विजय पाडळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रिंगण जगभर पसरलेलं आहे. आपल्या माणसांचं रिंगण. आपल्या जातीचं रिंगण. प्रत्येक जण आपल्याला वाचवू पाहतोय. त्याचबरोबर जमलं तर इतरांना संपवू पाहतोय. ‘सगळी दुनियाच एकमेकांवर टपून बसलीय.’ आपले एक रिंगण बनविण्याच्या नादात आपण इतरांपासून तुटत चाललो आहोत हे माणसाच्या ध्यानात येत नाही का, या प्रश्नासह समकाळातील किंवा अलीकडल्या-पलीकडल्या कुठल्याही काळातील अनेक घटनांची आठवण करून देणारी ही कादंबरी आहे.

देवाप्पा हा कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीचा नायक. कादंबरीची कहाणी आहे या मनस्वी, जिद्दी व तनमनाची अफाट ताकद असलेल्या माणसाची. त्याच्या शोधाची. त्याच्या प्रवासाची. त्याच्या जिद्दीची. त्याच्या लढय़ाची. त्याच्या झालेल्या आणि तरीही न झालेल्या पराभवाची..

आणि हा लढा आहे तोही त्याच्याशी तुल्यबळ असलेल्या एका उमद्या, शक्तिमान आणि जिद्दी प्राण्याशी. हा प्राणी तुल्यबळ आहे म्हणूनच तर या दोघांतल्या संघर्षांला लढा म्हणायचे. पण माणूस विरुद्ध पशू एवढाच मर्यादित हा लढा नाही. माणूस विरुद्ध निसर्ग असाही हा लढा नाही. या लढय़ाला अनेक संदर्भ आहेत. भौगोलिक संदर्भ, सांस्कृतिक संदर्भ, आजच्या जगण्याचे संदर्भ आणि भविष्याच्या सावलीचेही संदर्भ. जंगलातल्या एका रस्त्याला पुढे हजार वाटा फुटत जाव्या तसे.

म्हणून या कहाणीबद्दल सांगण्यापूर्वी आधी थोडी तिची पार्श्वभूमी सांगायला हवी.

देवाप्पा नावाच्या माणसाने आपल्या ‘मागे राहून गेलेल्या’(की ठेवलेल्या?) म्हशीचा घेतलेला शोध ही या कादंबरीची वर्तमानकाळात उलगडत जाणारी गोष्ट; पण लेखकासोबत ती ऐकताना तिची पाळेमुळे किती खोलवर गेलेली आहेत याचे विस्मयकारक दर्शन होत राहते. माणसाच्या भौतिक प्रगतीच्या मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या धरणामुळे विस्थापित व्हावे लागणाऱ्या एका जंगलातील छोटय़ा गावठाणातल्या माणसांची ही कहाणी. आपल्या लहानशा विश्वात स्वतंत्रपणे जगणारी माणसे. जगाच्या दृष्टीने गावठी, रानटी, अशिक्षित आणि असंस्कृत माणसे. डोंगरमाथ्यावर त्यांची वस्ती आहे. पायथ्याशी धरण बांधले जात आहे, त्यामुळे सपाटीवरची गावे हलविली जात आहेत हे त्यांना माहीत झाले आहे; पण परदु:ख शीतल असते. शिवाय एवढय़ा उंचावर राहणाऱ्या आपल्याला कोण आणि का हलविणार या भ्रमात ही माणसे जगत असतात आणि एके दिवशी ‘सरकार’ची माणसे येऊन त्यांना सांगतात, ‘तुम्हाला इथून जावे लागेल.’ आम्ही जाणार नाही, उठणार नाही म्हणून या लोकांनी लई धडपड केली. विरोध केला, गयावया केली, पण शेवटी त्यांना तिथून हलावेच लागले.

पायथ्याशी असलेल्या एका गावाच्या हद्दीत त्यांना सरकारने थोडी जमीन दिली; पण त्या गावातल्या लोकांना ही परकी माणसे खपेनात. ही कुठली रानटी माणसे आपल्या उरावर आली, आपल्या जमिनीत वाटा मागू लागली? आपण लुटले जातो आहोत, या भावनेने गावातील लोकांच्या मनात मूळ धरले. ‘सरकार’च्या दबावामुळे ही ब्याद हाकलून तर देता येत नाही, मग ते जमेल तेवढा त्यांना त्रास देऊ लागले. त्यांना ‘उचले’ म्हणू लागले, चोर म्हणू लागले. काही तरी कुरापत काढून मारू लागले. कुणी मेला तर त्याला ‘आपल्या’ स्मशानभूमीत जाळण्याची ते परवानगी देईनात. अशी जगायची आणि मरायचीसुद्धा चोरी झालेली.

इकडून हे गावकरी आणि दुसरीकडून ‘सरकारी माणसे’ या कैचीत ही रानमाणसे सापडली आहेत. ‘सरकारी माणसं’ ही एक वेगळीच जात आहे हे लेखकाने अचूक टिपले आहे. कुनाकडून कसं आणि काय काय उपटता येईल याचाच सतत विचार करणारी, ओरबाडणारी, वखवखलेली लुटारू जात. कसलाही विधिनिषेध नसणारी. या दोन प्रकारच्या माणसांच्या ओढाताणीत डोंगरावरून आलेल्या माणसांच्या आयुष्याच्या पार चिंध्या होऊन गेलेल्या.

विस्थापितांच्या या साऱ्या यातना देवाप्पा भोगतो आहे. एके काळी वाघाशी झुंज दिलेला, कमरेला कोयता लावून रानोमाळ हिंडलेला हा माणूस. या माणसांसमोर आपली शेळी झाल्याचे त्याला जाणवते आहे. माणसांच्या जातीसमोर आपला निभाव लागणार नाही हेही त्याला कळून चुकले आहे.

आणि असा म्हातारा देवाप्पा, आपल्या मुलाएवढय़ा वयाचे दोन तरुण सोबतीला घेऊन आज आपल्या मूळ वसतीकडे निघालाय. त्याला आपली ‘मुदिवाली’ म्हैस परत आणायची आहे. या म्हशीचीही एक कहाणी आहे. गाव सोडून निघताना सगळे सामान सोबत नेता येणार नाही हे ध्यानात आल्यावर काय घ्यायचे आणि काय सोडायचे याचा फैसला करावा लागला. ‘मुदिवाली’ म्हैस देवप्पाच्या आईची फार लाडकी. म्हातारीनं कौतुकानं तिच्या कानात मुदी घातली; पण ती निघाली वांझ. निरुपयोगी सामानासारखं तिला तिथंच टाकून यावं लागलं. म्हातारीनं खूप आकांत केला, मात्र दुसरा उपायच नव्हता; पण आजकाल म्हातारीला तिची फार आठवण येते. ‘तिला आण’ म्हणून तिनं देवाप्पाच्या मागे धोशाच लावलेला.

देवाप्पा म्हशीच्या शोधात निघतो आणि त्याच्या मनात आठवणींचे मोहोळ उठते. या कादंबरीचे निवेदन लेखकाने जाणीवपूर्वक दोन पातळ्यांवर ठेवले आहे. तृतीयपुरुषी निवेदन वापरून लेखक सारा परिसर जिवंत करतो आणि मधूनच प्रथम पुरुषी निवेदनातून देवाप्पाच्या मनात शिरतो. कादंबरीतील काळाचा प्रवासही एकरेषीय नाही. मधूनच देवाप्पाला डोंगरावरच्या जंगलात घालवलेले लहानपणीचे, तारुण्यातले, सर्वार्थाने जगलेले ‘स्वतंत्र’ दिवस आठवतात. मध्येच आजचे बेकार जगणे आठवते. एकीकडे म्हशीचा शोध घेताना ‘इतक्या गोष्टींचे कोंब त्याच्या डोस्क्यात उगवू लागले’ की आठवणींचा नुसता गोमकाला झालेला. या आठवणीतून हळूहळू देवाप्पाचे स्वभावचित्र ठळक होत जाते.

पण आता आणखी एक गोष्ट देवाप्पाला जाणवू लागली. आजूबाजूचं जंगल पार बदललं होतं. माणसांच्या गराडय़ातून सुटल्यावर या रानवाटावरून फिरताना जिंदगी गेली; पण आता त्या अनोळखी वाटू लागल्यात आणि मग एक चुकार शंका त्याच्या मनात उपजली. ‘कपाळावरला पांढरा टिळा, िशगाची गोलाई, पाठीवरला केसाचा भोवरा आणि कानातली मुदी’ यामुळे आपण आपल्या म्हशीला नक्कीच ओळखू; पण ती आपल्याला ओळखील का?’ छय़ा! ओळखणार नाही असं होणार न्हाई. त्याने स्वत:लाच हिंमत द्यायचा प्रयत्न केला. आपण एवढा जीव लावला होता तिला. ती कशी इसरंल? तळ्यात रवंथ करीत बसलेल्या म्हशींपैकी आपली म्हैस त्याने ओळखली; पण तिच्या नजरेत त्याला ओळख दिसेना. मनमोकळे हिंडून आणि भरपूर खाऊनपिऊन ती भलतीच धष्टपुष्ट झाली होती. याच्याकडे परकेपणानं बघत होती आणि जेव्हा त्याने आपल्याला पकडण्याचा चंग बांधला आहे हे तिला कळले तेव्हा तर तिने त्याच्याशी शत्रुत्वच पत्करले आणि मग सुरू झाला एक जबरदस्त लढा. याचा स्वामित्वासाठी, तिचा स्वातंत्र्यासाठी!

या लढय़ाचे मोठे चित्रदर्शी व प्रत्ययकारी वर्णन लेखकाने केले आहे. देवाप्पाबरोबर आलेले तरुण भेदरून पळून जातात; पण ‘मुदिवाली’सोबतच्या इतर म्हशी मात्र तिची साथ देतात. आपले एक संरक्षक रिंगण तयार करून आलेल्या संकटाशी त्वेषाने लढतात. हळूहळू आपण हरलेली लढाई लढतो आहोत हे देवाप्पाला जाणवू लागते.

ही लढाई देवाप्पा का हरला? याची अनेक कारणे आहेत. एक तर त्याने आपला जन्मजात कणखरपणा हरवलेला आहे. साऱ्या माणूस जातीनेच तो हरवला आहे आणि त्याची जागा कुटिलपणाने भरून काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कुटिलपणा हा कणखरपणाला पर्याय होऊ शकत नाही. दुसरे म्हणजे, लढता लढता तो ‘खूप दूरवर’ आला आहे. ही लढाई आता जनावरांच्या जमिनीवर आहे. ही जमीन एके काळी या माणसाचीही होती; पण इथली मुळे त्याने उपटली आणि खोड आपली ताकद हरवून बसले. तिसरे म्हणजे, स्वत: माणूस असल्याबद्दल एक सूक्ष्म अहंकार त्याच्या मनात आहे. (साऱ्याच माणूस जातीच्या मनात आहे.) तो म्हशीला म्हणतो, ‘तुझा मेंदू माझ्या पुढे जायला अजून लय वर्ष जातील. शेवटी ढोराचा मेंदू.’ पण लढाईत शत्रूला कमी समजू नये हे साधे सूत्र तो विसरतो.

अशी लढाई हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’मधील म्हाताऱ्यानेदेखील लढली होती आणि पराभूत झाल्यावर त्याला त्याचे कारण समजले होते. म्हातारा स्वत:ला प्रश्न विचारतो, ‘मी का हरलो?’ आणि स्वत:च उत्तर देतो,

‘I went too far away’ मानवाची सारी इच्छाशक्ती, जिद्द, हिंमत, शौर्य जमेस धरूनदेखील मानव आणि अतिमानवी शक्ती यांच्या दरम्यान जी अदृश्य सीमारेषा असते ती ओलांडून त्याला जाता येत नाही. फार दूर जाण्याचा प्रयत्न केला की, म्हाताऱ्याच्या हाती उरतो भंगलेल्या स्वप्नांचा कुरूप सांगाडा किंवा देवाप्पाला पाहावा लागतो आपल्या रक्तामांसाचा चिखल होत असलेला. देवाप्पाची कहाणी वाचताना हेमिंग्वेच्या म्हाताऱ्याची सतत आठवण होत राहते. केवळ कणखरपणा आणि जिद्द यासाठी नव्हे तर दोघांच्या स्वभावात अनेक साम्यस्थळे आहेत म्हणून. त्याला समोर फक्त मासा दिसतो, देवाप्पाला म्हैस. दोघांनाही स्वत:शीच बडबडण्याची सवय आहे. दोघांच्याही स्वभावात एक नैसर्गिक मिस्कीलपणा आहे, ऐन संकटातदेखील स्वत:वर हसण्याची विनोदबुद्धी शाबूत आहे. म्हातारा म्हणतो, ‘जर एखाद्या ठिकाणी नशीब विकत असतील तर ते विकत घ्यायला मला आवडेल.’ ऐन लढय़ात देवाप्पा मजेदार गाणी तयार करतो, तालावर म्हणतो. बरोबर आलेली पोरं पळून गेल्यावर त्याला बोलायला कुणीही चालते. म्हशी तर आहेतच, तो झाडाशी बोलतो, दगडाशी बोलतो. स्वत:च्या फुटलेल्या कोपरावर चोळलेल्या मातीशीही बोलतो. म्हणतो, ‘तुला रक्ताची तहान लागली असंल, घे भागवून.’

हेमिंग्वेचा म्हातारा माशाला म्हणतो, ‘कोण कुणाला मारील याची मी काळजी करीत नाही.’ देवाप्पा म्हशीला म्हणतो, ‘अखेरीस तू माझं शेण केलंस तर बहाद्दरनी. तू टाक मारून, त्याची पर्वा मला न्हाईच आता.’

या लढाईत शेवटी कमकुवत माणसाचा पराभव होणे स्वाभाविक असते. या रौद्र भीषण लढय़ाचे अत्यंत प्रत्ययकारी दर्शन कृष्णात खोत यांनी घडविले आहे ते मुळातूनच वाचावे. या संग्रामात जनावरासारख्या मुक्या प्राण्यालाही त्यांनी व्यक्तिमत्त्व मिळवून दिले आहे. हे कुरुक्षेत्र आणि त्याला वेढलेला परिसर यांचे शब्दचित्र रेखाटताना एक ललित लेखक म्हणून खोतांचे कौशल्य पणाला लागले आहे आणि त्यांत ते यशस्वीही झाले आहेत. ही दुनिया तिच्या साऱ्या ‘रूप-रस-गंध-स्पर्शासह’ त्यांनी जिवंत केली आहे.

म्हातारा हरतो, पण त्याचा पराभव शोकान्त नाही. मरता मरताही तो म्हणतो, ‘तू जिंकलीस असं तुला वाटत असंल, पण मी हरलो असं मला नाही वाटत. बाई ग, इथं माझी मरणमाती सांडण हेला हरणं कसं म्हणायचं?’

‘रिंगाण’ वाचून झाल्यावर डोक्यात विचारांचा जणू चिखल होऊन जातो. प्रश्नांचे मोहोळ उठते. अनेक प्रश्न रिंगण तयार करून भोवती फिरू लागतात. माणूस सुशिक्षित झाला आहे; पण सुसंस्कृत झाला आहे काय? सुशिक्षित होण्याच्या नादात त्याने आपल्याजवळचे काय गमावले आहे? रिंगण करून दबा धरून बसलेल्या म्हशी पाहताना देवाप्पाला वाटते, ज्या मुलखात आपल्याला राहावं लागते तिथे आपणही असेच स्वसंरक्षणार्थ रिंगण करून राहतोय, काय बी घडलं की गाव आपल्यावर धावून येईल या काळजीत. हे असे रिंगण जगभर पसरलेलं. आपल्या माणसांचं रिंगण. आपल्या जातीचं रिंगण. प्रत्येक जण आपल्याला वाचवू पाहतोय. त्याचबरोबर जमलं तर इतरांना संपवू पाहतोय. ‘सगळी दुनियाच एकमेकांवर टपून बसलीय.’ आपले एक रिंगण बनविण्याच्या नादात आपण इतरांपासून तुटत चाललो आहोत हे माणसाच्या ध्यानात येत नाही का? माणसावर प्रेम करा, प्राणिमात्रावर, निसर्गावर प्रेम करा ही पूर्वसूरींची शिकवण आपण विसरून चाललो आहोत का? याला काही उपाय आहे का? की अखेर माणसाचा असाच चेंदामेंदा होणार आहे? असंख्य प्रश्न. हल्ला करायच्या तयारीत.

पण आपलीच तयारी नसते, प्रश्नांचा मुकाबला करण्याची आणि मग ‘शत्रूशी लढण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पळ काढणे’ हे कन्फ्युशियसचे वाक्य आपल्याला आठवते- सुसंस्कृतपणे, सोईस्करपणे. दुसरे म्हणजे देवाप्पासारखे ‘लढलेच पाहिजे’ या पेचात आपण सापडलेलो नसतो. कारण ती आपली तातडीची गरज नसते. त्यामुळे आपण या चक्रव्यूहात शिरतच नाही, मग आपला ‘अभिमन्यू’ कोठला होणार? या प्रश्नांची उत्तरे शोधायची जबाबदारी माझी एकटय़ाची थोडीच आहे? मी एकटा काय करू शकणार? या सबबींचा ढालीसारखा उपयोग करून आपण आपला बचाव करतो.

पण मनात, खोलवर कुठे तरी आपल्याला जाणवलेले असते की, या प्रश्नांची उत्तरे मानव जातीला शोधावीच लागणार आहेत- तातडीने. नाही तर फार उशीर होऊन जाईल.

अभिजात साहित्य आणि चित्रपटांचे आस्वादक समीक्षक ही मुख्य ओळख. ललित लेखन आणि समीक्षेची ३५ हून अधिक  पुस्तके प्रकाशित. ‘देखिला अक्षरांचा मेळावा’, ‘सिनेमाचे दिवस पुन्हा’, ‘सिनेमायाचे दिवस’, ‘कथांच्या पायवाटा’ हे ग्रंथ लोकप्रिय. कवी रॉबर्ट फ्रॉस्ट, कथालेखक चेकॉव्ह, जी. ए. कुलकर्णी यांच्यासह चित्रपटांवरील समीक्षेचा गौरव.

vvpadalkar@gmail.com