मागील लेखात आपण ‘कायझेन’ या संकल्पनेची तोंडओळख करून घेतली. ही संकल्पना समजावून घेणे, आत्मसात करणे जपानी समाजमानसाला काहीसे सोपे गेले. कारण मुळात ही संकल्पना आणि त्यामागचे तत्त्वज्ञान हे जपानच्या राष्ट्रीय धर्माशी व संस्कृतीशी अतिशय सुसंगत होते. याचाही आपण अतिशय थोडक्यात आढावा घेतला. आपल्याकडे मात्र ही संकल्पना समजावून घेताना अनेकांची गल्लत झाली आहे, असेही विधान मागील लेखात केल्याचे वाचकांच्या स्मरणात असेल. यासंदर्भातले एक गमतीशीर उदाहरण अगदी मुद्दाम सांगण्यासारखे आहे.
एकदा पुण्यातील एका अतिशय मोठय़ा कारखान्याला भेट देण्याचा योग आला. हा कारखाना एका मोठय़ा प्रख्यात उद्योगसमूहाच्या मालकीचा असल्याने आपल्या कार्यक्षेत्रात त्याचा प्रचंड दबदबा आहे. साहजिकच आत शिरताना एक प्रकारचा अदृश्य ताण मनावर होता. आत गेलो. ज्या अधिकाऱ्याला भेटायचे होते त्याच्या कचेरीच्या दिशेने निघालो. प्रचंड मोठी यंत्रसामग्री आणि काम करणारे कामगार यांना ओलांडत पुढे चाललो होतो. कडेच्या भिंतीवर मोठमोठय़ा सूचना तसेच कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची विस्तृत माहिती झळकत होती. एका क्षणी पाय थबकले. कारण भिंतीवर कायझेन आणि त्याविषयीची काही माहिती लावलेली दिसली. जरा थांबून ती माहिती वाचू लागलो आणि धक्काच बसला. त्या माहितीमध्ये इतक्या ढोबळ स्वरूपाच्या तपशिलाच्या चुका होत्या, की आज सांगून कोणाला त्या खऱ्या वाटणार नाहीत. आणि मुख्य म्हणजे अतिशय चुकीच्या रीतीने ही संकल्पना समजावून देण्यात आली होती. अशा भयावह रीतीने जर कामगारांपर्यंत ‘कायझेन’ ही संकल्पना पोहोचविली जात असेल तर त्यामुळे निव्वळ गैरसमजच वाढीस लागणार याची खात्री झाली. गंमत म्हणजे काही क्षणांतच याचा प्रत्ययदेखील आला.
आम्ही ते भित्तीपत्रक न्याहाळत होतो तोच आम्हाला पाहून एक कामगार आमच्यापाशी आला. त्याने साहजिकच आमची चौकशी केली. जुजबी संभाषण झाले आणि आम्ही पुढे निघालो. क्षणभर मनात विचार आला म्हणून थांबलो आणि त्या कामगाराला हाक मारली. तो जवळ आला तसे त्याला- हा कायझेन नेमका काय प्रकार आहे, असे सहजच विचारले. त्याने मोठय़ा रुबाबात उत्तर दिले- ‘‘काहीजण करत्यात म्हणून ‘काय झन’ म्हणत असतील.’’ चूक त्याची नव्हती. त्या चुकीच्या माहितीपत्रकाचा याखेरीज दुसरा कोणताही परिणाम होणे शक्य नव्हते. आम्ही मुद्दामच त्याच्याशी संभाषण वाढवायचा प्रयत्न केला. भिंतीवर क्वालिटी सर्कलविषयी काही माहिती देणारे पत्रक लावले होते त्याविषयी त्याला विचारले. त्या कामगाराचे उत्तर तयारच होते- ‘‘काही नाही हो साहेब.. एवढेसे काही चुकले, जरा कुठे खुट्ट झाले की त्याचे खापर आमच्या डोक्यावर फोडण्याकरिता शोधून काढलेली थेरं आहेत सगळी. कशाची क्वालिटी आणि कशाचं सर्कल..!’ डेमिंगच्या तत्त्वज्ञानापासून उगम पावलेल्या कायझेन आणि क्वालिटी सर्कल या जगातील दोन अत्यंत क्रांतिकारक संकल्पनांचे आम्ही किती धिंडवडे उडवले आहेत याचा यापेक्षा सबळ पुरावा तो काय असणार? अशा घटना केवळ आपल्याकडेच घडतात असे मानायचे कारण नाही. पाश्चात्त्य देशांतदेखील अनेकदा असा विदारक अनुभव येतो.
‘स्पर्धा नको, सहकार्य हवे’ हे डेमिंगचे महत्त्वाचे सूत्र आहे. या सहकार्याच्या विचारातूनच ‘क्वालिटी सर्कल’ या संकल्पनेचा उदय झाला आहे. या लेखमालेच्या सुरुवातीला आपण ‘profound knowledge’ (सम्यक ज्ञान) या संकल्पनेचा विचार केला होता. ही संकल्पना ५० च्या दशकात उदयाला आली. त्यातून ६० च्या दशकात ‘क्वालिटी सर्कल’ या संकल्पनेचा उदय झाला. आणि त्यातूनच ७० च्या दशकात ‘कायझेन’ ही संकल्पना उत्क्रांत झाली. अधिक नेमकेपणाने सांगायचे तर १९६२ साली ‘क्वालिटी सर्कल’ ही एक चळवळ या स्वरूपात उभी राहिली. काय नेमके स्वरूप आहे या क्वालिटी सर्कलचे? अगदी थोडक्यात सांगायचे तर जेवणाची किंवा चहाची सुट्टी असते त्या फावल्या वेळात कामगार-कर्मचारी एकत्र यायचे आणि एकमेकांच्या कामाविषयी अतिशय अनौपचारिक गप्पा मारत कामातील समस्या व अडचणींविषयी देवाणघेवाण करायचे. यातूनच मग ते कामगार एकमेकांना काही उपाय सुचवायचे. आणि साहजिक त्यामुळे एकूणातच कामाचा दर्जा उंचावत जाऊन गुणवत्ता वाढायला मदत व्हायची. क्वालिटी सर्कलमध्ये यालाच काहीसे अधिकृत, औपचारिक स्वरूप दिलेले असते. जपानमध्ये ही संकल्पना उदयाला आली आणि अतिशय अल्पावधीत इतकी लोकप्रिय झाली, की पाहता पाहता केवळ औद्योगिक जगतातच नव्हे, तर सर्वच व्यवसायांत अशी सर्कल्स सुरू झाली. त्याला सुनियोजित चळवळीचे स्वरूप आले. पुढे साहजिकच हे लोण जगभर पसरले. ७० च्या दशकात आपल्याकडेसुद्धा ही संकल्पना रुजायला सुरुवात झाली.
पण मूळ गाभा समजावून न घेता केवळ एक चूष म्हणून जेव्हा कोणी अंधानुकरण करायला जातो तेव्हा घोटाळा होणारच. १९७४ साली घडलेला एक अतिशय नमुनेदार किस्सा यासंदर्भात अगदी आवर्जून सांगण्यासारखा आहे. भारतातील एक फार मोठे उद्योगपती जपानला गेले. एका अतिशय मोठय़ा जपानी उद्योगसमूहाबरोबर तांत्रिक सहकार्याचा करार करून भारतात व्यवसाय उभा करण्याची त्यांची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना होती. साहजिकच त्या जपानी उद्योगसमूहाच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांना आपल्या औद्योगिक साम्राज्याची समग्र माहिती सादर करायची होती. त्यांचे भाषण सुरू झाले. समोर बसलेल्या मान्यवर जपानी मंडळींना प्रभावित करण्याकरिता त्या उद्योगपतींनी मोठय़ा अभिमानाने सांगितले की, ‘‘आम्हीदेखील आमच्या कारखान्यात तुमच्यासारखीच क्वालिटी सर्कलची योजना राबवतो. गुणवत्ता वाढावी याविषयी आम्ही विशेष दक्ष असतो. याकरिता स्वतंत्र क्वालिटी कंट्रोल विभागदेखील आहे. आणि आमच्या क्वालिटी कंट्रोल विभागात थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ३०० माणसे काम करतात.’’ इतके बोलून आपल्या या उद्योगपती महाशयांनी समोरच्या सभेवर एक कटाक्ष टाकला. टाळ्यांचा कडकडाटात कधी सुरू होतो याची ते वाट पाहू लागले. पण झाले भलतेच! समोर बसलेल्या प्रत्येक जपानी माणसाच्या चेहऱ्यावर भयचकीत झाल्याचे भाव लख्ख दिसत होते. यांना काही कळेना. न राहवून त्यांनी विचारणा केली. भाषेच्या अडचणीमुळे आपला मुद्दा श्रोत्यांना नीट समजला नाही की काय? अखेर एक जपानी अधिकारी उठला आणि त्याने स्पष्टपणे विचारले, ‘‘तुमची क्वालिटी इतकी खराब आहे का, की क्वालिटी कंट्रोल विभागात ३०० माणसे ठेवायची वेळ यावी? तुम्हीदेखील क्वालिटी सर्कलची योजना राबविता असे म्हटले आहे. याच क्वालिटी सर्कलच्या माध्यमातून आम्ही आमच्या कामगारांची गुणवत्ता इतकी विकसित केली आहे, की आम्हाला क्वालिटी कंट्रोल विभागात केवळ एक कर्मचारी पुरतो. सगळे सुरळीत चालू आहे असा अहवाल वरिष्ठांना देणे, इतकेच काम त्याला असते.’’
ही घटना इथेच संपत नाही. कळस पुढेच आहे. यावर आपले उद्योगपती महाशय म्हणाले- ‘‘अहो, हे तुमच्या कामगारांच्या बाबतीत ठीक आहे. आमचे कामगार म्हणजे निव्वळ दगड आहेत दगड! आम्हाला तुमच्या कामगारांसारखे कामगार हवेत. म्हणून तर करार करायला मी इथे आलो आहे ना!’’ त्या जपानी अधिकाऱ्याला राहवले नाही. त्याने स्पष्टपणे बजावले- ‘‘मी खात्रीने सांगतो- तुमचे कामगार दगड नाहीत. तुम्ही त्यांना दगड बनवत आहात. कारण तुमच्यासाठी कामगार म्हणजे केवळ राबणारे दोन हात आहेत. पण त्या कामगाराला आपल्या दोन हातांच्या थोडासा वर एक मेंदूदेखील आहे. हा मेंदू तो उत्तम प्रकारे वापरू शकतो, हे मान्य करायची तुमची तयारी नाही.’’
जपानला अनेकदा जाऊनदेखील हे उद्योगपती नेमके काय शिकले कोण जाणे? ‘स्पर्धा नको- सहकार्य हवे’ या विचारसरणीतून उदय झाला क्वालिटी सर्कल्सचा! या उद्योजकाने आपल्या देशभर पसरलेल्या औद्योगिक साम्राज्यात क्वालिटी सर्कलची योजना राबविली आहे. पण त्यांना स्वत:ला ही योजना नेमकी किती समजली आहे, याबाबत शंकाच आहे. कारण आज २०१२ सालीदेखील त्यांच्या उद्योगसमूहात दरवर्षी सवरेत्कृष्ट क्वालिटी सर्कलची स्पर्धा घेतली जाते.
विसंगतीतून विनोद निर्माण होतो म्हणतात तो हा असा!    
lokrang@expressindia.com