नारायण धारप
माझ्या वाचनातून मला कथा सुचतात. वाचलेल्या कथांचा शेवट अपूर्ण किंवा असमाधानकारक वाटला, तर मनाची यंत्रणा कार्य करायला लागते. पर्यायी शेवट शोधायला लागते. माझ्याकडे गप्पा मारायला अनेक लोक-परिचित, तसेच अपरिचितही येतात. विषय कथांचा असला तर त्यांना आलेला वा त्यांनी ऐकलेला एखादा झपाटण्याचा किस्सा गप्पांच्या ओघात येतो. त्यातूनही कधी एखादी कथा आकार घेते. मांडके नावाच्या एका गृहस्थाने सांगितलेल्या अनुभवांवरून माझी कवठीचे वळण ही कथा जन्माला आली.
माझा स्वत:चा तर्क असा आहे, की एक वेगळ्या, खोलवरच्या, अव्यक्त पातळीवर मेंदू सतत काम करीत असतो. ती विचारयंत्रणा आपल्याला अगम्य, नव्हे अज्ञात असते. फक्त त्याचं फलित एकाएकी आपल्यासमोर येतं. (इंग्रजीत याला ब्लॅक बॉक्स प्रिन्सिपल म्हणतात.) माझ्या या विश्वासाला एक अनुभव आहे. एका रात्री मला एक संपूर्ण सलग कथा स्वप्नात चित्ररुपात दिसली. अविश्वसनीय, पण खरी गोष्ट. अगदी अथपासून इतिपर्यंत. मी हा अनुभव दुसऱ्या सकाळी पत्नीस सांगितला. महिन्याभरात त्यावर एक संपूर्ण कादंबरी लिहून झाली. (नाव सांगत नाही.)
हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आकाशपाळण्यातील धाडस..
सर्वसाधारणपणे मार्च-एप्रिलच्या सुमारास मी कथांची थोडक्यात टिपणे करून ठेवतो. सुरुवात-उच्चतम ताणांचा बिंदू-शेवट यांची एक लहानशी नोंद पुरते. नोंद आवश्यक आहे. नाहीतर अचानक सुचलेल्या काही कल्पना तशाच विरून जातात. सवडीनुसार एक कथा पूर्ण करतो. सुरुवात करून तीन-चारशे शब्द लिहून सोडून दिलेल्या अनेक कथा तशाच पडून आहेत. त्या पूर्ण होण्याची सूतराम शक्यता नाही. पण एकदा कथा लिहायला घेतली की त्यातली पात्रे कल्पनेत सतत माझ्या भोवती वावरत असतात. भयकथेत एक सूचकता हवी. पुढच्या भयानक प्रसंगांची नांदी म्हणून काही सूचक उल्लेख सुरुवातीपासूनच पेरून ठेवावे लागतात. (इतरांच्या भयकथा वाचताना मला दुहेरी आनंद होतो. कथा वाचनाचा सर्वसामान्य वाचकाचा आनंद, शिवाय लेखकाने त्याला इष्ट तो परिणाम साधण्यासाठी कोणकोणत्या क्लृप्त्या वापरल्या आहेत, याचा शोध घेणे हीही एक गंमतीची गोष्ट असते.)
भयकथा मानवी संस्कृतीच्या इतिहासात फार मागच्या काळापर्यंत जाते. जेव्हा आदिमानव गुहांतून राहात होता, निसर्गाचे सर्व चमत्कार त्याला अनाकलनीय आणि म्हणून भीतीदायक वाटत होते तेव्हा भयकथेचा जन्म झाला. प्रवासात अडचणीत सापडलेला एखादा शिकारी अंधारी रात्र तुडवीत, हिंस्र श्वापदांचे प्राणघातक हल्ले चुकवीत जेव्हा आपल्या गुहेत परत येई, तेव्हा तो आपल्याबरोबर नवेच काही तरी घेऊन येई. त्याच्या बावरलेल्या नजरेला रात्रीच्या अनोख्या आकारांना अक्राळविक्राळ भयानक रूपे आलेली दिसत. मनातल्या अतिशयोक्त कल्पनेने बाह्य सृष्टीलाही वास्तवापेक्षा मोठा आकार देई… आणि शेकोटीभोवती बसलेले त्याचे टोळीवाले त्याचे अनुभव विस्फारलेल्या डोळ्यांनी, थरथरत्या शरीरांनी ऐकत असत… तिथे भयकथा जन्माला आली.
अतिप्राचीन काळाच्या असीरियन भाषेतील उपलब्ध वाङ्मयावरून त्याही काळी पिशाच्च-कल्पनांचा मनावर पगडा होता हे दिसते. त्यांच्या लेखांत पिशाच्चबाधा दूर करण्यासाठी मंत्र आहेत, उपचारविधी आहेत. मृतांना पुरण्याची पद्धत होती. पण जमिनीखाली गाडलेले हे मृतदेह निश्चल राहतीलच याची खात्री कोण देऊ शकत होते? काहीही कारणाने ते अस्वस्थ झाले, आपली विश्रांतीची स्थाने सोडून वर पृथ्वीवर वावरायला लागले, रात्री-अपरात्री खिडक्यांच्या जाळ्यांतून घरात डोकावून पाहू लागले, दारापाशी दबा धरून बसायला लागले, गावाच्या वेशीपाशी विव्हळायला लागले तर? त्यांच्या प्रतिबंधासाठी अर्चा, विधी, ताईत यांची वर्णने आहेत.
इजिप्तमधे मरणोत्तर जन्मावर दांडगा विश्वास होता. केवळ फॅरोहच नाही तर प्रत्येक नागरिक त्याला शक्य असेल त्या प्रमाणात आपल्या पुढच्या जन्मासाठी तयारी करून ठेवत असे. पुढील जन्मात शरीर उपयोगी पडावे म्हणून त्याची ‘ममी’ बनवण्यात येत असे. प्रत्यक्ष इजिप्शियनांच्या वेळीच ही परंपरा हजारो वर्षांची झाली होती. मोठमोठ्या थडग्यांतून (पिरॅमिड्स) प्राचीन राजेमहाराजे आपापल्या कोशात नव्या आयुष्याची वाट पाहात होते आणि आपली विश्रांती भंग होऊ नये आणि मालमत्तेवर दरोडा पडू नये म्हणून इसिस देवीच्या पुजाऱ्यांतर्फे मोठमोठे शाप घालून ठेवलेले असत. (तुतान- खामेनच्या थडग्यावरचा शाप!) मृत्यूच्या अशा छायेत वावरणाऱ्या लोकांत भयकथा प्रसृत न झाल्या तरच नवल!
हेही वाचा : निमित्त : पुरुष नामशेष होणार आहेत!
संपन्न ग्रीक वाङ्मयातही भयकथांची उणीव नाही. ग्रीकांना निसर्गाच्या रौद्र रूपाची सततची जाणीव आहे. मानवी मनापुढे त्याचे अचानक प्रस्थान झाले, तर माणसाचे मन नाश पावते, याची त्यांना जाणीव होती. होमरच्या ओडेसीतील हेड्सचे, पर्गेटरीचे, पिशाच्चयोनीचे, रक्ताचे पाट घटाघटा पिणाऱ्या राक्षसांचे वर्णन करणारे प्रसंग विश्वविख्यात आहेत.
लॅटिन ग्रंथकारांनीही भयकथा हाताळल्या आहेत. त्यांतल्या काही तर इतक्या आधुनिक तंत्राने लिहिल्या आहेत की, आजही त्या वाचनीय आहेत. एक वेअर वूल्फची (लांडग्यात रूपांतर होणारा माणूस) आहे, तर दुसरी खरीखुरी पिशाच्चकथा आहे. ही प्लीनीने सुरा याला लिहिलेल्या एका पत्रात आहे. ज्याचा अन्यायाने खून झाला आहे, असा एक माणूस पिशाच्चरूपाने त्या घरात वावरत असतो; अॅर्थेनोडोरस नावाचा तत्त्वज्ञानी त्या घरात वस्तीला आला असताना तो या गूढ प्रकाराचा शोध घेतो आणि त्याला पिशाच्चाने दर्शवलेल्या ठिकाणी एका माणसाचा सांगाडा सापडतो. त्याला विधिपूर्वक अंत्यसंस्कार होताच घरातला त्रास थांबतो!
इंग्रजी वाङ्मयातील भयकथा तर सर्वश्रुत आहेतच. तात्पर्य एवढेच की, हा कथाप्रकार सर्व ठिकाणी आणि सर्व वेळी लोकप्रिय ठरलेला आहे. या आकर्षणामागे काय कारण असावे? भयकथा ही माणसातल्या कोणत्या तरी एका सुप्त इच्छेला साद घालते. मानवाचे अज्ञाताचे आकर्षण जबरदस्त आहे. सुसंस्कृतता ही ‘स्किनडीप’ आहे. त्याच्या आत आदिमानवच आहे. अंधाराची, एकटेपणाची त्याची भीती गेलेली नाही, फक्त दबलेली आहे. लक्षावधी वर्षे मनात वागवलेल्या या ‘इन्स्टिंक्ट्स’ फार प्रभावी आहेत. त्या तर्काच्या, विचाराच्याही खालच्या पातळीवर काम करतात. भयकथेने अंगावर येणारा शहारा म्हणजे फार फार प्राचीन काळची अंगावरचे काटे किंवा खवले संरक्षणासाठी ताठ करण्याच्या सवयीची आठवण आहे. या पातळीवरचे विकार प्रखर असतात, त्यांची समाधानाची मागणी नाकारता येत नाही- भयकथांचे आकर्षण हा त्यांतलाच एक भाग असावा. आजी-आजोबांकडे गोष्टीसाठी हट्ट धरणारी, गोष्टींनी भिणारी, पण आणखी गोष्टींसाठी हटून बसणारी लहान मुलं- मुलं तर्क, विचार यांपेक्षा अंत:प्रवृत्तींना ‘इन्स्टिक्ट्स’ना मानणारी असतात ती मुलंही हेच दाखवतात.
हेही वाचा : पडसाद…
भयकथेचा विषय, तिची लक्षणे, तिच्या मर्यादा, तिची यशस्विता यांवर आता थोडा विचार करायला हरकत नाही. भयकथा आणि भूतकथा यांच्यात एक लहानसाच, पण जाणवण्यासारखा फरक आहे. भूतकथेत एखादा अतृप्त आत्मा (त्याची सुखाची वा सुडाची इच्छा अपुरी राहिली असेल) माणसाच्या आकारात दृगोच्चर होतो, तर भयकथेत मानवी आकाराचे बंधन नाही आणि ही जाणवणारी दुष्ट शक्ती अमानवीसुद्धा असू शकते. भयकथेला सरळ निवेदन उपयोगी नाही. लेखकाने काही तरी हातचे राखून ठेवायला हवे. लेखनात सूचकता हवी. वाचकाला कथा-प्रवाहात सहभागी करून घ्यायला हवे, प्रसंगांचे दुवे जोडण्यासाठी वाचकाला आपली कल्पनाशक्ती वापरावी लागली पाहिजे.
भयकथेच्या लेखकाचा भूतसृष्टीवर विश्वास असणे आवश्यक आहे का? माझे असे वैयक्तिक मत आहे की, असा विश्वास असल्याशिवाय लेखकाच्या हातून खरे परिणामकारी लेखन होणे जवळजवळ दुरापास्त आहे. असं म्हटलं जातं की, हेन्री जेम्स हा पक्का स्केप्टिक पाखंडी होता. हेही खरं आहे की, त्याची ‘टर्न ऑफ दी स्क्रू’ ही लघुकादंबरी भयकथांच्या अत्युत्कृष्ट उदाहरणांपैकी एक गणली जाते. हा नियमाला अपवाद तरी मानला पाहिजे किंवा जेम्स वरकरणी जितका अश्रद्ध वाटत असे, तितका अंतर्यामी नव्हता, असंच मानायला हवं. भयकथा परिणामकारी व्हायची असेल तर ती वाचता वाचता असा कोणता तरी एक क्षण यायला हवा की, वाचकाचं सर्व अंग शहारून उठलं पाहिजे, त्याने अस्वस्थपणाने खांद्यावरून मागे वळून पाहायला पाहिजे… ‘अरे! माझ्यावर असा एखादा प्रसंग आला तर?’ असा विचार त्याच्या मनात यायला हवा… लेखन जर इतकं प्रत्ययकारी व्हायचं असेल तर लेखकाचा अशा गोष्टीवर विश्वास असल्याखेरीज ते शक्य नाही. शब्दांची किमया काही एका मर्यादेपर्यंतच परिणाम करू शकते.
भयकथेच्या लेखकाला तसा अनुभव आल्याखेरीज लिहिणे अशक्य आहे का? मला नाही वाटत की, ही गोष्ट अवश्य आहे. कोणत्याही क्षेत्रातला लेख परोक्षानुभूती, परकाया-प्रवेश हे तंत्र थोड्याफार प्रमाणात वापरतच असतो, कोणाला तरी तो अनुभव आला असला की पुरे; लेखक स्वत:चे कल्पनाचातुर्य वापरून, स्वत:ची त्या जागी कल्पना करतो आणि मग तो प्रसंग रंगवितो. ऐकीव अनुभवांवर उत्तम भयकथा आधारलेल्या आहेत. अशा कथांना सत्याभासाची एक वेगळीच शक्ती असते.
हेही वाचा : डॉक्टरांना कोण वाचवणार?
भयकथेचे स्वत:चे खास तंत्र आहे, काही नियम आहेत, काही विधिनिषेध आहेत. एखाद्या मृत मित्राची रात्री ऐकू आलेली अचानक हाक हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने थरारक प्रसंग ठरेल, पण त्यात भयकथेच्या दृष्टीने प्रभावी असे काही नाही. परिणामकारी होण्यासाठी भयकथा ही किंचित भडक रंगात रंगवली पाहिजे, त्यातली पात्रे व प्रसंग जीवनापेक्षा मोठी हवीत. भयाचा अतिरेक हाही शेवटी परिणामशून्य होईल, क्वचित प्रसंगी हास्यास्पदही होईल. वाचकाच्या कल्पनाशक्तीबद्दल लेखकाने योग्य तो आदर ठेवायला हवा. ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ हा नियम इतर सर्व बाबतींत, तसा इथेही लागू पडतो. विनोद आणि भय हे रस एकत्र येऊ शकत नाहीत. हे दोन प्रकारचे अनुभव घेताना मनाची अवस्था इतकी भिन्न भिन्न असते की, त्याचे मिश्रण अशक्यच. भयकथेच्या शेवटी वाचकाची फसवणूक होता कामा नये. प्रत्येक घटनेला काही नैसर्गिक, साधे-सोपे स्पष्टीकरण असलेच पाहिजे, असा काही नियम नाही. भयानक प्रसंगांच्या ताणाखाली शेवटपर्यंत कथा वाचत आलेल्या वाचकाला शेवटी जर सर्व प्रसंग वाऱ्याने, हलणाऱ्या फांद्यांनी, करकरणाऱ्या दारांनी किंवा अशाच काही क्षुल्लक कारणांनी घडलेले दाखवले, तर फसवले गेल्याची एक भावना होते.
भयकथेत पछाडणारी, वावरणारी किंवा नेणिवेच्या अगदी कडेकडेवर असणारी शक्ती ही दुष्टच हवी. संभाव्य नाशाच्या कल्पनेतच भीतीचा जन्म होतो. ‘भयकथा’ हे नावच स्वत:ची व्याख्या करते, त्या अनुभवात सापडलेल्या व्यक्तीला पछाडण्याचा वा उपद्रव देण्याचा त्या शक्तीचा हेतू नसला तरी एकूण अनुभव भीतीदायकच हवा.
कथेचा शेवट हा एकमेव ‘युनिक’ असलाच पाहिजे असे नाही. इतर कथांच्या मानाने भयकथेला हे एक स्वातंत्र्य आहे. बहुतेक भयकथा प्रथमपुरुषी पद्धतीने ‘निवेदित’ अशा असतात, कारण सर्व अनुभव व्यक्तिनिष्ठ असतात. बाहेरची सृष्टी सर्वांना सारखीच दिसेल, भासेल वा जाणवेल असे नाही. प्रत्येकाचा मेंदू स्वत:साठी बाहेरच्या जगाची एक प्रतिमा सायकलक्रम बनवीत असतो. बाह्यसृष्टीचे त्याला पंचेंद्रियांमार्फत ज्ञान होते. या संवेदना मेंदूत मॉडिफाय होऊन त्याची बाह्य जगाची प्रतिमा तयार होते. हिच्याच आधारावर तो आपले आयुष्य, आपल्या प्रतिक्रिया आखीत असतो. व्यक्तिगणिक ही प्रतिमा वेगळी असतेच आणि येथेच भयकथेला वाव आहे. एकाला आलेले अनुभव इतरांना येतीलच असं सांगता येत नाही. त्यामुळे एकाला जे ‘पछाडणे’ वाटेल, ते दुसऱ्याला भास वाटतील आणि वैद्याकीय तज्ज्ञाला मेंदूचा रोग वाटेल. त्यामुळेच भयकथेला अनेक पर्यायी शेवट असू शकतात. निवेदक हा आपले अनुभव इतरांवर लादत नाही- ते त्याचे एकट्याचे युनिक जग असते; इतरांना असंभाव्य वा अशक्य वाटणाऱ्या घटना तो त्याच्या चौकटीत संभाव्य, नव्हे अपरिहार्य म्हणून स्वीकारतो.
स्वर्ग-नरकाच्या, पाप-पुण्याच्या, कर्मफलाच्या कल्पना बदलत आहेत. ज्ञानाच्या पूर्वीच्या संकुचित मर्यादा संपल्या आहेत. मानवाची नजर आता अगाध अंतरावरच्या ताऱ्यांपर्यंत पोचते, तशीच अंतर्मनाच्या अशांत आणि अथांग विस्ताराकडेही जाते. स्वर्ग-नरकाच्या कल्पना बदलत आहेत. स्वर्ग आणि नरक दोन्ही मानवाच्या मनातच आहेत- इच्छा असली तर मानव स्वत:चा देव करू शकतो; पण त्याचे दानवातही पतन होऊ शकते. अव्यक्त मनाचा पसारा आता खुला झाला आहे आणि त्यातल्या रिप्रेस्ड इमोशन्स, प्रीमीव्हल इन्स्टिंक्ट्स या इतक्या सर्वग्राही असू शकतात की, पूर्वीचे राक्षस आणि दैत्य त्यांच्यासमोर सज्जन वाटावेत. भयकथा-लेखकांना या ‘अनकॉन्शस’ मनात कथांची असंख्य बीजे उपलब्ध झाली आहेत. अवकाशाचा अवाढव्य विस्तार, कालाचा अथांग व अगम्य विस्तार, कालप्रवाहाचे रहस्य… एकूण सृष्टीच्या गूढतेची खरी कल्पना आताच यायला लागली आहे, हेही भयकथेचे विषय होऊ शकतात.
पूर्वी अशीही एक रूढ कल्पना होती की, माणसाला पछाडणारे भूत, पिशाच्च, समंध, खवीस, हडळ, जखीण, अवदसा इत्यादी आविष्कार हे पापी असतात; दुष्टता काय ती त्यांच्यातच सामावलेली असे. आता हाही समज अग्राह्य झाला आहे. आता हेही मान्य आहे की, पछाडल्या गेलेल्या व्यक्तीतच या पाप, क्रौर्य इत्यादींचा उगम आहे. त्याने इतरांवर केलेल्या अन्यायात या पछाडण्याचे मूळ असते. त्याचा कॉन्शस त्याच्या पापांना शरीरबाह्य रूपे देत असतो, अशी मानसशास्त्रीय कल्पना आहे. नरक प्रत्येकाच्या मनातच दडून बसला आहे, हे वर एकदा आलेच आहे.
मानव जसा सुसंस्कृत होत चालला आहे, तसे त्याचे मन जास्त जास्त संवेदनक्षम बनत चालले आहे. एखादी सूचक ओळ त्याला भिवविण्यास पुरेशी होते. एखादा हलकासा स्पर्श, कानात एखादा हलकासा आवाज त्याच्या काळजाला हिसका देण्यास पुरा पडतो. त्याला अपील होणारी भयकथा त्याच तरल पातळीवर हवी.
आता शेवटी भारतीय व विशेषत: मराठी भयकथा वाङ्मयाकडे थोडासा दृष्टिक्षेप आवश्यक आहे. मराठीत भयकथा अभावानेच तळपतात, वरवर पाहता मला याची दोन-तीन कारणे दिसतात. पाश्चात्त्य धर्मकल्पनांत पुण्यवंतांचा राजा ख्राइस्ट आणि पापवंतांचा राजा सेंटान, ल्यूसिफर हे परस्परांचे शत्रू आहेत. मानवी आत्म्यासाठी या दोन शक्तींचा निरंतर झगडा चाललेला आहे. तर आपल्या कल्पनांत मृत्यूचाच देवांत समावेश केला आहे. यमधर्म हा मुळी आपले कार्य देवांच्या अनुमतीने आणि साहाय्यानेच पार पाडत असतो. त्यामुळे त्या दोघांच्यात काही द्वैत येण्याचा प्रश्नच राहात नाही.
हेही वाचा : एक दिवस धकाधकीचा…
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या संस्कारांप्रमाणे आपण मृतदेहांचे ज्वलन करतो. त्या शरीराची राखराख होऊन जाते. याउलट पाश्चात्त्य संस्कृतीत मृतांना पुरण्याची चाल आहे. मृत्यू आणि त्याची सर्व उपांगे ही मानवाची भीतिस्थाने आहेत. तेव्हा दशके किंवा शतके जमिनीखाली पेट्यांतून पुरून ठेवलेले मृतदेह, त्यांच्या ‘ग्रेव्हस्टोन्स’च्या रांगा… कल्पनाशक्तीला चालना द्यायला इथे केवढी सामग्री तयार आहे! सडलेली शरीरे, अस्थींचे सांगाडे… सर्व काही स्टेज प्रॉपर्टी तयार आहे! ते स्वत:च भयाचे संकेत आहेत, त्यांचे रंगभूमीवर पदार्पण हाच शरीरावर काटा आणणारा प्रसंग! याउलट आपल्याकडे हे काम अधिक कठीण आहे, हे उघड आहे. पण तरीही हा एक भाग सोडला तर ज्याला चेटूक ‘ब्लॅक मॅजिक’ म्हणता येईल, असे एक शास्त्र भारतात फार प्राचीन कालापासून अस्तित्वात आहे. यात करणी, भानामती, मूठ मारणे इत्यादी प्रकार येतात. या मार्गात साधक आहेत, तंत्र-विधी आहेत. त्यांच्या खरेखोटेपणाचा प्रश्न दूर ठेवला तरी केवळ भयकथा-निर्मितीच्या दृष्टीने त्यांचा अभ्यास केल्यास त्यांच्यात केवढे तरी प्रचंड भांडार साठवलेले आहे.
(‘साहित्य सूची’ दिवाळी १९८१ आणि ‘निवडक मराठी भयकथा’(१९७४ विशाखा प्रकाशन) या धारपांनी संपादित केलेल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेतून साभार)