सई केसकर
पिता पुरोगामी असो किंवा प्रतिगामी, लग्नाचा निर्णय चुकला तर तो खूप महागात पडतो हे भारतीय स्त्रीच्या मनावर लहानपणापासून बिंबवलं जातं. खरं तर स्वत:च्या पायावर उभं राहणं आणि अर्थार्जनाच्या आड येणाऱ्या व्यवस्थांना नाकारणं हे लग्न करण्यापेक्षा आणि ते टिकवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं. पण अजूनही कुटुंब सांभाळून अर्थार्जन करण्याकडेच बहुतांश स्त्रियांचा कल दिसतो. गेल्या शतकात ‘बाळूताई धडा घे’ आणि ‘ब्राह्मणकन्या’ या दोन कादंबऱ्यांत पुरोगामी पिता असणाऱ्या दोन मुलींच्या कथा आहेत. त्या लिहून झाल्यानंतर इतक्या दशकांत समाजात मोठे बदल घडूनही या कथानकाच्या आवृत्त्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. देशातील एका राज्यात प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची भूमिका घेतली जात असताना कालहत न झालेल्या या कादंबऱ्यांवर चर्चा..
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात एक मोठीच पुरोगामी चळवळ होऊन गेली. स्त्री शिक्षण, विधवा विवाह, हिंदू लग्न कायद्यातल्या सुधारणा, बालविवाहावर बंदी असे अनेक सुधारकी बदल महाराष्ट्रानं बघितले. हे सगळे बदल साधारण एकाच वेळी होत असल्यानं ते मान्य करता करता सगळ्यांचीच दमछाक होत असावी. स्त्री शिक्षण आणि हिंदू लग्नव्यवस्था या दोन मुद्दय़ांकडे जरा निरखून बघितलं, तर स्त्री शिक्षणामुळे हिंदू लग्नव्यवस्था आणि परिणामी कुटुंबव्यवस्था धोक्यात आली आहे असा एक सार्वत्रिक समज झाला होता. हा समज आजही टिकून आहे आणि त्याचबरोबर हिंदू धर्मात जातीत लग्न करायची प्रथाही तितकीच टिकून आहे! या संदर्भात, इंदिरा सहस्रबुद्धेंची ‘बाळूताई धडा घे’ आणि श्री. व्यं केतकर यांची ‘ब्राह्मणकन्या’ (इंग्रजी अनुवाद: कालिंदी – शांता गोखले) या दोन समकालीन कादंबऱ्या वाचनीय आहेत.
इंदिरा सहस्रबुद्धे यांची ‘बाळूताई धडा घे’ ही १९३१ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी भारतीय स्त्रीवाद आणि पुरुषसत्ता यांवर भाष्य करते. सोनू नावाची (ब्राह्मण) नायिका, आपल्या लहान मुलीला – बाळूताईला – पत्रांमधून स्वत:च्या आयुष्याची कथा सांगते. बाळूताईने तिच्या कहाणीतून धडा घ्यावा हा तिचा उद्देश. या कादंबरीला विद्युत भागवतांची ७० पानी प्रस्तावना आहे.
बाबासाहेब एक यशस्वी वकील आहेत. त्यांचा पुण्यातील सदाशिवपेठेत ऐसपैस वाडा आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी- सोनू. सोनूला बाबासाहेबांनी मुलांप्रमाणेच वाढवली. बाईच्या जातीने कसं वागावं याबद्दलच्या तिच्या आईच्या अनेक पुरुषसत्ताक कल्पना (घरकाम, दागिनेसोस, साडीत वावर.. इत्यादी) धुडकावून लावत बाबासाहेबांनी सोनूला लाडाकोडात वाढवलेलं आहे. सोनू तिच्या भावांबरोबर रोज बॅडिमटन खेळते (बॅडिमटन खेळणं हे पुरोगामी असण्याचं निर्विवाद लक्षण होतं हे ज्ञान मला भारतीय सिनेमा/ कादंबऱ्यांनी दिलं आहे), तिला मैत्रिणींप्रमाणेच मित्रही असतात; ती अभ्यासात हुशार आणि तिला तिच्या शिक्षकांच्या वागणुकीतून स्त्रियांप्रति भेदभाव नुसता दिसतच नाही, तर ती तो खमकेपणाने दाखवूनही देते. अशी सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य असलेली मुलगी मग एका गरीब (ब्राह्मणच, पण गरीब) मुलाच्या प्रेमात पडते. आपले वडील आपल्याला कधीच नाही म्हणणार नाहीत या भाबडय़ा समजात ती वावरते. आणि अर्थातच, ही घटना बाबासाहेबांच्या पुरोगामीपणाचा उंबरा ठरते- जो त्यांना ओलांडता येत नाही.
बाबासाहेबांना अचानक घराण्याची अब्रू, त्या गरीब मुलाचं घराणं अशा अनेक गोष्टींचा साक्षात्कार होऊन ते ताडकन् मागे फिरतात आणि आपण आपल्या मुलीला शिक्षण आणि स्वातंत्र्य दिल्यामुळेच तिनं असे गुण उधळले म्हणून शोक आणि पश्चात्ताप करू लागतात. घाईघाईत मग सोनूचं लग्न एका अतिश्रीमंत (ब्राह्मण) बिजवराशी लावून देतात. लग्नानंतर सोनू मलबार हिलवरील एका आलिशान बंगल्यात राहायला जाते. त्या बंगल्याचं वर्णन वाचून, एक वाचक म्हणून मलाही सोनूने विशुद्ध प्रेमाचा नाद सोडून द्यावा असं प्रामाणिकपणे वाटलं होतं; आणि कदाचित खऱ्या आयुष्यात होतं तसं पुढे ‘हॅप्पी कॉम्प्रोमाइझ’ होईल अशी आशा वाटली होती. पण सोनू काही माझ्यासारखी दांभिक आणि भांडवलशाहीच्या आहारी गेलेली नायिका बनलेली दिसत नाही!
बेफाम ऐश्वर्यापुढेही सोनूचं ठाम असणं, आणि नुसतंच भास्करच्या, म्हणजेच त्या गरीब ब्राह्मण तरुणावरच्या, प्रेमाबद्दल अडून राहणं नव्हे, तर ज्या पुरुषाबद्दल आपल्या मनात प्रेम नाही त्या पुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेवणं वेश्येसमान वागणं आहे असं न कचरता बोलून दाखवणं, हे या कादंबरीचं वेगळेपण. अनेक दिवस पतीला दूर ठेवून शेवटी एका मानसिक द्वंद्वाच्या क्षणी ती तिचा हट्ट सोडायचा ठरवते खरी, पण पुढे फासे असे काही पडतात की गरोदर अवस्थेत तिला पुन्हा बाबासाहेबांच्या घरी परत यावं लागतं. पुढे बाळूताईचा जन्म होतो.
त्या काळातील मनोरंजक कादंबरीचा हा एक उत्तम नमुना आहे. तरीही, वाचकाला एकदम ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ प्रणयाच्या टिपेवर नेऊन, इंदिराबाई मध्येच पुरुषसत्तेच्या थोबाडीत मारतात आणि पुन्हा आपल्याला कादंबरीत घेऊन जातात, हे विशेष आहे. त्या काळची हिंदू लग्नव्यवस्था किती जाचक होती याबद्दल या कादंबरीत अनेक ठिकाणी भाष्य आहे. लग्नातून सुटका करून घ्यायचा, म्हणजेच कायदेशीर काडीमोड घेण्याचा मार्गही तथाकथित उच्चजातीय स्त्रियांना बंदच असायचा असं अनेक ठिकाणी वाचायला मिळतं. अर्थात, याला तथाकथित खालच्या जातींमध्ये अपवाद होते हे प्रस्तावनेमुळे लक्षात येतं.
प्रस्तावनेतल्या विश्लेषणामुळे लक्षात येतं की, कादंबरीतली सोनूची गोष्ट म्हणजे त्या काळातील एका सर्वतोपरी लाभसंपन्न अशा बाईची आहे. कादंबरीतील सगळीच पात्रं ब्राह्मण असल्याने ही गोष्ट वरवर ‘गरिबी विरुद्ध श्रीमंती’ची वाटते. आपल्या मुलीसाठी साधारण तिच्याच वयाचा, तिला लहानपणापासून ओळखणारा, बुद्धिमान, उच्चशिक्षित, ब्राह्मण परंतु गरीब पुरुष निवडण्यापेक्षा तिला अजिबात न ओळखणारा, चाळिशीचा, बिजवर, ब्राह्मण पण अतिश्रीमंत पुरुष योग्य- हा विचार व्यावहारिक लाभाचा आहे असं काही जण म्हणतील.
या कादंबरीची नायिका मात्र निर्विवादपणे सोनू आहे. आपल्याच पुरोगामीपणाच्या हौसेपोटी शिकवलेली, लाडावलेली मुलगी जेव्हा ते सगळेच संस्कार एकदम सीरियसली घेते, आणि बापाचं काहीच ऐकत नाही तेव्हा बापाची सगळी शस्त्रं क्षणार्धात गळून पडतात आणि तो लगेच प्रस्थापित वर्णव्यवस्थेच्या आणि पुरुषसत्तेच्या कुशीत शिरतो. प्रेमभंग झालेला प्रियकर काही वर्ष नापास होऊन मग एकदम डॉक्टर होतो आणि परदेशात दवाखाना थाटतो. बिजवर नवरा कधी गोडीत येऊन, कधी धुसफुस करून, त्याच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून, नायिकेचं मन वळवायचा प्रयत्न करतो, आणि तिनं शिक्षणाचा हट्ट सोडल्यावर तिचं अभिनंदन करतो. प्रेमभंग झालेल्या पुरुषाला त्यातून बाहेर येण्यासाठी काहीही करता येतं; अगदी समुद्र ओलांडून परक्या देशांत राहता येतं. तो जिथे जिथे जातो, तिथे तिथे लग्नाळू मुलींचे बाप त्याच्या गळ्यात पडतात. सोनूला विसरण्यासाठी दुसरं महायुद्धही त्याच्या आयतंच पुढय़ात येतं. युद्धात घायाळ झालेल्या सैनिकांची सुश्रूषा केल्याने आपल्याला सोनूचा विसर पडेल म्हणून तो युद्धात सामील होतो. पण प्रेमभंग झालेल्या आणि मनाविरुद्ध लग्न लावून दिलेल्या स्त्रीची घुसमट मात्र चार िभतींच्या बाहेर जाऊ शकत नाही. तिची घुसमट केवळ तिचं प्रेम उत्कट आणि आदर्शवादी आहे म्हणून होत नसून, तिला तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही म्हणून होत असते. कादंबरी वर्णव्यवस्थेच्या एकाच स्तरात सीमित आहे. मात्र, ती दोन वेगळ्या आर्थिक वर्गामधला संघर्ष दाखवते. साहजिकच कादंबरी वाचून झाल्यावर मनात असा प्रश्न आला की सोनू श्रीमंत परजातीयाच्या प्रेमात पडली असती तर काय झालं असतं? आजच्या काळात, माझ्या आजूबाजूला बघितलं तर असं लक्षात येतं की, एका सामाजिक आणि आर्थिक स्तरात आता जात आणि आर्थिक वर्ग यांची अदलाबदल करता येईल इतके ते ‘फ्लुइड’ झाले आहेत. पण जात आणि वर्ग हे अदलाबदल करण्याजोगे वाटणं हे फक्त समाजातील सत्तास्थानं बदलल्याचं लक्षण आहे. मुलीला त्या वर्गाबाहेरच्या पुरुषाशी लग्न करायला विरोध होत असेल, तर आजच्या स्त्रीमध्ये आणि सोनूमध्ये काहीच फरक नाही. पण ही माझ्या मर्यादित कक्षेतून दिसणारी उदाहरणं आहेत आणि इंदिराबाईंनी कादंबरी लिहिली तो काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये अनेक दशकं उलटून गेली आहेत.
माझ्या प्रश्नाचं उत्तर मला डॉ. श्री. व्यं. केतकर यांच्या ब्राह्मणकन्या या कादंबरीत मिळालं. शांता गोखलेंनी ‘कालिंदी’ या नावानं त्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे जो मी वाचला. १९३० साली प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीवर तत्कालीन समीक्षकांनी भरपूर टीका केली. इंग्रजी अनुवादाच्या प्रस्तावनेत शांताबाई केतकरांच्या शैलीचं आणि कादंबरीच्या काही कमकुवत बाजूंचं टीकात्मक परीक्षण करतात. त्या काळातल्या युरोपीय प्रेमकादंबऱ्यांचं अनुकरण करणाऱ्या मराठी कादंबऱ्यांत ‘ब्राह्मणकन्या’ मधली भाषा आणि मुद्दे बसत नव्हते. केतकरांच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक परिस्थितीमुळे, एखाद्या कुशल संपादकांकडून ती कादंबरी संपादित करून घेणं त्यांना जमलं नाही. तरीही, शांताबाई सांगतात, ती अनेक कारणांनी त्यांना महत्त्वाची वाटते म्हणून त्यांनी तिचा अनुवाद केला.
या कादंबरीतला बाप, अप्पासाहेब डग्गे, सोनूच्या बापासारखाच पुरोगामी विचारांचा आहे. डॉ. चिंतोपंत नावाच्या ब्राह्मणाने ‘ठेवलेल्या’ खालच्या जातीतल्या मंजुळाबाईच्या मुलीशी, ब्राह्मण अप्पासाहेब डग्गे लग्न करतात. असा उदारमतवादीपणा कृतीत आणल्याबद्दल त्यांचं पुरोगामी समाजात कौतुक होतं. त्यांना एक मुलगा (सत्यव्रत) आणि दोन मुली (उषा आणि कालिंदी) होतात. आपल्या वडिलांचा उदारमतवाद हा केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी होता हे त्यांच्या मुलांच्या लक्षात येऊ लागतं. लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोनं मंजुळाबाईंना भेटू नये यासाठी अप्पासाहेब प्रयत्न करतात आणि तसं घडवूनही आणतात. कालिंदीला एका खालच्या जातीतल्या सुशिक्षित, तडफदार मुलाकडून मागणी येते तेव्हा तो ब्राह्मण नाही म्हणून ते त्याला नकार देतात. परिणामी, आपल्या बापाच्या पुरोगामीपणाचं अप्रूप न वाटून घेता, कालिंदी त्याला पुरती ओळखून असते. तिच्या आईनं जरी ब्राह्मणाशी लग्न केलं असलं, तरी ब्राह्मण समाज तिला आपलंसं करत नाही हे कालिंदीच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे स्वत:कडे, कुठलीच जात सांगू न शकणाऱ्या, समाजानं बहिष्कार घातलेल्या व्यक्तीप्रमाणे ती बघत असते. सतत उच्च आणि नीच जातींमधल्या उंबऱ्यावर घुटमळल्यानं, कालिंदीचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा कडवट झाला असला, तरी आप्तेष्टांच्याच भेदभावानं कालिंदीला कधी धक्का बसत नाही. शिवाय घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यानं श्रीमंत बापाची मुलगी म्हणूनही कालिंदीला कुणा ब्राह्मणाची मागणी येणार नाही याची खात्री असते. बीएचं शिक्षण अर्धवट टाकून, घरातून पळून जाऊन, ती शिवशरणप्पा नावाच्या एका श्रीमंत, विवाहित लिंगायत वाण्याबरोबर त्याची ठेवलेली बाई म्हणून नांदू लागते. या गोष्टीचा धक्का मात्र तिच्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच बसतो. तिच्याशी सामाजिक परिस्थितींवर हिरिरीनं वाद घालणाऱ्या तिच्या लाडक्या भावालाही तिचं हे वागणं अनाकलनीय वाटतं.
आंतरजातीय लग्न केल्यामुळे समाजाकडून होणारी निर्भर्त्सना आणि अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांचं पुन्हा उच्चवर्णीयांत रुजणं किती अवघड आहे हे जवळून बघितल्यामुळे कालिंदीला लग्नाचा काही ऐहिक किंवा सामाजिक फायदा नाही असं वाटायला लागतं. आपण लग्नासाठी पुरुषाबरोबर राहायचा निर्णय न घेता, प्रेमाखातर घेतला आहे असा विचार करून तिला तिची भूमिका अधिक उदात्त वाटते. सुरुवातीला शिवशरणप्पा तिला मोठय़ा थाटात ठेवतो. तिच्या बाळंतपणासाठी युरोपियन नर्स घेऊन येतो. तिला एका मोठय़ा बंगल्यात ऐशोआरामात ठेवतो. तिची श्रीमंती पाहून, तिला एकदा चोरून भेटायला आलेल्या तिच्या आईलाही मत्सर वाटतो, इतकं ऐहिक सुख ती उपभोगत असते.
इंदिराबाईंची सोनू तिच्या प्रियकराबरोबर जे सहजीवन अनुभवत नाही, आणि ते कदाचित अप्राप्य असल्यानं तिला रम्य वाटतं, ते केतकरांची कालिंदी अनुभवते. त्यातून लग्नाप्रमाणेच, प्रेमाचाही फोलपणा तिच्या हळूहळू लक्षात येतो. प्रेम ही काही चिरंतन भावना नाही आणि आपण निवडलेला जोडीदार आपल्याला हवी तशी बौद्धिक, वैचारिक साथ देऊ शकत नाही हे कालिंदीच्या लक्षात येऊ लागतं. त्याचप्रमाणे ‘ठेवलेल्या बाईमुळे’ शिवशरणप्पालाही समाजात अवहेलना सहन करावी लागते. तसंच, त्याच्या जातीतल्या व्यापाऱ्यांकडून बहिष्कृत व्हावं लागतं. याचा परिणाम असा होतो की कालिंदीला लवकरच दारिद्य्राचे दिवस येतात. पदरी एक मूल, अर्धवट सोडलेलं शिक्षण आणि प्रियकराचा आपल्यात कमी होत जाणारा रस.. या सगळ्याचे एकत्रित परिणाम काय होतील हे ओळखल्यानंतर कालिंदीसमोर तीनच मार्ग उरतात- स्वत:ला आणि लहान मुलाला संपवणं, तिला मुलासकट सांभाळायला तयार असलेला दुसरा पुरुष शोधणं किंवा स्वत:च्या पायावर उभं राहणं. कालिंदीचा मार्ग कितीही खडतर असला तरी तिच्या अर्थार्जन करायच्या निर्णयामुळं तिच्या गोष्टीचा शेवट सुखी आहे. सोनूच्या बाबतीत मात्र असं घडत नाही. पुरुषसत्तेच्या पिंजऱ्यात घुसमट होऊन सोनूचा करुण अंत होतो.
या दोन्ही कादंबऱ्यांतला एक सामान दुवा कादंबरीतल्या पित्याचा पुरोगामीपणाचा आहे. स्वत: उदारमतवादी होऊन खालच्या जातीतल्या बाईशी लग्न करणारे अप्पासाहेब डग्गे मुलीच्या बाबतीत मात्र असा उदारमतवादीपणा दाखवू शकत नाहीत. आणि सोनूला लाडाकोडात वाढवणारे बाबासाहेब, ती त्यांच्याकडे नोकरी करणाऱ्या कारकुनाच्या मुलाच्या प्रेमात पडल्यावर थेट तिच्या शिक्षणालाच दोष देऊ लागतात! आपल्या पुरोगामीपणाची लक्ष्मणरेषा घरातल्या मुलीच्या प्रेमप्रकरणातच आखली असेल तर ते कसलं पुरोगामीपण आणि कसला स्त्रीवाद? एका स्वतंत्र, सज्ञान व्यक्तीला तिला हव्या त्या स्वतंत्र सज्ञान व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार आहे हे मान्य करणं, इतकीच पुरोगामीपणाची व्याख्या इथे पुरेशी आहे. पण हे दोन्ही बाप त्या निकषावर पूर्णपणे नापास होतात.
दुसरीकडे, आपल्याला लग्नाचं बंधन झुगारून आपल्या प्रियकराबरोबर पळून जाता येऊ शकतं हा विचारच करू न शकणारी सोनू खचून मरून जाते. आणि आयुष्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या पुरुषांना जोखून त्यांच्या मान्यतेला अजिबात महत्त्व न देणारी, त्या काळात (किंवा अत्ताच्याही!) काहीसा अनैतिक मानला जाणारा निर्णय घेणारी कालिंदी मात्र स्वत:साठी आणि स्वत:च्या मुलासाठी चांगलं आयुष्य उभं करू शकते. कालिंदीचा तथाकथित निर्ढावलेपणाच शेवटी तिच्या उपयोगी पडतो. भारतात अजूनही, अशा काहीशा बेदरकार स्त्रियांकडे भयमिश्रित संतापानं बघितलं जातं. जातीत लग्न करण्याची प्रथा अजूनही यशस्वीपणे टिकून आहे. आंतरजातीय लग्नांचं प्रमाण फक्त ५ टक्के इतकं आहे. तरीही आपल्याला केरळ स्टोरीसारखा सिनेमा भयभीत करून जातो. जातीबाहेर लग्न करणाऱ्या हिंदू जोडप्यांना ज्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात- अगदी खून करण्यापासून ते ‘तू आम्हाला मेलास/ मेलीस’ या मध्यमवर्गीय मानसिक छळापर्यंत- त्या बघता, आंतरधर्मीय विवाहाचं संकट अजून काही पिढय़ा लांब असावं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आणि १९३०-३१ सालच्या या दोन कादंबऱ्या बघता, मागच्या नव्वद वर्षांमध्ये परिस्थिती फार बदलली आहे असं वाटत नाही. हल्लीच पंतप्रधानांच्या राज्यातल्या एका समाजानं, प्रेमविवाह करण्याला आईवडिलांची अनुमती अनिवार्य करावी असा प्रस्ताव सरकारकडे मांडला आहे.
बाबासाहेब आणि अप्पासाहेबांसारखे ‘अटी शर्ती’ घालणारे पुरोगामी बाप आजही बघायला मिळतात. आणि त्यांच्या अटी-शर्ती पाळून त्यांना पसंत पडेल अशाच मुलाशी लग्न करणाऱ्या (किंवा अशाच मुलाच्या प्रेमात पडणाऱ्या) मुलीही बघायला मिळतात. स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं तर कुटुंबव्यवस्था धोक्यात येईल (आणि ती येईलच आणि यावीच!) या भीतीपायी आजही बाबासाहेबांच्या आणि अप्पासाहेबांच्या निर्णयाचं समर्थनच होताना दिसतं. इतक्या वर्षांनीही या दोन कादंबऱ्यांमधील कथानकाच्या पुनरावृत्त्या समाजात घडतात, हे चांगले की वाईट, याचा विचार आज अधिक व्हायला हवा. saeekeskar@gmail.com