पान जमवून आणलं की, अकलेचं कुलूप उघडतं, असं आपल्याला अमिताभच्या त्या प्रसिद्ध गाण्यातून कळलं. पण त्याच्या कितीतरी अगोदर, ‘पुलं’चा तो पानवाला मराठी संस्कृतीत रंगलाच होता. त्याच काळात, म्हणजे १९६८ मध्ये औरंगाबादच्या उस्मानपुरा भागात एक पानाची टपरी सुरू झाली. आता त्याचं दुकान झालं आहे. त्यात दोन शिफ्टमध्ये २० तरुण काम करतात. इतर कोणत्याही शहरात किंवा खेडय़ात पानाची टपरी असते. औरंगाबादमध्येही पानाची दुकानं आहेत. एखाद्या खेडय़ा-गावातील किराणा दुकानांपेक्षा मोठी. समोर बर्फाच्या लाद्यांवर वेगवेगळ्या प्रकारची पाने. काही पानांना नुसता कात लावलेला. काही पानांचे विडे चांदीच्या वर्खात आणि लालचुटूक चेरीचा टिळा मिरवणारे.. बहुतांश टपरीमध्ये फ्रिज ही गरजेची बाब. अनेक जण एकाच वेळी पानाला चुना-काथ लावताहेत, कोणी सुपारी कातरताहेत.. एका लयीत, आपापल्या नादात कामात गुंतलेले अनेक हात नुसते न्याहाळणं हेदेखील समोरच्या ग्राहकाला वेळ विसरायला लावणारं असतं. पानातील चटण्यांचे एवढे प्रकार, की ओळींनी मांडलेल्या डब्यांतून तो पानवाला पानात काय घालतो आहे, हे दर्दी विडाप्रेमींशिवाय इतरांना कळणारही नाही.. अशी ही विविधतेने नटलेली, कित्येक वर्षांची परंपरा असलेली औरंगाबादमधील पानाची दुनिया! एक ‘रंगीन’ दुनिया.. उस्मानपुऱ्यातील ते दुकान हे या दुनियेचं खास आकर्षण!
..‘आणि हाताने पहार वाकविणाऱ्या त्या सहा फुटी माणसाने तबकातील विडा उचलला,’ हे अफजलखान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षांच्या कथेतील वाक्य शाहिराने उच्चारले की विडा उचलण्यातील ते ‘आव्हान’नाटय़ रोमांचकारी होतं. एरवी चंचीतून पान काढून चुना लावून सतत पान जमवू पाहणाऱ्या व्यक्ती कमी झाल्या असल्या, तरी पानाचं विश्व तसं रंगेलच. अगदी शिव-पावर्तीच्या काळापासून प्रणयरंगात पानाचे उल्लेख दिले जातात. घरातून शुभ कामाला जाताना गोविंद विडा देण्याची पद्धत होती. घरातल्या शुभकार्यात पान असतं अगदी रुखवातात पानपुडा देण्याचीही पद्धत आहे. लग्नाची बठक जमली की फोडा सुपारी म्हणतात आणि निवांतीने लोक पान खात राहतात. अगदी बारशापासून ते सरणापर्यंत पानसुपारी येते. पानाचं सांस्कृतिक विश्व टिकवून धरणारे शरफुभाई सांगतात, ‘हा धंदा तसं आव्हानच.’ ते कसं? या धंद्यात पानवाल्याची स्मृती संगणकासारखी असावी लागते. कोणाला पानात चुना कमी लागतो. कोण कात खात नाही. कोणाला भाजकी सुपारी लागते. कोणाची सुपारी कतरी, तर कोणाला खडी. कोणाला कमी जर्दा तर कोणाला सुगंधी तंबाखू. पान बांधून दिल्यावर ‘विलायची टाकली का?’, असं विचारणारं गिऱ्हाईक अधिक तपशील जाणून घेणारं असतं. बांधलेलं पान हातात आल्यानंतर त्याची घडी पुन्हा सोडून त्यात विलायची शोधणाऱ्या माणसाचा स्वभाव संशयी असतो, हे शरफुभाई अनुभवानं सांगतात. दिवसभरात चाडेचार ते पाच हजार पानं विकणारा हा माणूस पानातून एक नवी दृष्टी देतो.
शरफुभाईंनी १९६८ साली उस्मानपुऱ्यात टपरी उघडली. तेव्हा वडील सिंचन विभागात शिपाई होते. पगार कमी होता. घर भागवणं अवघड. संसाराचा गाडा ओढताना मुलांनी शिकावं असं त्यांना वाटे. पण शिकून नोकरी मिळेल का, या प्रश्नाचं उत्तरं तेव्हा मिळत नव्हतं. त्यामुळे धंदा टाकावा हा सल्ला शिक्षकही देत. पण करायचं काय हे कळलं नाही. त्यामुळे शरफुभाईंनी मुंबई गाठली. हॉटेलात चहा देण्याचं काम करताना शर्मा नावाचे एक गृहस्थ भेटले. ते चित्रपटात संवाद लिहायचे. शरफूंचा त्यांचा परिचय झाला. कादरखान हा त्यांचा आदर्श. कधीतरी पान जमवतानाच शरफुभाई मुंबईतल्या कादर खानच्या आठवणीत रमतात. ‘उसके अखलाख बहुत बढिया थे’.. असं ते सांगतात. पुढे काही दिवस संवाद लिहिण्याचं काम शरफुभाईंनीही केलं. पण पसे मिळाले नाहीत. शेवटी मुंबई सोडली आणि औरंगाबाद गाठलं. धंदा टाकायचा तर पसे नव्हते. शरफुभाईंच्या आईने- नजमा बेगम यांनी अंगावरचे दागिने विकून नऊ हजार रुपयांचं भांडवल दिलं. टपरी उभी राहिली आणि पान-विडीचा धंदा वाढत गेला.
जे काम करायचं त्यातील सगळं ज्ञान घे, असं शरफूचे वडील सांगायचे. पानाला चुना लावता लावता हा पठ्ठय़ाही एक एक माहिती मिळवत गेला. भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान या तीन देशांत पानाची संस्कृती रुजलेली. आयुर्वेदात पान खाण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. कावीळ झाल्यानंतर तर पानातून औषध देणारे अनेक वैद्य आजही आहेत. मोगल संस्कृतीत पानाचं महत्त्व वाढत गेलं. त्याला नवाबी थाट मिळाला. शरफुभाई सांगत होते, ताजमहाल बनवताना नूरजहाँनी एकदा पान खाल्लं होतं आणि पिंक एका चुना मारलेल्या भिंतीवर टाकली. त्याचा रंग बदलला. आणि तेव्हापासून पानाला चुना लावण्याची पद्धत रूढ होत गेली. आयुष्यातील बहुतांश शुभकार्यामध्ये पान नसेल तर ‘पान’ही हलत नाही. त्यामुळे पानाच्या या धंद्याला ‘बरकत’ आहे. शरफुभाईंना मिळालेल्या ९ हजारांच्या भांडवलानंतर एकदाही मागे वळून बघावं लागलं नाही. पैसे कमी पडले की, एखाद्या पानशौकिनाला विनंती करायची आणि त्याने आर्थिक मदत करावी, असा व्यवहार वर्षांनुवर्षे चालला. दरम्यान, पानाची चव बदलती राहायला हवी, असे एकदा शरफुभाईंच्या आईने सांगितलं. त्यानंतर वेगवेगळे सुगंधी पदार्थ टाकून वेगवेगळ्या चवीचं पान बनविणं हा छंदच त्यांना जडला. पानाचे तसे १०-१२ प्रकार. पण ग्राहकांची पसंती असणाऱ्या चार प्रकारची पाने सर्वत्र मिळतात. मघई, बनारसी, कलकत्ता मिठा आणि कपुरी पान वेगवेगळ्या प्रांतांतून येतं. बनारसी आणि मघई उत्तर प्रदेशातून, कलकत्ता मिठा हे पश्चिम बंगालमधून, तर कपुरी पान गुजरातमधून. चवीनुसार आणि त्याच्या ताजेपणावर दर ठरलेले. दिवसभरात साडेचार हजार पानांची विक्री शरफुभाई करतात. अर्थात ते पान लावण्याच्या भानगडीत फारसे नसतात. ‘तारा पान सेंटर’मध्ये पान लावून देणाऱ्यांची संख्या १०पेक्षा अधिक असते. कोणी काथ द्रव स्वरूपात करणारा, तर कोणी पान लावून देणारा. एखाद्याला खोकला झाला तर लवंग जाळून पानातून देण्याचा प्रयोगही शरफु यांनी केला. केवळ पानाची चव नाही तर पानाची प्रतिष्ठा कोणत्या ठिकाणी वाढते, हे शरफुभाईंना चांगलं माहीत आहे. त्यामुळेच त्यांच्याकडील ‘कपल’ पानाला थेट पाच हजारांचा भाव मिळून जातो. हनिमून स्पेशल पान दीड हजारांचं आणि राजा-राणीचं पान ५०० रुपयांचं.
..विडा या विषयावर बोलताना शरफुभाईंची रसवंती अधिक रंगते आणि ते पानाच्या इतिहासात जातात.. ‘पानाचा आणि प्रणयाचा अधिक जवळचा संबंध ‘कामसूत्रा’तही नमूद केला आहे. शाक्त संप्रदायातील तंत्रोपासनेत मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन या पाच ‘म’कारांना स्वीकारणाऱ्यांनी पानाला कामुकतेचं प्रतीक मानलेलं आहे. बहुतांश चित्रपटांमध्ये नायकीण किंवा वेश्या वस्तीतील स्त्रियांचे रंगलेले ओठ आणि पान खाणं हे उगीच नाही आलं. पान ही भारतीयांची संस्कृती बनली आहे. त्याशिवाय का साहित्यात पानाचे एवढे संदर्भ येतात?’ विडा गुंडाळून त्यावर चेरीची टिकली लावता लावता शरफुभाई गिऱ्हाईकालाच विचारतात.
‘कळीदार कपुरी पान, केशरी चुना’ ही लावणी असो किंवा ‘नटले तुमच्यासाठी राजसा, विडा रंगला ओठी’, ‘पान खाये सैंया हमारो’ ही गाणी पानाबरोबरची सांस्कृतिक वीण सांगणारी. हा धागा शरफुद्दीन यांनी पद्धतशीरपणे व्यवसायात उतरविला आणि पानाची महती थेट आखाती देशांपर्यंत नेली. अलीकडच्या काळात दहशतवादी कारवायांचे प्रकार सुरू झाले आणि विमानातून होणारी पानांची ने-आण थांबली आहे.
केवळ पान-काथ-सुपारी आणि चुना असा पान जमविण्याचा प्रकार औरंगाबादेत नाही. पानात चॉकलेट आणि पानात काजू-बदामसुद्धा हे नवं सूत्र शरफुद्दीन यांनी मांडलं. निरनिराळ्या चवीची पानं तयार करण्यासाठी वेगवेगळ्या सुगंधी चटण्या औरंगाबाद येथे आवर्जून मागविल्या जातात. ही चटणी तिखट नसते. मात्र, मुखशुद्धी करताना ती चव काही काळ रेंगाळत राहावी, अशी सोय त्यात असते. त्यामुळे अगदी साधं पान खायचं म्हटलं तरी एका पानाची किंमत १५ रुपयांपेक्षा कमी कोठेही नाही. शहरात तुलनेने कमी टपऱ्या आहेत. त्याचं कारणही या पानांच्या मोठय़ा दुकानांत दडलं आहे. पानांची दुकानं एवढी मोठी असतात की, बघणाऱ्याला अचंबा वाटतो. बर्फाच्या लादीवर थंडावा निर्माण करून देणाऱ्या पानांच्या किमती मात्र सर्वसामान्यांना परवडणाऱ्याही आहेत आणि श्रीमंतांसाठी ‘शौक’ करावा अशाही आहेत. शरफुभाईंच्या दुकानात पानाचा लाडू मिळतो. वेगवेगळ्या चटण्या आणि खारीक-खोबऱ्यापासूनचा मसाला भरलेल्या या पानाच्या लाडूचंही मोठं कौतुक होतं. एरवी पान खाणं हा तसा आवर्जून करावा, असा भाग राहिला नाही. पानाची बाजारपेठ गुटख्याने कधीच ताब्यात घेतली आहे, पण तरीही शरफुभाईंचा धंदा जोरात आहे. एवढा की, त्यांच्या सगळ्या मुलींची लग्न त्यांनी पान लावून देऊन केली आहेत. घरसंसाराचा गाढा तर सहजपणे उचलला जात आहे. पण बांधलेलं घर आणि व्यवसायातली स्थिरता ते अनुभवतात, अगदी आयकर भरून. महिन्याची उलाढाल लाखो रुपयांची आणि अशिक्षितांना रोजगार निर्माण करून देणारी!
सुहास सरदेशमुख – suhas.sardeshmukh@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा