र -सेंटर – निघावं हे ठीक. पण त्यात जाणाऱ्या एखाद्याने माझा हरवलेला आवाज मिळवून द्या असं म्हणणं कल्पनारम्य व धक्कादायक. प्रत्येकाच्या भाळी भाकितं लिहिणारी सटवी (किंवा सटवाई देवी) आपल्याकडली लिहिण्याची सगळी पेनं चेचून, तोडून टाकते हे ठीक. पण हातात एक शेवटचं पेन ठेवते. त्या पेनाने ती यापुढे घराघरात जन्माला येणाऱ्या बाळाचं भविष्य ‘एकसारखं.. एकसामायिक.. एकमेकांसाठीचं’ लिहिणारं असते. ही कल्पनेपलीकडची कल्पना. एखाद्या बाईला गरोदरपणात कपडे न घालण्याचे डोहाळे लागतात. म्हणून लोक तिला वाळीत टाकतात पण मग ‘‘माणसाने कपडेच घातले नाहीत तर काय होईल?’’ या विचाराला चालना मिळते. एखाद्या माणसाला काजवे पकडायचा नाद लागतो आणि त्याला बोलणारे काजवे, पोहणारे काजवे असे सापडत राहतात. अशा खूप फॅण्टसीज या छोटेखानी पुस्तकात आहेत. वास्तवाची आणि कल्पनेची अशी बुद्धिमत्त सरमिसळ कमी बघायला मिळल्याने नजरेत भरण्याजोगी आहे.
अशा अनेक अर्थानी उत्तर आधुनिक कालखंडाचं चित्रण करणारा हा कथासंग्रह वाचनीय आहे. वाचकाच्या कक्षा विस्तारणारा आहे. आपल्या आसपास केवढं काहीतरी घडतंय – मोडतंय आणि आपण कुठल्या सुरक्षा चौकटीला धरून बसलोय? असं वाटून मनोमन कान धरायला लावणारा आहे. बाबासाहेबांनी आधुनिक विवेक जागा करण्याचं काम केलं हे तर खरंच. त्यांनी कोणत्याही एकाच प्रकारच्या बदलांचा पुरस्कार न करता संपूर्ण परिवर्तनाचा विचार मांडला, त्यासाठी चळवळ उभी केली. या परिवर्तनाचे वेगवेगळे आयाम सुचवण्याची क्षमता या कथांमध्ये आहे. त्यांचं मोल मराठी साहित्यविश्वाने जाणावं.
मात्र अशा विचारांच्या प्रभावामुळे उचंबळलेल्या भावनांची सुरुवातीची अभिव्यक्ती (उद्रेक?) थोडी तीव्र – भडक किंवा वरच्या पट्टीतली झाली तर समजू शकतं. पुढे मात्र अधिक संयत – प्रगल्भ सूर लावूनही इच्छित ते कलावंताला – लेखकाला साध्य करता येतं, असं निरीक्षण आहे. शिल्पा कांबळे यांच्याबाबतीत असं झालं तर मला आनंद वाटेल. एका चांगल्या, ऐपतदार लेखकाचं योगदान वाचकांनाही समृद्ध करेल.
गेल्या तीन-चार दशकांपासून सामाजिक जाणिवेने लिहिणाऱ्या लेखिकांमधील महत्त्वाचे नाव. साहित्याच्या कथा, कादंबरी, बालसाहित्य, माहितीपर आणि संपादन अशा सर्वच क्षेत्रांत कार्यरत. ‘आरंभ’, ‘कोपरा’, ‘सात आठ ते सातावर आठ’ हे गाजलेले कथासंग्रह, गोंदण ही कादंबरी तसेच अनेक विनोदी लेखसंग्रहांसह पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित. सुनीताबाईंवरील व्यक्तिचरित्रात्मक लेखन तसेच पु.ल. देशपांडे यांच्या समग्र दर्शन या ग्रंथाचे सहलेखन.
mangalagodbole@gmail.com