अघोरी व अनिष्ट प्रथा जोपासण्यासाठी मुक्या प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा अनेक समाजांत पूर्वापारपासूनच चालत आलेली आहे. ग्रामीण भागात अनेक देवी-देवतांचे नवस फेडण्यासाठीही प्राण्यांचा बळी दिला जातो. विदर्भ-मराठवाडय़ातील अनेक यात्रांमध्ये सतत हे दृश्य पाहून एक संन्यासी अस्वस्थ झाला. या प्रथेविरुद्ध लढण्याचा त्याने निर्धार केला आणि तो या क्रूर प्रथेच्या विरोधात उभा ठाकला. दिलीप नामदेव पवार हे त्याचं नाव. आज लोक त्याला ‘दिलीपबाबा’ म्हणून ओळखतात. लहानपणापासूनच समाजसेवेचा वसा घेतलेल्या दिलीपबाबांनी गेली ३५ वर्षे अथक परिश्रमांती २१ गावांमधील यात्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या बळीची अघोरी प्रथा बंद पाडली. व्यसनमुक्तीपासून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा करणाऱ्या दिलीपबाबांनी पुढे बळीच्या प्रथेविरोधातील लढय़ात स्वत:ला झोकून दिले.
मुक्या प्राण्यांना आपलं मानणारे आधुनिक संत असा दिलीपबाबांचा लौकिक आहे. १५ ऑगस्ट १९५८ ला वाशिम जिल्हय़ाच्या मंगरूळपीर तालुक्यातील गोगरी या छोटय़ा गावात त्यांचा जन्म झाला. वडील शिक्षक, तर आई गृहिणी. घरात तीन भावंडं. १२ एकर शेती आणि वडिलांच्या नोकरीवर घराचा उदरनिर्वाह चाले. सामाजिक कार्याचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. शेलूबाजार इथं दिलीपबाबांचं दहावीपर्यंत शिक्षण झालं. आपण सुखी आणि आनंदी असलो तरी समाजातील दु:ख व हालअपेष्टा पाहून त्यांचं मन हेलावून जात असे. दहावीनंतर शिक्षणाला पूर्णविराम देऊन त्यांनी पूर्णवेळ समाजसेवा सुरू केली. समाजातील एक मोठा घटक व्यसनांच्या विळख्यात अडकल्याचं त्यांच्या लक्षात आलं. व्यसनामुळे अनेकांचा जीव जातो, संसार उघडय़ावर पडतात हे त्यांनी पाहिलं. त्यामुळे व्यसनमुक्तीच्या कार्याला त्यांनी सुरुवात केली. त्याबद्दल आदिवासी, बंजारा, कोरकू समाजातील युवकांमध्ये जाऊन त्यांनी जनजागृती सुरू केली. व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी सामूहिक प्रार्थना, काकडआरती, योगधारणा, व्यायाम आदी उपक्रम त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर क्रांतिकारक, संत आणि समाजसुधारकांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचं वाटपही सुरू केलं. युवकांच्या मनावर शिक्षणाचं महत्त्व ठसवण्यासाठी त्यांनी ‘शिक्षण ही जीवनाची चावी आहे, जितकं शिकाल तेवढं जीवन समृद्ध होईल..’ हे विचार त्यांच्यात रुजवले. ‘रामायण वाचून त्याची पूजा करण्याऐवजी भगवान श्रीरामांच्या कृतीचं अनुकरण करा, म्हणजे जीवनात तुम्हीच राम बनाल,’ असा संदेशही त्यांनी दिला. वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत त्यांचं हे कार्य सुरू होतं.
त्यानंतर ईश्वर व गुरूंचा शोध घेण्यासाठी गृहत्याग करून ते बाहेर पडले. अयोध्या, हरिद्वार आदी तीर्थक्षेत्री गेले. पण तीर्थक्षेत्री चालणारा व्यवहार, अहंभाव, संघर्ष आणि भौतिक आसक्तीच्या किळसवाण्या अनुभवांना कंटाळून निसर्गाशी एकरूप होण्यासाठी ते जंगलात निघून गेले. जंगलात भ्रमंती करताना त्यांनी निसर्गज्ञान प्राप्त केलं. पशुपक्षी आणि प्राण्यांच्या वर्तणुकीतून त्यांना आगळी प्रेरणा मिळाली. इतकी अविश्रांत भटकंती करूनही त्यांना देव आणि गुरू काही मिळाला नाही. त्यामुळे समाजसेवेची शक्ती मिळवण्यासाठी पंढरपूर गाठून चंद्रभागेच्या काठी त्यांनी पाच दिवस अन्नपाणी त्यागून स्वत:च स्वत:चा शोध घेतला आणि त्यांना एक सत्य उमगले : आपल्या आचारविचारांत, कामातच देव असतो. पंढरपुरातील मधुकरराव टोमके यांनी त्यांना त्यांच्या मूळ गावी- लाठी इथं आणलं.
समाजसेवेचा निर्धार केलेल्या दिलीपबाबांनी एका झोपडीत आश्रम सुरू केला. दिलीपबाबा परतल्यामुळे आनंदी झालेल्या आई-वडिलांनी आश्रमात येऊन त्यांना घरी परतण्याचा आग्रह केला, पण त्यांनी त्याला नकार दिला. आपण समाजसेवेचे व्रत घेतले आहे, आता सारे आयुष्य त्यासाठीच झोकून देणार, असे सांगून त्यांनी आई-वडिलांची समजूत काढली.
धार्मिक पूजापाठ, कर्मकांडांत न अडकता आपलं जीवन केवळ समाजसेवेसाठी खर्ची घालायचं त्यांनी ठरवलं. त्यामुळे त्यांच्याकडे आपली गाऱ्हाणी घेऊन येणारे लोक वाढू लागले. मग दिलीपबाबांनी मौन व्रत स्वीकारले. गेली ३५ वर्षे त्यांचे हे मौनव्रत सुरू आहे. दरम्यान, गरीबांना कपडेवाटप, भांडीवाटप व यात्रेत सेवा देण्याचं कार्य त्यांनी सुरू केलं.
समाजात वावरत असताना त्यांना बळीच्या नावावर प्राणीहत्येची गंभीर समस्या जाणवली. देवाच्या नावे प्राणीहत्या का केली जाते, या प्रश्नाने ते अस्वस्थ झाले. ही बळी प्रथा बंद करण्यासाठी त्याविरोधात ठामपणे लढा देण्याचा निर्धार त्यांनी केला. बळीप्रथेविरोधात जनजागृती करत असताना एका साध्या माणसानं विचारलेल्या प्रश्नातून गोशाळा सुरू करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. लाठीजवळील जंगलात कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेल्या गाई सोडवून त्यांनी गोशाळेत आणल्या. कसायाच्या तावडीतून या गाईंना सोडवण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. परंतु न्यायालयात विरोधात निकाल लागल्याने त्या कसायाकडून या ५० गाई विकत घेऊन त्यांनी गोशाळेत त्यांचं संगोपन सुरू केलं.
संत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांची शिकवण मानणाऱ्या दिलीपबाबांनी यात्रेत होणारी पशुहत्या कशी अमानवी आहे, याबाबत जनजागृतीस सुरुवात केली. मालेगाव तालुक्यातील धमधमी या गावात दसऱ्याच्या दिवशी बोकडांचा बळी देऊन त्या बळीच्या रक्ताचा टिळा घरांना लावण्याची प्रथा होती. दिलीपबाबांनी जनजागृती करून सर्वप्रथम १९८१ मध्ये या गावातली ही प्रथा बंद पाडली. त्याऐवजी गावातील लोकांना मिष्ठान्न भोजन दिलं. बोकडबळी प्रथेतील अनिष्टता गावकऱ्यांना पटवून देऊन त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं. गेली ३५ वर्षे ते राज्यात सर्वत्र फिरून याबद्दल जनजागृती करत आहेत. त्यामुळे अनेक मोठय़ा यात्रांमधील बळी प्रथा बंद करण्यात त्यांना यश आलं आहे. पशूंच्या मांसाऐवजी बुंदी, पुरी-भाजीच्या जेवणाचा नैवेद्य दाखविण्याच्या त्यांच्या आवाहनाला संवेदनशील समाजाचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
दिलीपबाबांनी आजवर २१ गावांतील यात्रांमध्ये होणारी अशी पशुहत्या बंद केली आहे. त्यात वाशिम जिल्ह्य़ातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी, रुईगोस्ता, धमधमी, गव्हा, नागरतास, पिंपळवाडी, सुकली; हिंगोली जिल्ह्य़ातील कोथळज, कळमनुरी; यवतमाळमधील गणेशपूर; बुलढाणा जिल्ह्य़ातल्या मोळामोळी, सोनाटी, मांडवा, मोहना, शेंदला; अकोला जिल्ह्य़ातील सौंदळा, कातखेडा, चेलका, खरप, मांडवा, अनिकट, जुने शहर; अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा, मेळघाट यांचा समावेश होतो. ही प्रथा बंद करताना त्यांना अनेक अडचणी येतात. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या- त्या गावच्या किंवा समाजाच्या ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेऊन दिलीपबाबा जनजागृती करतात. त्यामुळे सकारात्मक परिणाम होऊन लोकांकडून प्रतिसाद मिळतो असा त्यांचा अनुभव आहे. खेरीज जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सोबतीला असतेच. मोळामोळी आणि कोथलज येथील मुस्लीम समाजातही प्राण्यांच्या बळीची प्रथा होती. ती बंद करण्यातही दिलीपबाबांना यश आले. रामनवमीला वाशिम जिल्ह्य़ातल्या पोहरादेवी इथं बंजारा समाजाची मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त येतात. तिथं ४० हजार बोकडांचा बळी दिला जात असे. रक्ताचे पाट वाहत. बंजारा समाजातील नेते व शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या यात्रेत तब्बल २० वर्षे त्यांनी जनजागृती केली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आलं असून, बोकडबळी प्रथा पूर्ण बंद झाली आहे. आता तिथं बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अकोला जिल्ह्य़ातल्या सौंदळा इथंही बोकडबळीची परंपरा होती. हजारावर बोकडांची मुंडकी कापून ती मंदिराच्या पायऱ्याशी गाडून ठेवली जात. दरवर्षी नवे बोकडबळी देऊन पुरलेली जुनी मुंडकी बदलली जात. दिलीपबाबांनी जनजागृती करून या प्रथेस पायबंद घातला. बळी प्रथा बंद झालेल्या २१ गावांत आता यात्रेदिवशी महाप्रसादाचं वाटप केलं जातं. या प्रथेविरोधात शासनाने कायदा करायला हवा असे त्यांचे म्हणणे आहे. सामाजिक बांधिलकीतून इतरही उपक्रमांचं आयोजन ते करत असतात.
वाशिम जिल्ह्य़ातल्या लाठी गावात ‘दिलीपबाबा गोरक्षण जीवदया व्यसनमुक्ती संस्था’ स्थापन करम्यात आली आहे. दगडाच्या मूर्ती पुजण्यापेक्षा प्राण्यांची पूजा करा, असे ते सांगतात. त्यांच्या या सामाजिक कार्यासाठी देशविदेशातून आर्थिक पाठबळ मिळतं. लाठीमध्ये ७० लाख रुपये खर्च करून त्यांनी गोशाळा बांधली आहे. बळी प्रथेविरोधातील या कार्यासाठी दरवर्षी २० लाखांचा खर्च येतो. बळीप्रथा बंद झालेल्या २१ गावांमध्ये महाप्रसादाची परंपरा सुरू राहण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उभारून त्याच्या व्याजातून हा उपक्रम राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे. गोमाता संगोपनासाठी ५० लाखांची तजवीज त्यांनी केली आहे. दिलीपबाबांची राहणी अत्यंत साधी. बनियन व पांढरं धोतर हाच पेहराव. ते पायात चप्पलदेखील घालत नाहीत. आपल्या कार्यासाठी गाडय़ा देणगीरूपात मिळाल्या असल्या तरी ते पायी वा एसटी-रेल्वेनंच प्रवास करतात. साध्या राहणीमुळे सर्वसामान्यांशी आपली नाळ जोडलेली राहते असं ते मानतात. त्यांच्या कार्याच्या पावतीदाखल त्यांना राज्य शासनासह स्वयंसेवी संस्थांचे १२ पुरस्कार आजवर मिळाले आहेत. ते म्हणतात, ‘मला कोटय़वधीचा निधी लोक देतात. त्याचा विनियोग मुक्या जनावरांसाठी होतो. पैसा चंचल आहे. त्यामुळे माझ्या कपडय़ांना मी कधीच खिसा शिवला नाही. बळी प्रथेविरुद्ध लढा देण्याचं कार्य अविरत सुरू ठेवणं हाच माझा ध्यास आहे.’ त्यांच्या या कार्यात आता अनेक लोक सहभागी होत आहेत. त्यातून बळी प्रथेविरोधात एक व्यापक चळवळ निर्माण झाली आहे.
प्रबोध देशपांडे / prabodh.deshpande@expressindia.com
दिनेश गुणे / dinesh.gune@expressindia.com