कवी संतोष पद्माकर पवार यांच्या ‘बहादूर थापा आणि इतर कविता’ या साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवितासंग्रहास अनिल अवचट यांनी लिहिलेली प्रस्तावना..
सं तोष पवार या तरुण मुलाच्या कविता वाचल्या तेव्हा थक्क झालो. इतकी अस्सल माणसं खूप दिवसांत साहित्यातून भेटली नव्हती. अगदी नावांपासून सुरुवात. ही नावं, आडनावं आपण ऐकली कशी नव्हती; मी फिरता माणूस आहे, तरीही? मला वाटतं, आपला समाज माहिती आहे आपल्याला.. तो आपण पाहिलाय. पण या कवितेनं मला गदागदा हलवून सांगितलं- ‘नाही पोरा, त्यापलीकडेही काही आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे.’ प्रत्यक्ष नाही, तरी संतोषच्या कवितेने ते दाखवलं, हे बरंच झालं.
काहीशी व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘माणदेशी माणसं’ची आठवण झाली. मी लहान होतो तेव्हा ते वाचलं आणि थरारून गेलो. सोबत द. ग. गोडसे यांची अप्रतिम चित्रं. याही संग्रहात गिरीश सहस्रबुद्धे यांची चित्रे आहेत. तशीच अस्सल, तशीच अर्थवाही. कवितेला पूरक. ‘माणदेशी माणसं’ कथेच्या वळणाने गेलं, तर हे पुस्तक कवितेच्या- हा दोहोंतला फरक.
या पुस्तकात फक्त माणसं आहेत. माणसांची स्वभावचित्रे आहेत, आयुष्यचित्रे आहेत. शिवाय काहींची झगडा-चित्रे, तर काहींची हताश-चित्रे. या कविता आहेत. त्या मुक्तछंदात आहेत. त्यात लय आहे. पण हे लिखाण कधी गद्याकडेही झुकते. म्हणजे गद्य आणि पद्य यांच्या सीमारेषेवरची ही कविता आहे काय? कवीने हा विचार न करता ती लिहिली, हे बरंच झालं. तसे करण्याचा धीटपणा, निरागसपणा, सहजता त्यात आहे.
या कवितेत कधी दाहक वास्तव येते. ते खूप खोलवर झिरपते आणि अस्वस्थ करते. एक बाई आपल्या शेताची जिवापाड राखण करते. पण भोवतीचं जवळ येणारं शहर त्या शेताचा घास कसा गिळतं, याची विदारक कथा यात आहे. सगळ्या जगाविरुद्ध ती बाई लढली. पण नातवंडांनीच सह्य़ा करून जमीन विकली.. ही हतबलता. शहर नावाच्या राक्षसाच्या पुढे काहीच टिकू शकत नाही. पण दुसऱ्या कवितेत असा न हरणारा माणूस भेटतो. गावातल्या अनिष्टांविरुद्ध धोका पत्करून हा कायम उभा. अगदी स्थानिक सत्ताधीश पुढाऱ्याच्या विरोधातही.
या कवीची पहूंच सर्वत्र आहे. अगदी एका मुसलमान विधवेचं अंतरंग त्याला ठाऊक आहे, तिच्याशी याचा संवाद आहे. एका माणसाचे जगणे तर थक्कच करते. तो कागदोपत्री मेला आहे. घरच्यांनी त्याची जमीन वाटून घेतली आहे. खूप वर्षांनी तो परत आला. आता तो कुणालाच नकोसा आहे. शेवटी तो परांगदा होतो. हे जसे त्याचे दुसरे मरणच. पण ते बरे, असा घरच्यांचा आलेला दाहक अनुभव. असे कित्येक. पानापानांवर वेगळं काही देणारे, दाखवणारे. भाषा इतकी सहज, की जशी पोयटय़ाची वस्त्रगाळ माती. मऊ म्हणून मजेत चालावे.. तर कधी पाय फरकेल, कधी दलदलीत फसेल, ते सांगता येणार नाही. काही माहीत नसलेले शब्दही भेटले. उदा. ‘निवदबोणे.’ काही वाक्यांना त्या दाहक अनुभवामुळे सुभाषिताचे स्वरूप आलेय. जसे ‘सरकारी उंबरठे आणि अंगावर रट्टे सारखेच.’ हिराबाईची पाची मुलं घराला आधार न देता परांगदा झाली. त्याचं वर्णन असं- ‘लिंपणातून माती निसटून पडावी, भिताडीचा पोपडा वारंवार गळून पडावा..’ किती प्रभावी वर्णन! ते किती दृश्यमय आहे!
खूप दिवसांनी खरंखुरं वाचलं. ते दाहक आहे, त्यात ताकदही आहे. आम्ही मध्यमवर्गीय माणसं बरीचशी एकसारखी. फार फरक नाही. आणखी वरच्या वर्गात जावे, तर जवळपास एकच. शिष्टाचारांनी बद्ध. संपत्तीची हाव, आपल्यापुरते पाहणे, दिखाऊपणा.. सगळे सारखेच. त्यामानाने संतोषच्या या दुनियेत माणसांची केवढी विविधता आहे. जसं तऱ्हेतऱ्हेच्या वृक्षांनी, गवतांनी, पशुपक्ष्यांनी भरलेलं जंगलच! जरी या जंगलावर परिस्थितीची कुऱ्हाड पडत असली, तरी त्यातली विविधता चकित करणारी आहे.
आपल्या मराठी साहित्यात आणि हिंदी, कन्नड, बंगाली साहित्यात मोठा फरक जाणवतो. साठ सालापर्यंतच्या मराठी साहित्यात फक्त मध्यमवर्गीय जीवन व त्यातल्या समस्या येतात. भोवती एवढं प्रचंड जग पसरलं आहे, याची या साहित्याला कल्पनाच नसावी. ग्रामीण व दलित लेखकांनी साठनंतर हे वास्तव मराठी साहित्यात आणले. संतोषची कविता असेच डोळे उघडण्याचे काम करणारी आहे. प्रेमचंदांच्या साहित्यात जमीनदारही अस्सल असतो आणि चांभारही. तसं मराठी साहित्यात आता आता व्हायला लागलंय. संतोषची कविता त्याचाच एक भाग आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा