एक असा जमाना होता जेव्हा डॉक्टर म्हणजे ईश्वराचं दुसरं रूप मानलं जात असे. कारण ईश्वरी कृपेनं मानवी जन्म मिळाला असं मानलं तरी जगविण्याची, जीवघेण्या आजारातून वाचवण्याची करामत डॉक्टरच करू शकतो, अशी त्यामागे श्रद्धा होती. त्यामुळेच त्या काळात वैद्यकीय ‘पेशा’ असा शब्दप्रयोग केला जात असे आणि त्याच्याशी इमान राखत दुर्गम ग्रामीण भागात तशी सेवा देणाऱ्या ‘धन्वंतरीं’पुढे सारेजण नतमस्तक होत असत. पण काळाच्या ओघात ‘पेशा’चं रूपांतर ‘व्यवसाया’त झालं आणि गेल्या पंधरा-वीस वर्षांत त्यावर ‘धंदेवाईक’पणाचीही पुटं चढू लागली. ‘डिसेंटिंग डायग्नोसिस’सारख्या पुस्तकांनी हे काळं जग अधिकच ठसठशीतपणे प्रकाशात आणलं. त्यामुळे सेवाभावी डॉक्टरांबद्दलच्या गोष्टी म्हणजे ‘दंतकथा’ वाटू लागल्या. अर्थात एकीकडे असं चित्र असलं तरी या अल्पसंख्य गटाचे प्रतिनिधी व संस्था आजही समाजात कार्यरत आहेत आणि सर्वच प्रकारच्या सुविधांपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागात त्यांचाच मुख्य आधार असतो. चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांचा या अल्पसंख्याकांच्या यादीमध्ये समावेश करावा लागेल.
मुंबईत जन्म, पाल्र्याच्या परांजपे विद्यालयात शालेय शिक्षण आणि रूपारेल महाविद्यालयात दोन र्वष, त्यानंतर एमबीबीएस-एमडी अशा देदीप्यमान शैक्षणिक कामगिरीनंतर खरं तर मुंबईत प्रॅक्टिस आणि खोऱ्याने पैसा, असा पुढचा प्रवास तर्कशुद्ध ठरला असता. पण सुवर्णा नलावडे या युवतीच्या बाबतीत तसं घडलं नाही. कराडच्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वैद्यकीय महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९५ मध्ये पुन्हा मुंबईत जाऊन रीतीनुसार वैद्यकीय क्षेत्रात प्रत्यक्ष काम सुरू केलंही होतं. त्या काळात मुंबईत कूपर आणि नानावटी ही दोन मोठी रुग्णालयं सोडली तर सर्वसामान्य गरीब लोकांसाठी फारशी आरोग्यसेवा उपलब्ध नव्हती. ‘कूपर’मध्ये रुग्णांची इतकी गर्दी असायची, की खाटेवर आणि जमिनीवरही रुग्ण असायचे. त्यांचे फार हाल व्हायचे. त्यातच डॉक्टरांच्या कमतरतेमुळे त्यांना वैद्यकीय सुविधाही नीट मिळू शकत नव्हती. ही परिस्थिती पाहून अस्वस्थ झालेल्या या तरुणीने जास्त चांगल्या, अतिदक्षता विभागासारख्या सुविधा असलेल्या ‘जसलोक’मध्ये नोकरी पत्करली. पण तिथे दुसऱ्या टोकाचं दृश्य होतं. ‘डिलक्स’ खोल्या, मोठय़ा काचांच्या खिडक्यांमधून समुद्राचं दृश्य आणि आरामशीर बिछान्यावर उपचार घेत महिनोन्महिने पडून राहणारे धनवान रुग्ण! त्यावेळी ‘अॅम्ब्युलन्स डय़ूटी’ही असायची. एखाद्या गरीब रुग्णाच्या घरी उपचारासाठी गेलं तर तिथे मात्र साधी गादीही नसायची.
अशा प्रकारे सर्वसामान्यांचा लोंढा असणारं कूपर हॉस्पिटल आणि उच्चभ्रूंसाठी त्या काळात जणू प्रतिष्ठेचं प्रतीक असलेलं जसलोक रुग्णालय या दोन टोकांच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांमध्ये काम करताना या क्षेत्रातील कमालीच्या भिन्न परिस्थितीने डॉ. सुवर्णा यांच्या मनाला जोरदार धक्के दिले. आपल्या ज्ञान व अनुभवाचा या लोकांसाठी सदुपयोग व्हावा, अशी तीव्र इच्छा असल्यामुळे या परस्पर विसंगत अनुभवांनी त्या आणखीच अस्वस्थ झाल्या. हे सगळं काय चाललंय, आपण नेमकं काय करतोय असे प्रश्न सतावू लागले. इथे असं केवळ नोकरीच्या शाश्वतीपोटी काहीतरी करत राहण्यापेक्षा जिथे आपली खरी गरज आहे, आपल्या ज्ञानाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकेल तिथे आपण काम केलं पाहिजे, असं त्यांना तीव्रपणे वाटू लागलं. अशाच अस्वस्थ मन:स्थितीत असताना मुंबईच्या वालावलकर ट्रस्टतर्फे चिपळूण तालुक्यात नव्याने सुरू होत असलेल्या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी हवे असल्याची जाहिरात त्यांच्या वाचनात आली. तोपर्यंत कोकणात फार कधी न आलेल्या त्यांनी या जागेसाठी अर्ज केला. विश्वस्त मंडळींनी त्यांची निवड केली आणि १९९६ मध्ये त्या डेरवणला दाखल झाल्या. हॉस्पिटल कुठे आहे म्हणून शोधत गेल्या तेव्हा त्याचं अजून फारसं बांधकाम झालं नसल्याचं लक्षात आलं. रुग्णालयाचा स्वागत कक्ष होता आणि बारुग्ण विभागाची तात्पुरती सुविधा केलेली होती. जवळच एक मंदिर होतं आणि त्या मंदिरातच एका बाजूला राहण्याची सोय केलेली होती. ही परिस्थिती पाहून डॉ. सुवर्णा थोडय़ा गोंधळल्या. तरी त्यांनी स्वत:शीच ठरवलं की, महिनाभर राहून तर बघू या. तोपर्यंत फार काही प्रगती दिसली नाही तर अन्य विचार करू. पण वालावलकर ट्रस्टच्या विश्वस्तांनी त्यांना निराश केलं नाही. त्या दिवसापासून आजतागायत त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या असून सध्या त्या वैद्यकीय संचालिका या पदावर काम करत आहेत. येथे आल्यानंतर थोडय़ाच काळात क्ष-किरणतज्ज्ञ डॉ. नेताजी पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
सुरुवातीच्या काळात, दिवसभरात एखादा पेशंट आला तरी सारेजण खूश व्हायचे. या दुर्गम भागात न मिळणारी दर्जेदार वैद्यकीय सेवा दिली पाहिजे, असा विश्वस्तांचा सुरुवातीपासून कटाक्ष होता. त्यामुळे सीटीस्कॅन मशीनही लगेच आलं. पण त्याच्या वापराचा सल्ला कोण देणार? कारण त्या काळात कोणाला त्याबाबत फरशी माहितीच नव्हती. मग आरोग्यविषयक आणि पर्यायाने रुग्णालयाबाबतही प्रचारासाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यंमध्ये गावोगावी आरोग्य शिबिरं सुरू केली. त्यातून तीन प्रमुख बाबी लक्षात आल्या. एक म्हणजे, इथले लोक आर्थिकदृष्टय़ा फार गरीब आहेत. दुसरं म्हणजे, इथे सगळी ‘मनीऑर्डर इकॉनॉमी’ आहे आणि तिसरं व सर्वात अवघड दुखणं म्हणजे अंधश्रद्धा! कुणीही आजारी पडलं की, डॉक्टरऐवजी मांत्रिकाला गाठायचं. त्याच्या तथाकथित जारणतारण विद्य्ोने गुण यावा म्हणून हवा तसा खर्च करायचा. त्याचा उपयोग झाला नाहीच आणि अगदी कोणी त्यातल्या त्यात शिकल्या सवरलेल्या माणसाने आग्रहच धरला तर नाईलाज म्हणून डॉक्टरकडे जायचं, हा इथला परंपरागत शिरस्ता. इथे कशा प्रकारच्या आर्थिक-सामाजिक रचनेत काम करायचं आहे, याचं भान या शिबिरांमधून आलं. त्यात जास्त तातडीने उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना संस्थेच्याच गाडीतून रुग्णालयात आणून उपचार सुरू केले. मांत्रिकासह इतर सारे उपाय थकल्यावर रुग्णालयात जायचं, या इथल्या अडाणी धोरणामुळे सुरुवातीच्या काळात थेट अत्यवस्थ रुग्णच यायचे. त्यामुळे रुग्णालयात सर्वसाधारण वॉर्डच्या आधी दोन खाटांचा अतिदक्षता विभागच सुरू केला. पहिला रुग्ण आला तो स्वागत कक्षातच कोसळला. त्याची हृदयक्रियाच बंद पडली होती. तातडीचे उपचार करून त्याचा जीव वाचवला. पण या अनुभवातून या विभागासाठी सर्वप्रथम व्हेन्टिलेटर, पेसमेकरची व्यवस्था केली. मग सर्पदंश झालेले रुग्ण येऊ लागले. सापाचं विष जास्त भिनलं तर किडनी निकामी होते. त्यावर तातडीने डायलिसिसचे उपचार करण्याची गरज असते. ही बाब विश्वस्तांच्या लक्षात आणून दिल्यावर दुसऱ्या दिवशी डायलिसिसचं मशीन आलं. पण त्याच्या वापराचा फार अनुभव नव्हता. अशा वेळी संस्थेशी संबंधित पुण्याच्या डॉक्टरांशी फोनवरून संपर्क करून मार्गदर्शन घ्यायचे. त्या काळात रुग्णालयात फोन आलेले नव्हते. त्यामुळे अशा प्रकारे परगावी कुणाशी बोलायचं झालं तर चिपळूण गाठावं लागायचं. आता मात्र इथे आठ डायलिसिस मशीन आहेत, एवढंच नव्हे तर त्यांच्या वापराच्या प्रशिक्षणाचा अभ्यासक्रमही सबंध महाराष्ट्रात फक्त इथेच असल्यामुळे तो पूर्ण केलेले तंत्रज्ञ राज्यभरातील नामवंत रुग्णालयांमध्ये काम करत आहेत.
गावोगावी घेतलेली आरोग्य शिबिरं आणि रुग्णालयात येणाऱ्यांवर उपचार करताना डॉ. पाटील यांच्या लक्षात आलेली आणखी एक सार्वत्रिक महत्त्वाची बाब म्हणजे, कुपोषण. पण या प्रश्नाला हात घालायचा असेल तर रुग्णालयात बसून काही होणार नव्हतं. त्या लोकांपर्यंत पोचायला हवं. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी सेविकांची मदत घेऊन काम सुरू केलं. त्याबाबतच्या सर्वेक्षणात असं लक्षात आलं की, यांच्या आहारात पोषणमूल्य असलेलं असं फारसं काही नसतंच. म्हणून त्यांना कडधान्यं, नाचणी, तीळ, तूप इत्यादींच्या मिश्रणातून बनवलेले पौष्टिक लाडू सुरू केले. वाडय़ा-वस्त्यांवरच्या गरोदर माता, लहान मुलं आणि किशोरवयीन मुली या सर्वाना दिवसाला तीन या प्रमाणात किमान वर्षभर हे लाडू दिले जातात आणि त्याचा अपेक्षित परिणामही दिसून आला आहे. याचबरोबर महिलांच्या मोफत बाळंतपणाची सुविधा सुरू केली. त्यांना रुग्णालयात आणण्यासाठी अॅम्ब्युलन्सची सोय केली. शिवाय अशा मोठय़ा रुग्णालयाचं त्यांच्यावर दडपण येऊ नये म्हणून डोहाळजेवणासारखा कौटुंबिक जिव्हाळ्याचा उपक्रम साग्रसंगीत केला जातो. तो कार्यक्रम झाल्यावर वैद्यकीय तपासणी आणि रुग्णालयात बाळंतपणासाठी प्रवृत्त केलं जातं. अचानक कळा सुरू झाल्यावर संबंधित महिला आणि कुटुंबीयांची धावपळ होऊ नये म्हणून अपेक्षित दिवसाच्या सुमारे दोन आठवडे आधीच तिला रुग्णालयात दाखल करून घेतलं जातं. हे तिचं माहेर असल्यासारखी वागणूक दिली जाते. तिचा आहार, आरोग्य, बाळंतपणानंतर बाळाची काळजी इत्यादीबाबत प्रशिक्षण आणि आवश्यकता वाटल्यास समुपदेशनही केलं जातं. विशेष म्हणजे त्यामध्ये संबंधित बाईच्या सासूलाही सहभागी करून घेतलं जातं. यानंतरही वर्षभर बाळाचे वाढदिवस नियमितपणे साजरे करून त्यानिमित्ताने तपासण्या आणि लसीकरणाचं वेळापत्रक सांभाळलं जातं.
आरोग्य सर्वेक्षणातील सुमारे ७० टक्के किशोरवयीन मुली कुपोषित असल्याचं आढळून आल्यामुळे त्यांच्यासाठी एक आठवडय़ाची निवासी कार्यशाळा डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाते. कारण वयाच्या या टप्प्यावरच कुपोषण रोखलं तर त्यांच्या पोटी जन्माला येणारं बाळ कुपोषित राहणार नाही, हा त्यामागचा विचार आहे.
मुंबईच्या टाटा मेमोरिअल कॅन्सर रिसर्च सेंटरच्या मदतीने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यंमधील बावीसशे गावांमध्ये प्रत्येक घरात जाऊन केलेली कर्करोग सर्वेक्षण आणि निदान शिबिरं हा डॉ. पाटील यांच्या संयोजनातून साकारलेला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम. यामध्ये २५ र्वष वयावरील सुमारे पाच लाख जणांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी त्यापैकी सुमारे दहा हजार जणांवर तेथेच उपचार करण्यात आले, तर आणखी सुमारे अडीच हजार जणांना रुग्णालयात आणून पुढील उपचार किंवा शस्त्रक्रिया केल्या गेल्या. याव्यतिरिक्त स्तनाच्या कर्करोगावर वेगळ्या पद्धतीने उपचाराचे प्रयोगही इथे यशस्वीपणे करण्यात आले आहेत आणि टाटा सेंटरने त्याचा स्वीकार केला आहे.
सुमारे दोन दशकांपूर्वीचा ओसाड माळरानावरचा शेडवजा बारुग्ण विभाग ते सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी युक्त पनवेल ते गोवा या महामार्गावरील सर्वोत्कृष्ट बहुउपचार रुग्णालय, विविध प्रकारचे आरोग्यविषयक उपक्रम, निमवैद्यकीय अभ्यासक्रम आणि गेल्याच वर्षी सुरू झालेलं ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असा हा प्रवास, वालावलकर ट्रस्ट ही विश्वस्त संस्था आणि डॉ. सुवर्णा पाटील यांनी एकत्रच केलेला! या वाटचालीत ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त विकास वालावलकर, मार्गदर्शक काकामहाराज जोशी, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रफुल्ल गोडबोले, देश-परदेशातले असंख्य वैद्यकीय तज्ज्ञ, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर इत्यादींचंही बहुमोल योगदान आहे. पण संस्थेची मुख्य वैद्यकीय आघाडी डॉ. पाटील यांनी पहिल्या दिवसापासून आजतागायत समर्थपणे सांभाळली म्हणूनच हे शक्य झालं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. भवतालच्या समाजाचं भान ठेवत कोकणच्या वैद्यकीय क्षेत्रातली संस्था आणि व्यक्तीची ही एका पातळीवर समांतर, तर दुसऱ्या पातळीवर एकरूप होऊन चाललेली सेवाव्रती वाटचाल खरोखरच दुर्लभ आणि लोभसही!
सतीश कामत – satish.kamat@expressindia.com
दिनेश गुणे- dinesh.gune@expressindia.com
(समाप्त)