नरेंद्र भिडे
narendra@narendrabhide.com
१९९०-९१ चा काळ होता. मी भारत गायन समाजात बाळासाहेब माटे यांच्याकडे हार्मोनियम शिकायला जात असे. त्या वेळेस संगीत नाटकातील नांदींचा कार्यक्रम करण्याची एक कल्पना शैला दातार यांना सुचली. जवळजवळ वीसेक नाटकांतील वेगवेगळ्या नांदी समूह स्वरात सादर करायच्या आणि गणेशोत्सवात त्याचा कार्यक्रम करायचा अशी ती कल्पना होती. अर्थातच या सर्व नांदी आमच्याकडून बसवून घ्यायच्या आणि या कार्यक्रमाला एक मूर्त स्वरूप प्राप्त करून द्यायचं हे सोपे नव्हते. ही जबाबदारी एका अशा माणसाकडे दिली गेली, जो संगीत नाटकाचा गेल्या साठ वर्षांचा जिवंत इतिहास होता. अर्थातच स्वरराज छोटा गंधर्व!
आमची प्रॅक्टिस सुरू झाली तसं माझ्या लक्षात यायला लागलं की, आपल्याला जेवढे छोटा गंधर्व माहिती आहेत तो त्याच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा एक अत्यंत छोटा असा भाग आहे, हिमनगाचे केवळ टोक! लडिवाळ सुरात गाणारा गायक नट आणि मानापमान, सौभद्र इत्यादी नाटकांतून नायकाची भूमिका वठवणारा एक कलाकार हे छोटा गंधर्व यांचं फक्त एक Visiting Card होतं! छोटा गंधर्व हे काय प्रकरण आहे आणि ते किती खोल आहे याची थोडीसुद्धा जाणीव त्या वेळेस आम्हाला कोणालाही नव्हती. आणि जसजसं या माणसाशी संपर्क वाढायला लागला तेव्हा लक्षात आलं की मराठी संगीत आणि नाटय़रसिकांनी या माणसाला जेवढं डोक्यावर घ्यायला हवं होतं तेवढं घेतलेलं नाही. या माणसाची योग्यता ही कुणाला नीट कळलेलीच नाही! अर्थात त्यामागे कारणेही होती. छोटा गंधर्व म्हणजे दादा हे अतिशय मितभाषी, थोडेसे विक्षिप्त आणि प्रथमदर्शनी ज्यांची भीती वाटावी असे एक व्यक्तिमत्त्व होते. म्हणजे ज्या लडिवाळ गायनाकरता ते प्रसिद्ध होते, ते गाणं नुसतं ऐकलं की जे रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहायचं त्याचा आणि या समोर दिसणाऱ्या माणसाचा कुठे ताळमेळच जुळेना. हातात कायम एक शिलगावलेली सिगारेट आणि कायम स्वत:च्या तंद्रीत. भवतालाचं काही भानच नाही. आपल्याकडे बघत असले तरी असं वाटायचं की ते आपल्या आरपार दुसरीकडेच पाहताहेत. यामुळे या माणसाचा अंदाजच येत नसे. पुढे मग त्यांच्याकडे संगीत शिक्षण सुरू झालं आणि या माणसाची संगीतावरची हुकमत, त्यांचा व्यासंग आणि त्यांचा अप्रतिम सुरेल गळा याचा अंदाज लागायला लागला. आणि आम्ही अंतर्बा थरारलो. तो सगळाच काळ एका सुंदर स्वप्नासारखा अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा आहे. दादांना जाऊन आता आता जवळजवळ २३ वर्षे होतील, पण तरीही त्यांचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय, तो माझ्या अजूनही पूर्णपणे लक्षात आहे. काहीही लायकी नसताना एवढा मोठा माणूस आमच्या भाग्यात लिहिलेला होता ही अतिशय सुंदर गोष्ट होती.
विसाव्या शतकाच्या आरंभीच्या तीस-पस्तीस वर्षांत संगीत रंगभूमी मुख्यत्वे तीन पायांवर उभी होती. बालगंधर्वाची ‘गंधर्व नाटक मंडळी’, मास्टर दीनानाथ यांची ‘बलवंत संगीत मंडळी’ आणि आणि केशवराव भोसले व नंतरच्या काळात बापूराव पेंढारकर यांची ‘ललितकलादर्श’. तसे अजूनही गायक नट आणि नाटक कंपन्या होत्या, पण या तिघांइतकी यशाची पावती रसिकांनी बाकी कोणास एवढय़ा प्रमाणात दिली नाही. याच काळात ९-१० वर्षांच्या सौदागर नागनाथ गोरे या मुलाकडे ‘बालमोहन नाटक मंडळी’च्या दामूअण्णा जोशी यांचं लक्ष गेलं. साताऱ्याजवळच्या कोरेगाव येथील एका गरीब कुटुंबात जन्माला आलेला हा मुलगा. अत्यंत गोड गळा आणि प्रचंड बुद्धिमत्ता. परंतु आजच्यासारखं या गोष्टी पटकन जगाच्या समोर येण्याची सोय नव्हती. पण आपल्या आणि मराठी संगीत नाटय़ादी कलांच्या सुदैवाने दामूअण्णा जोशी यांच्या रत्नपारखी नजरेनं हे रत्न हेरलं आणि ते सौदागरला आपल्या बरोबर घेऊन गेले. तसं बघायला गेलं तर नाटकात काम करण्यासाठी लागणारं रूप हे सौदागरकडे अजिबात नव्हतं, पण तरीही गाण्याच्या जोरावर बालमोहनमध्ये त्यांनी बस्तान बसवलं. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात काही स्त्री-पार्ट केले, पण खऱ्या अर्थाने त्यांच्यातील गायकाला पलू पडायला सुरुवात झाली ती अत्र्यांच्या नाटकांमुळे. खाडिलकर, देवल, गडकरी या परंपरेतील नाटकांना पूर्णपणे छेद देणारी अत्र्यांची नाटकं होती आणि त्यात सौदागरने आपल्यातील संगीत कलेची चुणूक दाखवायला सुरुवात केली. ज्येष्ठ समाजसुधारक अनंत हरी गद्रे यांनी या मुलाचं गाणं ऐकलं आणि त्या काळातील पद्धतीप्रमाणे त्याचं नामकरण केलं ‘छोटा गंधर्व.’
पण हा मुलगा साधा नव्हता. संगीत नाटकातून काम करून गायक नट म्हणून नाम कमावणे यापलीकडे जाऊन काहीतरी करण्याची आंतरिक ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देईना. यातच त्यांनी इंग्रजीचं शिक्षण घेतलं आणि संस्कृतचंसुद्धा! मी स्वत: दादांना अस्खलित इंग्रजी आणि संस्कृत बोलताना बघितलं आहे. हे सगळं त्यांनी केव्हा केलं आणि ते त्यांना का करावंसं वाटलं याचं आपल्याकडे काहीच उत्तर नाही. सिंदेखान नावाचे एक अवलिया गायक त्या काळी होते. त्यांच्याकडून बंदिशींचा प्रचंड मोठा ऐवज छोटा गंधर्व यांनी मिळवला आणि जोपासला. पारंपरिक आणि नवीन अशा दोन्ही प्रकारच्या संगीत नाटकांतून छोटा गंधर्वानी काम केलं. पण जुन्याच नाटकातील जुन्याच चाली जेव्हा त्यांच्या तोंडून आपण ऐकतो तेव्हा असं वाटतं, या चाली त्यांनी स्वत:च दिलेल्या आहेत. ‘लाल शालजोडी’, ‘कोण तुजसम सांग मज गुरुराया’, ‘प्रिये पहा’, ‘दे हाता शरणागता’, ‘आनंदे नटती’, ‘जलधर संगे नभ’, ‘नच सुंदरी करू कोपा’सारखी असंख्य पदे ही खरं तर जुनीच, पण त्यात छोटा गंधर्वानी स्वत: अत्यंत जाणूनबुजून आत्मसात केलेल्या तीन-चार शैली मिसळल्या आणि त्याच्यावर एक छोटा गंधर्व नावाची नाममुद्रा उमटवली. बालगंधर्व आणि मास्टर दीनानाथ ही त्यांची दैवतं होतीच, पण त्याही पलीकडे जाऊन उत्तर भारतीय उपशास्त्रीय संगीताचा पूरबी आणि पंजाबी ढंग त्यांच्या गाण्यात फार सुंदर रीतीने मिसळलेला आपल्याला दिसतो. आणि फक्त हेच नव्हे तर कधी कधी दाक्षिणात्य शास्त्रीय संगीताचाही प्रभाव त्यांच्या बऱ्याच गाण्यांवर पडलेला आहे हे आपल्या लक्षात येतं! हे सगळं जादूई मिश्रण कसं तयार झालं याचं उत्तर शोधून काढणे फार अवघड आहे. मूच्र्छना पद्धतीचा अवलंब करून वेगवेगळ्या रागांचे पदाच्या मूळ रागावर कलाम करणे हा तर छोटा गंधर्वाच्या गाण्यातील एक अप्रतिम आणि विस्मयचकित करणारा आविष्कार. उदाहरणार्थ ‘या ना नवल नयनोत्सवा’ या ‘खमाज’ वर आधारित पदामध्ये कोमल निषादावर ठेहेराव घेऊन ते त्या कोमल निषादात षड्जाचा भास निर्माण करायचे आणि अचानक ‘पूरीया’ रंगाची सुरावट आपल्याला ऐकू येई. असे अनेक प्रकार ते बेमालूमपणे करत. अगदी अखेपर्यंत पांढरी तीन- पांढरी चारसारख्या उंच स्वरात गाणं त्यांनी पसंत केलं, पण त्यांचं गाणं कधीही कर्कश वाटलं नाही. गोड आणि लडिवाळ गाणारा हे visiting card त्यांनी शेवटपर्यंत जपलं.
वेगवेगळ्या नाटय़गीतांच्या मूळ बंदिशी आणि आणि मूळ ठुमऱ्या, दादरे, टप्पे यांचा प्रचंड मोठा ज्ञानकोश म्हणजे छोटा गंधर्व. मला आठवतं आमचा नांदी हा कार्यक्रम बसवत असताना त्यांनी काही पदांमध्ये आम्हाला चक्क Harmony मध्ये गायला सांगितलं होतं. हा stern Harmony अभ्यास त्यांनी कधी केला असेल देवच जाणे! अतिशय विचित्र असे कधीही न ऐकलेले अनवट राग, जोड राग, स्वत: तयार केलेले राग, वेगवेगळ्या लावण्या, लोकगीते आणि असंख्य बंदिशी ऐकल्या की वाटायचं आता यांच्याकडून काही शिकूच नये. नुसतं ऐकत राहावं! त्यातून जे मिळेल ते मिळेल. केवळ सिंदेखानच नव्हे तर बालगंधर्व, बागलकोटकर बुवा, भुर्जी खांसाहेब, नरहरबुवा पाटणकर, मास्टर दीनानाथ, मास्तर कृष्णराव अशा अनेकांकडे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शिकलेल्या गोष्टी त्यांच्या स्मृतिपटलावर कायमच्या कोरल्या गेल्या होत्या. आणि त्यांना पटापट सगळे एकदम आठवे. मग आमची तारांबळ होई आणि आम्ही नुसते अवाक होऊन ऐकत बसू.
नुसतं गायकच नव्हे तर संगीतकार म्हणूनसुद्धा छोटा गंधर्व यांनी खूप वेगळी कामगिरी केली ‘सुवर्णतुला’, ‘देवमाणूस’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’ यांसारख्या नाटकांतील गाण्यांचे संगीत आणि आणि ‘गोविंद गोविंद’, ‘बोलू ऐसे बोल’, ‘तोची विश्वंभर’सारखे अभंग हे त्यांनी रचले, परंतु फारसे प्रसिद्ध नसलेले ‘वाऱ्यात मिसळले पाणी’ या बाळ कोल्हटकर लिखित नाटकाचे संगीतसुद्धा दिले. आणि या नाटकांमधून वेगवेगळे उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटकी राग तसेच ‘गुणकंस’सारखे स्वरचित राग त्यांनी वापरले. ‘बसंतीकेदार’, ‘शंकराबहार’, ‘भूपनट’सारखे रागही ते त्यांच्या खास ढंगात खूप सुंदरपणे आळवून म्हणत. विदुषी शैला दातार, पं. दिग्विजय वैद्य यांच्यासारख्या विद्वान शिष्यांना त्यांनी खूप शिकवले. पं. यशवंतबुवा जोशी आणि पं. प्रभाकर कारेकरसारख्या प्रख्यात गायकांनीही त्यांचे मार्गदर्शन घेतले. थोर संगीत संयोजक शामराव कांबळेसुद्धा त्यांना गुरू मानत. पण तरीही छोटा गंधर्व यांचे संगीत पुढच्या पिढीपर्यंत जेवढे पोचायला हवे होते तेवढे पोचले नाही हेही एक सत्यच आहे.
आपण लहानपणी ऐकलेली एक गोष्ट असते. एक हत्ती आणि पाच आंधळे- त्याप्रमाणे छोटा गंधर्व हे त्या हत्तीसारखे होते आणि वरील अपवाद वगळता त्यांच्या सहवासात आलेले सर्व संगीतज्ञ, संगीताचे अभ्यासक, विद्यार्थी, रसिक हे त्या आंधळ्यांसारखे. त्यांना छोटा गंधर्व तेवढेच भासले जेवढे त्यांच्या वाटय़ाला आले. एखाद्या भव्य गोष्टीचं मूळ स्वरूप हे लांबून जास्त स्पष्ट दिसतं त्याप्रमाणे आज २२ वर्षे लांब आल्यानंतर छोटा गंधर्व ही काय चीज होती ते जाणवतंय. छोटा गंधर्वाना आर्थिक यश भरपूर मिळाले यात वाद नाही. १९५० च्या सुमारास सर्वाधिक नाइट घेणारा कलाकार म्हणून त्यांनी नाव कमावलं होतं. पण त्याही पलीकडे जाऊन छोटा गंधर्व नावाच्या ज्ञानसागरात उडी मारून त्याच्यातली सर्व रत्न धुंडाळण्याची संधी फार लोकांना मिळवता आली नाही हेच आज राहून राहून वाटतं.
छोटा गंधर्व गायक म्हणून किती मोठे होते हे सर्वानाच माहिती आहे. परंतु प्रत्यक्ष गाणं सोडून एक संगीताचा सर्वागीण अभ्यास करणारा व्यासंगी आणि अतिशय आत्ममग्न कलाकार हे छोटा गंधर्वाचं खरं रूप आहे. त्यांच्या समकालीन लोकांना आणि समीक्षकांना ते पुरेसं कळलं नाही असं कधी कधी वाटतं. असा अवलिया आणि ज्ञानसमृद्ध माणूस परत होईल न होईल माहीत नाही, पण आमच्या नशिबात तो एकेकाळी आला होता आणि आम्हाला भरभरून देतही होता; परंतु तेवढं घेण्याची कुवत आमच्यातच नव्हती हेच खरं!