स्थलांतर हे पर्याय नसण्यातून, मुळे तुटण्यातून, नियतीच्या अगम्य कसोटीवर घडते. ते आतून खाणारे दाहक आणि तप्त अनुभव देते. अशा स्थलांतरित माणसांचे बेटांसारखे प्रदेश बनतात. ती बेटे पाण्यात तरंगत राहतात आणि कोणतीही संस्कृती पुन्हा त्या बेटाला जोडून घ्यायला उत्सुक नसते. अशा या सांस्कृतिक बेटाचे, दाहक राजकीय स्फोट होण्याच्या काठावर असताना प्रभावशाली वर्णन ही मराठी कादंबरी करते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोणताही वाचक आपण निवडलेल्या किंवा आपल्याला आवडलेल्या लेखकाचे काम वाचत असतो तेव्हा तो त्या लेखकाचा एका बाजूने लचका तोडून सावकाशपणे चव अनुभवत असतो. बहुतांशी माणसे आपण ज्या बाजूने लचका तोडला तेव्हढी एकच बाजू त्या लेखकाला आहे असे मानून त्या बाजूच्या चवीचे भक्त होतात. रोज उठून तेच खात बसतात. आपल्या पुढील पिढीलासुद्धा व्यापक चवीची सवय लावत नाहीत. बहुतांशी लेखकांना दुसरी किंवा पलीकडची न दिसणारी बाजूच नसते. ‘फ्रेंच फ्राईज’प्रमाणे असे रुचकर पण घातक लेखक आपल्या समृद्ध मराठी साहित्य परंपरेमध्ये आपण अनुभवलेले आहेत. अशा चविष्ट लेखकांचे धडे शाळेच्या किंवा प्रबंध लिहून मास्तर होण्याच्या महाविद्यालयीन वर्गांना असतात.

एका वेळी दोनच पुस्तके – दिवाळी अंकांचा सेपरेट चार्ज अशा आत्याबाईंच्या फराळी लायब्रऱ्या मराठी कुटुंबांना असे ‘फ्रेंच फ्राईज’ दशकानुदशके पुरवत आल्या आहेत. काही मोजके बुद्धिमान, कार्यरत आणि उत्तम लेखक असतात जे अशा उर धपापणाऱ्या, कोंडाळेप्रचुर वाचन संस्कृतीला माहीत नसतात. अनेक बाजूने अशा उत्तम लेखकांचे लचके सावकाश आणि संवेदनशीलतेने तोडत व्यापक जाणिवेचे जाणकार आणि प्रगल्भ वाचक त्यांचा आस्वाद घेत राहतात. चवीच्या आणि ताजेपणाच्या कसोटीवर हे लेखक उजवे असतात. विलास सारंग यांच्यासारख्या प्रगल्भ लेखकाचे साहित्य मराठी कुटुंबातील वाचनाची जाणीव घडणाऱ्या मुलामुलींच्या हाती योग्य वयात येणे हे फार मोठे नशिबाचे काम.

‘एन्कीच्या राज्यात’ या कादंबरीचा तरुण नायक प्रमोद वेंगुर्लेकर सत्तरीच्या दशकात आपल्या आयुष्यातील दुसरे स्थलांतर करतो. पहिले स्थलांतर अनेक तरुणांप्रमाणे महाराष्ट्रातून अमेरिकेला झालेले असते. कुटुंबाच्या आणि भारतीय समाजाच्या भोंगळ वागण्याला कंटाळून तो संधी मिळताच शिकवायला आणि संशोधन करायला अमेरिकेला निघून गेलेला असतो. पण तिथे जाताच पुन्हा त्याचे मन तेथील एकरेषीय आणि मठ्ठ सामाजिक वातावरणाने अस्वस्थ होऊ लागते. प्रमोद अंतर्मुख स्वभावाचा आहे. त्याला जोआन नावाची अमेरिकन मैत्रीण आहे. तो जाईल तिथे स्थानिक मित्र बनवणाऱ्या माणसांपैकी आहे. भारतीय लोकांचा त्याला तिथेसुद्धा कंटाळा आहे कारण जातीचा विचार भारतातील लोकांच्या मनातून जात नाही. एकमेकांची आडनावे खोदून खोदून विचारून त्यावरून त्या माणसाच्या प्रगतीचे आडाखे बांधणाऱ्या, लग्न करायला अमेरिकन मुली शोधणाऱ्या, आणि पैशाच्या विचारांनी वेड्या झालेल्या भारतीय लोकांपासून तो लांब राहतो. वडील त्याला परत यायचा आग्रह करतात कारण गोव्यात नवीन विद्यापीठ उभे राहणार असते आणि कोकणी मराठा लोकांची सद्दी संपवून इतरांना तिथे संधी मिळणार असते. वडिलांचा फोन प्रमोद कट करतो.

अमेरिकेत चालून आलेली चांगली दुसरी संधी नाकारतो. जोआनसोबत शारीरिक आणि मानसिक नात्यातून तयार होऊ लागलेली सुरक्षितता आणि त्यातून मिळू शकले असते असे फायदे नाकारतो. इराकला बसरा या शहरात नोकरी पत्करून अमेरिकेतून चालता होतो. प्रमोद अशा संवेदनशील माणसांपैकी आहे ज्याची जाणीव युरोपने विकसित केली आहे. अमेरिकेने नाही. आणि युरोप म्हणजे भारतावर राज्य केलेलं इंग्लंडसुद्धा नाही. हा फरक महत्त्वाचा आहे. मेलेल्या मराठी लेखकाच्या नातेवाईकांनी भरवलेले लेखकाच्या टोप्या, फोटो आणि कोट यांचे प्रदर्शन भारावून जाऊन पाहणाऱ्या भाबड्या मराठी वाचकांना इंग्लंड म्हणजे युरोप नाही हे नेहमी सांगावे लागते. स्वतःचा शोध घेणं, स्वतःचे निर्णय जाणीवपूर्वक तपासून पाहत राहणं, स्वतःच्या आयुष्याला अनोळखी वळणे देत आपल्या मनातील आतले संगीत ऐकायचा आणि आपल्याला लाभलेली अशी विशिष्ट दृष्टी शोधायचा प्रयत्न वारंवार करणारा आधुनिक युरोपिअन परंपरेचा प्रमोद हा मराठी साहित्यातील नायक आहे.

‘एन्कीचे राज्य’ म्हणजे इराक. एन्की हा सुमेरियन संस्कृतीतील मनुष्याचे रक्षण करणारा देव. अतिशय ताकदवान. इराकमधील उर च्या टेकडीवर बसून तो मानवजातीवर लक्ष ठेवून असतो.प्रमोद १९७० च्या दशकात अमेरिकेतून इराकमध्ये पोचतो, तेव्हा इराकमध्ये छप्पन साली राजेशाही उलटवून टाकून आलेले सोशालिस्ट सरकार आहे. विनोदाने त्याला प्रमोदचे मित्र ‘थर्ड वर्ल्ड सोशालीजम’ म्हणतात. अमेरिकेचा धिक्कार करायचा पण अमेरिकन विद्वानांना शिकवायला , कामाला बोलवत राहायचे. अमेरिकन बायका प्रेयसी म्हणून स्वीकारायच्या पण त्या बायांशी लग्न करायला बंदी. भरपूर पेप्सी प्यायचे. कम्युनिस्टांचा छळ करायचा आणि खाजगी अर्थव्यवस्थेला सतत मारत राहायचे. या कादंबरीमध्ये सत्तरीच्या दशकातील बहुरंगी बहुढंगी इराकमध्ये अनेक प्रकारच्या पौर्वात्य आणि पाश्चिमात्य माणसांचा मिलाफ झाला आहे. फ्रेंच, स्वीडिश, जर्मन, अमेरिकन, भारतीय अशी अनेक देशातील बहुभाषिक आणि विविध संस्कृतीची माणसे तिथे पोट भरायला आली आहेत. तेलामुळे उत्पन्न झालेला पैसा या सगळ्यांना आकर्षित करतो आहे. त्यासोबत अशा आखाती प्रदेशात जाणवणारी सांस्कृतिक पोकळी या अनेक देशातील माणसांना घेरून राहिली आहे. बसरा हे बगदादपासून लांब. शत अल अराब नदीच्या मुखाजवळचे शहर. या शहरात प्रमोदला भेटलेली अनेक बहुरंगी माणसे, त्या अनेक देशांतील माणसांशी आणि समाजाशी सावकाश तयार होणारे प्रमोदचे नाते आणि त्या सर्वांच्या मनात जगण्याविषयी सावकाश तयार होणारी पोकळी हा या कादंबरीचा गाभा आहे.

स्थलांतर हे पर्याय नसण्यातून, मुळे तुटण्यातून, नियतीच्या अगम्य कसोटीवर घडते. ते आतून खाणारे दाहक आणि तप्त अनुभव देते. अशा स्थलांतरित माणसांचे बेटांसारखे प्रदेश बनतात. ती बेटे पाण्यात तरंगत राहतात आणि कोणतीही संस्कृती पुन्हा त्या बेटाला जोडून घ्यायला उत्सुक नसते. अशा या सांस्कृतिक बेटाचे, दाहक राजकीय स्फोट होण्याच्या काठावर असताना प्रभावशाली वर्णन ही मराठी कादंबरी करते.
१९९० साली शाळेत शिकत असताना मंडल आयोगाची बातमी वृत्तपत्रात आली तेव्हा शाळेत शिक्षकांनी अभ्यास बाजूला ठेवून आम्हा सगळ्यांना, ‘तुम्ही आता सगळे ताबडतोब देश सोडून जा. या देशाला तुमची किंमत उरणार नाही. परदेशी विद्यापीठात शिका, तिथेच नोकऱ्या करा आणि परत इथे येऊ नका’, असे कळकळीने सांगितले, पण तो सर्व आठवडा आठवीच्या वर्गात असलेली आम्ही सर्व मुले भेदरून घाबरून गेलो होतो. काहीतरी अनर्थ होणार आहे असे वातावरण होते. घर, ओळखीचे शहर कायमचे सोडून निघून जाणे ही भावना तेव्हा भयंकर वाटली होती. पण दोनच वर्षात सोबतची सर्व पिढी अमेरिकेला निघून गेली. या वास्तवाची जाणीव एन्कीच्या राज्यात वाचताना मला प्रकर्षाने झाली. शाळेतील तो दिवस आठवला.

एन्कीच्या राज्यात या कादंबरीला एकरेषीय कथासूत्र नाही. अस्तित्ववादी जाणिवेच्या कडेने जाणारे ते अस्वस्थ मन:स्थितीच्या नायकाचे अतिशय देखणे असे साहित्यशिल्प आहे. अनेक उत्तमपणे रेखाटलेल्या अनेक देशातील व्यक्तिचित्रांची यात मालिका आहे, जी माणसे प्रमोदच्या बसरा येथील वास्तव्यात त्याच्या आयुष्यात येऊन खोल असा ठसा उमटवून जातात. मारिया ही अर्जेंटनाची नागरिक आहे, जी स्थानिक इराकी माणसाशी, लग्नाला बंदी यायच्या आधी लग्न झालेले असूनही प्रमोदची प्रेयसी बनते. मारिया सोडून गेल्यावर प्रमोदच्या आयुष्यात स्थानिक इराकी कुटुंबातील सलवा येते. फ्रांस्वा नावाचा लेबनीज – फ्रेंच मित्र भेटतो. भारतातून आलेले आणि फ्लॅट शेअर करणारे शर्मा आणि मुकर्जी हे पुरुषांचे जोडपे आहे. अलिगढ येथून आलेला कट्टर धार्मिक हमीद आहे, जो इराकला येऊन नुसती दारूच प्यायला लागत नाही तर जवाद नावाच्या दुसऱ्या पुरुषासोबत शारीरिक संबंध ठेवतो. कोकणातील वेंगुर्ल्याचा खलाशी काझी आहे, खुदेर हा कम्युनिस्ट मुलगा आहे जो प्रमोदचा टाइपरायटर चोरून वापरून पार्टीचे काम करतो. शरवान नावाचा कुर्दी वंशीय मुलगा आहे जो प्रमोद बसवीत असलेल्या नाटकात ज्युलिअस सीझरचे काम करतो पण सोशालिस्ट पार्टीकडून त्याची हत्या केली जाते. माणसे भेटत आणि तुटत जातात. ओळखीचे रूपांतर क्षणकालीन मैत्रीत होते पण नात्यात हाती काही लागत नाही, अशी तरंगणारी अस्वस्थ जाणीव प्रमोदच्या मनात मोठी होत राहते.

प्रमोदच्या मन:स्थितीचे वर्णन करायला वापरलेल्या अतिशय ताकदवान दृश्यप्रतिमा ह्या कादंबरीची सौंदर्यस्थळे आहेत. चोरून इम्पोर्ट केलेले टाइपरायटर्स आणि त्याचे नाट्यमय आवाज, शहरातील प्रसिद्ध कॅब्रे, मिलिट्रीने समुद्रकिनाऱ्याला घातलेले कुंपण, पाणथळ प्रदेश, शहरातील धुळीची वादळे, वर्षातून एकदाच पडणारा वेड्यासारखा पाऊस. कादंबरीतील लैंगिकतेचे प्रदेश अतिशय मोकळे, विस्तृत आणि कोणताही आव न आणता सहजपणे लिहले आहेत. विलास सारंगांचे इतर साहित्य वाचताना मला लक्षात आले की समाजातील जातीव्यवस्थेचा सांस्कृतिक वातावरणावर होणारा परिणाम यावर त्यांनी आपल्या कामातून वारंवार चिंतन केले आहे. पुराणकथांच्या आधारावर अतिशय उत्तम विनोदबुद्धी वापरून त्यांनी आधुनिक कथासूत्र निर्माण केली आहेत जी आजच्या जातिव्यवस्थेवर भाष्य करतात. ‘एन्कीच्या राज्यात’ पुन्हा वाचायला गेलो तेव्हा त्यांच्या लेखन शैलीचे वैशिष्ट्य असलेले हे दोन्ही पैलू अधोरेखित झाले. ‘एन्कीच्या राज्यात’ अनेक वेळा चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे उलगडत जाते कारण प्रमोद हा एक नायक सोडल्यास कादंबरीतील कथासूत्र एकरेषी आणि व्यक्तिकेंद्रित कथेचे नाही. ते दृश्य आणि ध्वनी यातून तयार होणाऱ्या अनुभवाचे आहे.

शेजारील इराणमध्ये १९७९ साली उठाव होऊन गंभीर परिस्थिती उद्भवते. इजिप्तने त्याच वेळी इस्राइलला राजकीय पाठिंबा दिल्याबद्दल रागावलेल्या अरब राष्ट्रांची बैठक बगदादमध्ये भरते आणि विमानतळ दहा दिवसांसाठी बंद होतो. देश सोडून पळून जाणारी माणसे इराकरूपी तुरुंगात अडकतात. या राजकीय नाट्यपूर्ण क्षणांपाशी संपणारी ही कादंबरी फार मोठा अंतर्गत प्रवास करून मोकळ्या शेवटच्या ठिकाणी थांबते. नियतीच्या. पुढे काय होईल हे माहीत असण्याच्या आणि नसण्याच्या.

आखातातील पैशाने माझ्या परिचयातील अनेक लोकांचे जगणे सुकर झाले. पण त्याच पैशापलीकडील जगण्याचे प्रतिबिंब मराठी साहित्यात या कादंबरीच्या रूपाने पडल्याचे अनुभवल्याने मला वाचक म्हणून फार आनंद झाला. आजपर्यंत अनेक वेळा पुनर्वाचनासाठी मी या कादंबरीकडे वळलो आहे, त्या प्रत्येक वेळी मी नवीन अनुभवांना सामोरा गेलो आहे.बगदादचा विमानतळ बंद होतो तेव्हा प्रमोदची अमेरिकन प्रेयसी जोआन शेजारच्या इराणमधील शहरात असते. प्रमोद इराकमध्ये अडकलेला असतो. भारतात जाणे आणि पुन्हा अमेरिकेला जाणे या दोन्ही शक्यता बंद झालेल्या असतात. अशा पोकळीवजा परिस्थितीत तो मित्रांसोबत कॅब्रे पाहायला जातो. रात्री नाचणाऱ्या दोन मुलींना टॅक्सीत घालून मित्रांसोबत हॉटेलवर जाताना प्रमोदला हुंदके येऊ लागतात. सोबत झोपण्यासाठी त्यांनी उचललेली मुलगी एका हाताने त्याला थोपटू लागते आणि दुसऱ्या हाताने त्याच्या कोटाच्या खिशात हात घालून पैशाचे पाकीट चोरू लागते. ह्या हाताच्या प्रतिमेवर ही कादंबरी संपते.

मातृभाषा आपल्यावर स्थानिक संस्कृतीचे बंधन घालून आपल्याला जखडून तर टाकत नाही ना? याकडे प्रत्येक लेखकाने सजगपणे लक्ष द्यावे लागते. भाषा हे फक्त साधन असते. आपण अनुभवविश्व आणि आभास निर्माण करायची क्षमता घेऊन लिहावे आणि तसे करताना भाषेचा फक्त साधन म्हणून वापर करावा. वैक्यतीक कुटुंब , समाज, त्याच्या चालीरीती , ह्याचे दडपण आणि ओझे फेकून देता येते का हे पाहावे. मातृभाषा आणि आपण याचा संबंध इतकाच असावा. आपण म्हणजे आपल्या आजूबाजूचा समाज नाही. ही जाणीव व्ही एस नायपॉल यांच्यासारख्या जगभरातील ज्या अनेक लेखकांनी पक्की केली त्यात विलास सारंग यांचे नाव माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. व्यक्तिकेंद्रित शहरी मानसिकतेचे लिखाण निर्भीडपणे आणि संवेदनशीलतेने आपल्या मातृभाषेत करायला, आपल्या अनुभवांना न संकोच वाटता मोकळेपणाने कागदावर उतरवायला जे बळ लागते ते बळ योग्य वयात मला ‘एन्कीच्या राज्यात’ या कादंबरीने दिले. त्यामुळेच मी ‘कोबाल्ट ब्ल्यू’ लिहू शकलो असे मला वाटते. त्यामुळे या आधुनिक मराठी साहित्यकृतीचे माझ्या मनातील स्थान फार मोठे आहे.

सचिन कुंडलकर


सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ह्यांच्यासोबत सहायक म्हणून कामाला सुरुवात करून , सचिन कुंडलकर ह्यांनी गंध, गुलाबजाम, हॅपी जर्नी , पॉंडिचेरी, कोबाल्ट ब्लू असे दहा चित्रपट लिहून दिग्दर्शित केले आहेत. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोबाल्ट ब्लू आणि मोनोक्रोम ह्या त्यांच्या कादंबऱ्या तसेच आणि नाईंटीन नाईंटी हे ललित लेखांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.