संतोष जगताप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१९७२ च्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या कथांतून पापभीरू, शोषित, वंचित, दीन-दलितांच्या वेदना शब्दबद्ध करीत भय, भूक, वासना, सत्ता इत्यादीसंबंधी समाजाच्या अंतरंगातला दुष्ट काळ भास्कर चंदनशिव यांनी चितारला आहे. कथेच्या मुळाशी मूल्यांच्या पडझडीनं अस्वस्थ झालेलं आणि मुक्या जिवांविषयी कारुण्यानं भरून आलेलं मन आहे.

समकालीन सामाजिक पर्यावरणात माणुसकीची मूल्यं जपण्यासाठी तळमळीनं सशक्त लेखन करणारे भास्कर चंदनशिव हे मराठी ग्रामीण साहित्यातले एक ठळक कथाकार. संपूर्ण गावगाडा कवेत घेत शेतकरी आणि दलित समूहाचं सर्वांगीण चित्रण आणि या समूहाच्या व्यथा वेदनांना वाचा फोडण्यासाठी वैचारिक मनोभूमिकेची पेरणी करणं हा त्यांच्या लेखनाचा स्थायीभाव. सामान्य माणसाच्या जगण्याशी एकरूप झालेला, आपली सत्याग्रही लेखननिष्ठा अढळ ठेवणारा हा व्रतस्थ लेखक अंत:र्बाह्य निर्मळ मनाचा माणूस आहे. त्यांचे ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘नवी वारुळं’, ‘बिरडं’ हे कथासंग्रह, भूमी आणि भूमिका, माती आणि मंथन, माती आणि नाती हे समीक्षात्मक लेखसंग्रह आणि रानसय, भिंगुळवाणा हे ललित लेखसंग्रह इत्यादी पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

‘जांभळढव्ह’ हा कथासंग्रह १९८० साली प्रकाशित झाला. त्यात एकूण १५ कथा आहेत. इथल्या माणसांचा पसारा पाहिला की लेखक कोणत्या वर्गाचा आवाज मांडू पाहतो ते लक्षात येईल. दांडग्यांच्या अत्याचारानं पिचलेला अगतिक बंका महार, गावाचे दगड झेलत गहिवरून रडणारी खुळी, भुकेच्या जंजाळात अडकलेल्या गया-चंपा, मनाचा कोंडमारा सोसणाऱ्या सरू, आंधळी या स्त्रिया, नामा नावाचा भोळसर माणूस, पिण्याच्या पाण्यासाठीही वंचित असणारा दलित, पाळीव जनावरागत मिळणारी वागणूक सोसणारी पबी, मनोरुग्ण पोरगा, मसणवटय़ाच्या जागेसाठीही परवड वाटय़ाला आलेला अण्णा रामोशी, सत्तापिपासूंच्या कचाटय़ात सापडलेला पांडा.  ‘नाही रे’ वर्गातल्या या माणसांची दु:खं लेखकानं या कथांतून समोर आणली आहेत. २८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात भास्कर चंदनशिव म्हणाले होते, ‘‘समाजाचा विश्वस्त म्हणून साहित्याद्वारे सामाजिक प्रश्नांची वकिली मी नक्कीच केली आहे.’’ या विधानाचा प्रत्यय त्यांच्या सर्व लेखनातनं येतो. त्यांच्या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या माणसांच्या व्यथा सामाजिक प्रश्नांतूनच निर्माण झालेल्या आहेत.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे : बदनाम गल्ल्यांतले सच्चेपण

शोषित, वंचित समाजघटकांतल्या स्त्रियांच्या पिचलेल्या डोळय़ातलं पाणी या कथासंग्रहाच्या पानोपानी आहे. स्त्रीवर झालेल्या अत्याचाराची घटना घेऊन आलेली ‘आग’ ही कथा. यातील पीडित फुला ही दलित आहे आणि जुलूम करणारा तरुण धना पाटलाचा पोरगा आहे. आपण रोजच्या भाकरीसाठी गरजवंत आहोत म्हणून आपली माणसं धनदांडग्यांसमोर शरणागत होतात ही फुलाची जिवघेणी वेदना आहे. असलं अपमानित जीवन जगण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा विचार तिच्या मनात येतो. फुलाची समजूत घालताना वंचा म्हातारी आपल्या बहिणीच्या नातीचा दाखला देते. तिनं आत्महत्या केली. बहीण रडून रडून आंधळी झाली, पण वेदना मुकीच राहिली.  माणसाच्या घाण वासानं शिशारलेल्या ‘खुळीची गोष्ट’ सुन्न करते. कुत्रा आणि खुळी यांच्यांसंबंधी लेखकानं केलेलं कलात्मक चित्रण आतडं पिळवटून टाकणारं आहे. दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळून निघालेल्या माणसांचं चित्रण असणारी, भूक आणि भयाचं दर्शन घडवणारी, दोन वेळच्या अन्नासाठीही मोताद झालेल्या माणसांना आपल्या वासनेसाठी बोळात गाठून वापरून घेणारी वासनांध प्रवृत्ती दाखवणारी ‘तर गया दारात बसूनय’ ही कथादेखील तितकीच परिणामकारक. मूल्य जपण्यासाठीचा पापभीरू माणसांचा अंत:र्बाह्य संघर्ष या कथेतनं प्रभावीपणे टिपला आहे. ‘भूक’ कथेतली आंधळी आपल्या काळजातलं गुज सांगण्यासाठी चंपी नावाच्या कुत्रीला लळा लावते. चंपीही आंधळीवर जीव  जडावते. माणसाच्या ‘बोलण्या’विषयी फार कल्पकतेनं ही कथा सूचन करते. ‘जांभळढव्ह’ कथेत भावनांचा गहिरा डोह आहे. माणूसपण विसरून हैवान झालेला पबीचा चुलता आणि नवरा यांसारखी माणसं, पोरकेपणानं हीन-दीन झालेली पबी आणि तिची आई, पाळीव जनावरागत मिळत असलेली वागणूक सोसणारी पबी बापूला, ‘बापू, मला वाट दाव की..’ असं म्हणते तेव्हा कथा वाचणारा वाचकच वाट शोधायला लागतो. दुष्काळात खडीवरच्या कामाचा मुकादम गरजवंत स्त्रियांना आपल्या वासनेची शिकार व्हायला भाग पाडतो. नकार देणारणीला आपल्या ‘पोटावर बिबं घालायची’ वेळ आणतो. अशा स्थितीत चंपाच्या मनातलं द्वंद्व ‘पीळं’ या कथेतनं येतं. ‘आपण माणसाच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा कुत्री झालो असतो तर तीन टायमाला पोट तरी भरलं असतं’ असा विचार तिच्या मनात येतो. त्यावेळी कुत्रीच्या तोंडी आलेले ‘पोटाची सवत होऊ इच्छिते, मग उंबराचीही सवत व्हावं लागेल’ हे उद्गार आपल्याही मनाला पीळ पाडतात. सत्ताकारणात स्त्रीला कसं नागवलं जातं याचं चित्रण ‘निवडणूक’ या कथेतनं येतं.  मारण्याच्या निमित्तानं का होईना नवऱ्याचा हात आपल्या अंगाला लागला म्हणून सुख मानणारी, नवऱ्याच्या सहवासाला आणि आई होण्याला आसुसलेल्या; पण एक अटळ भागधेय वाटय़ाला आलेल्या सरूचा वेल सुकत वाळून गेल्याची कहाणी ‘कारल्याचा येल’ या कथेतनं येते.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे : लैंगिकतेचे कलात्मक समाजभान..

जातीमुळं वाटय़ाला येणारं हीनपण, आर्थिक कुचंबणा आणि त्यातनं होणारा माणसांचा मानसिक कोंडमारा या कथा समोर आणतात. आपल्या सुनेवर झालेल्या अत्याचारानं बंकान्नाच्या काळजात आग लागली आहे. पण भाकरीशी वैर कसं बांधावं या प्रश्नानं त्याला वेढलं. शिरजोरांनी पैशाची भाड दिली; पण केवळ पैसे मिळाले म्हणून बंकान्ना गप्प राहिला का? गावाच्या विरोधात जाऊन उद्या आपण जगायचं कसं? ही त्याची अगतिकता त्याला गप्प राहायला भाग पाडते. या घुसमटीतनं बाहेर जायला मरण ही एकच वाट आहे असं म्हणत बंकान्ना स्वत:च्या मनाला खाऊन घेतो. ‘जांभळढव्ह’मधला बापू हा पबीचे भोग बघून आतनं उलतो. ‘पाणी’ कथेत दलितांच्या स्पर्शानं पाणी बाटतंय म्हणून तथाकथित वरच्या जातीतले लोक दलितांना गावाच्या आडातलं पाणी घेण्यावर बंधनं आणतात. तेव्हा दलित ‘आपला सवतेल हिरा’ खांदू लागतात. त्यावेळी सदा ‘यो हिरा गाववाल्यांना देखवल का? दांडगावा करत ते आडकाठी आणतील. आपल्या झऱ्याचं पाणी टिकंल का? प्यायला मिळंल का?’ हे आपल्या पोरांना कसं समजावून सांगावं या कात्रीत सापडतो. ‘ऐक कथा माणसांची’ ही कथा मनोरुग्णाच्या आई-वडिलांची घालमेल सांगता सांगता मनोरुग्ण आणि गावाचीही कहाणी सांगते. ‘मसणवटा’ कथेतली पाटलीन जिवा रामोश्याच्या टोपल्यात ‘वाळका बुरसटलेला तुकडा’ टाकते. आणि त्याच वेळी त्याच्याजवळ आपल्या कुत्र्यासाठी ‘सबंध दुमती गरम चपाती’ देते. आभाळ गहिवरून येतं. जिवाच्या डोळय़ापुढं त्याचं घटका मोजणारं पोरगं तरळू लागतं. त्याचं काळीज ‘नखलू’ लागतं. पोरगं वारल्यावर मसणवटय़ाच्या जागेवरनं होणारी परवड सोसताना जिवाचं काळीज जातीय वर्चस्वाच्या जोडय़ाखाली चेंगरलं जातं. कामावरच्या मुकादमाची वागणूक हैवानाची आहे म्हणून चंपाचा नवरा गरज असूनही तिला त्या कामावर येऊ देत नाही. धनदांडग्या सत्तापिपासूंच्या दहशतीत दबणाऱ्या सामान्य माणसाची होलपट ‘निवडणूक’ ही कथा दाखवते.

सर्वंकष समाजहितासाठी आवश्यक पायाभरणीची निकड नजरेस आणून देताना या कथा समाजवास्तव दाखवतात. समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती आणि व्यवस्थेचं नाकर्तेपण नोंदवतात. बुरसटलेल्या चालीरीती, अपमानित जिणं नाकारत दलित आपला स्वतंत्र पाणवठा करू बघतात तेव्हा त्यांच्या जिवावर उठत जगणं हैराण करणारी व्यवस्था इथे दाखविली जाते. स्त्रीला भोगवस्तू मानत तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणारी, जातीय वर्चस्ववादातनं माणसाच्या मरणानंतरही माणसाला हीन लेखणारी, सत्तेसाठी गोरगरिबांच्या घराची राखरांगोळी करणारी दुष्ट प्रवृत्ती या कथा उघड करतात.    

दिवसाढवळय़ा आपल्यावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय; पण याविरोधात दाद कोणाकडं मागायची? व्यवस्थेकडं जाऊन न्याय मिळणार नाही, उलट आपल्यालाच त्रास होईल, हे बंकान्नाचं मत. दलितांनी नदीत विहीर खांदल्यावर ‘नदी काय बापाची मिरासय्..’ म्हणत पाटील दलितांना सरकारची भीती घालू बघतो त्यावेळी ‘गाववाल्यांनी मोठमोठी झाडं तोडून न्हेली तवा न्हाय सरकार आलं. आन् आताच-’ हा कथेतल्या संभाचा उद्वेग. रोजच्या पोटापाण्यासाठी रीतसर रोजगाराची कोणतीच सोय नसलेली ‘एक कथा चोराची’मधली माणसं. 

पिढय़ान्पिढय़ा दमन सोसणाऱ्या माणसांत आता अन्यायाविरुद्ध प्रतिकार करत उभं राहण्याचं भान आणि धैर्य आल्याच्या खुणा या कथा दाखवतात. आपल्याच माणसांना चावडीवर बोलवायला निघालेला रामा येसकर स्वत:लाच विचारतो, ‘तू कोण हायीच?’ चावडीवर पाटलाला सदान्ना सबुरीनं सांगतो, ‘आपल्या येळचं आता ऱ्हायलं न्हाय.’ संभा आणि रामचंदर गावाविरुद्ध उसळून बोलतात. अत्याचाराविरुद्ध गप्प बसणाऱ्या बंकाला आपण वाळीत टाकल्यास ‘दुख हालगटाला आन् डाग पखालीला’ होईल. तसं न करता आपण साऱ्यांनी जमून पाटलाला जाब विचारण्याचा विचार दलित बांधव करतात. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश समाजमनात रुजू लागल्याची आश्वासक जाणीव या कथांनी टिपली आहे.          

मानवी पात्रांबरोबर या कथांतनं येणारे कुत्रा, कुत्री, मांजर, बोका, उंदीर, साप, सोनकिडे, रातकिडे, कावळे, चिमण्या, गिधाडं, माशा, पिंगळा असे जीव.. वड, लिंब, बेल, तुळस असा झाड झाडोरा.. रात, दिवस, ऊन, पाऊस, अंधार यांची रूपं पात्र म्हणूनच चंदनशीव कथेत सक्रिय राहतात.

समाजाच्या तळातल्या माणसांचं जीवनदर्शन घडवणाऱ्या या कथा मांडताना लेखकानं त्या माणसांची मानसिक आंदोलनं नेमकेपणानं टिपली आहेत. ‘एक कथा चोराची’ ही संपूर्ण कथा पात्रांच्या संवादातनंच उलगडते. हे संवाद म्हणजे भूक भागवण्यासाठी भुकेलेल्या माणसांतले झगडे दर्शवणारे, त्यांच्या पोटातनं आलेले उद्गार आहेत. कथेतलं निवेदन आणि संवाद बोलीतच आहेत. ही बोली अप्रतिम शब्दकळा, म्हणी आणि वाक्प्रचारांनी अर्थातच सशक्त आहे. पिचलेल्या माणसांची वेदना त्यांच्याच बोलीत आल्यानं जिवंत चित्रण वाचनाचा समृद्ध अनुभव या कथा देतात. स्वत्व जपत आपल्या बोलीचं अंगबळ भास्कर चंदनशिव यांनी दाखवून दिलं. त्यामुळे बोलीचं सामर्थ्य तर लक्षात आलंच; आणि त्यासोबत गावोगावच्या लिहू बघणाऱ्या हातांना व्यक्त होण्याचा आत्मविश्वासही मिळाला.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे: मोटार लाइनवाली ‘एकोणिसावी जात!’

कथा प्रसंगांच्या निमित्तानं येणारी शब्दचित्रं अत्यंत लोभस आहेत. उदाहरणार्थ- ‘नळगुदलेला इक्राळ अंधाराय. व्हकव्हकता.. जिभल्या चाटणारा. आत फाटकं घोंगडं पांघरून दडलेलं कोपट, हजार हाताचा थयथयाट करणारा मागचा कडू लिंब.. सारा सारा अंधार ढवळून, गढूळ करणारा. कोपटातली.. भडकती चिमणी. तिच्या उज्याडानं दारावाटं काढलेली वळवळती जीभ. लाल-पिवळी, दबती-भडकती, आंगण चाटणारी..’ (आबामा). किंवा ‘देवळावर हात पसरून मोठा लठ्ठ वड उभा हाय. वाऱ्याच्या झुळकीनं त्याच्या पोटात कळ निघतीय. त्यो कण्हतच ऱ्हातोय.. जोरात कळ आली की कर्रकर्रतोय. आन् टपा टपा डोळय़ांतल्या पाण्यागत पिकली पानं पत्र्यावर टपकत ऱ्हात्यात..’ (खुळीची गोष्ट). प्रत्येक कथेत वेधक शब्दकळा जागोजागी आहेत. उदाहरणार्थ-  ‘डोळय़ाचं कावळं गरगरू लागलं’, ‘अंग चोरून बसलेली रात’, ‘कुडाच्या भिंती कण्हत्यात’, ‘डोळय़ाचं हात सारा सारा अंधार चाळत्यात’, ‘इतकं बघून बघून ढव्ह कितींदा तरी पोटुशी राहिला असंल..’, ‘फाटक्या घशातून बोलणं तुटून पडू लागल्यालं..’, ‘हळूहळू जिती व्हत जावीत, तशी लेंकरं उठत मरगळत उठून बसली.’  

समाजवास्तवातली ठणकती दु:खं केंद्रस्थानी घेऊन आलेल्या, आली वेळ निभावून नेण्यातच आयुष्य कडंला नेणाऱ्या; परिस्थितीनं रंजल्या गांजल्या माणसांच्या या कथा वाचताना जीव गलबलतो. माणुसकीला डाग लावणाऱ्या प्रवृत्ती प्रकर्षांनं समोर आणणाऱ्या या कथा उन्नत मानवी जगण्यासाठी आपण सत्त्वशील व्हावं असं आवाहन करणाऱ्या आहेत.

लोणविरे या सांगोला दुष्काळी तालुक्यातील गावात शेती आणि नोकरी करणारे संतोष जगताप कवी आणि लेखक म्हणून लोकप्रिय. ग्रामीण भागातील जगण्याचे सूक्ष्मदर्शी निरीक्षण. एक कवितासंग्रह आणि त्यानंतर खेडय़ांमध्ये होणाऱ्या बेसुमार भारनियमाच्या व्यथा मांडणारी ‘विजेने चोरलेले दिवस’ ही कादंबरी विविध पुरस्काराने सन्मानित.  

santoshjagtaplonvire@gmail.com