सकाळी-सकाळी राज ठाकरेंचा निरोप आला, ‘बाळासाहेबांची प्रकृती गंभीर आहे’, त्यांच्या या एका निरोपाबरोबर पायाखालची माती सरकली, काळजात चर्र् झाले, डोळ्यांपुढे अंधारी आली..पुन्हा सावरून सावध होईपर्यंत महाराष्ट्र धर्म जागवणाऱ्या, जतन करणाऱ्या या वादळी व्यक्तिमत्त्वाचा एक मोठा आलेखच डोळ्यांपुढे उभा राहिला.
खरेतर पुरंदरे-ठाकरे संबंध आमच्या वडिलांपासूनचे. प्रबोधनकारांचा आणि माझ्या वडिलांचा स्नेह होता. यातूनच पुढे बाळासाहेबांची ओळख झाली. नंतर १९५६ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या निमित्ताने आम्ही दोघे पहिल्यांदा एकत्र आलो. त्या चळवळीत जोडला गेलेला हा बंध पुढे अधिकाधिक दृढ होत तो ऋणानुबंधात कधी बांधला गेला हे कुणालाच कळले नाही. आमची ओळख जरी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून झाली असली, तरी मैत्रीचे धागे कलेच्या प्रांतातून जुळले. त्या काळी बाळासाहेबांची व्यंगचित्रे सर्वत्र गाजत होती. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि क्रीडाविषयांवरील या व्यंगचित्रांतून बाळासाहेबांच्या ‘फटकाऱ्यां’चा आसूड दररोज उमटत होता. त्या-त्या विषयांतील घटनांचे यानिमित्ताने ‘मार्मिक’ निरिक्षण आणि परीक्षण होत असे. अबोल शब्दात रेखांनी काढलेले हे एकेक ठाकरी भाषेतील अग्रलेख होते. अशा या व्यंगचित्रांसाठी अनेकदा ऐतिहासिक संदर्भाची गरज लागे, त्या वेळी बाळासाहेबांचा दूरध्वनी आमच्याकडे खणखणत असे. या प्रत्येक चर्चेतून मग त्यांच्यातील पत्रकार, लेखक, कलाकार, राजकीय अभ्यासक, इतिहासकार लक्षात येई. त्यांच्या या फटकाऱ्यांमधून काहींच्या पाठीवर थाप पडली तर काहींच्या वाटय़ाला वळही आले. या फटक्यांमधून अत्रेंपासून आम्ही स्वत:ही सुटलो नाही.
एक छायाचित्र हजार शब्दांची माहिती देते असे म्हणतात. पण बाळासाहेबांचे एखादे व्यंगचित्र तर सारी घटना, प्रसंगच लोकांपुढे उभे करत. मला अनेकदा वाटते, त्यांच्यातील कलाकाराने एका व्यंगचित्रकाराला जन्म दिला, तर या व्यंगचित्रातून पुढे एक मार्मिक-फर्डा वक्ता जन्माला आला. रोखठोक, सडेतोडपणा हे त्यांच्या व्यंगचित्रांचे लक्षण होते. ही चित्रे सभ्यतेची आलवणे नेसलेल्या ढोंगी पत्रकारितेला झेपणारी नव्हती, ती समाजातल्या संतप्त पण अबोल असणाऱ्या असंख्य वाचकांना मात्र जवळची वाटत होती.
व्यंगचित्रांच्या माध्यमातून आमचा हा संवाद हळूहळू इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन विषयांकडे वळू लागला. आम्हा दोघांमधील हा एक समान धागा. या दोन्ही विषयांचे बाळासाहेब निस्सीम भक्त होते. पण त्यांची ही भक्ती डोळस होती. खरेतर यामागे त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याच संस्कारांचाच मोठा वाटा होता. प्रबोधनकार स्वत: एक मोठे इतिहासकार होते. त्यामुळे बाळासाहेबांची अगदी लहान वयात या विषयाकडे पाहण्याची दृष्टी तयार झाली. त्यांच्या या स्वच्छ दृष्टीमुळेच पुढे त्यांच्या प्रत्येक कार्यात ‘शिवधर्म’ डोकवायला लागाला. छत्रपती शिवरायांचे राष्ट्रनिर्माण, त्यांनी जनतेत निर्माण केलेले राष्ट्रप्रेम, जागवलेली महाराष्ट्र धर्माची अस्मिता..हे सारे सारे त्यांना आकर्षित करत गेले आणि त्यातूनच पुढे त्यांच्या विचारांची सारी बैठक या शिवतत्त्वज्ञानावर आधारत गेली. मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, मराठी भाषेचा लढा किंवा मुंबईच्या अस्तित्वाचा संघर्ष या प्रत्येक ठिकाणी त्यांची ही लढाई छत्रपती शिवरायांच्या त्या मार्गानेच सुरू राहिली. यात अनेक ठिकाणी त्यांना यश आले, तरी ‘बेळगाव’ महाराष्ट्रापासून दुरावल्याचे दु:ख त्यांना अखेपर्यंत बोचत राहिले.
बाळासाहेबांच्या व्यक्तित्वात मुळात कायम एक कलाकार दडलेला. १९७४ साली छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक त्रिशताब्दी सोहळा वर्षांनिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर एक मोठी शिवसृष्टी उभारण्याचे ठरले होते. ही योजना बाळासाहेबांच्या कानावर घालताच त्यांनी सहकार्याचा हात तर पुढे केलाच पण त्यात ते स्वत: सहभागी झाले. या साऱ्या शिवसृष्टीचा ‘प्लॅन’ बाळासाहेबांनी तयार केला हे आज कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही. तो किल्ल्याचा आकार, प्रवेशद्वार, ते आई भवानी मातेचे मंदिर हे सारे त्यांच्या कला-कल्पनेतून साकारले. ती शिवसृष्टी पाहायला ते रोज येत, वेगवेगळ्या सूचना करत. पुढे मुंबईतील अनेक दिवस हजारो लोक ही शिवसृष्टी येऊन पाहत, न्याहाळत होते. तिचे कौतुक करत होते. पण या साऱ्यांमागे बाळासाहेबांचे मोठे योगदान होते. गंमत अशी, की शेवटी हा सोहळा झाल्यावर या कामाची पावती म्हणून त्यांनी केवळ या शिवसृष्टीतील ती भवानी देवीची मूर्ती मागवून घेतली. ती आजही सेनाभवनामध्ये वास करत आहे.
‘जाणता राजा’चे तर बाळासाहेबांना भारी कौतुक होते. हे महानाटय़ ज्या वेळी त्यांनी पहिल्यांदा पाहिले, त्या वेळी ते म्हणाले, ‘हे पाहण्यासाठी दोन डोळे अपुरे पडत आहेत!’ या नाटकातील ‘मेक-अप’ पासून ते वेशभूषेपर्यंत अनेक छोटय़ा-छोटय़ा गोष्टीबद्दल त्यांनी सूचना केल्या. या महानाटय़ासाठी भवानी मातेची एक मोठी मूर्ती तयार करवून घेतलेली होती. या शिल्पाकडे पाहताना ते ‘सुंदरऽऽऽ!’ असे मोठय़ाने उद्गारले, पण त्याचवेळी कलाकाराची पुस्ती जोडत म्हणाले, ‘कमरेखाली प्रमाणबद्धता थोडी कमी पडली आहे.’ ..एकाचवेळी इतिहासावर, कलाकारांवर प्रचंड प्रेम, पण ते व्यक्त करताना अभ्यासू नजरही सतत जागती ठेवलेली.
छत्रपती शिवरायांच्या चित्राबद्दल एकदा आमची चर्चा होत होती. या वेळी अनेक कलाकृती चर्चेत आल्या. पण या प्रत्येक वेळी महाराजांचे चित्र अजून अपुरे असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणत हे व्यक्तिमत्त्व कलाकारांच्या आवाक्याबाहेरचे आहे. कितीही सुंदर, पराक्रमी, तेजस्वी चित्र काढले तरी मन भरत नाही. यावर मग प्रत्यक्ष महाराजांना पाहून काढलेल्या चित्राविषयी त्यांना विचारले तर, त्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे, पण असमाधान मात्र कायमच राहते.’
बाळासाहेबांवर सर्वात मोठा आघात मीनाताईंच्या जाण्याचा झाला. खरेतर आयुष्यात तिथेच ते खूप खचले. देवावरचा त्यांचा विश्वास उडाला. आम्ही अनेकदा मातोश्रीवर भेटलो, की ते हात हातात घेऊन माँसाहेबांच्या आठवणींनी व्यथित होत.
मातोश्रीवरच्या त्यांच्या दालनात माँसाहेबांचे एक सुंदर चित्र लावलेले आहे. एकदा माझा हात धरत ते मला हे चित्र दाखवू लागले. या चित्रात माँसाहेबांचे कुंकू काहीसे विस्कटलेले होते. त्याकडे पाहत व्याकूळ झालेले बाळासाहेब म्हणाले, ‘काय सुंदर काढले, बघा..ते कंकू पाहा, कसे दाखवले..’ कलाकृतीतील एखाद्या जागेचे स्वत:शी जोडलेले हे नाते सांगतानाचे बाळासाहेब अनुभवणे मलाही जड गेले. ..काय खरे, त्यांच्यातील पती की कलाकार!
साहित्य, नाटक, चित्रपट, क्रीडा, पत्रकारिता, वक्तृत्व या साऱ्यांच प्रांतात त्यांनी भ्रमंती केली. अनेक कलांना आश्रय दिला. उत्तेजन दिले. रसिकता त्यांच्या रक्ताच्या थेंबा-थेंबात भरलेली होती. एखाद्या गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना मध्येच ते ‘स्कोअर’ काय झाला रे असे विचारत.
गेल्या अनेक वर्षांतील बाळासाहेब हे महाराष्ट्राला भेटलेले एक चांगले वक्ते आहेत. सावरकर आणि बाळासाहेब या तर ‘महाराष्ट्र धर्मा’च्या दोन जबरदस्त ‘अॅन्टीएअर क्राफ्ट गन्स’ म्हणाव्या लागतील. त्या एकदा धडाडू लागल्या, की विरोधकांच्या जन्मकुंडल्या त्यातील राहू-केतूंसह उधळल्या जात. बाळासाहेबांचे विचार अनेकदा त्या क्षणाला घणाघाती, हातोडय़ाच्या घावाप्रमाणे वाटतात, पचायला जड वाटतात. पण भविष्यात अनेकदा हेच विचार काळाचे बोल ठरले.
बाळासाहेबांच्याच प्रयत्नातून रायगडावरील छत्रपतींच्या सिंहासनाच्या जागी मेघडंबरी बसली. आंबेगावच्या शिवसृष्टीचे काम मार्गी लागले. महाराष्ट्रातील सारे गडकोट त्यांना माझ्याबरोबर पाहण्याची इच्छा होती. किमान रायगडाची यात्रा तरी घडावी असे त्यांच्या खूप मनाशी होते. यासाठी अनेकदा जाण्याचेही ठरायचे पण दरवेळी काहीतरी कारणाने तो बेत रद्द करावा लागायचा. अगदी आता गेल्या चार महिन्यांपूर्वीच त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, त्या वेळीही त्यांनी या रायगड भेटीची खंत बोलून दाखविली. आता हे शक्य नाही म्हणूनच त्यांना या वेळी रायगडाचे एक चित्र भेट दिले. यावर लगोलग खोलीत हे चित्र त्यांना कायम दिसेल असे लावण्याची त्यांनी सूचना केली.
..‘महाराष्ट्र धर्मा’ने तन-मन ओंथबलेले असे हे व्यक्तिमत्त्व!
व्यंगचित्रकार, कलाकार, पत्रकार, संपादक, वक्ता, कार्यकर्ता, संघटक, नेतृत्व, अनेक कला-कलाकारांचा आश्रयदाता, खेळ-खेळाडूंचा पाठिराखा असे हे बहुआयामी, गुणसंपन्न व्यक्तिमत्त्व! शतकात असे एखादेच व्यक्तिमत्त्व होते, महाराष्ट्राला ते लाभले!
महाराष्ट्र, मराठी भूमी, मराठी माणूस, त्याची संस्कृती, इतिहास, परंपरा अशा या महाराष्ट्र धर्मासाठी बाळासाहेब जगले. त्यांच्या जाण्याने आज हा ‘महाराष्ट्र धर्म’च पोरका झाला आहे. मराठी भाषा अबोल झाली आहे आणि मराठी मन सुन्न झाले आहे.
..माझे म्हणाल, तर माहेरवाशिणीची असते तशी माझी हक्काची, रुसण्याची, हट्ट करण्याची जागा मी हरवली आहे!
(शब्दांकन : अभिजित बेल्हेकर)
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे…
महाराष्ट्र, मराठी भूमी, मराठी माणूस, त्याची संस्कृती, इतिहास, परंपरा अशा या महाराष्ट्र धर्मासाठी बाळासाहेब जगले. त्यांच्या जाण्याने आज हा ‘महाराष्ट्र धर्म’च पोरका झाला आहे. मराठी भाषा अबोल झाली आहे आणि मराठी मन सुन्न झाले आहे.
आणखी वाचा
First published on: 18-11-2012 at 08:30 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray maharashtra religion is remained because of you babasaheb purandare