वसीमबार्री मणेर

‘माणदेशी माणसं’ ही माडगूळकरांची निर्विवाद बहुचर्चित-बहुपरिचित कलाकृती; परंतु ‘जांभळाचे दिवस’ तितकेच, किंबहुना त्याहून एक पाऊल पुढे नात्यातली गुंतागुंत दाखवण्यात हुकमत राखणारं पुस्तक आहे. अंगभूत लिहिण्याची ऊर्मी आणि माणदेशात असणारा अभावग्रस्त जगण्याचा परीघ, हे माडगूळकरांच्या कथेसाठी कुस्त्यांचे जंगी मैदान होते. त्यात त्यांची शाब्दिक मल्लगिरी अविरत चाले..

ज्या सातारा जिल्ह्याला हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या महाबळेश्वर, सज्जनगड, वासोटा आणि कोयनेचे ‘बहुचर्चित’ सौंदर्य लाभलं आहे त्याच सातारा जिल्ह्यातील ‘ओसाड भकास’ माळरानात वसलेल्या फलटणचा मी रहिवासी.

‘पावसाळय़ात खूप छान दिसत असेल नाही! मस्त हिरवेगार!’ अशी प्रतिक्रिया माझा पिवळा शुष्क माळ पाहून अनेक मित्र, आप्तेष्ट देऊन जातात. डोक्यावर रणरणतं ऊन.. विस्तीर्ण उघडं निळंशार आकाश आणि त्याखाली पसरलेलं विस्तीर्ण माणदेशी माळरान, वाऱ्यावर भुरभुरणारं पिवळं खुरटं गवत, तापलेलं  ऊन, शुष्क प्रदेशातील बसकी झुडपं आणि कूट-रो ऽऽऽ असा आवाज करत आकाशात उडणाऱ्या पकुडर्य़ा.. हे दृश्य मला उजाड भकास नाही वाटत. उलट मी घरात बसलोय असं वाटतं.

माळरान आवडतो म्हणून व्यंकटेश माडगूळकर आवडतात की माडगूळकर आवडतात म्हणून माळरान भावतो हे शालेय जीवनात पडलेलं कोडं मला वयाची चाळिशी उलटली तरी आजही कोडंच बनून राहिलेलं आहे. खरं तर दख्खनच्या पठारावरील विस्तीर्ण उघडय़ा माळरानांनी मला आयुष्यभर मोहिनी घातली आहे. याचाच माणदेश हा एक भाग. माडगूळकरदेखील तिथलेच. लांडगे, होले, चित्तूर, कोल्हे, पकुडर्य़ा, भोरडय़ा, तिखटजाळ, आळ, पिवळाजर्द माळ, गार हवा, बोरी बाभळी, मुलाण्याचा बकस, तंबोळय़ांची खाला, झेल्या या चितपरिचित संज्ञा.

माडगूळकरांनी ‘जांभळाचे दिवस’ हा कथासंग्रह लिहिला. १९५८ साली लिहिलेलं पुस्तक आजही ताजं वाटतं. त्यातल्या ‘अनवाणी’, ‘शाळातपासणी’ आणि ‘सायकल’ या तीन कथा सोडल्या तर बाकी सर्व कथा स्त्री-पुरुष नात्यातले सुप्त आकर्षण, त्यातून येणारा दृश्य-अदृश्य ताण आणि त्याचे विविधांगी-विविधरंगी पदर उलगडणाऱ्या आहेत. माडगूळकरांच्या सर्वच कथांमधून जगण्यात असलेला-नसलेला अवकाशाच्या सुगीचे दिवस धरण्याचा प्रयत्न दिसतो.

आजच्या आधुनिक जगात व्यक्तीच्या आणि नात्यातल्या लैंगिकतेविषयी इतकं लिहिलं- बोललं जात असताना माडगूळकरांच्या लेखनात सुमारे सत्तर वर्षांपूर्वी इतक्या ताकदीनं लिहिलेलं साहित्य- तेही माझ्या मातीतलं! हे वाचून माझ्या तर अंगावर रोमांच उभे राहतात.

माडगूळकरांच्या लेखनात एक अवकाश आहे. कदाचित अर्थार्जनासाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना मिळालेली विविधतेने नटलेली अनुभवविश्वं, दोन कामांमध्ये असणारा रिकामा वेळ हेही कारणीभूत आहेत आणि अंगभूत लिहिण्याची ऊर्मी आणि माणदेशात असणारा अभावग्रस्त जगण्याचा परीघ.. हे माडगूळकरांच्या कथेसाठी जणू कुस्त्यांचे जंगी मैदान.

अत्यंत आटोपशीर आकाराचा निव्वळ दहा लघुकथांचा हा संग्रह माझ्या हाती जून २०११ साली पडला. माडगूळकरांचं इतर जवळजवळ सर्व साहित्य मी वाचून काढलं होतं आणि आपण माडगूळकर संपूर्ण वाचले आहेत असा सुप्त अभिमान आणि गैरसमजही होता. या पुस्तकाने पुस्तक प्रदर्शनातच माझा तो गैरसमज दूर केला. ‘असेल काही बारीकसं’ म्हणत मी घेतलं आणि त्या पुस्तकानं मनात मोठं घर करायला सुरुवात केली. अत्यंत सावकाश.. त्यांच्या कथेत असणाऱ्या अवकाशानुरूप, पायात कुरूप जसं कळत नकळत वाढतं ना तसं. आज त्या गोष्टीला एक तपाहून जास्त काळ उलटला आणि त्या पुस्तकाची मोहिनी मला त्याकडे पुन:पुन्हा खेचत राहते. निव्वळ दहा गोष्टींचं छोटेखानी असलेलं हे पुस्तक; पण मनाचा सारखा ठाव घेतं. ‘माणदेशी माणसं’ ही माडगूळकरांची निर्विवाद बहुचर्चित-बहुपरिचित कलाकृती, परंतु ‘जांभळाचे दिवस’ तितकेच किंबहुना त्याहून एक पाऊल पुढे नात्यातली गुंतागुंत दाखवण्याची हुकमत राखणारं पुस्तक आहे.

यातली पहिली कथा आहे ‘जांभळाचे दिवस’ – ‘शाळेला मे महिन्याची सुट्टी  झाली आणि मी गावी आलो तेव्हा जांभळाचे दिवस होते. दुपारी सुम्म ऊन पडे आणि मला करमत नसे.’ अशी सुरुवात माडगूळकर करतात आणि भर उन्हाळी दुपारी ते आपल्याला माण नदीवर घेऊन जातात. नदीच्या काठी बरीच लेंडी आणि मूठ जांभळाची झाडं असतात. तिथे लेखक आणि शेळय़ा चरायला आलेल्या मुसलमानाच्या चमन याच्याबरोबर खाल्लेल्या जांभळांची आणि घालवलेल्या वेळेची गोष्ट आहे. उन्हाळी दुपार इतकीच मूक आणि उन्हाच्या तडाख्याइतकीच चटका देणारी.

 ‘पंच्च्याण्णव पौंडांची मुलगी’ ही कथा एका भणंग माणसाची. एका रम्य बागेबाहेर फुटकळ काम करीत वांझोटय़ा जगण्याची गोष्ट! बागेमध्ये येणाऱ्या एका तरुणीबद्दल निर्माण होणाऱ्या आकर्षणाची ही कहाणी आणि त्याबाबत तो काहीही न करू शकणं आणि केवळ वाट पाहत भकास जगत राहणं याची ही कथा. भकास जीवन, सुप्त आकर्षण आणि जगण्याचा फोलपणा, शहराचे बकालपण असे सारे यात सापडते.

‘उतारावर’ या गोष्टीत मध्यमवयीन पुरुषांचे एका थंडगार हवेच्या सकाळी उत्साही होणे, टेकडी चढणे, जग आणि जगणे सुंदर वाटणे आणि ऊन वाढता उत्साह जाणे, जग आणि जगणे असह्य होणे या गोष्टी फार शिताफीने कथेत गुंफल्या आहेत. तसा कथेचा जीव फार छोटा, परंतु मध्यमवयीन पुरुषाची घालमेल खूप उत्तमपणे माडगूळकर टिपतात.   

‘लोणी आणि विस्तू’ ही पोस्टाबाहेर कार्ड लिहिणाऱ्या रघुची गोष्ट. घाटावरची एक नांदत नसलेली सासुरवाशीण बाई अत्येसोबत कार्ड लिहायला येते आणि रघुच्या आकर्षणास धुमारे फुटतात, त्याच्या तुटपुंज्या जगण्याची, तुटपुंजे ठरलेल्या आकर्षणाची आणि तुटपुंज्या आत्मविश्वासाची ही गोष्ट पकडून ठेवते आणि मनात जखडून राहते. 

‘बाई’ या गोष्टीत मुंबईच्या चाळीत एकटी राहणारी बाई-शिक्षिका आणि तिचं तिथलं भीत भीत जगणं. जग आपल्याविरुद्ध कटच करीत आहे, वाकडय़ा नजरेनं पहात आहे असं वाटणं.. त्यातून असलेले चिडचिडेपण आणि आपल्या एका सहकाऱ्यासोबत जमलेलं प्रेम आणि नंतर झालेलं तोकडं लग्न. चिं. त्र्यं. खानोलकरांच्या ‘अजगर’ या दीर्घ कथेच्या परिसराची आठवण यावी तशी वातावरणनिर्मिती आणि परीघ या कथेचा आहे. माडगूळकरांची ‘बाई’ त्याच चाळीत राहत असावी जिथं खानोलकरांची ‘अजगर’ घडली असे वाटत राहते. 

एका कथेत कसलीही पूर्वकल्पना नसताना एक स्त्री आणि पुरुष एका घटनेद्वारे एकत्र येतात आणि अपरिहार्यता म्हणून वेळ घालवतात आणि सुप्त आकर्षणाचा खेळ सुरू होतो. संमती आणि नकार यातील अत्यंत बारीक, धूसर रेषेवर चालणारी ही गोष्ट रात्रीच्या चांदण्याच्या गारव्यात घाम फुटेल अशी होऊन जाते. तर आणखी पुढली एक कथा मध्यमवयीन पुरुषाच्या स्वप्नरंजन आणि लैंगिकतेचे उत्तम चित्रण करते.

हा संग्रह व्यंकटेश माडगूळकरांच्या आरंभीच्या लेखनकाळातील आहे, त्यामुळे ‘कथा’ या प्रकारासोबत त्यांनी केलेले प्रयोगही या संग्रहात पाहायला मिळतात. ‘शाळा तपासणी’ ही तंतोतंत शंकर पाटील यांच्या रांगडय़ा विनोदी सदरात मोडणारी कथा आहे. ‘अनवाणी’, ‘सायकल’ या कथा लिहिताना माडगूळकर विषय आणि मांडणी यांमध्ये अक्षरश: खेळताना भेटतात. संग्रहाच्या माझ्याकडल्या कॉन्टिनेन्टल प्रकाशनाच्या आवृत्तीवर दीनानाथ दलाल यांचे मुखपृष्ठ ‘जांभळाचे दिवस’ या शीर्षककथेवर बेतलेलं असून जलरंगात केलेलं अत्यंत मोहक काम आहे.

साधे शब्द, साधी मांडणी, परंतु कमालीचा गुंतागुंतीचा मुद्दा ही माडगूळकरांच्या लेखनाची वैशिष्टय़े. या क्षेत्रात जणू हुकमत त्यांचीच आहे. माणसाच्या रोजच्या जगण्याचे विषय घेऊन वैश्विक भावनांची पकड घेण्याची या लेखकातील ताकद आज पुढच्या शतकात वाचतानाही किंचित कमी झालेली वाटत नाही.

फलटणमधील माझ्या शिक्षिकांनी मला शालेय जीवनात अनेक लेखकांची ओळख त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून घडवून आणली. आरती प्रभू, वसंत नरहर फेणे,  जॉन स्टाइनबेक, इस्मत चुगताई, सआदत हसन मंटो, यांनी गारूड घातलं. राजन खान, जिम कॉर्बेट, जाई िनबकर, गौरी देशपांडे, शंकर पाटील, द. मा. मिरासदार यांची काही पुस्तकं आवडली. कालानुरूप त्यातील काहींची मोहिनी राहिली, काहींची सरली. आधी काही आवडलेली पुस्तकं नंतर आवडेनाशी झाली; परंतु व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकांबाबतीत तसं नाही झालं. हळूहळू  त्यातल्या गोष्टी, प्रसंग रक्तात भिनून गेल्याची जाणीव झाली.

माडगूळकर आणि मी एकाच भौगोलिक परिघातून येतो, एकच अभावग्रस्त माणदेश आम्हाला खुणावतो- जो त्यांच्या कथांमध्ये चित्रित झालाय, तसाच आजही लख्खं आहे. लोकांच्या लेखी ‘एक काम धड’ न केलेले आम्ही कथा, चित्र, सिनेमा, पटकथा, वन्यजीव, निसर्ग भटकंती या समस्थलांत रमतो, इतक्या समान गोष्टींमुळेही कदाचित अनेक वाचकांसारखे माडगूळकरांचे गारूड आजही माझ्यावर आहे.  

नव्वदीच्या दशकात फलटणचे एक शेतकरी रंगा दाते लिहिते झाले आणि त्यांनी ‘चांदीच्या तोरडय़ा’ हा कथासंग्रह लिहिला. त्याचा प्रकाशन सोहळा त्यांनी फलटणमध्येच  ठेवला होता. त्या सोहळय़ास प्रमुख पाहुणे व्यंकटेश माडगूळकर होते. मी त्यांना पहिल्यांदा आणि शेवटचे तेव्हा भेटलो होतो. त्यांनी स्वाक्षरी केलेला ‘चांदीच्या तोरडय़ा’ हा कथासंग्रह आज २७ वर्षे झाली तरी माझ्याकडे जपून ठेवला आहे.

आमच्या फलटणच्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ मॅक्सीन आजी एकदा म्हणाल्या होत्या, ‘जांभळं-बोरं यांचा पुरेपूर आस्वाद खरंच घ्यायचा असेल तर तुम्ही या मातीत जन्माला आलं पाहिजे. माझ्यासारखीला ही फळं चवीला जरा जड जातात.’

भर दुपारी माळरानावर जावं एक किंवा दोनच जांभळं किंवा बोरं तोंडात टाकावी, फळ खावून संपलं तरी त्याची बी मात्र पुढचे दोन तास चघळत माळावर भटकत राहावं हा माझा मन शांत करण्याचा आवडता कार्यक्रम .. अशाच कोण्या दुपारी मी एखाद्या ओढय़ाच्या डोहाशी बसलोय. आसपास कसलाही आवाज नाही. डोहातल्या पाण्यावर कसलाही तरंग नाही, पण मला माहीत आहे की शेजारीच कोठे तरी माडगूळकरांचा चमन शेळय़ा चरत आहे. थोडय़ाच वेळात ती पाण्यावर येईल. असा विचार करीत मी चमनसोबत उन्हात जांभूळ चघळावं अशी शांत दुपार चघळून काढलेली आहे. कारण हेही दिवस ‘जांभळा’चेच आहेत. माडगूळकर माझ्यात भिनले आहेत. पुन:पुन्हा या पुस्तकातील कथाप्रसंगांची माणदेशात जिथं जाऊ तिथं आठवण करून देत आहेत.

वसीमबार्री मणेर मणेर चित्रपट दिग्दर्शन-निर्माता, लेखन, चित्रकला, बालसाहित्य, प्रकाशन अशा विविध क्षेत्रांत कार्यरत. काही वर्षे मुंबईतील सिनेविश्वात कॅमेरामन, सिनेमॅटोग्राफर म्हणून काम. त्यानंतर फलटणमध्ये बालसाहित्य आणि भाषाप्रसारासाठी ‘दवात-ए-दक्कन’ प्रकाशन संस्थेची स्थापना. ‘झुम्कुळा’ या पहिल्याच कथासंग्रहाला राज्य सरकारचे पारितोषिक. गेली काही वर्षे सिनेनिर्मिती, विद्यापीठांत सिनेशिक्षण आणि कथालेखनात सक्रिय.

mwaseem1@gmail.com