प्रशांत कुलकर्णी
prashantcartoonist@gmail.com
जगभरातले अफलातून व्यंगचित्रकार, त्यांच्या कलाकृती, त्यांनी निर्माण केलेलं हास्य, त्यांनी केलेलं राजकीय, सामाजिक किंवा जीवनविषयक भाष्य आणि त्यासंदर्भातील काही अद्भुत, मजेशीर गोष्टी कथन करणारं सदर..
मराठी राजकीय व्यंगचित्रकलेला खऱ्या अर्थानं काही अस्तित्व, स्वरूप आणि शक्ती दिली असेल तर ती व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी. वयाच्या विशीतच त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रातून राजकीय व्यंगचित्रं काढायला सुरुवात केली आणि त्यांचं नाव राजकीय व्यंगचित्रकार म्हणून देशभर गाजू लागलं. काही आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्येही त्यांची व्यंगचित्रं प्रकाशित झाली. यथावकाश बाळासाहेबांनी इंग्रजीतून मराठीमध्ये स्थिरस्थावर व्हायचं ठरवलं आणि ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्याचीही त्याच सुमारास स्थापना झालेली होती.
स्पष्ट व नेमकं राजकीय भाष्य, कुशाग्र विनोदबुद्धी, मराठी भाषेशी लीलया खेळण्याची हातोटी, हजरजबाबी स्वभाव, ब्रशच्या साहाय्यानं केलेलं लवचिक आणि जोरकस चित्रांकन आणि या सर्वावर कडी करणारी त्यांची अर्कचित्रांवरची (कॅरिकेचर्स) हुकुमत ही बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेची शक्तिस्थानं मानता येतील. याच शक्तिस्थानांमुळे त्यांनी मराठी माणसाच्या मनावर अनभिषिक्तपणे कितीतरी वर्ष राज्य केलं. सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना ओळखणं हा ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पलू मानावा लागेल; जो पुढे त्यांना राजकारणात यशस्वी होताना उपयोगी पडला. या भावनांना स्वत:च्या शब्द आणि चित्रसामर्थ्यांनं ते वेगळ्याच पातळीवर घेऊन जात. उत्तम विनोदी कल्पना, ठोस राजकीय भाष्य, चित्राची रचना, उत्तम देहबोली दाखवणारी पात्रांची व्यंगपूर्ण शरीररचना आणि विविध पात्रांचे नेमके भाव दाखवणारं कॅरिकेचिरग ही ठाकरे यांच्या राजकीय व्यंगचित्रांची वैशिष्टय़ं आहेत. ठाकरे यांचं शब्दांवरचं प्रभुत्व अचंबित करणारं आहे. मराठी भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, उपमा, उत्प्रेक्षा अलंकार यांचा उत्कृष्ट वापर करून त्यांनी व्यंगचित्रांची गुणवत्ता (खरं म्हणजे धार!) वाढवली.
बाळासाहेबांच्या स्वभावातच एक मिश्कील नकलाकार आणि विनोदकार लपला होता. समोरच्या माणसाची नक्कल करणं, गंमत करणं, टोपी उडवणं, क्वचित खिल्ली उडवणं इत्यादी प्रकार ते सहज करायचे. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या नकलांना उपस्थितांची दादही सहजी मिळायची. या त्यांच्या मिश्कील स्वभावाचं प्रतिबिंब ‘रविवारची जत्रा’मध्ये पाहता येतं. ‘मार्मिक’च्या मधल्या दोन पानांत येणारी ‘रविवारची जत्रा’ ही व्यंगचित्रमालिका म्हणजे विविध सामाजिक व राजकीय विषयांवर वेगळ्याच रंगानं, ढंगानं आणि अंगानं फुलवलेला विलक्षण व्यंगचित्रकलाप्रकार मानावा लागेल. कधी खाद्यपदार्थ, तर कधी जंगली प्राणी, कधी फळे, कधी भाज्या, कधी राशी, कधी विविध वाद्य्ो, कधी फटाके, तर कधी विविध सण यांसारख्या प्रतिमांचा वापर करून त्यांनी गमतीशीर राजकीय-सामाजिक भाष्य करणारी ‘जत्रा’ रेखाटली.
उदाहरणार्थ, एकदा राजकीय पक्षांची चिन्हं घेऊन त्यांनी ‘जत्रा’ सजवली. काँग्रेस आणि जमाते इस्लाम यांच्यातील निवडणुकीसाठीच्या वाटाघाटी- ही या चित्राची पाश्र्वभूमी. काँग्रेसचं त्यावेळेस चिन्ह होतं ‘गाय-वासरू’! चित्राला नाव दिलंय- ‘सौदा’! आणि ‘जमाते इस्लाम’वाला खाटीक हातात सुरा घेऊन गाय-वासराकडे बोट दाखवून इंदिराजींना विचारतोय, ‘किती मतांना विकाल?’ याच मालिकेत जनसंघाचे नेते नुसती पणती व वात घेऊन ‘तेल.. तेल’ असं ओरडत आहेत, तर कम्युनिस्ट पक्षाची निशाणी विळा-हातोडा याची ‘कामगारांचा गळा चिरणारा विळा’ अशी संभावना केलीय.
एकदा भोपाळमध्ये एकाने ‘इंडिकेट रेस्टॉरंट’ या नावानं हॉटेल सुरू केलं. त्यावरून सुचलेल्या खाद्यपदार्थाच्या रूपात तत्कालीन राजकारणी भेटतात. इंदिरा जिलेबी (तुकडे झालेली. म्हणजे काँग्रेस + मुस्लीम लीग + डी. एम. के.) किंवा (आंबलेला) सुब्रमण्यम डोसा किंवा (रताळे भरलेला) जगजीवनराम बटाटेवडा, इत्यादी इत्यादी. मात्र, या मालिकेत यशवंतरावांना दहीवडय़ाच्या रूपात दाखवताना ‘वडा चांगला, पण दही (म्हणजे काँग्रेस) आंबट’ अशी कॉमेंट टाकून बाळासाहेबांनी यशवंतरावांविषयी स्नेहभावच प्रकट केलेला दिसतो. पण शेवटी चित्रातला सामान्य माणूस मात्र हे सगळे पदार्थ खाऊन थुंकून टाकतोय असा धम्माल एन्ड केलाय!
एका ‘जत्रे’चा विषय होता ‘सर्कस’. त्यात चिनी आक्रमणाचा रणगाडा थोपवण्यासाठी (संरक्षणमंत्री) यशवंतराव पैलवानाच्या रूपात दाखवले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सर्कसमधल्या झुल्यावर लोंबकळत पडलेला दाखवलाय. कम्युनिस्ट डांगे विदूषकाच्या वेशात एकदा चीन आणि एकदा रशिया अशा कोलांटउडय़ा मारताना दाखवले आहेत, तर पाकिस्तानचे याह्यखान हे ‘भारत मत्री’ या सुंदरीला सुरे फेकून मारताहेत आणि अमेरिकेला म्हणताहेत, ‘काळजी करू नका, एकही खंजीर फळ्याला लागणार नाही.’ ही मालिका गमतीशीर भासत असली तरी यातल्या प्रत्येक चित्रात ठाकरे यांचं राजकीय भाष्य दिसतं.
‘काही राजकीय वादक’ या ‘जत्रे’त त्यांनी विविध वाद्यं विविध नेत्यांशी जोडून मजा आणली आहे. उदाहरणार्थ, चंद्रशेखर यांना जनता पक्षातील वाद आवरता येईनात. त्यावेळी हाताबाहेर चाललेला अॅकोर्डियन असं म्हणून त्यांची वादक म्हणून होणारी केविलवाणी अवस्था दाखवली आहे, तर राजनारायण हे स्वत:चेच ढोल बडवताना रेखाटले आहेत. त्यांच्या काही ‘जत्रा’ गंभीरही आहेत. उदाहरणार्थ, नेहरूंच्या निधनानंतरच्या ‘जत्रे’तून त्यांनी एक अत्यंत प्रभावी व्यंगचित्र काढलं. नेहरूंबद्दल ते म्हणतात, ‘नेहरूंचा अमृतमहोत्सव देशभर उत्साहात साजरा झाला असता, पण क्रूर काळाने अमृतकलश लवंडला.’ या चित्रात जमिनीवर सांडलेल्या पाण्यातून पंडितजींचं अर्कचित्र काढण्याची कल्पकता विलक्षण आहे.
देशभरात आंधळ्यांची संख्या दीड कोटी आहे अशी बातमी एकदा आली होती. त्यावर त्यांनी ‘जत्रा’ रंगवली. त्यात विविध राजकीय व्यक्तींचा राजकीय आंधळेपणा त्यांनी नेमकेपणाने दाखवला होता. उदाहरणार्थ, नेहरू आणि मेनन यांना चिनी आक्रमणाचा धोका दिसला नाही, इत्यादी. ‘प्रजासत्ताकातील राशी’ या जत्रेत त्यांनी बारा राशींना न्याय (!) दिलेला दिसतो. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे मकर ही रास. यातील ‘कर’ हा दडलेला शब्द मगरीच्या रूपाने सामान्य माणसाला कसा खायला येतोय याचं यथार्थ चित्रण त्यांनी केलंय.
‘प्रजासत्ताकाचे फायदे’ या मालिकेत त्यांनी सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून प्रजासत्ताकाकडे पाहिलं आहे. त्यात अन्नटंचाई, बेकारी, हातभट्टीची मुबलकता, घरटंचाई वगैरे विषयांना त्यांनी अगदी सहज स्पर्श केला आहे. आजही यातील अनेक चित्रं समर्पक वाटतील, यातच बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रसामर्थ्यांचं यश दडलं आहे.