येत्या १६ तारखेला १६ मे आहे, हे काय आम्हास माहीत नाही?
तरीही राहून राहून मनात असा गब्बरसिंगी सवाल येतोच, की-
कब है सोला मे?
किंवा कधी येणार वैशाख कृष्ण द्वितीया शके १९३६?
अखेर माणसाने एखाद्या गोष्टीची वाट पाहायची म्हणजे तरी किती? त्याला काही सुमार?
बोटावरची शाईसुद्धा उडून गेली आहे. राज्यात आणखी एखादी फेरी असती तर एवढय़ात दुबार मतदानसुद्धा करता आले असते. तेवढेच पवारसाहेबांच्या विनोदास जागता आले असते!
पण या निवडणूक आयोगास काही विचारसंहिताच नाही. आमचे लाडके नेते व भावी पंतप्रधान महामहीम नरेंद्र मोदी यांनी परवा निवडणूक आयोगाच्या वर्तनावर टीका केली, ती अगदी योग्यच होती बघा. या आयोगास जनता कदापि माफ नहीं करेगी! काही पोचच नाही त्यास!
पंतप्रधान झाल्याबरोबर आपण पहिले काम कोणते करणार, तर ‘अमेठीचा विकास’ अशी घोषणा नमोभाईनी केली आहे. पण आमची त्यांस शिरसाष्टांग विनंती आहे, की त्यांनी पहिल्यांदा या निवडणूक आयोगास गंगार्पणमस्तु करावे. (बाकीचे स्नूपगेटादी आयोग त्यानंतर घ्यावेत!)
बरोबरच आहे! परीक्षा आणि निकाल यात इतके अंतर का ठेवतात कोणी? यास नियोजन म्हणायचे की कुटुंबनियोजन?
जरा तरी आमादमीच्या मनाचा विचार?
लोकांचे सोडा. झालेच तर काँग्रेसच्या उमेदवारांचेही सोडा. १६ मे ही तारीख क्यालेंडरातून कोणी निरस्त केली तरी त्यांना चालेल. पण भाजपच्या कोमल कमळांचा तरी विचार करायचा ना आयोगाने! सुकून चालली ना ती वाट पाहून! कित्येक कमळांच्या तर डोळ्यांस डोळा लागेनासा झाला आहे. या कुशीवर वळले की खुर्ची. त्या कुशीवर वळले की खुची.. अशी साक्षात् बुंगावस्था झाली आहे कित्येकांची.
परवा आमचे बहिर्जी नाईक्स सांगत होते की, रामदासभाई आठवलेंनी तर आपण मंत्री झालोच आहोत, अशी सेल्फीसुद्धा काढली आहे मनातल्या मनात शंभर वेळा! अखेर किती काळ त्यांनीसुद्धा ‘अब की बार’ म्हणायचे?
तर सांगण्याचा मुद्दा असा, की नमोपला (याचे पूर्वीचे नाव भाजप!) बहुमत मिळणार, मग मोदीजी पंतप्रधान होणार, मग अच्छे दिन येणार, हे पद मिळणार, ते महामंडळ लाभणार, असे एक्लेअरी लड्डू अनेकांच्या मनात आतापासूनच फुटत आहेत. किती किती बेत आखले आहेत लोकांनी!
बरे, या मोदीलाटेचा (ज्यांना लाटेची थिअरी मान्य नाही त्यांनी येथे ‘एल-नमो इफेक्ट’ असे वाचावे!) प्रभाव असा, की असे बेत आखणाऱ्यांत केवळ नमोपच्या नेत्यांचाच नाही, तर काँग्रेसी पुढाऱ्यांचासुद्धा समावेश आहे. उदाहरणार्थ, आमचे लाडके मुख्यमंत्री बाबाजी पृथ्वीराज चव्हाण. त्यांनी म. म. नमोजींच्या पावलांवर पाऊल टाकण्याचा निर्णय (तातडीने!) घेऊन टाकला आहे. (येथे पावलांवर पाऊल म्हटले आहे. पावलांबरोबर पाऊल नव्हे. पवारसाहेब, कृपया काळजी नसावी!)
तर लोकसभा निवडणुकीतील परिस्थितीचे स्नूपिंग केल्यानंतर बाबाजींच्या ध्यानी ही बाब आली, की नमोपचे प्रचाराचे जे मॉडेल होते, त्या तुलनेत काँग्रेस खूपच कमी पडली. तशी कबुलीच बाबाजींनी दिली. वर हेही जाहीर केले की, नमोजींच्या प्रचार मॉडेलप्रमाणेच आपणही विधानसभेला जोरदार प्रचार करणार. एवढे सांगूनच बाबाजी थांबले नाहीत. त्यांनी त्याची तयारीसुद्धा सुरू केली आहे. हे ऐकल्यानंतर घरात एक क्षण थांबणे आम्हास कठीण होते. तश्शीच बस पकडून आम्ही ‘वर्षां’वर गेलो. पाहतो तर बाबाजी एका फडक्याने खुर्चीवरच्या फायली झटकून टेबलावर ठेवत होते.
म्हणाले, ‘बरेच दिवस खुर्चीवर बसलो की सारखं टोचायचं. पाहिलं, तर तिथं हा ढीग..’
म्हणालो, ‘नाही म्हणजे सहजच आलो होतो. तुम्ही आता विधानसभेसाठी प्रचाराचं नवं मॉडेल काढणार आहात असं कानावर आलं..’
‘बरोबर आहे तुमची माहिती. बसा. तुमची एक सेल्फी काढतो. म्हणा, चीऽऽऽऽज!’
आम्ही आकर्ण स्मितहास्य केले. त्यांनी क्लिक्दिशी मोबाइलमधून आमचा फोटो काढला.
‘तुमचं प्रचाराचं मॉडेल कसं असेल हे जाणून घ्यायचं होतं..’
‘एक मिनिट हं. जरा एक ट्विट करतो.. हं बोला..’
‘ते प्रचाराचं मॉडेल..?’
‘हाहाहा!’ बाबाजी साऊथच्या हीरोसारखे खदखदून हसू लागले. ‘काय मस्त ज्योक आहे! कसं सुचतं बुवा लोकांना? थांबा हं, तुम्हाला फॉरवर्डच करतो. व्हॉट्सॅप सुरू आहे ना तुमचं?’
‘हो आहे.. पण हे जे नवं मॉडेल आहे तुमचं..’ आम्ही अजूनही चिवटपणे आमच्या प्रश्नास धरून होतो.
‘हं, त्याचं काय?’
‘कसं आहे ते?’
‘एकदम एक्सलंट! ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॅप सगळं आहे. शिवाय फाय मेगापिक्सेलचा क्यामेरा.. बॅटरी लाइफ जरा कमी आहे, पण..’
आम्ही बाबाजींच्या हातातील बॅटरी लाइफ कमी असलेल्या मॉडेलकडे पाहतच राहिलो.
त्या मोबाइलची बॅटरी उतरलेली होती.
रेंज तर नव्हतीच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा