जगभरातील निम्म्याहून अधिक लोकांनी दक्षिण कोरियामधून आलेल्या आपल्या ‘गॅझेट्स’वर यंदाच्या ऑस्कर सोहोळ्याचे कवतिक अनुभवताना दक्षिण कोरियाई चित्रपटाचा गौरव अनपेक्षित आणि चांगल्या अर्थाने धक्कादायक असल्याचा ग्रह केला असेल. मात्र, गेल्या पंधरा-वीस वर्षांतील दक्षिण आशियाई राष्ट्रांतील चित्रपटांवर एक दृष्टिक्षेप टाकला तर यंदा ऑस्करच्या चार पुरस्कारांसह ‘पॅरासाईट’ला मिळालेले यश अचानक आणि अनपेक्षित नाही याची खात्री पटेल. अॅकॅडमीद्वारा जाहीर झालेला पुरस्कार ही आशियाई देशीवादाला दिलेली पहिली कबुली होती, इतकेच..
एकेकाळी आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणेच हॉलीवूड आणि परभृत सिनेमाची उसनवारी करण्यात धन्यता मानणाऱ्या पूर्वेकडच्या काही राष्ट्रांवर १९९७ साली आलेल्या आर्थिक मंदीने मोठा आघात केला. ‘एशियन क्रायसिस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आर्थिक संकटापासून आपला भारत देश पूर्णपणे दूर होता, तरी थायलंड, दक्षिण कोरिया, हाँगकाँग हे देश त्यात पोळून निघाले होते. आज आर्थिकदृष्टय़ा या सर्व देशांनी फिनिक्ससारखी भरारी घेतली आहे. त्या काळात मात्र या देशांतील सामान्य माणसांना मंदीचा जबर तडाखा सोसावा लागला होता. या मंदीचे पडसाद तिथे चित्रपटासारख्या कलात्मक माध्यमात उमटले. या देशांतील नव्या पिढीच्या चित्रपटकर्त्यांनी देशातील गुन्हेगारी, आर्थिक चढउतार, देशातील राजकीय ताण यांमधून कल्पना-भांडवल उचलत चित्रपट निर्माण करण्यास सुरुवात केली. थायलंडमधील पेन-इक-रतनरंग, हाँगकाँगमधील जॉनी टो आणि दक्षिण कोरियामधील चान वूक पार्क, बोंग जून-हो या दिग्दर्शकांनी जागतिक प्रेक्षकांना आवडेल असा ‘देशीवादी’ चित्रपट बनविण्यावर भर दिला. त्याचे परिणाम म्हणजे आज या दिग्दर्शकांचे चित्रपट जगभरातील सिनेवर्तुळात मानाचे स्थान राखून आहेत. पेन-इक-रतनरंग या दिग्दर्शकाचे ‘फनी स्टोरी ऑफ सिक्स अॅण्ड नाइन’, ‘मोनोरॅक ट्रान्झिस्टर’, ‘लास्ट लाइफ इन युनिव्हर्स’, जॉनी टो या दिग्दर्शकाचे ‘ब्रेकिंग न्यूज’, ‘इलेक्शन’, ‘एक्साईल’, चान वूक पार्क यांची सूड चित्रत्रयी आणि बोंग जून-हो यांचे ‘मेमरीज ऑफ मर्डरर’, ‘द होस्ट’, ‘मदर’ हे चित्रपट गेल्या दोन दशकांतले उत्तम आशियाई चित्रपट म्हणून ओळखले जातात. एकीकडे या देशांतील चित्रपटांचा विकास होत असताना चीन, जपान आणि तैवानमधूनही उत्तमोत्तम चित्रनिर्मिती होऊ लागली. पण दक्षिण कोरियाच्या चित्रपटांचा कान महोत्सवातून मोठय़ा प्रमाणावर जगप्रसार झाला. हे चित्रपट हिंसा आणि सेक्स बेधडक आणि प्रसंगी अतिरंजित प्रमाणात मांडू लागले. प्रेमकथांच्या सरधोपट चौकटी त्यांनी उद्ध्वस्त केल्या. त्यातून तयार झालेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांसह हॉलीवूडच्या ‘मिरामॅक्स’, ‘ड्रीमवर्क्स’ आणि ‘वॉर्नर’सारख्या मातब्बर स्टुडिओज्चेही लक्ष वेधले. वितरण आणि रूपांतरणासाठी या काळात दक्षिण कोरियाई चित्रपटांचे सर्वाधिक हक्क अमेरिकेत विकत घेण्यात आले. ‘सिम्पथी फॉर मिस्टर व्हेन्जनन्स’ या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर कोरियन चित्रपटांमध्ये सूडपटांची एक चौकट तयार झाली. डोळ्यांवर आणि मनावर परिणाम करणाऱ्या हिंसक दृश्यांचा चित्रपटांत समावेश होऊ लागला. अत्यंत निष्पाप आणि पापभीरू व्यक्तींवर होणारा अन्यायाचा कहर आणि त्या व्यक्तींनी ‘अँग्री यंग मॅन’ बनत केलेली अन्यायाची परतफेड या कथारचनेचे सारेच चित्रपट यशाची नवी समीकरणे तयार करीत होते. ‘बिटरस्वीट लाइफ’, ‘सिटी ऑफ व्हायलन्स’, ‘सनफ्लॉवर’, ‘आय फॉर आय’, ‘मेन फ्रॉम नोव्हेअर’, ‘द चेझर’ या चित्रपटांमध्ये सूडाचे वेगवेगळे अवतार पाहायला मिळतात.
मॉन्स्टर चित्रपट ‘द होस्ट’, सीरियल किलर सिनेमा ‘मेमरीज् ऑफ मर्डरर’ या ताकदीच्या कथा हाताळल्यानंतर दिग्दर्शक बोंग जून-हो यांनी ‘मदर’ नावाचा सूडपट बनविला. कोरियन सूड-समीकरणाचे बंधन झुगारून इथली वृद्ध व्यक्तिरेखा हाणामारी न करता तगडय़ा नायकांहून वरचढ अशा क्लृप्त्या करताना दिसते. बोंग जून-हो यांच्या प्रत्येक चित्रपटातील रहस्य आणि आशय हा माणूसपणाच्या अनपेक्षित गोष्टींची नव्याने ओळख पटवून देतो. त्यात सामाजिक स्तरांचा सखोल अभ्यास दिसतो. ‘द होस्ट’ चित्रपटात पाणराक्षसाची निर्मिती ही अमेरिकी लष्कराकडून हान नदीत घातक रसायने सोडण्यातून झाल्याचे कथानकात सूचित करण्यात आले आहे. २००६ सालच्या या चित्रपटापासून अमेरिकी वर्चस्ववादावर टीका आणि टिपण्णी करण्याची संधी बोंग जून-हो यांनी साधली आहे. अन् ‘पॅरासाईट’मध्ये ती तीव्रतेने समोर आली आहे.
जग सपाटीकरणाच्या काळात दोन हजार सालोत्तर पिढीच्या डोक्यातील अमेरिकेचा पगडा हळूहळू कमी व्हायला लागला. भारतासह चीन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया आदी आशियाई राष्ट्रांमध्ये आधी शिक्षण आणि नोकरीच्या संधींसाठी असलेले अमेरिकाप्रेम आटायला लागले. याचे प्रमुख कारण या देशांमध्येच प्रति-अमेरिकासदृश संस्कृती तयार झाली. आर्थिक आणि सामाजिक स्थिती उंचावणाऱ्या संधी तयार झाल्या. त्यातून गडगंज श्रीमंतांचा ‘अति आहे रे’ वर्ग निर्माण झाला आणि त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ‘अति नाही रे’ वर्ग तयार झाला. गेल्या दहा वर्षांत देखण्या गगनचुंबी इमारतींची विकसित होणारी निवासी संकुले आणि त्यांच्याच दुसऱ्या बाजूला असणारी झोपडपट्टय़ांची भलीमोठी वस्ती हा आपल्या शहरांचा विरोधाभासी चेहरा नजरेसमोर आणला तरी हा बदल लक्षात येईल. ‘पॅरासाईट’मध्ये या दोन परस्परविरोधी संस्कृतींना एकत्र आणण्यात आले आहे.
जगभरात वितरित होणाऱ्या व्हिडीओ गेमच्या निर्मितीत असलेल्या कुटुंबातील श्रीमंत व्यक्तिरेखा तसेच नोकरी गेल्यामुळे विविध क्लृप्त्यांआधारे रोजच्या जगण्याची प्रक्रिया पूर्ण करणारे आर्थिकदृष्टय़ा अक्षम कुटुंब या चित्रपटात आहे. त्यांच्यातली दरी आयुष्यात कधीच भरून न निघणारी आहे. एका कुटुंबाला पैसा खर्च कसा करावा याची चिंता आहे, तर दुसऱ्याला तो कसा कमवावा, याची! त्यातच गरीब कुटुंबातील मुलाला मित्राच्या शिफारशीवरून श्रीमंत कुटुंबाच्या घरात प्रवेश मिळतो. अन् तो तिथे वाकडे मार्ग अवलंबत आपल्या सगळ्या कुटुंबाच्या नोकरीचा प्रश्न मिटवतो. काही क्षणांसाठी त्यांची अर्थचिंता पूर्णपणे नष्ट होते. मात्र, त्यांचा हा बनाव फार काळ टिकू शकत नाही. त्यांनीच तयार केलेल्या खोटेपणाच्या जाळ्यात त्यांचे अडकणे अटळ बनते.
समाजाच्या आर्थिक स्तरांतील दोन भिन्न टोकाला असणाऱ्या या घटकांमध्ये प्रत्यक्षात कुठलाही संघर्ष होताना दिसत नाही. कारण तसा थेट संघर्ष होऊच शकणार नाही, इतकी दोन घटकांमधली तफावत मोठी आहे. श्रीमंत कुटुंब पुरते अमेरिकाधार्जिणे आहे. अमेरिकेतून आणलेल्या वस्तू आणि अमेरिकेत शिकून आलेल्या व्यक्तींविषयी त्यांना कमालीची आस्था आहे. त्याचवेळी एतद्देशीय कसे जगत असतील याविषयी त्यांना काडीचीही आस्था नाही. सुखाच्या ठरवून दिलेल्या मापदंडापलीकडे त्यांना जगायचे नाही. अन् त्यात त्यांचीही चूक नाही. तर गरीब कुटुंबाला आपली आर्थिक आणि सामाजिक स्थिती कधीही बदलता येणार नाही, त्यामुळे जितक्या शक्य होतील तितक्या क्लृप्त्यांद्वारे बनाव व कारस्थानांच्या मार्गे यशस्वी होण्यावाचून त्यांना पर्याय नाही. श्रीमंत कुटुंबाची फसवणूक ही त्यांची जगण्याची गुरुकिल्ली आहे. ती तडीस नेण्यासाठी नीतिमूल्यांना त्यांनी तिलांजली दिली आहे. यातील श्रीमंत कुटुंबात पैसा, सत्ता, वर्चस्व यामुळे आलेले सामाजिक एककल्लीपण आहे. गरीबांबाबत, त्यांच्या शरीराला येणाऱ्या विशिष्ट गंधाबाबत त्यांना घृणा वाटते. हा चित्रपट दोन्ही वर्गाचे जगणे तपशिलांत दाखवतो. त्यांच्यातील सामाजिक भेदाचे विच्छेदन करताना हा चित्रपट त्यातल्या दृश्यसंपन्नतेने प्रेक्षकाला खिळवून ठेवतो, अस्वस्थ करतो. कथेतील रहस्यदालनांचा फेरफटका घडवतो आणि आपल्या भवतालाचे आकलन अधिक तीव्रतेने करण्यासाठी मदत करतो.
अभिजात संगीतासह जगण्यासाठी चालणारे व्यक्तिरेखांचे फसवणुकीचे नवनवे आराखडे, अमेरिकेतील रेड इंडियनच्या संदर्भाचा वापर करून चलाखीने महासत्तेच्या दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीवरील टीका आणि वैश्विक पातळीवर सगळ्याच समाजात बसू शकणाऱ्या कथेचे दमदार सादरीकरण या बलस्थानांवर यंदा ऑस्करमध्ये ‘पॅरासाईट’च्या वाटय़ाला इतके मोठे यश आले.
आठ वर्षांपूर्वी ‘साय’ या दक्षिण कोरियाई गायकाच्या यूटय़ुबद्वारे व्हायरल झालेल्या ‘गन्नम स्टाईल’ या गाण्यातही तिथल्या समाजात गरीब-श्रीमंतांमध्ये वाढलेल्या दरीबाबत रोख होता. गेल्या काही वर्षांत दक्षिण कोरियाई पॉप कलाकार व त्यांच्या टीव्ही मालिका पाहणारा वर्ग जगभरात वाढत चालला आहे. सुंघा जंग नावाच्या गिटारवादकाला यूटय़ुबच्या माध्यमातून जागतिक पटलावर ओळख मिळाली आहे. जगातील सर्वात अवघड शिक्षणप्रक्रिया राबविणारे राष्ट्र म्हणून ओळख असलेल्या दक्षिण कोरियातून कलेचे नवनवे आविष्कार जगभराचे लक्ष वेधत आहेत. स्थानिक घटकांना वैश्विक अधिष्ठान देण्याच्या दक्षिण कोरियाच्या ‘देशीवादी’ हौसेतून पुढील काळात आणखी उत्तमोत्तम कलानिर्मिती होण्यासाठी ऑस्करच्या निकालामुळे मदतच होणार आहे.