प्रसाद कुमठेकर

परभणीसारख्या प्रांताला सात दशकांपूर्वी साहित्याच्या भूगोलात आणणारी ‘आडगावचे चौधरी’ ही कादंबरी. ही मराठवाडय़ाचा विशिष्ट जीवनसंदर्भ  दाखवत माणसाच्या जीवनसंघर्षांची कहाणीदेखील बनते. जहागीरदार कुटुंबाच्या पिढय़ान् पिढय़ांचा सरंजामी लेखाजोखा मांडते. रंजनप्रधान लिखाणाचा प्रचंड रेटा असतानाच्या काळात अराजकता, दांभिकता, अन्याय, कपट या वास्तवात जगणारे सर्वसामान्य, दुसऱ्या महायुद्धाचे परभणीसारख्या आडगावात झालेले भीषण परिणाम याचा शोध घेते.

zee marathi satvya mulichi satavi mulgi serial off air
‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘शेवटचा दिवस’ म्हणत कलाकारांनी शेअर केले सेटवरचे फोटो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार
pune pustak Mahotsav marathi news
‘पुणे पुस्तक महोत्सव’ का गाजला?
karan johar mother admited mumbai hostpital
करण जोहरची आई हिरू जोहर रुग्णालयात दाखल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा पोहोचला भेटीला
parag sonarghare paintings exhibition,
कलाकारण : माणसाने माणसाला अमूर्तासम पाहणे…
rashmika mandanna watched pushpa 2 with vijay deverakonda
रश्मिका मंदानाने विजय देवरकोंडाच्या कुटुंबियांसह पाहिला ‘पुष्पा २’ सिनेमा, फोटो झाला व्हायरल

वर्तुळाच्या कडेला परीघ म्हणतात. केंद्रबिंदूपासून दूर असल्या कारणाने परिघावरचा लेखक आणि त्याचं साहित्य वाचकांच्या दृष्टिआड होते. अशाच दृष्टिआडच्या आडगावातील एक लेखक म्हणजे बी. रघुनाथ. परभणी नामक जिल्हावजा आडगावात बी. रघुनाथ ऊर्फ भगवान रघुनाथ कुलकर्णी (१५ ऑगस्ट १९१३ – ७ सप्टेंबर १९५३) नावाचे बहारदार लेखक होऊन गेले. ‘परभणीत काही असो किंवा नसो, जीवन मात्र आहे,’ असं सांगत आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक सर्व स्तरांवर प्रतिकूल परिस्थितीशी झगडा देत सातत्याने लेखन केले. समकालीन मित्रांत ‘बी.आर.’ या नावाने ओळखले जाणारे बी. रघुनाथ हैदराबाद संस्थानाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात तात्पुरत्या स्वरूपाची कनिष्ठ कारकुनाची नोकरी करत. निजामी राजवटीत मराठीस राजाश्रय आणि पोषक वातावरण नसतानासुद्धा त्यांनी मराठी साहित्यात कथा, कविता, कादंबरी आणि ललित निबंध यांची मौलिक भर घातली. त्यांच्या सात कादंबऱ्या, सुमारे दीडशेहून अधिक कविता (त्यांनी ‘फुलारी’ या टोपणनावानेसुद्धा कविता केली आहे.) आणि अनेक ललित निबंध प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिखाण सुरू केले तो कालखंड आजपासून बरोबर त्र्याण्णव वर्षे आधीचा. स्वत:ला ‘मी एक धटिंगण लेखक आहे,’ असं म्हणणाऱ्या या सिद्धहस्त लेखकाने, ‘ओऽ’ ही पहिली कादंबरी एकोणीसशे छत्तीस साली लिहिली; पण त्या काळातील समीक्षकांना आणि वाचकांना सवयीचा नसलेला वास्तववादी मार्ग त्यांनी स्वीकारला होता त्यामुळे त्यांच्या ‘ओऽ’ला प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्यांनी ‘हिरवे गुलाब’, ‘बाबू दडके’, ‘उत्पात’, ‘म्हणे लढाई संपली’, ‘जगाला कळलं पाहिजे’ आणि ‘आडगावचे चौधरी’ या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘आडगावचे चौधरी’ ही त्यांची शेवटची कादंबरी रघुनाथांच्या मृत्यूनंतर, २७ ऑक्टोबर १९५४ रोजी प्रसिद्ध झाली. अवघ्या चाळिसाव्या वर्षी आर्थिक हलाखी, मानसिक ताण आणि जुलमी सरंजामी राजवट तोंड देता-देता कार्यालयातच हृदयक्रिया बंद पडून त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे : आत्मकथांना वाट देणाऱ्या समाजगोष्टी..

‘आडगावचे चौधरी’ ही मराठवाडय़ाचा विशिष्ट जीवनसंदर्भ असलेली; पण तो ओलांडून माणसाच्या जीवनसंघर्षांची कहाणी आहे. केवळ एकशे दहा पृष्ठांची ही कादंबरी एका जहागीरदार कुटुंबाच्या पिढय़ान् पिढय़ांचा सरंजामी लेखाजोखा मांडते. चौधरी घराण्याचा अनीती आणि स्वार्थाने लदबदलेला अनागोंदी जुलमी कारभार तर यातून मांडला जातोच; पण बरोबरच विविध स्तरांतील माणसांचं ठाशीव चित्रणदेखील समोर येते. सरंजामी जीवनाचा भेदक अनुभव देणारी, इतकी अल्पाक्षरी कादंबरी अपवादात्मकच. भारतात सामाजिक व्यवस्थेत वतनसंस्था निश्चितपणे केव्हा प्रविष्ट झाली याबद्दल विद्वानांत एकमत नाही; पण तेराव्या शतकापासून ती अधिक दृढतर होत गेली. अर्थात त्याआधी पण सरंजामी वतने होतीच. सरंजामी पद्धतीचे अत्यंत विदारक रूप हैदराबाद संस्थानात पाहावयास मिळते. गावेच्या गावे एकेका जमीनदाराच्या मालकीची होती. मराठवाडा-कर्नाटकातील रयतवारीला काटशह म्हणून या भागात मोठय़ा प्रमाणावर जहागिरी निर्माण करण्यात आल्या. कमालीच्या शोषणावर आधारलेली आणि पराकोटीच्या अन्यायांनी पुरेपूर भरलेली अशी ही व्यवस्था होती. अशाच शोषकांच्या जहागीरदार कुळाची प्रातिनिधिक कथा बी. रघुनाथांनी ‘आडगावचे चौधरी’मध्ये मांडली आहे.

आडगाव वसलं..! या दोन शब्दांनी सुरू होणारी ही कादंबरी ‘वरवाडा, उदयास्त आणि चौधऱ्याचं हाड’ अशा तीन विभागांत विभागली गेली आहे. ज्यात आबाजी, सोनाजी, बाबाजी, राजाजी, आबासाहेब, भाऊसाहेब, नानासाहेब, दादासाहेब, रावसाहेब यांसारखे क्रूर आणि वेगवेगळय़ा स्वभाववैशिष्टय़ांचे वतनदार चित्रित होतात. पैसा, प्रतिष्ठा आणि वासनेसाठी ते कोणतेही दुष्कृत्य करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. ‘दगलबाजी, डाकूगिरी, द्वेष, अहंता, वामगमन, लुच्चेगिरी अशा अनेक अवगुणांच्या प्रकर्षांचं उदाहरण देताना आडगावच्या चौधऱ्यांचा उल्लेख निघाल्याशिवाय राहत नसे!’ या एकाच वाक्यात या सरंजामी चौधऱ्यांच्या एकंदर कारभाराची कल्पना येते आणि मग गुंतागुंतीचा, कटकारस्थानांचा, कुरघोडय़ांचा भव्य महापट वाचकांच्या डोळय़ांसमोर उभा राहतो. आडगावात खुंटा रोवून बसलेले हे चौधरी जहागीरदार जनतेचं शोषण करतात. लूटमार, दरोडेखोरी करतात. स्त्रियांना भ्रष्ट करतात. सढळ हाताने देव-धर्माचाही वापर आपल्या स्वार्थासाठी करतात. आबाजी चौधरी यांतला शिरोमणी. चौधऱ्यांनी मागितलेली रक्कम द्यायला गावकरी नाही म्हणत नाहीत, तरी या आबाजी चौधऱ्याची आग निवत नाही. आबाजी चौधरी, वरवाडय़ातल्या बैठकीत बसून आपल्याला साक्षात्कार झाला आहे आणि गावातल्या महादेवाच्या पडक्या उपेक्षित मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आदेश आहे, अशी लोणकढी थाप ठेवून देतात. गावभर या गोष्टीचं स्वागत होतं. फद्र्या तयार होतात. आकडे पडतात आणि ‘हस्तेपरहस्ते’साठी फद्र्यासह त्यांचे दूत गावोगावी रवाना होतात. या गोष्टीमुळे डाकू चौधऱ्याचा दुलरकिक गाणारी माणसं ‘धन्य धन्य तो आबाजी चौधरी आडगावकर’ म्हणू लागतात. वरवाडय़ावरच वर्गणीच्या रकमेचे ढीग पडू लागतात. मंदिर तयार होतं, सोन्याचा मुखवटा घातलेल्या शाळुंकेसमोर मुद्रांच्या राशीवर राशी पडू लागतात. शेवटी ‘सोवळय़ा ओवळय़ाचा भ्रष्टाकार होऊन महादेव कोपला की काय कोण जाणे’ असं म्हणत वरवाडय़ातल्या ज्या खोलीत देवापुढल्या मुद्रांची रास होती, ज्या खोलीत यात्रेची लूट दडवली होती, त्याच खोलीत मंदिरातून चोरीला गेलेला सोन्याचा मुखवटा दिसू लागतो. दानशूरतेचं प्रदर्शन करण्यासाठी दूरदूरच्या ब्राह्मणांना ते मागतील ती दक्षिणा कबूल करून जेवायला बोलवायचं, दक्षिणासुद्धा द्यायची; पण ती दक्षिणा घेऊन ते शिवेबाहेर पडले की आपल्या माणसांकडून ती परत लुटून आणायची असा यांचा खाक्या. त्यामुळे ‘आडगावच्या चौधरीची दक्षिणा नको,’ असं लोक उपरोधाने म्हणत. त्यांच्या पिढीतले बाकी चौधरीही कमी भरती असेच कलंकित. नानाजी चौधऱ्याने उंबरग्याच्या नवाबाला आडगावी आणले आणि नंतर लुटले. राजाजीने धारिपपरीच्या देशमुखाला जिवंत जाळले. दडक्याच्या मदतीने देसायाला नागवून चौधऱ्यांनी त्याची सगळी संपत्ती लुटून घरी आणली आणि आपली मुलगी त्यांच्या घरी देऊन संबंध जोडला.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे : हृदयस्पर्शी ‘चॅलेंज’

या चौधऱ्यांचा माज जसा वाढला तसाच तो उतरला. आबाजी चौधरीने मंदिरातील सोन्याचा मुखवटा चोरला आणि त्या कामी मदत करणाऱ्या रामोशाला गोळी घालून ठार मारलं. सूड उगवण्यासाठी दडके आणि देशमुख यांनी कोल्हाटणीच्या जलशात घुसून चौधऱ्यांना ठार केलं. पैशासाठी भाऊसाहेब चौधरी भ्रमिष्ट झाले. देशमुखाची इस्टेट लाटण्यासाठी भाऊसाहेब चौधऱ्यांनी सुंदरनानीला आपल्या घरी आणून ठेवलं. राजाभाऊ देसाई या आपल्या जावयाची शेती, सोनंनाणं लुबाडलं. रावसाहेब, दादासाहेब, आबासाहेब हे चौधरी विलासात अन् व्यसनात राहू लागले, व्यभिचारी झाले, आपसात भांडू लागले, वेगळे झाले. राध्याच्या बायकोला भ्रष्ट केली म्हणून राध्या आणि त्याच्या साथीदारांनी रावसाहेबाला ठार केलं. पिढय़ान् पिढय़ाच्या उदयास्ताच्या पार्श्वभूमीवर जप्त झालेली जहागीर सोडवून घेण्यासाठी, अधिकारपदीच राहण्यासाठी शेवटचा ‘राजा अंबिकाचरण दासरावजी रावसाहेब आडगावकर चौधरी जहागीरदार’ जी काही अतोनात धडपड करतो त्याचे चित्रण तब्येतीत वाचण्यासारखं आहे. वीस-पंचवीस वर्षांच्या कोर्टकज्ज्यानंतर मिळवलेल्या जहागिरीची महावस्त्रं घेऊन जेव्हा हा गिड्डा चौधरी आडगावी पाऊल ठेवतो तेव्हा त्याला त्याच्या वरवाडय़ात दिवासुद्धा दिसत नाही. सगळीकडे उजाड आणि भकास अवकळा आलेली. ‘‘वसंतातील प्रात:काळ! ऋतुराजाची कसलीच चिन्हं सभोवती दिसत नव्हती, वृक्षांना पानं नव्हती. मळय़ात गारवा नव्हता, वास्तू माणसांवाचून रिकामी उरली होती. रानं उपेक्षून पडली होती!’’ लेखक पुढे लिहितो, ‘‘..एवढा उजेड असतानाही चौधऱ्यांना अंधार दिसू लागला. त्यांचा घसा कोरडा पडू लागला. गावात कुठंही त्यांना पाणी दिसलं नाही. मग पाण्याजवळ असावं म्हणून ते धावू लागले. तशी तशी त्यांना अधिकाधिक तहान लागू लागली.’’ असे अनेक जिवंत रसरशीत प्रसंग अतिशय कमी शब्दांत लेखक वाचणाऱ्याच्या डोळय़ांसमोर उभे करतो. रामदेवळीचे दडके, झाडगावचे देसाई, वहिनी, राध्या, मंजुळा, अंबिकाचरण यांनी ठेवलेली बाई, नाचणाऱ्या बायका, डाकू असे अनेक विविध स्तरांतील स्त्री-पुरुष या कादंबरीत येऊन जातात. आडगाव येतं, धारिपपरी येतं, गुलजारबाग, जहागीरदार नवाबांच्या वस्तीचा शाहद बंडा, महकमे मालगुजारी असे नागरी भागसुद्धा दिसतात. बी. रघुनाथांची ही कादंबरी म्हणजे आजच्या काळात एखाद्या नेटफ्लिक्सच्या सीरिजमध्ये सहज खपून जावी अशी आहे.

हेही वाचा >>> आदले।आत्ताचे : कहाणी एका लढय़ाची

कथनाचा वेग इतका जोरकस आहे की, कथनातील उणिवा झाकोळल्या जातात. आडगावसारखी किती तरी गावं मराठवाडय़ातल्या सरंजामशाही व्यवस्थेत नांदली, उठली, बदलली. या कादंबरीद्वारे बी. रघुनाथांनी मराठी साहित्य नकाशावर मराठवाडा अधोरेखित केलं आहे. तसेच आपल्या लेखनातून पात्रांच्या मुळाशी असलेल्या प्रेरणांचा ते शोध घेत जातात. त्यांच्या लिखाणाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे स्त्रीची उदात्त निरागस बहुआयामी रूपे दाखवण्याची संवेदनशीलता. कुचंबलेल्या व्यक्तिजीवनाच्या आणि सामाजिक घडामोडीच्या डोळस निरीक्षणातून स्फुरलेले तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या लेखनातून मांडले आहे. प्रादेशिकतेबरोबर मूलभूत मानवी प्रवृत्तींचं दर्शन, आजूबाजूचा परिसर त्याच्या खोलीसह टिपणारी सहिष्णू नजर, गंगाजमनी दृष्टिकोन, कसदार, कमावलेली संस्कृतप्रचुर, पण सोपी नादमधुर भाषा ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्टय़े. त्यांच्या लिखाणात भावनेने ओथंबून बदबदणारे संवाद, उपमा, अलंकाराचं नटवेपण, सुभाषितांचा तडका यांना फाटा दिलेला आढळतो. त्यांच्या समकालीन लेखकांपेक्षा ही शैली खूप वेगळी आहे. ते सहज, सुलभ, अलंकारविरहित भाषा वापरतात, त्यामुळे कदाचित आजही ती ताजी वाटते. प्रस्तुत कादंबरीत बी. रघुनाथांच्या लेखनाचं एक स्पष्ट वैशिष्टय़ म्हणजे इथे लेखक निवेदक जरी असला, तरी लेखकाचं स्पष्ट अस्तित्व कोठेच लक्षात येत नाही. कादंबरीत पात्रमुखी निवेदन येत नाही. पराकोटीची वास्तवनिष्ठा या त्यांच्या प्रवृत्तीमुळे त्यांच्या प्रादेशिकतेला कलात्मक उंची प्राप्त झाली आहे. आपल्या लेखनशैलीविषयी रघुनाथ म्हणतात, ‘‘गोष्टीची सुरुवात, मध्य, शेवट या विषयावर माझा मुळीच अभ्यास झालेला नाही. मला चांगली वाटली तीच सुरुवात आणि जिथे थांबावंसं वाटलं तिथेच शेवट!’’ अशी मांडणी म्हणजे तत्कालीन साहित्यिक सोवळेपणाविरुद्धचं बंडच होतं.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे: व्यवस्थेच्या चरक्यातलं नातं..

रंजनप्रधान लिखाणाचा प्रचंड रेटा असतानाच्या काळात अराजकता, दांभिकता, अन्याय, कपट या वास्तवात जगणारे सर्वसामान्य, दुसऱ्या महायुद्धाचे परभणीसारख्या आडगावात झालेले भीषण परिणाम, स्वातंत्र्यसंग्राम, परिवर्तनाच्या वळणावर असलेला समाज, तत्कालीन हैदराबाद संस्थानातील सामाजिक आणि राजकीय जीवन व्यक्त करणारा हा लेखक विरळाच. टांगेवाले, वेश्या, टॅक्सी ड्रायव्हर, हॉटेलातील पोरे, पानपट्टीवाले, कारकून, फकीर अशा विविध स्तरांतील व्यक्तींची ठाशीव नोंद बी. रघुनाथ घेतात. त्यांची निरीक्षणं सूक्ष्म आणि सखोल आहेत. निजामीची बंधनं असतानादेखील उघडंनागडं सत्य आपल्या लेखनातून मांडण्याचं धारिष्टय़ आणि वाचकांच्या जाणिवांना हात घालण्याचं सामर्थ्य, त्यांच्या लेखणीत आहे. ‘आडगावचे चौधरी’ला आज सात दशकं पूर्ण झाली आहेत तरी ती सगळय़ाच बाबतीत ताजी वाटते आणि म्हणूनच माझ्या पिढीच्या वाचकाला भिडते. ‘साहित्य अकादमी’ने काढलेले ‘निवडक बी. रघुनाथ’ हे त्यांच्या कथांचं पुस्तक आणि ‘जनशक्ती वाचक चळवळी’ने तीन खंडांत उपलब्ध करून दिलेले ‘समग्र बी. रघुनाथ’ हा आमच्या पिढीसाठी मौल्यवान ठेवा आहे.

prasadkumthekar1@gmail.com

Story img Loader