राजेंद्र येवलेकर
‘आपल्याला भूमीवर सुरक्षित राहायचे असेल तर आपल्या सागरावर आपले सर्वोच्च प्रभुत्व राखावे लागेल,’ असे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले होते. ते एका अर्थाने नव्हे, अनेक अर्थाने खरे आहे हे आजच्या काळात पदोपदी प्रत्ययास येत आहे. दक्षिण चिनी महासागरावर चीन गाजवत असलेले वर्चस्व, त्याला अमेरिकेने काटशह देण्याचा केलेला प्रयत्न, बदलती भूराजकीय समीकरणे, ‘क्वाड’ या चीनविरोधी आघाडीत भारताचा सहभाग, अमेरिकेचे हिंद-प्रशांत महासागर धोरणावर भर देणे या साऱ्या गोष्टी आपल्याला सागरी सुरक्षा व सागरी मार्गावरचे प्रभुत्व किती महत्त्वाचे आहे हे दाखवून देतात. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या निर्मितीची यशोगाथा या प्रकल्पाचे प्रमुख ए. शिवतनू पिल्लई यांनी इंग्रजीतून कथन केली आहे. त्याचा मराठी अनुवाद राजहंस प्रकाशनाने ‘ब्राह्मोस- एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा’ या नावाने प्रकाशित केला आहे. संरक्षण तंत्रज्ञानविषयक हे पुस्तक मराठीत अनुवादित करण्याचे आव्हान लेखक अभय सदावर्ते यांनी यशस्वीपणे पेलले आहे. प्रत्येक संकल्पना समजून घेऊन, तिचे मराठीत रूपांतर करून, ती माहिती सोप्या शब्दांत मांडणे ही अतिशय अवघड गोष्ट असते. तसे पाहिले तर हे पुस्तक केवळ तांत्रिक मुद्दय़ांनी भरलेले असेल असा आपला वरकरणी समज होत असला तरी ‘खुल्या सागरातील संघर्ष’ या प्रकरणापासूनच हे पुस्तक मनाचा ठाव घेते. भारताला ‘ब्राह्मोस’सारख्या समर्थ व शक्तिशाली क्षेपणास्त्राची गरज का होती आणि आहे याचे विवेचन करताना लेखकाने एक घटना नमूद केली आहे. ४ डिसेंबर १९७१ रोजी कराची बंदरावरील काळोख्या रात्री पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध पुकारलेले असताना कराची बंदर व परिसरात गस्त घालणाऱ्या ‘पीएनएस खैबर’ या विनाशिकेला भारताच्या क्षेपणास्त्रांनी जो दणका दिला, तो पाकिस्तान कधीही विसरलेले नाही. त्यावेळी जो प्रतिहल्ला भारताने केला होता त्यात आपल्या जहाजांवरून रशियन बनावटीची ‘एसएसएन २’, ‘बी स्टायटेक्स’ ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. त्या काळात अमेरिकेनेही आपले सातवे आरमार पाठवण्याची धमकी दिली होती. १९७१ सालातील पाकिस्तानविरुद्धच्या युद्धातील भारताचा विजय आपल्याला साधा-सोपा वाटत असला तरी त्याला एक वेगळी पार्श्वभूमी होती. भारतीय नौदल सक्षम करण्याची गरज आहे हे त्या काळापासूनच बोलले जात होते; पण त्यासाठी आणखी सामथ्र्यशाली क्षेपणास्त्रे तयार करण्याची गरज होती. हा शोध नंतर सुरूच राहिला. ३४ वर्षांनंतर १५ एप्रिल २००५ रोजी अरबी समुद्रात ‘आयएनएस राजपूत’ ही नौदलाची आघाडीची युद्धनौका गस्त घालत होती. सागराच्या कुशीत उगवलेली ती एक सुखद पहाट होती. अशात मुंबईच्या दिशेने शत्रूचे एक जहाज येत होते. त्यावेळी ‘राजपूत’ युद्धनौकेवरील सर्वाना कप्तानाने शत्रूच्या जहाजाचा वेग व इतर धोके यांची आगाऊ माहिती दिली आणि तद्नंतर दक्षतेचे आदेश देण्यात आले. थोडय़ाच वेळात राजपूतच्या कप्तानाने आदेश दिले : ‘आक्रमण..!’ त्याच क्षणी ध्वनीपेक्षा तिप्पट वेगाने एक क्षेपणास्त्र उडाले व ते त्या जहाजावर जाऊन आदळले. या हल्ल्यात त्या जहाजाच्या अक्षरश: चिंधडय़ा उडाल्या. अर्थात लक्ष्य केलेले ते जहाज मोडीत काढण्यात आलेले भारताचेच निकामी जहाज होते. थोडक्यात, ब्राह्मोस क्षेपणास्त्राची ती अविश्वसनीय चाचणी होती. या चाचणीत वापरलेले लक्ष्य करावयाचे जहाज हे भारतीय नौदलातून पूर्वीच बाद झालेले होते. अमेरिका हा भारताचा संरक्षण भागीदार अलीकडच्या काळात झाला आहे; परंतु खरा भागीदार पूर्वीपासून रशियाच होता. रशियाच्या मदतीनेच भारताने ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार करण्याची किमया साध्य केली आहे. त्यासाठी ए. शिवतनू पिल्लई यांच्या खांद्यावर ही धुरा सोपवली होती ती माजी राष्ट्रपती व ख्यातनाम वैज्ञानिक ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी. सुरुवातीला कलाम व पिल्लई यांची कारकीर्द इस्रोतून सुरू झाली. भारतीय अवकाश कार्यक्रमाचे भीष्मपितामह विक्रम साराभाई व त्यानंतर संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार राजा रामण्णा यांनी अवकाश संशोधनाचा संरक्षणात वापर करण्यास सुरुवातीपासूनच उत्तेजन दिले. इस्रोचे अध्यक्ष राहिलेले सतीश धवन हे याबाबतीत थोडेसे साशंक होते. नंतरच्या काळात विचार करता डॉ. ए. पी. जे. कलाम हे इस्रोतून ‘डीआरडीओ’त आले. त्यांच्यापाठोपाठ ए. शिवतनू पिल्लई यांनीही या संस्थेत पदार्पण केले. त्यानंतर कलाम यांनी ब्राह्मोस क्षेपणास्त्र तयार करण्याची जबाबदारी पिल्लई यांच्या खांद्यावर टाकली आणि त्यांनीही ती यशस्वीपणे पार पाडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजघडीला पाकिस्तानकडे ७० ते ११० अण्वस्त्रे आहेत असा अंदाज आहे. १९६५ आणि १९७१च्या युद्धापासून चीन व पाकिस्तान हे एकमेकांचे मित्र आहेत. या गोष्टींचा विचार केला तर ब्राह्मोस प्रकल्प हा इतका महत्त्वाचा का आहे, हे आपल्याला जाणवून देण्याचे काम या पुस्तकाने केले आहे. आजही त्या परिस्थितीत फरक पडलेला नाही. उलट, सर्वच आघाडय़ांवर आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी ठाकलेली आहेत. रशियाशी आपली मैत्री अजूनही कायम आहे. ती राखताना ‘एस ४००’सारख्या क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा रशियाकडून मिळवताना आपल्याला अमेरिका आपल्यावर निर्बंध कसे लादणार नाही यासाठीची कसरत करावी लागते आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती भारतात केल्यामुळे आपण खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण झालो आहोत. आत्मनिर्भर भारताची मुहूर्तमेढ त्यावेळीच कलामांनी रोवली होती आणि त्यातूनच शत्रूला धडकी भरवणाऱ्या ब्राह्मोसची निर्मिती झाली. या क्षेपणास्त्रनिर्मितीची प्रेरणा, संकल्प, त्यात आलेल्या अडचणी, तंत्रज्ञानातील स्वयंपूर्णता यामुळे भारताच्या ‘शांतिदूत’ या उपाधीला खरी किंमत मिळाली. अण्वस्त्रे असलेले देश हे इतरांना धाकात ठेवण्यासाठी त्यांच्या क्षमतेचा उल्लेख नेहमी करीत असतात.  प्रत्यक्ष अण्वस्त्रे वापरण्याची गरज नसली तरी अणुस्फोटाच्या चाचण्या भारताने घेतल्या. त्यामुळेच आज आपल्याकडे कुणी वाकडय़ा नजरेने पाहत नाही. अर्थशक्ती व संरक्षणबळ हीच कुठल्याही महासत्तेची खरी बलस्थाने असतात. भारत महाशक्ती व्हायचा तेव्हा होईल, पण आज तरी संरक्षण सिद्धतेत तो स्वयंपूर्ण झालेला आहे याची जाणीव या पुस्तकातून होते. जगातील परिप्रेक्ष्यात आपले स्थान त्यामुळे कळते, यातच या पुस्तकाचे खरे महत्त्व सामावलेले आहे. या पुस्तकाचा यापूर्वीच रशियन भाषेतही अनुवाद झालेला आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील विश्वसनीय मैत्रीचाही हा एक धागा आपल्याला बांधून ठेवतो.

‘ब्राह्मोस : एका अज्ञात संशोधनयात्रेची यशोगाथा’- ए. शिवतनू पिल्लई, प्रस्तावना-

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, अनुवाद-  अभय सदावर्ते, राजहंस प्रकाशन,

पाने- ३२२, किंमत- ३७५ रुपये   ६