समीर गायकवाड
जे घडलेय ते लिहिताना सच्चेपणाचा रंग काळा असला म्हणून त्याचे मूल्य घटत नाही; खोटेपणाचा रंग भलेही कितीही शुभ्रधवल असला तरी त्यापुढे हा काळोख हजार पटीने भारी ठरतो. नैतिकतेच्या बेगडी शुभ्र कॅनव्हासवरती ‘सैली’च्या सच्चेपणाचा काळा ठिपका उठून दिसतो- अगदी कथित पतिव्रतेच्या भाळावरल्या ढळढळीत कुंकवासम.
श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली ‘सैली : १३ सप्टेंबर’ ही कादंबरी त्या काळातली आहे, ज्या काळामध्ये मराठी जनमानसात सोवळे- ओवळे पाळले जात होते. इतकेच नव्हे तर साहित्य- प्रवाहातदेखील अशा प्रकारचे भेद अस्तित्वात होते. वेश्या आणि वेश्यावस्ती यावर ज्ञात मराठी साहित्यातले आजवरचे सर्वाधिक भेदक, परिणामकारक लेखन नामदेव ढसाळांनी केलेय हे सर्वश्रुत आहे. अन्य काहींच्या लेखनामध्ये याविषयी कधी तुरळक तर कधी दीर्घ उल्लेख आहेत.
मराठी लेखक आणि त्याच्या आयुष्यात आलेलं वेश्यावस्तीतलं प्रेमजीवन हा मराठी साहित्याचा विषय होऊ शकला नसता; मात्र श्रीकांत सिनकरांनी ‘सैली : १३ सप्टेंबर’ लिहून नवी दिशा चोखाळली. या कादंबरीचे लेखनगुण साहित्यिकदृष्टय़ा आणि सामाजिकदृष्टय़ा भिन्न पातळीवरचे आहेत. ही कथासाखळीरूपी कादंबरी सत्यावर बेतली होती. ती सिनकरांची आत्मकथा होती. यातल्या पात्रांची पार्श्वभूमी नि त्यांचं बाविश्व थेट वेश्यावस्तीशी निगडित आहे.
श्रीकांत सिनकर यांची ओळख पोलीसचातुर्य कथा, तत्सम गुन्हेगारीविषयक लेखन करणारे साहित्यिक अशीच सीमित राहिली. वास्तवात त्यांच्या लेखनामध्ये केवळ गुन्हेगारी विश्व आणि तपास इतक्याच गोष्टी नव्हत्या. सिनकरांचा वावर गुन्हेगारी अड्डे, जुगाराचे क्लब, वेश्यावस्ती, मटकावाले आदींपाशी असे. निव्वळ घरात बसून त्यांनी या कथा रचलेल्या नाहीत. ते स्वत: या विश्वात फिरत राहिले, नानाविध अनुभव घेतले. जीवनात जे काही केलं त्यासाठी त्यांनी स्वत:ला जबाबदार धरलं. असं जगण्यासाठी कमालीचं एकाकीपण भिनावं लागतं- ते सिनकरांच्या वाटय़ाला आलं होतं. सिनकर एक व्यक्ती म्हणून कसे होते याविषयी त्यांच्या समकालीन लेखक मित्रांनी काही उत्तम निर्विष नोंदी केल्यात. त्यातून त्यांचे बेधडक आणि अफाट व्यक्तिमत्त्व समोर येते. कथित नैतिक संकेतांसह समाजाला धडका मारत आपल्याच धुंदीत जगणारा हा माणूस नितळ होता. सौजन्यशील बोलणं, आतिथ्यशील वागणं हा त्यांचा स्थायिभाव होता.
हेही वाचा >>> आदले । आत्ताचे : लैंगिकतेचे कलात्मक समाजभान..
त्यांना मनमौजी म्हणणं अनुचित ठरेल, ते अनिर्बंध जगले असं म्हणणं योग्य ठरेल; कारण काही महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना मनाचा कोंडमारा करत जगावे लागलेय. अशापैकीच एक गोष्ट ‘सैली’ची आहे. सिनकर एका देखण्या नेपाळी वेश्येच्या प्रेमात पडले होते. ‘सैली’ तिचे नाव. तिचेच व्यक्तिचित्र या पुस्तकात रेखाटलेय. सैलीशिवाय जगन, दत्तू आणि जीन यांच्यासोबतचे नातेसंबंध उलगडलेत. १९५५ साली वयाच्या पंधराव्या वर्षी सिनकर दत्तूला भेटले, त्यानंतर जगन, सैली आणि जीनची भेट झाली. १९७९ साली जीनसोबतचे नाते दुरावले नि हा अध्याय संपला. या दोन तपांच्या काळाची गोष्ट म्हणजे ‘सैली : १३ सप्टेंबर’ हे पुस्तक. यातील १३ सप्टेंबर ही तारीख सैलीच्या वाढदिवसाची. देहजाणिवांच्या पलीकडे असणारी जिवाची ओढ ‘सैली’त पानोपानी भेटते. गरिबीतून सिनकर कोवळय़ा वयात मटक्याच्या ‘फास्टमनी’कडे खेचले गेले. आपली जुगारी ओढ ते गरिबीमुळे असल्याचे स्पष्ट करत नाहीत, ती वर्णनातून समोर येते. ‘न्यूयॉर्क कॉटन’ मटक्याचे बुकिंग घेणाऱ्या वाण्याचा मदतनीस असणारा जगन त्यांना यातूनच भेटला. त्याच्याशी जोवर मैत्री होती तोवर खिसा गच्चच राहिला. सात दशकांपूर्वी षोडशवर्षीय पोरापाशी जुगारातून शंभराची नोट येणे याचा हर्षांर्थ ज्यांना अनुभवास आला तेच जाणोत! जगनसोबत सिनकर मुंबईभर फिरले. हातभट्टीपासून वेश्यावस्तीपर्यंतच्या बदनाम वाटा त्यांनी तुडवल्या. वेश्येशी प्रत्यक्ष देहस्पर्शास मात्र आणखी पाच वर्षे लागली. जगनसोबत त्यांनी हरतऱ्हेची ऐश केली. जगनमुळे श्रीकांतना पैशाचं जुगाराचं विश्व ‘ओपन’ झालं. बरेच दिवस सर्व सुरळीत चालले. १९६० मध्ये सिनकर मुंबईमधून पुण्याला गेले, १९६१मध्ये पानशेतच्या पुरामुळे ते मुंबईस परतले. ते पुण्यातच राहिले असते तर ते मटका अड्डेवाले झाले असते. दरम्यान सिनकरांनी मुंबई सोडण्याआधी जगनने वाण्याजवळचे बुकिंग घेण्याचे नि रायटरचे काम सोडून स्वत:चा ‘धंदा’ सुरू केला होता, त्यात पकडले गेल्यावर सिनकरांनीच त्याला जामीन मिळवून दिला होता. दीड दशकांनी सिनकर जगनला भेटले तेव्हा तो जगनशेठ झाला होता. त्याचे हे स्थित्यंतर श्रीकांतना रुचले नाही, आपला मित्र बदलला असला तरी त्याने दिलेला मूलमंत्र त्यांना अखेपर्यंत प्रिय होता. इथून सिनकरांचा जगनशी संपर्क तुटला. १९६१ ला पुण्याहून मुंबईला परतल्यावर रिकामटेकडय़ा मित्रांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यात दत्तू आला. विक्रोळी स्टेशनला लागून असलेल्या टेकडीच्या तळाशी हातभट्टीच्या अड्डय़ामध्ये दारू गाळण्यासाठी भट्टय़ा पेटवायचे काम दत्तू करायचा त्यामुळे त्याची ओळख ‘दत्तू बॉयलर’. सिनकरांच्या आयुष्यात जगनमुळे जुगार आला आणि दत्तूमुळे हातभट्टी आली. कंपनीत कामाला असूनही कफल्लक असणारे सिनकर नि हातभट्टीवाला दत्तू यांची मैत्री विलक्षण होती. हातभट्टी कशी बनवतात, त्यातले बारकावे कोणते इत्यादी दत्तूच्या मदतीने शिकून सिनकरांनी स्वत:च दारू बनवली. १९६३ ला सिनकरांची नोकरी सुटताच दत्तूची साथही सुटली. दीड दशकानंतर दत्तू पुन्हा भेटला, मात्र त्याचं एकाकी जगणं सिनकरांच्या जिव्हारी लागलं. जुगार, दारू आयुष्यात आल्यानंतर साहजिकच वेश्यागमनाचा तिसरा टप्पाही त्यांच्या जीवनात आला. १९६० साली सिनकर कुंटणखान्यात गेले.
हेही वाचा >>> चौसष्ट घरांच्या गोष्टी : युवा बुद्धिबळपटूंचा दबदबा
कुंटणखान्यात जाण्यामागे वासनापूर्ती करणे, देहभावनांचे शमन करणे हीच कारणे होती असं सिनकर प्रांजळपणे सांगतात. यात गुंतूनही विशीच्या वयातले सिनकर मुली पटवून त्यांना भाडोत्री गाडीवर फिरवत. रूढ जगतामध्ये सामान्यत: वेश्येकडे जाणारा माणूस म्हणजे चरित्रहीन, नीतिहीन, बदनाम समजला जात असूनही सिनकर हे सत्य मांडताना डगमगत नाहीत. निव्वळ तटस्थपणे ते स्वत:कडे, समाजाकडे पाहतात. बैदा गल्लीमधल्या आंटीपाशी दारू ढोसून केवळ टाइमपाससाठी फॉकलंड रोडवर बायकांकडे जाणे हे उचित, अनुचित की अनैतिक या गुंत्यात न पडता ते त्यांना हवे तसे जगत. त्यांचे ते दैनंदिन जगणे होते आणि या दरम्यानच १९६४ मध्ये सैली त्यांना भेटली. ही नेपाळी तरुणी तिच्या नजरेमुळे चेहऱ्याच्या ठेवणीमुळे सिनकरांच्या मनात ठसली. तिच्याकडे त्यांनी वेश्या म्हणून कधीही पाहिले नाही हे विशेष. तिच्यावर त्यांनी प्रेम केले. एका वेश्येसोबत असणारा देहव्यवहार त्यांनी जरूर केला, मात्र तो सराईत पिसाटलेला उपभोग नसून सहवासाचा आनंद होता, हे त्यांनी नमूद केले. सैली आणि सिनकर यांच्यात शारीरिक व्यवहार संपताच अंत:करणाच्या ओढीचे नाते निर्माण झाले होते. मात्र या नात्याला नाव कोणते, याचे उत्तर सिनकर देऊ शकले नाहीत. कारण समाजाला हे नातेच मान्य नसते. भलेही सैली आणि सिनकर यांच्यातले प्रेम ‘प्लेटोनिक’ नसेल, पण ते वखवखलेल्या वासनेचे, हपापलेल्या देहजाणिवांचेही नव्हते. एकदा सैलीच्या मालकिणीने अड्डय़ाची जागा बदलली, त्यामुळे सिनकरांची तिची चुकामूक झाली. सिनकरांच्या अंगी केवळ देहभूक असती तर त्यांना ठाऊक असलेल्या अख्ख्या मुंबईतल्या कोणत्याही कुंटणखान्यात जाऊन आपले कंडशमन केले असते. मात्र मामला तो नव्हताच. सैली पुन्हा भेटल्यानंतर तिच्या देहसुखापेक्षा तिचा सहवास पुन्हा लाभणार याचा त्यांना आनंद होतो. सैलीच्या कुंटणखान्यातील इतर मुलींबरोबर सिनकर शय्यासोबत करत नाहीत. ते आपल्या नकळत सैलीच्या विश्वात घेऊन जातात. पुढे जाऊन त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. हे करत असताना ते कुठेही प्रबोधनाचा आव आणत नाहीत. इतर वेश्या आणि सैली यांच्यातला फरक सिनकरांना ठाऊक होता. सिनकरांचा बोल्डनेस आणि सच्चे निढळ प्रेम याची प्रचीती त्यांच्या वेश्यावस्तीतील वावरातून येते. आपल्या घरामध्ये त्यांनी सैलीचा फोटो फ्रेम करून लावला होता आणि आपण तिच्याशी लग्न करणार आहोत हे ते उघडपणे सांगत. सैली सिनकरांना लग्नास नकार का देते याचे ठोस निष्कर्ष सिनकर मांडत नाहीत. आपण लेखक आहोत हे तिच्याशी ओळख झाल्यापासून सात वर्षांच्या काळापर्यंत लपवल्यानंतर एके दिवशी सैलीला सत्य कळते. हा भला माणूस गुंतून पडला तर त्याची अधोगती होईल अशी तिची भावना असते, त्यांच्यातले संबंध ताणले जातात. एके दिवशी अफाट दारू पिऊन सिनकर तिच्यापाशी जातात. तिला आपल्यासोबत बाहेर चलण्यास सांगतात. सैली नकार देते. तिने आधी लग्नास नकार दिला होता नि आता ती आपल्यासोबत येण्यासही नकार देतेय याचा ते भलताच अर्थ लावतात आणि तिला चारचौघात अवमानित करतात. तीही त्यांना तिखट प्रत्युत्तर देते. संतापलेले सिनकर तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार देतात. त्यातून त्यांचे नाते विकोपाला जाते. १९७१ नंतरचे सिनकर आणि पूर्वीचे सिनकर यांच्या लेखनात, विचारात फरक आहे हे जाणवते! सेक्सपासून स्वत:ला दूर ठेवणारे सिनकर पुढे जाऊन ‘जीन’कडे ओढले जातात. जीनचे खरे नाव अरुंधती. उच्चशिक्षित, सुंदर, कमावती, स्वत:चे विचार असणारी आणि पुरुषांच्या मनाचा तळ शोधणारी तरुणी. तिच्या कमनीय देहाकडे सिनकर खेचले जातात. जीनच्या नकाराचा सवालच नव्हता. भाळलेल्या पुरुषाबरोबर आवडत्या पद्धतीने जगण्यास सज्ज असलेली जीन एका अर्थाने ‘हाय प्रोफाइल प्रोस्टिटय़ूटच.’ ते दोघेही एकमेकांच्या देहाशी, मनाशी खेळत राहतात. जीन एकाच वेळी अनेक पुरुषांना खेळवू शकते. तिला हवा तसा पुरुष भेटतो. तिचे लग्न ठरते. सिनकरांच्या आयुष्यातून ती निघून जाते. इथे एक त्रिकालाबाधित सत्य सिनकर अगदी बिनदिक्कत मांडतात. जीनसोबत आपण कितीदा झोपलो आणि कितीदा देहसुख भोगले याचे मूल्यमापन ते करू शकत नाहीत. जीनचा देह कवेत असूनही त्यांच्या मनामध्ये सैलीचा चेहरा कायम असायचा. हे असे अनेक पुरुषांसोबत घडते, पण ते इतक्या धडधडीतपणे सांगण्याची िहमत क्वचित कुणात असते. आपण वेश्येकडे जात होतो, तिच्याशी संबंध ठेवत होतो, लग्न करू इच्छित होतो. दारू, मटका, जुगार, वेश्या यांखेरीज गुन्हेगारीचे जग जवळून पाहूनही त्या दुनियेचे आपण घटक झालेलो नाहीत हे ते सच्चेपणाने मांडतात. बहुतेक आत्मकथनात स्वत:ची भलावण करण्याचा दोष आढळतो. अपवाद वगळता कुणी तंतोतंत खरे लिहिले तरी एखाददुसरी गोष्ट लपवण्याकडे अनेकांचा कल असतो. इथे सिनकर या सर्व लक्षणांच्या ठिकऱ्या उडवतात. सभ्यतेची झापडे लावून वाचन करणाऱ्या वाचकालाही थपडा लगावतात. अशी बरीच पात्रे आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात लपूनछपून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष येतात, आपण त्यांच्यासोबत कसे वागतो वा त्यांच्या बाबतीत काय विचार करतो हे आपण कधीही प्रांजळपणे मांडत नाही, कारण आपण अव्वल दर्जाचे छुपे भामटे असतो. सिनकर भामटे नव्हते हा त्यांच्यातला गुण आहे. सैलीच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये पेशाने परिचारिका असलेल्या सिनकरांच्या पत्नीचे अधिकचे व्यक्तिमत्त्व आलेय. तिच्यासोबत नाते जुळण्यापूर्वी सिनकरांनी तिला ‘सैली..’ वाचायला दिले. त्यांचे हे नितळ खरेपण तिला आवडले. सैलीकडे समाज कसा पाहील याचा विचार सिनकरांनी जिवंत असतानाही केला नाही, मृत्यूपश्चातचा तर सवालच नव्हता. साहित्यिक मांडणीमधली सामाजिक कथा बऱ्याचदा बेंगरूळ स्वरूपाची वाटते, तिला अशा प्रकारच्या लेखनाची अलर्जी असते. व्यसनाधीनता, रंडीबाजी- वेश्यागमन याचे उदात्तीकरण साहित्य खपवून घेत नाही अशी मखलाशी करत हे लेखन सांदाडीत टाकले जाते. मात्र समाजाच्या ठायी जे दोष आहेत त्याबद्दल साहित्यिक काय करतो याविषयी साहित्यविश्व मौनाची गुळणी धरते. समाज तर यावर व्यक्तही होऊ इच्छित ना. सरडा नसूनही ते गरजेप्रमाणे रंग बदलते. त्याला ‘असले’ सिनकर पचनी पडतच नाहीत! कथेत साहित्यमूल्य नाही, प्रतिभेची गुणलक्षणे नाहीत आदी भाकड चिकित्सेत सैली अनेक पातळय़ांवर कमी पडत असेल, मात्र छाती ठोकून खरे सांगण्यामध्ये आणि जसे आहे तसे मांडण्यामध्ये ती अनेक साहित्यकृतींपेक्षा कैक पटीने पुढे आहे!
सिनकरांचे सकल विश्व धूसर होऊनही ते त्याकडे ज्या विलक्षण दूरस्थ भावनेने पाहतात तेच इतके प्रभावी आहे की नकळत सिनकरांविषयी सहानुभूती निर्माण होते. आता काळ बदललाय. अशा धाटणीच्या लेखनास आता थोडी तरी समाजमान्यता मिळतेय, याची पायाभरणी ‘सैली’सारख्या लेखनातून झालीय हे नाकारता येणार नाही.
sameerbapu@gmail.com