यशोधरा काटकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जागतिकीकरणाच्या रेटय़ात नातेसंबंधांबरोबर लैंगिकतेकडे पाहण्याच्या दृष्टीतही बदल झाले. गे -लेस्बियन- बायसेक्शुअल-ट्रान्सजेंडर-क्वीयर या भवतालात वावरत असलेल्या समुदायाला अलीकडच्या काळात समाजासह साहित्यानेही काही अंशी स्वीकारले. ‘इब्रु’ कथासंग्रहात या व्यक्तिरेखा ठळकपणे येतात. त्या सनसनाटी घडवण्याचा हेतू न ठेवता परंपरेला धक्का देण्यासाठी..

लैंगिकतेबद्दल खुलेपणाने काहीही बोलले वा विचारले जात नाही. तो सभ्यपणा नाही, असा संस्कृतीपरंपरेने दिलेला समज आपण प्रत्येक काळात पुढच्या पिढीला देत आलो आहोत. यामुळे अनेक प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य आपणच हिरावून घेत गैरसमजांना जन्म देत जातो. जिथे लैंगिकतेबद्दल इतका कोतेपणा आहे, तिथे परिघापलीकडच्या – गे -लेस्बियन- बायसेक्शुअल-ट्रान्सजेंडर-क्वीयर या वेगवेगळय़ा मार्गावरून निघालेल्या माणसांबद्दल, त्यांच्या लैंगिकतेच्या छटा, परस्परसंबंध आणि कौटुंबिक-सामाजिक-मानसिक-आर्थिक-राजकीय गरजांबद्दल काही विशिष्ट व्यासपीठ सोडले तर उघड चर्चा होत नाही. आपल्या भवताली, कुटुंबात, मित्रपरिवारातच असतात ही माणसे. प्रसंगी ती कर्तबगार, प्रतिभाशाली आणि हवीहवीशी दिसतात, पण विशिष्ट हद्दीपलीकडे त्यांना स्वीकारले जात नाही. जिथे समाजमान्य स्त्रीपुरुष संबंधांबद्दल इतका बंदिस्तपणा आहे, तिथे ‘अनैसर्गिक’ मानले जाणारे ‘एलजीबीटीक्यू’ शिवाय विवाहबा, लिव्ह-इन- रिलेशनशिप्स, मुक्त लैंगिक संबंध हे चौकटीबाहेरचे विषय समाजाइतकेच साहित्यापासूनही दूरच राहतात. पण प्रियांका पाटील यांच्या ‘इब्रु’ या कथासंग्रहात परिघामध्ये जगणाऱ्या तसेच ‘एलजीबीटीक्यू’ व्यक्तिरेखा एकविसाव्या शतकातल्या बदलत्या मानवी सबंधांना अनुसरणाऱ्या प्रतिनिधी म्हणून धीटपणे उभ्या राहिल्या आहेत. ‘इब्रु’ हा कन्नड शब्द आहे. इब्रु म्हणजे दोघी. संग्रहाच्या शीर्षकापासून लेखिकेची विषयाला थेट भिडण्याची आणि अनुभव धीटपणे मांडण्याची वृत्ती सामोरी येते. या कथा धक्कादायक वाटण्याची शक्यता आहे, पण लेखिकेचा हेतू सनसनाटी घडवण्याचा नसून परंपरेला धक्का देण्याचा आहे. या कथा स्त्रीकेंद्री असल्या तरी तिच्यातला ‘तो’ आणि त्याच्यातली ‘ती’ शोधण्याची असोशी इथे असल्यामुळे माणूसपणाच्या गाभ्याशी भिडण्याचा एक व्यापक प्रयत्न इथे दिसतो.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे : ‘आडगाव’चा लेखक!

‘इब्रु’मध्ये कावेरी आणि चन्नव्वा या शेजारणी -मैत्रिणींच्या समलिंगी आकर्षणाची कथा सामोरी येते. सीमा भागातल्या खेडय़ात राहणाऱ्या या दोघी सुशिक्षित आहेत, चन्नव्वा कमावती, स्वतंत्र आहे, पण धर्मसंस्कृतीपरंपरेनुसार लग्न करून सासरी गेलेली कावेरी पहिल्याच रात्री नवऱ्याचा स्पर्शाची शिसारी येऊन माहेरी परत येते. ती वेगळी आहे हेही हित पाहणारे तिचे साधे, सरळमार्गी आई-वडील, नवरा आणि सासरची मंडळी या सर्वापासून लपवून ठेवते. त्यामुळे गोंधळलेले आई-वडील अशा विपरीत परिस्थितीतही तिच्या पाठीशी उभे राहतात, तिला नोकरी मिळून ती कमवती होते. पण पुढे ती चन्नव्वाबरोबर सहजीवन सुरू करते तेव्हाही आई-वडिलांना विश्वासात घेत नाही. शेवटी जेव्हा कावेरी आपली बाजू त्यांना समजावून सांगते तेव्हा ही पापभीरू माणसे कमालीची हादरतात. त्यामुळे त्यांना असे धक्क्यावर धक्के देणारी कावेरी ही एका पातळीवर स्वार्थी वाटते. पण समाजात अशा मुली असतात, त्यांना आईवडिलांनी समजून घ्यावे यावर लेखिकेचे लक्ष केंद्रित झाले आहे. अशीच एका पातळीवर स्वार्थी वाटणारी रावी ‘सीक्रेट बॉक्स’मधून सामोरी येते. तिच्यावर प्रेम करणाऱ्या सागरबरोबर ती प्रामाणिक राहील का? कसे असेल त्यांचे पुढचे सहजीवन? हे प्रश्न इथे निर्माण होतात. परंतु लेखिकेची सहानुभूती त्यांना आहे, त्यामुळे त्यांची कहाणी सुफल संपूर्ण करण्याकडे तिचा कल आहे. पण प्रत्यक्षात ज्या शक्यता तिने या कथांमधून पेरलेल्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे.

हेही वाचा >>> आदले।आत्ताचे : कहाणी एका लढय़ाची

या कथांच्या केंद्रस्थानी ज्या विविध वयाच्या, स्वभाववृत्तींच्या आणि कौटुंबिक -सामाजिक स्तरातल्या स्त्री व्यक्तिरेखा अवतरत येतात त्या अनेक प्रकारे लक्षवेधी आहेत. यात मुलगा व्हावा म्हणून नवऱ्याच्या छळाला सामोरी जाणारी वंदना आणि गर्भाशयात मारून टाकलेल्या तिच्या पाच मुली (‘मोक्ष),’ विवाहबाह्य संबंध ठेवून दुसऱ्या स्त्रीसाठी अपरात्री नवऱ्याने घरातून हाकलली गेलेली, पुढे परदेशात स्वत:ची कर्तबगारी सिद्ध करणारी घटस्फोटिता आरोही आणि तिच्याबरोबर फरफटत गेलेल्या अजाण अन्वी-तन्वी (डेस्टिनेशन), बलात्कारातून दिवस गेल्यामुळे गोठय़ात ढकलली गेलेली अल्पवयीन प्रतिभा (रणमर्दिनी), ग्रामीण संयुक्त कुटुंबातली विधवा जानकी (रांजण) अशा वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा इथे सामोऱ्या येतात. ‘इब्रु’मधून कावेरी-चन्नव्वा, ‘बोगदा’मधल्या प्रवासात भेटलेल्या कॉर्पोरेट करीयरिस्ट युविका- वेश्याव्यवसाय स्वीकारलेली सारिका आणि ‘त्याच्यातली ती’मधली निवेदक- एचआयव्हीबाधितांच्या वॉर्डमध्ये सफाई कामगार असलेली तृतीयपंथी आशा सामोऱ्या येतात. पितृसत्ताक समाजव्यवस्थेत भरडून निघणाऱ्या, पुरुषांकडून ठेचल्या जात घराबाहेर फेकल्या गेलेल्या या व्यक्तिरेखांशी लेखिकेचे अगदी पोटातून सहवेदनेचे, सहकंपाचे नाते आहे. यातल्या प्रत्येकीकडे बघताना तिच्या संवेदनशील मनाला पाझर फुटतो, त्यांचे जगणे सफल व्हावे असे तिला मनापासून वाटते, त्या समरसतेतून तिची कथा जन्म घेत जाते. ‘ना-स्तन’ मधली आयुष्यात सर्वतोपरी यशस्वी असणारी समिधा ब्रेस्ट कॅन्सरमुळे स्तन गमावते तेव्हा सर्वस्व हरपल्यासारखी खचून जाते. तिच्या लेखी स्तन गमावणे हा तिच्या स्त्रीत्वावर, मातृत्वावर घाला आहे. म्हणून तिचा आक्रोश आतल्या आत धुमसत राहतो. जिथे तिला जवळ घेत समीर म्हणतो की, ‘समिधा, स्तन बाईला पूर्णत्व देत नाहीत, तर बाई स्तनांना पूर्णत्व देते आणि तू आजही माझ्यासाठी तितकीच पूर्ण आहेस, कदाचित पूर्वीपेक्षा अधिक!’ स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू न मानता, तिच्या बुद्धी आणि कर्तबगारीतले सौंदर्य स्वीकारणारे पुरुष जेव्हा स्त्रियांना साथ देतील तेव्हा समताधिष्ठित आणि निरामय समाज निर्माण होईल, अशी आशा ही कथा निर्माण करते.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे: मोटार लाइनवाली ‘एकोणिसावी जात!’

रावीचे आकाशशी असणारे संबंध जाणूनही तिच्यावरच्या प्रेमापोटी लग्नाला तयार होणारा सागर आणि दुसरीकडे अल्पावधीत तिसरीशी अफेयर सुरू करणारा आकाश असा विचित्र त्रिकोण ‘सीक्रेट बॉक्स’मधून समोर येतो. जेव्हा आकाशकडून प्रतारणा होण्याचे वळण तिच्या आयुष्यात येते तेव्हा रावीप्रमाणे वाचकालाही धक्का बसतो, पण ती एक क्षणही न दवडता सागरच्या दिशेने वळते. आजची स्त्री पुरुषी आक्रमकतेच्या अवकाशातदेखील स्वतंत्र अस्तित्व टिकवायला शिकली आहे हे वास्तव नाकारून कसे चालेल, असा प्रश्न ही कथा उभी करते.

या कथासंग्रहातल्या ‘रांजण’, ‘बोगदा’, आणि ‘त्याच्यातली ती’ या कथा विशेष उल्लेखनीय आहेत. ‘रांजण’मधल्या जानकीचे जगणे, फुलणे नवऱ्याच्या अनपेक्षित मृत्यूनंतर गोठून गेले आहे. ग्रामीण शेतकरी संयुक्त कुटुंबाच्या बारदान्यात जगणाऱ्या या विधवा स्त्रीला भौतिकदृष्टय़ा काही कमी नाही. तिच्या सासरची मंडळी तिला सांभाळून घेत पूर्वीसारखेच मानाने वागवत दिनक्रमाच्या रहाटगाडग्यात सामावून घेतात; पण नवऱ्याने फुलवलेली लैंगिक सुखाची आस तिला अंतर्बा पेटवत, सैरभैर करत राहते. तिने जमिनीत पुरलेला रांजण हे तिच्या बंदिस्त आयुष्यात मूकपणे विझवलेल्या लैंगिकतेचे रूपक बनून सामोरे येते. मातीचा रांजण/ कुंभ हे जागतिक संस्कृतीने आदिशक्ती प्रकृतीमातेचे, पर्यायाने योनीचे प्रतीक मानले आहे हे लक्षात घेतले तर या कथेतून वेगळय़ा शक्यता दिसू लागतात. सगळय़ा जगाचे पोषण करणाऱ्या पृथ्वीमातेची कन्या असणाऱ्या सीता : जानकीने गमावलेल्या सृजनाच्या, सुफलनाच्या शक्यतांच्या जाणिवेने दु:खाची धार गडद होत कथेला नि:शब्द शेवटाकडे नेते. ‘बोगदा’ या कथेत पुरुषप्रधान व्यवस्थेने असहाय केलेल्या आधुनिक कॉर्पोरेट जगात वावरणारी युविका आणि वेश्याव्यवसाय स्वीकारावा लागणारी सारिका यांच्या जगण्याची शोकांतिका सामोरी येते. या अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी असणारे प्रकाशाचे वर्तुळ त्यांच्या वाटय़ाला येणार नाही, वासनेच्या लालबुंद जाळाचे दाहक चटके खातच त्यांना जीवनप्रवास रेटावा लागणार आहे ही बोचरी जाणीव इथे होते. तसेच ट्रेनच्या प्रवासात ‘त्याच्यातल्या ती’चा शोध घेऊ पाहणाऱ्या निवेदक आणि तृतीयपंथी आशाची कहाणी हृदयाला भिडते. सारिका-युविका या कुणाच्या खिजगणतीत नसणाऱ्या स्त्रिया. या कुणीच नसतात एकमेकींच्या, पण त्या या छोटय़ाशा प्रवासात एकमेकींशी सौहार्दाचे, मित्रत्वाचे नाते जोडत, वाचकाला त्यात सामील करून घेतात. त्यांची संवेदनशीलता, सहिष्णुता त्यांना ‘नायिका’त्व प्राप्त करून देते. त्यामुळे या कथा केवळ जानकी, युविका, सारिका, आशा यांच्या राहात नाहीत, त्या सर्वाच्या होत अंत:करण आद्र्र करत जातात.

हेही वाचा >>> आदले । आत्ताचे: डोळस कलाप्रेमी विश्व..

‘इब्रु’मधल्या काही कथांमध्ये संदिग्धता जाणवली तरी त्यांत कोणती ना कोणती अपूर्वताही आहे आणि ती लेखिकेच्या सामाजिक वास्तवाशी जुळलेली आहे. या कथेला कोणत्याही राजकीय-सामाजिक विचारधारेच्या अभिनिवेशाचे लेबल नाही. यात स्त्री व्यक्तिरेखा केन्द्रस्थानी असल्या तरी या कथेला रूढ अर्थी स्त्रीवादी म्हणता येणार नाही. लेखिका आपल्या ‘म्या सक्षम कवा नव्हती मग?’ या कवितेत शेवटी म्हणतात,

‘शेवटची वळ (ओळ) लिहिताना एक इनंती साऱ्यांना

सबला, अबला, सक्षम, अक्षममध्ये

नका अडकवू आता आम्हा बायांना ..’

इथे त्यांची भूमिका स्पष्ट होते.

या कथा कोणत्या वाटा शोधत पुढे जातील, नवनवे आशय धुंडाळत अभिव्यक्तीची कोणती सशक्त रूपे धारण करून सामोरी येतील ते आता लेखिकेच्या हाती आहे.

‘इब्रु’मधील कथा स्वत:चे असे वेगळे जीवनभान, सामाजिक दृष्टी आणि कलात्मक भान घेऊन प्रकट झाल्या आहेत, त्या अर्थी त्या स्वतंत्र आहेत.

लेखिकेकडे सांगण्यासारखे खूप काही आणि सांगण्याची असोशी आहे. ग्रामीण, निमशहरी, महानगरी आणि परदेशी जीवनानुभव व्यक्त करण्याची दृष्टी त्यांच्या ठायी असल्याने याच दमाने यापुढेही त्यांचे कथालेखन समोर यावे.

व्यवसायाभिमुख शिक्षणात अध्यापक म्हणून कार्यरत असताना ललित आणि ललितेतर लेखनात सक्रिय. कथा, व्यक्तिचित्रणे, ललितबंध, चित्रपटविषयक लेखन. ‘बंजाऱ्याचे घर’ (आत्मकथनात्मक), ‘अपूर्व, अलौकिक, एकमेव’ (व्यक्तिचित्रे), थर्ड पर्सन (कथा) ही पुस्तके लोकप्रिय. हिंदी कवी, नाटककार आणि लेखक नरेन्द्र मोहन यांच्या ‘कमबख्त निंदर’ या आत्मकथनाचा अनुवाद.

lekhikaaat12a@gmail.com