घनदाट झाडीने वेढलेल्या एखाद्या बगीच्यात एक मंद सुगंध दरवळत असतो, मग त्या सुगंधाच्या उगमाचा शोध सुरू होतो आणि कुठल्यातरी कोपऱ्यात एका नाजूक वेलीवरच्या इवल्याशा फुलातून तो सुगंध दरवळतोय, हे लक्षात येते. असा धुंद सुगंध अनुभवण्यासाठी ते फूल नाकाजवळ नेण्याची गरजच नसते. त्या सुगंधाने आपल्यासारखाच वेडा झालेला धुंद वारा ते काम करतो आणि एकेका झुळुकीबरोबर तो सुगंध सर्वदूर पोहोचवितो..

बुधवारी अशीच एक वाऱ्याची मंद झुळूक देशाच्या ईशान्येकडील एका कोपऱ्यातून थेट मुंबईत आली.. आणि त्या वाऱ्यासोबत तिकडचा एक अनोखा सुगंध मुंबईच्या किनाऱ्यावर पसरला. काही मोजकीच माणसं त्या सुगंधाचा अपूर्व अनुभव घेऊ  शकली आणि त्यातला कसदारपणा जाणवला. विशेष म्हणजे, त्या सुगंधाचे फूलच तेथे अवतरले होते, असंख्य गंधवेडय़ांच्या गराडय़ात सापडूनही, त्या फुलाच्या सोज्वळ चेहऱ्यावर आपल्यापाशी असलेल्या सुगंधाच्या गर्वाची गंधवार्ताही उमटलेली दिसत नव्हती. अतिशय निगर्वीपणाने त्या फुलाने आपला गंध तेथे उधळला आणि त्या सोज्वळ सोहळ्याने सारा परिसर परिमळून गेला..

समाजासाठी नि:स्वार्थपणे काहीतरी भव्य-दिव्य करणाऱ्यांची परंपरा महाराष्ट्रात आहेच, पण देशाच्या एका कोपऱ्यात, ईशान्येकडील आसामसारख्या आजवर काहीशा एकाकी पडलेल्या व त्यामुळेच आपण भारतीय आहोत, या जाणिवेच्या जागृतीसाठी आसुसलेल्या राज्यातील हे सुगंधी फूल म्हणजे बिरुबाला राभा नावाची एक सामान्य कुटुंबातील महिला. एव्हाना या नावाचा सुगंध जगभर पसरला आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी तर या महिलेची नोबेल पुरस्कारासाठी आसामातून एकमुखी शिफारस झाली होती. कारण या महिलेने एकाकीपणाने उभारलेल्या कामातून आसामातील मागासलेल्या समाजघटकांमध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. जुन्या, अनिष्ट आणि विघातक प्रवृत्तींपासून हा समाज दूर होऊ  लागला आहे. या रूढींमागील विदारक वास्तवाची जाणीव समाजाला होऊ  लागली आहे, आणि त्यापायी मानवी जिवांची होणारी क्रूर थट्टाही आता संपुष्टात येऊ  लागली आहे.

मुंबईच्या सावरकर स्मारकात बुधवारी ‘माय होम इंडिया’ नावाच्या संस्थेने बिरुबाला राभा यांना मुंबईत बोलावून त्यांच्या कार्याचा सत्कार केला. ईशान्येकडील राज्यात असामान्य काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची ओळख मुंबई-महाराष्ट्राला करून देणे आणि ही राज्ये आणि देश यांतील मानसिक अंतर पुसणे या उद्देशाने ही संस्था हा कार्यक्रम दर वर्षी मुंबईत आयोजित करते. आसामातील अनेक गावांतील आदिवासी जमातीमध्ये आजही चेटकीण समजून महिलांचा अनन्वित छळ केला जातो. अशा महिलेला समाजातून अक्षरश: वाळीत टाकले जाते आणि शारीरिक, लैंगिक, मानसिक छळातून त्या महिला अखेर मरणाला कवटाळतात. या समस्येची पाळेमुळे वेगळ्याच, धक्कादायक स्वार्थामध्ये गुरफटलेली आहेत, हे अनेकांना माहीतही नसते. कित्येकदा, मालमत्तेतील वाटणीच्या वादातून एखाद्या महिलेस हद्दपार करण्यासाठी, तिचा काटा काढण्याची ही अघोरी प्रथा वापरली जाते, हे विदारक वास्तव अनेकदा लक्षातच येत नाही आणि या कटाच्या मुळाशी असलेल्यांचा स्वार्थ सहजपणे साधला जातो.. बिरुबाला नावाच्या या महिलेला या वास्तवाची जाणीव झाली, ती तिच्या स्वत:वर ओढवलेल्या एका प्रसंगातून! आणि तिला जाग आली. तिने कंबर कसली आणि चेटकीण ठरवून महिलांचा जीव घेणाऱ्या या अघोरी प्रथेच्या विरोधात ती ठामपणे उभी राहिली. आसामातील सामान्य जनतेमध्ये एका क्रांतिकारी बदलाचे पहिले पाऊल या सामान्य महिलेने टाकले आणि गेल्या चार दशकांत अनेक महिलांना या अघोरी प्रकाराचा बळी जाण्यापासून वाचविले..

या क्रांतीची सुरुवात बिरुबालांच्या घरातूनच झाली. १९८५ मध्ये त्यांच्या मुलाला, धर्मेश्वरला काहीतरी मानसिक आजार जडला आणि मुलाला पिशाच्चाने पछाडले, या भयाने सारे कुटुंब हादरले. मुलाच्या मानगुटीवरील पिशाच्चाचा विळखा सोडविण्यासाठी प्रथेप्रमाणे बिरुबालांनीही ओझाचे-मांत्रिकाचे-झोपडे गाठले. मुलाच्या आजाराचे कारण त्यांना जाणून घ्यायचे होते. एक चिंताग्रस्त, असहाय्य आई समोर विनम्रपणे हात जोडून उभी आहे हे पाहताच मांत्रिक जरा जास्तीच जोरात घुमू लागला. समोरच्या धुनीत मोठा जाळ तयार झाला आणि त्याच्या गूढ उजेडात त्याचे डोळे चमकूलागले. मुलाच्या आजाराचा शोध घेण्यासाठी त्या मांत्रिकाने हातातील हाडूक जोरात जमिनीवर आपटले आणि परिसर जणू थरारून गेला. मग मांत्रिक बोलू लागला.. ‘‘तुझ्या मुलाचे एका परीशी लग्न झाले आहे. ती तुझ्या मुलापासून गर्भवती आहे आणि तीन दिवसांत ती प्रसूत होणार आहे.. ज्या दिवशी ती तुझ्या मुलाच्या मुलाला जन्म देईल त्या दिवशी तुझ्या मुलाला मरावे लागेल. तो या जगात राहणार नाही.. आणखी तीन दिवसांनी तुझ्या मुलाचा मृत्यू अटळ आहे!’’ पुत्रवियोगाच्या केवळ कल्पनेने हादरलेली बिरुबाला त्या दिवशी असहाय्यपणे घरी आली आणि पुढचे दिवस मोजू लागली. तीन दिवस संपले, चौथ्या दिवसाची पहाट उजाडली आणि मुलाचा आजार कमी झाला. काही दिवसांनी मुलगा खडखडीत बरादेखील झाला. चेटूक, भूतपिशाच्च, भानामती, करणी या सगळ्या गोष्टींवरचा आजवरचा विश्वास तिने एका क्षणात झटकून टाकला. एखाद्या स्त्रीला चेटकीण ठरवून आयुष्यातून उठविण्याचा प्रकार म्हणजे भंपक, स्वार्थी लोकांच्या कारस्थानाचा भाग असला पाहिजे, या खात्रीने तिची तगमग सुरू झाली आणि बिरुबालाने पदर खोचला..

जवळपास ४० वर्षांपूर्वी बिरुबालांनी या अघोरी प्रकाराविरुद्ध बंड पुकारले.. आजही ती लढाई संपलेली नाही. ग्रामीण, दुर्गम भागात अजूनही आरोग्याच्या आधुनिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे आजारांवरील उपचाराचे अन्य मार्गही स्थानिक लोकांना माहीतच नाहीत. सुविधांच्या अभावामुळेच अशा प्रसंगी मांत्रिकाच्या दारात जाण्याची वेळ येते आणि उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतो. मंत्रतंत्राच्या या विळख्यातून समाजाला सोडविण्यासाठी ग्रामीण भागात आधुनिक आरोग्यसुविधा पोहोचल्या पाहिजेत, हा या लढय़ाचा गाभा आहे. पण तो लढा तितका सोपा नव्हता. सन २००६ ते २०१२ या सहा-सात वर्षांत जादूटोणा करणारा किंवा चेटकीण ठरविल्या गेलेल्या सुमारे ९० जणींना समाजाच्या अघोरी छळामुळे प्राण गमवावे लागले. मग हा लढा अधिक प्रखर झाला. बिरुबालांनी कार्यकर्त्यांची फौज उभी केली. या प्रकारामागील स्वार्थी सत्य उजेडात येऊ  लागले. अखेर या प्रथेला प्रतिबंध करणारा कायदाही अस्तित्वात आला. तरीही ग्रामीण, दुर्गम भागांत आरोग्य सुविधा पोहोचेपर्यंत चेटूक आणि जादूटोण्याचा मानसिक प्रभाव पुरता नष्ट होणार नाही, याची बिरुबालांना जाणीव आहे. म्हणूनच ही लढाई संपलेली नाही, असे त्या म्हणतात.

आसाम-मेघालयाच्या सीमेवरील ठाकूरभिला नावाच्या एका दुर्गम खेडय़ात या संघर्षांची बीजे बिरुबालांनी रोवली. मुलाच्या मानसिक आजारानंतरचे मांत्रिकाचे भाकीत भंपक असल्याची खात्री झाल्यावर चेटूक, भानामती, जादूटोणा हे सारे झूठ आहे, हे समाजाला पटविण्यासाठी बिरुबाला घराबाहेर पडल्या. गावोगावी, घराघरांत गेल्या आणि या अघोरीपणापासून दूर राहू या, असे त्यांनी कळकळीने लोकांना विनविले.. अशाच काळात, कुठे कुठे कुणा महिलेला चेटकीण ठरवून तिचा लैंगिक, मानसिक, शारीरिक छळ सुरू झाल्याच्या बातम्या कानावर येऊ  लागल्या, पण अस्वस्थ बिरुबाला लगेचच त्या गावात थडकू लागल्या. उभा गाव ज्याच्या विरोधात असतो, त्याच्या पाठीशी उभे राहून गावाशी संघर्ष करणे हे केवढे दिव्य असते, याची केवळ कल्पनादेखील करणे काहीसे कठीणच असते. पण बिरुबाला यांना अशा प्रसंगी आपल्या नावामुळे धीर यायचा.. बिरुबाला म्हणजे वीरबाला! ज्या नावातच शौर्याची बीजे आहेत त्याने डगमगायचे नसते, असा निर्धार करूनच बिरुबाला त्या गावात दाखल व्हायच्या आणि प्रबोधन, शिक्षण, समजूत काढून.. असे सारे मार्ग अवलंबून गावाचे मतपरिवर्तन करण्याचा आगळा प्रयोग सुरू व्हायचा.. चेटकीण म्हणून कपाळावर शिक्का बसल्यानंतर अशा महिलेला मरणाखेरीज पर्यायच नसायचा. बिरुबालांच्या संघर्षांमुळे आजवर पन्नासहून अधिक महिलांचे मरण टळले, त्यांच्या कपाळावरील तो शिक्का पुसला गेला आणि गावाने त्या महिलांना पुन्हा स्वीकारले.. पण हे सारे सहजपणे घडत नव्हते. बिरुबालांनाही अनेकदा प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागले. जिवे मारण्याच्या धमक्या पचवाव्या लागल्या. समाजातील परंपरेला आव्हान दिल्याबद्दल समाजिक बहिष्कारही सोसावा लागला. घरादाराचा त्याग करून गाव सोडून जाण्यासाठी गावकऱ्यांनी आणलेला दबाव मोडून काढताना त्यांच्या मानसिक कणखरपणाची कसोटी लागली, पण ही लढाई अध्र्यावर सोडायची नाही, हा त्यांचा निर्धार होता.. अशा प्रथा मोडून काढण्यासाठी कायद्याचे पाठबळ हवे, हे त्यांना जाणवले. कार्यकर्त्यांची फौज सोबत घेऊन त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले. २०११ मध्ये स्थानिक संघटना, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या कायद्यासाठी मोहीमच उघडली. ऑगस्ट २०१५ मध्ये त्याला यश आले. आसाम विधानसभेने या प्रथेला प्रतिबंध करणारा कायदा अखेर संमत केला. कुणाचाही जीव घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, हे आसामात अधोरेखित झाले.. वीरबालेच्या लढय़ाला मिळालेली ही मान्यताच होती.

एखाद्या दुर्गम भागात कुणा असहाय्य महिलेवर समाजाकडून अशा अत्याचाराची शिकार होण्याची वेळ आलीच, तर त्या महिलेची किंवा तिच्या कुटुंबाची मानसिक अवस्था काय असू शकते, हे शहरी, सुशिक्षित समाजाच्या कल्पनेपलीकडचे आहे. बिरुबालांच्या संघर्षांच्या कथेला समाजाच्या मानसिक परिवर्तनाच्या लढाईची दुसरी बाजू आहे. ग्रामीण भागात- जेथे समाजाच्या अस्तित्वाच्या भौगोलिक कल्पनाही गावाच्या सीमेपलीकडे नसतात, अशा भागात हा अवघड संघर्ष पुकारलेल्या बिरुबालांच्या कामाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आहे. आसामात तर त्यांचे नाव घराघरांत पोहोचले आहे.. बिरुबाला हे नाव आसामच्या परिवर्तनाच्या लढाईचे जणू बोधचिन्ह बनले आहे. त्यांच्या या कामाचा सुगंध ईशान्येकडे सर्वत्र पसरला आहे.

गेल्या बुधवारी, २३ नोव्हेंबरला बिरुबाला राभा नावाचे हे सुगंधी फूल मुंबईतही आढळले!

दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com

Story img Loader