|| सुजाता राणे
‘सावळ्या चाहुलीचा झिम्मा’ हे महावीर जोंधळे यांनी लिहिलेले ललितलेखन स्वरूपाचे पुस्तक. प्रस्तावनेत प्रा. रूपाली शिंदे यांनी वापरलेली ‘विमुक्त ललित गद्य’ ही संकल्पना या लेखनासाठी जास्त योग्य वाटते. या पुस्तकामध्ये लेखकाने भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोन काळांच्या संदर्भात आपल्या गावातील बालपणीच्या आठवणींच्या आधारे निसर्ग आणि माणसाचे नाते उलगडून दाखवले आहे. पावसाच्या काळ्या ढगांपासून सावळ्या विठ्ठलापर्यंतचा जाणीव व नेणीव यांच्यादरम्यानचा तरल प्रवास म्हणजे हा लेखसंग्रह होय. पावसाच्या आगमनाने पुस्तकाची सुरुवात होते. यातील स्त्री ‘खूप कोसळावे वाटते बयाबाई’ म्हणत साक्षात् विठ्ठलालाच ‘विठ्ठला, एकदा तरी रुक्मिणीशी नेमकं काय बोलायचे ते बोलून घे. बाईच्या काळजाला जन्म देणारीचे बोल माहीत असतात म्हणून सांगितलं. विठ्ठला, रुक्मिणीचा विचार घे. काळ्या ढगात तुझ्याआधी आम्हाला दिसते ती रुक्मिणी!’ अशी विठ्ठलाशी संवाद साधते आहे. ही स्त्री शेताचा, मातीचा, पावसाचा, निसर्गाचा परस्परांशी असणारा घनिष्ठ संबंध जाणते. या लिखाणात ग्रामीण स्त्रीचे मातृत्व, सासू-सुनेचे संबंध, पतीबरोबरचे नाते आणि या समग्र संसार प्रपंचात असूनही विठ्ठलाशी चाललेला वाद-संवाद, सामाजिक- सांस्कृतिक व्यवस्थेतील तिचे स्थान असे अंतर्बाह्य विविध पदर उलगडून दाखवले आहे. बोलण्याची गरज पूर्ण करण्यासाठी घराच्या खिडकीपासून ते झाडावर बसलेल्या पाखरांपर्यंत कोणाशीही संवाद साधण्यासाठी चाललेली या स्त्रियांची तगमग दिसून येते.
या लेखांच्या अनुषंगाने स्त्रीजीवनाकडे पाहण्याची लेखकाची दृष्टीही जाणवते. आईचे सडा शिंपणे, कांडणे, स्वयंपाक करणे, सोजी तुंबून बोटवं, नकुलं यांसारखे पारंपरिक पदार्थ काबाडकष्ट करून सतत करत राहणे, उन्हाळ्यात पापड, कुरडया वाळवणाची कामे करणे आणि एवढे सगळे करूनही कुठेच त्रागा नाही, कामाचा कंटाळा नाही हे लेखकाने आवर्जून सांगणे यात सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थांनी स्त्रियांच्या आत्मसमर्पणाने संसार व मातृकर्तव्यात रममाण राहावे या वृत्तीचे केलेले उदात्तीकरण जाणवते. ग्रामोफोनच्या तबकडीवरील गाणी ऐकत निवांत क्षण जगणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत रानातील किंवा घराच्या दिवाणखान्यातील निवांत क्षण स्त्रियांच्या वाट्याला अजिबात येत नाहीत, हे निरीक्षण लेखकाने नोंदवले आहे.
पाणवठ्यावरती सुखदु:खं वाटणाऱ्या, वारीला जाणाऱ्या, क्वचित प्रसंगी वारीतच आयुष्याची सांगता वाट्याला येणाऱ्या, विवाहित, लेकुरवाळ्या, विधवा इत्यादी स्त्रियांच्या विविध रूपांचे शब्दचित्र उठावदार करण्यात लेखक महावीर जोंधळे यशस्वी झाले आहेत. चित्रकार श्रीधर अंभोरे यांच्या समर्पक रेखाचित्रांनी पुस्तकाच्या सौंदर्यात भर टाकली आहे. लेखकाने मांडलेला आशय प्रभावीपणे रेखाचित्रांमधून व्यक्त झाला आहे. लेकुरवाळी माऊली, डवरलेले झाड इत्यादी रेखाचित्रांची पुस्तकातील रेलचेल त्याचे केवळ दृश्यात्मकच नाही, तर आशयात्मक सौंदर्यही वाढवते.
महावीर जोंधळे यांच्या भाषेत हे ‘ग्रामपुराण’आहे. यात गावातील निसर्गवर्णनासोबतच तुक्या घिसाडी, मंजुळा आत्या, वाण्याची सून रुक्मिणी, मणीपोत विकणारी आळसूंदा, दत्तू शिणगार, वारकरी मंडाई इत्यादी व्यक्तिरेखा त्यांनी मोजक्या शब्दांत जिवंत केल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी लेखकाचे प्रथमपुरुषी निवेदन आहे. ‘विठ्ठलासारखेच दिसायचे मामंजींचे रूप. रंगही काळासावळाच…’ अशा शब्दांत व्यक्तिचित्रण करताना लेखातील निवेदन सासुरवाशीण स्त्रीमार्फत करण्याचा प्रयोग लेखकाने केला आहे. लहान वयात आई, आजी इत्यादी स्त्रियांच्या जगण्याचे लेखकाने जवळून निरीक्षण केलेले असल्यामुळे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून प्रथमपुरुषी निवेदन करणे लेखकाला शक्य झाले आहे.
या पुस्तकात सर्वसामान्य माणसाने केलेली तत्त्वज्ञानात्मक विचारांची मांडणी अतिशय ओघवत्या भाषेत येते. ‘दगड’ या निसर्गघटकाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दाखवून देणारी प्रतीकात्मक गोष्ट मुळातून वाचण्यासारखी आहे. बाभळीच्या झाडाचे पुस्तकात जागोजागी आलेले वेगवेगळ्या संदर्भातील उल्लेख लक्षणीय आहेत.
माऊली आणि तिचे तान्हे बाळ यांच्यातील संबंधांचे वर्णन करताना लेखकाची लेखणी फारच संवेदनशील होते. आजीने पाटी स्वच्छ करायला पाण्यात बुडवून दिलेली चिंधी… ‘तिचा कुबट वास आजही नाकात वास करून राहिलाय…’ असे म्हणत लेखक गतकाळातील मानवी नातेसंबंधांतील ओलावा टिकवणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक संकेतव्यूहांना कालबाह्य होताना पाहतोय याबद्दलची उघड खंतही व्यक्त करतो आहे. त्यातून लेखकाचा एक भोळाभाबडा दृष्टिकोनही जाणवतो. गावी लहानपणी ‘घन:श्याम सुंदरा श्रीधरा… अरुणोदय झाला’ असे भूपाळीचे शब्द ऐकू यायचे. आता सकाळी ‘इलू इलू’ गाणं म्हणणारा मुलगा भेटतो आणि त्या भूपाळीचे साखरी शब्द हरवल्याची लेखकाला तीव्र जाणीव होते. चकारी, सूरपारंब्या, लगोऱ्या, विटी-दांडू इत्यादी खेळ आणि त्यांच्या अनुषंगाने लहान मुलांचे ग्रामीण जीवनातील अनुभवविश्व याचेही काळाच्या पटावर धुसर होत जाणे लेखक नोंदवतो.
गावातील चिरेबंदी वाडा, जुन्या ग्रामीण व्यवस्थेतील बलुतेदारांची व्यवस्था, विवाहितेची कपाळावर करंड्यातील कुंकू लावण्याची पद्धत, गुऱ्हाळाचे दिवस, हुरडा पार्टी, सुगीचे दिवस, ताकाचा डेरा, चंदन उगाळण्याची सहाण, घराण्याची रसिकता दाखवणारा पाळणा, त्या पाळण्याच्या चार कोपऱ्यांना बांधलेला चांदवा यांसारख्या नॉस्टेल्जिया जाग्या करणाऱ्या वास्तु, वस्तू, रिती यांचे उल्लेख लेखांमध्ये वरचेवर येतात.
डोंगराच्या पायथ्याशीच असलेल्या आश्रमातील पावसाळी दिवसांतल्या चित्राने पहिल्या प्रकरणाची सुरुवात होते. पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात आश्रमशाळेत ‘गळ्यात जानवे असलेच पाहिजे असा दंडक. नसेल तर भुके मरा. बाभुळशेंगांच्या खेळासाठी जानवे तोडल्यामुळे वाट्याला आलेली भूक आजही आठवते. या आठवणीनेच पुस्तकाचा समारोप होणे एक वर्तुळ पूर्ण करते. पावसाचे काळे ढग जसे उत्स्फूर्तपणे मोकळे होतात तसे व्यक्त होण्यासाठीचे उत्स्फूर्तपण, विठ्ठलाचे सावळे रूप आणि ग्रामीण स्त्रियांचे झिम्मा-फुगडीप्रमाणे आवर्तात गुंतलेले भावविश्व यांचा मिलाफ दर्शवणारे ‘सावळ्या चाहुलीचा झिम्मा’ हे पुस्तकाचे शीर्षकही समर्पक आहे. सावळ्या विठ्ठलाचे चित्र एकूणच आपल्या सांस्कृतिक संचिताचे सूचन करते.
‘सावळ्या चाहुलीचा झिम्मा’
– महावीर जोंधळे, मनोविकास प्रकाशन, पृष्ठे- १३२, किंमत- १५० रुपये
sujatarane31may@gmail.com