मध्य प्रदेशमधल्या जबलपूर स्थानकावर उतरलो. तिथून पुढे १६५ कि. मी.वर बांधवगड! बांधवगड हे उमरिया जिल्ह्य़ातील सर्वात मोठे नॅशनल पार्क. या पार्कमध्ये जंगलसफारी आणि पक्षीनिरीक्षणासाठी चाललो होतो. सोबत मुलगा, त्याचे मित्र-मैत्रिणी. सारे झुऑलॉजी, बायो-टेक्, केमिस्ट्री इ. शाखांचे; पण वन्यजीवनाबद्दल आस्था असणारे! साऱ्यांकडे मोठय़ा लेन्स असणारे एसएलआर कॅमेरे. मग काय, पशुपक्षी, प्राणी, प्राण्यांचे आवाज, कॉल, इ.वर त्यांची चर्चा रंगात! या तरुणाईत ‘ज्येष्ठ’ काय ते आम्हीच.. मी आणि माझी पत्नी!
मध्य प्रदेश म्हणजे माथ्यावर तळपता सूर्य आणि कमालीचा उकाडा. त्यात मे महिन्याचा शेवट आणि जूनची सुरुवात. अशा प्रचंड उकाडय़ातली सफर. रेल्वे-प्रवास वातानुकूलीत असल्याने बाहेरचे तापमान जाणवले नव्हते. पण जबलपूर ते बांधवगड या चार-साडेचार तासांचा उन्हातला प्रवास मात्र ‘मुंबई’ बरी म्हणत होता. उन्हाच्या झळा सोसत ‘नेचर हेरिटेज’ या जंगल रिसॉर्टवर पोहोचलो. तिथं वातानुकूलित खोल्यांची सोय असल्याने हायसे वाटले. उद्याच्या सफारीच्या सूचना सर्वाना रात्री जेवण झाल्यावर मेसमध्येच दिल्या गेल्या. पहाटे चारला ‘वेकअप्’ कॉल. साडेचार वाजता मेसमध्ये चहासाठी! आणि बरोबर पाच वाजता जंगल सफारीसाठी फॉरेस्ट ऑफिसच्या गेटवर सगळे हजर! जंगलचा पेहेराव, डोक्यावर हॅट, सोबत दुर्बीण, कॅमेऱ्यासह सज्ज.
एकेका जीपमध्ये सहाजण याप्रमाणे चार जीप सफारीला सज्ज झाल्या. सोबत वनविभागाचा गाइड. त्याला जंगलातील रस्ते, पशुपक्ष्यांचा अधिवास, पक्ष्यांची नावे, प्राण्यांचे प्रकार नावानिशी तोंडपाठ! वाघाच्या ‘पग मार्क’वरून हे ठसे सकाळचे ताजे की जुने, हेही नेमकं परिचित. सकाळी पाच ते साडेनऊ-दहापर्यंत जंगलात भटकंती. सगळे रस्ते मातीचे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी सर्वाची चौकशी आणि खात्री केल्यावर आमच्या जीप्स जंगलात शिरल्या. पहाटे साडेपाचची वेळ; तरी दिवस मोठा असल्याने चक्क उजाडलेलं. धुरळ्याचा रस्ता चिडीचिप गार. त्यावर उमटणारी सफारीची चाके. धुरळ्यावर रस्ता ओलांडणाऱ्या प्राण्यांच्या पायांचे ठसे. वेगवेगळ्या प्राण्यांचे ते ठसे निरखण्यात आणि त्यांचे फोटो काढण्यात तरुणाई दंग. एवढय़ात ‘पावशाल्लो ऽऽ पावशाल्लो’ हा परिचित आवाज ऐकला आणि चकितच झालो. पहाटेच्या त्या गार, शांत वातावरणात पावशा पक्ष्याचा आवाज थेट कोकणात घेऊन गेला. गावकुसावर ओरडणारा ‘पावशा’ आठवला.
आपल्या कोकणातला हा पक्षी हाकेच्या अंतरावर ओरडतोय म्हणजे नक्की पाऊस येणार! आकाशात काळ्यानिळ्या ढगांची गर्दी झाली होती. पावशाच्या सुरात सूर मिसळत ‘म्यॅव्होऽऽ म्यॅव्होऽऽ’ करत मोर आणि लांडोरही दिसू लागली. मोर पिसारा फुलवून नाचत होता, तर लांडोर त्याच्या आसपास फिरत होती. मुलांचे कॅमेरे त्यांना टिपत होते. पुढे पुढे जात असताना नानाविध पक्षी दिसत. त्यांची इंग्लिश नावं मुलं उच्चारीत. एकजण ती ‘नोट’ करी. जीप मागे घेत पुन्हा खात्री करत. मी मात्र बेहोश होऊन ओरडणाऱ्या ‘पावशा’ला पाहत होतो. त्याच्या आवाजावरून मुलांनी सांगितलं, हा ‘पावशा’ म्हणजे ‘पाईड कुकू.’ मग त्यांनी पाहिलेल्या वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांची नावे सांगितली. ती पक्ष्यांची नावं ऐकून मी अचंबितच झालो. अगदी जमिनीवर सरपटत चालणारे वा झाडाच्या ढोलीत असणारे छोटे पक्षीही त्यांनी टिपले होते. मुलांनी जरी त्यांची इंग्लिश नावं सांगितली तरी मी त्यांना बुलबुल, चातक, मोर, लांडोर, नवरंग, शिंपी, हळद्या, नीळकंठ, तांबट, गरूड, वेडा राघू, पोपट, चिमण्या, टिटवी, कौडा, भारद्वाज, शिकरा, कोतवाल ही त्यांची भारतीय नावं सांगितली. नकळत त्या पक्ष्यांबद्दल आकर्षण वाटू लागलं. ‘एशियन पॅरेडाईज फ्लायकॅचर’  म्हणजे ‘स्वर्गीय नर्तक पक्षी’ किंवा ‘यलो फुटेड ग्रीन पिजन’ म्हणजे ‘हरियाल’ ऐकून मौज वाटली. पक्षीनिरीक्षणासाठी थांबत थांबत आमची जंगलसफारी सुरू होती.
एवढय़ात एका बाजूला हरण, सांबर, गौर दिसले. पाणवठय़ाचा अंदाज घेत त्या दिशेने ते जात होते. वाघाचं दर्शन झालं नव्हतं; परंतु हरणाचा वेगळा ‘कॉल’ आला की गाइड त्या दिशेला कान लावून ‘टायगर ओ साइड रहेगा’ म्हणत पुढे जाई. मुलं मात्र पशुपक्ष्यांचे फोटो काढण्यात, त्यांच्या नोंदी करण्यातच दंग होती. आम्ही ज्या मार्गावर होतो त्या मार्गास ‘मगधी’ म्हणत. मगधी, खिचली, तला, शिवसैया असे वेगवेगळे ‘रूट’ होते. पैकी ‘तला’ या मार्गावर हमखास वाघ दिसतो. ‘बमेरा’ हा जंगलचा राजा समजला जाणारा वाघ मुलांना पाहायचा होता. पण तो मार्ग दुसऱ्या दिवशीच्या सफारीचा होता.
इतक्यात पावशालो पक्ष्याचे ‘पेर्ते व्हा.. पेर्ते व्हा’ आणि मोराचे ‘म्यॅव्हो म्यॅव्होऽऽ’ ऐकत असतानाच जंगलात पावसाळी वातावरण निर्माण झाले. सूर्योदय अजून व्हायचा होता, पण सगळी झाडं नि:शब्द आणि स्तब्ध होती. त्यांच्या शेंडय़ावर चिमण्यांचे थवे. आमची जीप एका झाडाजवळ आली आणि खुरटय़ा जाळीत वेढलेल्या वारुळातून मुंग्या बाहेर येताना दिसल्या. वाळवीचे पंख फुटलेले थवे तिथून उडताना दिसले. बिळात दडून राहिलेले सरपटणारे जीव बाहेर पडताना दिसले. पक्ष्यांचे वेगळे आवाज आणि आनंदी भरारी जणू सृजनाची पहिली चाहूल देत होती. चातकाप्रमाणेच ‘पावशा’ हा पावसाचं वर्तमान आणणारा पक्षी. ‘पेर्ते व्हा.. पेर्ते व्हा’ या त्याच्या सांगण्यावर शेतकरी पेरणी करतात. आता तो जोर करून आमच्या आसपासच ‘पेर्ते व्हा.. पेर्ते व्हा’ ओरडत होता.
ही सृजनवेळा अनुभवत सगळे सफारीस सज्ज झाले. पुन्हा चार तास जंगलात.. पशुपक्षी-प्राण्यांच्या सान्निध्यात! वातावरण पूर्णपणे बदललं होतं. उन्हाचा आता मागमूस नव्हता. आमची सफारी महामन तलावाजवळ येऊन ठेपली. तलावाजवळ एक मोठा वृक्ष होता. वृक्षावर पानं कमी अन् पक्षी जास्त! नानाविध प्रकारचे पक्षी. चिमण्या, टिटव्या, बुलबुल, सुतार, नीळकंठ, हळद्या, नवरंग, कौडा.. या छोटय़ा पक्ष्यांसोबत गरुड आणि गिधाडेदेखील होती. झाड पक्ष्यांनी भरून गेलेलं. मला पाडगांवकरांची आठवण आली. पाखरांचं झाड की झाडांची पाखरं! पाडगांवकर म्हणतात- ‘भुर्र पाखरे येतात मागोवा घेत झाडांचा.. त्यांना शोधावीच लागतात झाडे अटळ रीतीने। झाडेही शोधीत असतात पाखरांना थरारून.. एका गतिमान स्तब्धतेत, स्वत:पल्याड होऊन.. कधी शोधता शोधता पाखरांना झाडे दिसतात.. आणि शोधणाऱ्या झाडांनाही पाखरं गवसतात.. मग उरते ती केवळ भारलेली अचानकता.. पाखरांची झाडं.. आणि झाडांची पाखरं हळुवार..’
ही भारलेली अचानकता हळुवार, नि:शब्दपणे अनुभवत असतानाच समोर झाडाखाली दिसला मोर-लांडोरीचा नाच! तेवढय़ात पाणवठय़ावर आलेले हरण, सांबर आणि इतर प्राणी.. सगळे एकवटलेले एका ठिकाणी. कारण एकच : पाणी! ‘जल तिथे जीव’ हा सृष्टीचा नियमच! पाणवठय़ावरची ती पशुपक्ष्यांची सभा पाहत असतानाच पुन्हा मोराने ‘म्यॅव्होऽऽ मॅव्हो’ करत पिसारा फुलवला. पावशा पुन्हा जोराने ‘पेर्ते व्हा.. पेर्ते व्हा’ ओरडू लागला. त्याच्या गळ्यात सृजन दाटून आला होता. आभाळ एकाएकी काळंनिळं झालं. गार हवा सुटली. वाऱ्यानं झाडं हलू लागली. पक्षी उडू लागले. आणि पाठोपाठ ‘टप् टप्.. ट्प.. टप्’ घोडय़ांच्या टाचांचा आवाज करत पाऊस आलाच. धुरळा-मातीच्या रस्त्यावर तडतडा वाजू लागला. जंगलातल्या झाडांवर.. झाडांच्या शेंडय़ांवर.. फांद्यांवरच्या घरटय़ांवर अलगद कोसळू लागला. ‘पेर्ते व्हा..’चा जोर आता आसमंतात घुमू लागला. जंगलात उघडय़ा जीपमध्ये धुरळ्याच्या रस्त्यावर मातीचा आणि रानगंधाचा पहिलावहिला गंध मोठा श्वास घेत अंतरंगात साठवून घेत होतो. दोन्ही हात आभाळाकडे करत सृजनाचा तो पहिला साक्षात्कार ‘याचि देही’ अनुभवत होतो. पहिल्या पावसाची शुभ्र फुलं अंगावर झेलत होतो. जंगलाशी बोलत होतो.
..एव्हाना जंगल सोडून सफारी रिसॉर्टच्या दिशेनं निघाली होती. पण मन मात्र जंगलातच घुटमळत होतं. पाखरांचे मंजुळ स्वर, पशुपक्ष्यांचे ‘कॉल्स’, मोराचा ‘म्यॅव्होऽऽ’ आणि पावशाची ‘पेर्ते व्हा’ची साद मनात एकत्रितपणे निनादत होती..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा