डॉ. राधिका विंझे

रोहन शाळेतून आल्यावर आजोबांनी त्याला सांगितलं, ‘‘आज तुझ्यासाठी जेवणानंतर सरप्राइज खाऊ आणला आहे.’’ हे ऐकून स्वारी खूश होऊन हातपाय धुऊन लगेच जेवणाच्या टेबलाजवळ गेली. जेवता जेवता रोहन आणि आजोबांच्या गप्पा हा नेहमीचा क्रम. जेवणानंतर आजोबांनी रोहनला त्याचं आवडतं चॉकलेट आइस्क्रीम दिलं. केवढा आनंद!

आइस्क्रीम खाता खाता पुन्हा शाळेतल्या गप्पा सुरू झाल्या आणि त्यातच आइस्क्रीम वितळलं. रोहननं आजोबांना पटकन हसून सांगितलं, ‘‘आजोबा, हे आइस्क्रीम नाही, हे मिल्कशेक झालं!! स्थायू आइस्क्रीमचं रूपांतर द्रव मिल्कशेकमध्ये झालंय.’’ रोहनला पटकन त्याच्या विज्ञानाच्या पुस्तकातल्या द्रव्याचे प्रकार व त्यांचे गुणधर्म याची आठवण झाली. स्थायू, द्रव, वायू हे द्रव्याचे तीन प्रकार. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी या तीन प्रकारांत विभागता येतात. स्थायू पदार्थांमध्ये दोन कणांमधील अंतर सर्वात कमी, तर वायू पदार्थात तेच अंतर सर्वाधिक असते. स्थायू पदार्थ आकार बदलत नाहीत. द्रवपदार्थ ज्या भांड्यात ठेवू त्याचा आकार घेतात व वायू पदार्थांना आकार नसतो.

रेफ्रिजरेटरमधून आपण बर्फ बाहेर काढला की स्थायू बर्फाचे द्रव पाण्यात रूपांतर होते व तेच पाणी उकळले की त्याचे रूपांतर वायूरूपी वाफेत होते. पदार्थातील घटक सारखेच, पण त्याच्या अवस्था वेगळ्या, यामुळेच आपला निसर्ग जास्त वैविध्यपूर्ण बनतो!

Story img Loader