‘निराश व्हायचे नसते. खचून न जाता अडचणींवर मात करायची असते,’ अशी वाक्ये भाषणात अनेकजण वापरतात. मात्र, प्रत्यक्ष तशी वेळ आल्यानंतर अनेकजण गर्भगळीत होतात. एखादाच अपवाद ठरतो- जो समाजाचा आदर्श ठरतो. चहुबाजूंनी कोसळलेल्या संकटांशी झुंजत त्यांना परतवून लावणाऱ्या आणि स्वत:बरोबरच असंख्य महिलांना स्वयंपूर्णतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या चंद्रिकाताई चौहान यांच्याकडे आज समाज त्याच आदराने बोट दाखवतो. अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर चंद्रिकाताईंनी उद्योगाचे एक विश्व उभे केले आणि या विश्वात वावरणाऱ्या प्रत्येकाला नवा आत्मसन्मानही मिळवून दिला. आज चंद्रिकाताई या सामाजिक बांधिलकीने भारलेली एक संस्था झाली आहे.
मूळच्या गुजरातेतील अहमदाबादजवळील सिरोही गावच्या चंद्रिका चौहान या सध्या सोलापुरात असतात. दहावीपर्यंत शिकलेल्या चंद्रिकाताईंचा १९८३ मध्ये शंभुसिंह चौहान यांच्याशी विवाह झाला. शंभुसिंह राजस्थानातील अबू रोडचे राहणारे. समाजऋण फेडण्याच्या संस्कारांतून संघाच्या कामाला पूर्णवेळ वाहून घेण्याचे त्यांनी ठरवले आणि सोलापूर जिल्हय़ात करमाळा येथे त्यांना पाठविण्यात आले. काही वर्षांनंतर त्यांनी सोलापुरातच सबमर्सिबल पंपाचे वितरक आणि पॉवरलूमच्या सुटय़ा भागांचे विक्रेते म्हणून व्यवसाय सुरू केला. वैवाहिक जीवन सुरळीत सुरू असताना शंभुसिंहांना १९८९ मध्ये हृदयाच्या आजारामुळे एका शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागले. या आजारामुळे प्रकृती सतत बिघडू लागली आणि अंथरूणाला खिळून राहण्याची पाळी आली. नोकरांवर विसंबून चालणाऱ्या व्यवसायात बँकेच्या कर्जाचा बोजा वाढत गेला. अडचणी वाढू लागल्या की संकटांना सामोरे जाण्याची माणसाची ताकद क्षीण होऊ लागते. शंभुसिंहांचे तसेच झाले. आर्थिक संकटांना तोंड देण्याची ताकद संपली आणि त्यांनी अखेरीस व्यवसाय गुंडाळून टाकला.
अशा संकटसमयी पत्नी चंद्रिकाताईंनी पदर खोचला. घरात तीन मुले, धाकटय़ा दीराची तीन मुले, मोठय़ा दीराचा एक मुलगा अशी सात मुले आणि आजारी पती. अशा स्थितीत घर चालवायचे कसे, हा चंद्रिकाताईंसमोर मोठाच प्रश्न होता. राजस्थानातील सासरची मंडळी ‘सोलापूर सोडून परत या’ असा आग्रह करत होती. मात्र, बँकेचे कर्ज डोक्यावर असताना राजस्थानला निघून जाणे म्हणजे कर्ज बुडवणे असे ठरले असते. कोणत्याही परिस्थितीत कर्जाची परतफेड केल्याखेरीज सोलापूर सोडून जायचे नाही असे त्यांनी ठरवले. पण तेव्हाही घरची चूल कशी पेटवायची, हा प्रश्न मेंदू पोखरत होताच. कर्जाचा आकडा होता तब्बल १८ लाख! परंतु ते फेडायचेच आणि कुटुंबालाही सावरायचे, असे दुहेरी आव्हान त्यांनी स्वीकारले आणि कंबर कसली.
अशा प्रसंगात कधी कधी माणुसकीचा ओलावाही मोठा दिलासा देऊन जातो. शंभुसिंह यांचे मित्र सत्यनारायण गुंडला यांनी स्वत:चे घर चौहान कुटुंबीयांना राहण्यासाठी दिले. घरासमोर स्मशानभूमी आणि अर्धा किलोमीटर परिसरात एकही घर नाही. पण अडचणीत असताना मिळालेला हा आधारही मोठा होता. याच घरात राहून कुटुंब सावरायचे असे चंद्रिकाताईंनी ठरवले. सुरुवातीला शिवणकाम करून कशीतरी गुजराण करू असा विचार होता. पण भाषेची अडचण होती. गुजराती आणि मोडकीतोडकी हिंदी हे त्यांचे संवादाचे माध्यम! मग त्यांनी ठरवले- मराठी शिकायचे. किमान व्यावहारिक आणि संवादापुरती भाषा आलीच पाहिजे. सोलापूरच्या कामगार कल्याण केंद्रात तेव्हा शिलाईकामाचा तीन महिन्यांचा पदविका अभ्यासक्रम होता. त्यासाठी त्यांनी अर्ज केला. त्या अभ्यासक्रमासाठी फीपोटी द्यावे लागणारे ६० रुपयेही तेव्हा त्यांच्याकडे नव्हते. ‘कपडे शिवून देईन, त्याचा मोबदला फीपोटी कापून घ्या,’ अशी गळ त्यांनी केंद्रप्रमुखांना घातली आणि अखेर त्यांना प्रवेश मिळाला. तीन महिन्यांत शिवणकामातील पदविका आणि हस्तकलेचे शिक्षणही त्यांनी पूर्ण केले. आणि शिलाईच्या परीक्षेत त्यांचा २६ केंद्रांतून पहिला क्रमांक आला.
आता आपण घेतलेले शिवणकामाचे शिक्षण इतरांनाही द्यायचे व त्यातून आपली आर्थिक घडी बसवायची असे त्यांनी ठरवले. आधी जवळच्या काही मत्रिणींना त्यांनी शिवणकाम शिकण्याचा आग्रह धरला. आर्थिक स्थिती चांगली असली तरी अंगात एखादी तरी कला असली पाहिजे असा आग्रह धरत त्यांनी शिलाई केंद्र सुरू केले आणि पाहता पाहता अनेक भागांत शिलाई केंद्रांचा पसारा पसरला. फॅशन डिझायिनग, एम्ब्रॉयडरी, रांगोळी, मेहंदी, टाकाऊपासून टिकाऊ, मोत्यांचे दागिने, सजावट अशा अनेक हस्तकलांचे वर्ग चंद्रिकाताईंनी सुरू केले. एकदा एखादी गोष्ट पाहिली की ती कशी करायची, हे त्यांना सहज कळायचे. शिलाई केंद्र चांगले सुरू झाले तेव्हा लातूरच्या डॉ. अशोकराव कुकडे यांनी सेवावस्तीत वर्ग सुरू करण्याचा सल्ला दिला, तेव्हा तेथील गरजूंना मदत करण्यासाठी मोफत वर्ग सुरू करण्यात आले.
पसे नाहीत म्हणून कोणाला अडवायचे नाही, हे सूत्र ठेवून त्यांनी हे वर्ग चालवले. दहा हजारांहून अधिक महिलांनी त्यांच्याकडून वेगवेगळय़ा कला आत्मसात केल्या. त्यांच्याकडे शिकलेल्या महिलांनी आणखी नवे वर्ग सुरू केले. चंद्रिकाताईंचे काम पाहून १९९७ साली भाजपने नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याचा त्यांना आग्रह केला. पण निवडणुकीसाठी पैसा लागतो, आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, असे सांगून त्यांनी त्यातून अंग काढून घ्यायचा प्रयत्न केल्यावर लोकांनीच पैसे गोळा केले. ११ हजार ८८६ रुपये जमा झाले आणि चंद्रिकाताई निवडणुकीत उतरल्या. प्रतिस्पध्र्यावर मात करून विजयीही झाल्या. नगरसेविका असतानाही शिलाई व विविध कलांचे वर्ग सुरू होते. मग त्यांनी स्वयंसहाय्यता संघ समूह (बचतगट) उभे करण्यास सुरुवात केली. त्या गटांच्या माध्यमातून विविध वस्त्यांतील कौटुंबिक कलह सोडवणे, लग्नं ठरवणे अशी कामे सुरू झाली. बाजारपेठेत लोकांना कामासाठी मजूर हवे असत. ते मिळवून देण्याचे काम त्या करत. त्यातून लोकांची गरज भागायची आणि गरजूंना रोजगारही मिळायचा. या साऱ्या समाजोपयोगी कामाचे फलित म्हणून २००१ मध्ये त्यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्या वेळी पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आल्या तेव्हा पतीची प्रकृती पुन्हा बिघडू लागली होती. हृदयावर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी तीन लाख रुपये खर्च येणार होता. या काळात त्या एका कंपनीच्या विक्री प्रतिनिधी म्हणून काम करत होत्या. लातूर, सांगली, अकलूज, सोलापूर या भागात सुमारे १०० महिला प्रतिनिधींचे एक जाळेच त्यांनी उभे केले होते. अधिक विक्री केल्यास कंपनीने सिंगापूर ट्रिपची संधी देऊ केली होती. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपली आíथक अडचण सांगितली व ठरल्यापेक्षा अधिक व्यवसाय केला. त्यातून कंपनीने त्यांच्या पतीसाठी शत्रक्रियेचा खर्च तर देऊ केलाच; शिवाय सिंगापूरची सहलही झाली.
त्यानंतर मात्र त्यांनी हे काम थांबवले. परंतु आíथक निकड कायमच होती. याच काळात त्यांना आणखीही काही समदु:खी महिला भेटल्या आणि आपल्याहूनही मोठय़ा समस्यांशी सामना करणारी कुटुंबे आसपास आहेत याची जाणीव चंद्रिकाताईंना झाली. या कुटुंबांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मदत करायची असा निर्धार त्यांनी केला. कारण केवळ एकदा मदत करून भागणार नव्हते. एका संध्याकाळी अशाच एका महिलेशी तिच्या समस्यांवर बोलत असताना चंद्रिकाताईंच्या डोक्यात एक कल्पना चमकली. ज्वारीच्या कडक भाकरीचा व्यवसाय तेव्हा अनेक घरांत लहान स्वरूपात सुरू होता. याच व्यवसायातून आता आपले घर चालवायचे आणि अनेकींना आधारही द्यायचा असे त्यांनी ठरवले. ५० भाकरी विक्रीसाठी टेबलावर ठेवून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. पण दोन-तीन दिवस विक्री झालीच नाही. मग त्यांनी चवीसाठी काहींना भाकरी मोफत दिल्या. काही दिवसांनी पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या मंडळींसाठी एका दानशूराने भाकरीची ऑर्डर नोंदवली आणि चंद्रिकाताई हरखून गेल्या. सुरुवातीलाच हा चांगला शकुन आहे असे समजून त्या उत्साहाने कामाला लागल्या. सहकारी महिलांना गोळा केले आणि तब्बल तीन हजार भाकऱ्यांची ही पहिली मोठी ऑर्डर त्यांनी पूर्ण केली.
पुढे काही दिवसांनी ‘उद्योगवर्धिनी’ या संस्थेच्या महिला मेळाव्यासाठी आलेल्या सुमारे साडेसात हजार महिला जमल्या होत्या. त्याच दिवशी वर्तमानपत्रात ‘भाकरीचा चंद्र उगवला’ अशी बातमी आली व त्यानंतर चंद्रिकाताईंकडे भाकरीच्या मागणीचा ओघ सुरू झाला. पाहता पाहता सोलापुरातील अनेक महिलांचे जाळेच चंद्रिकाताईंच्या भाकरी व्यवसायात सामील झाले. उद्योगवर्धिंनीच्या प्रेरणेतून सुमारे अडीचशे महिला दररोज १५ हजार भाकऱ्या तयार करून विकतात. ६० ठिकाणी विक्री केंद्रे सुरू झाली. उद्योगवर्धिंनीने हे काम सुरू केल्यानंतर सोलापुरात कडक भाकरी व शेंगाची चटणी या व्यवसायाने गती घेतली. सध्या दररोज किमान एक लाखाहून अधिक भाकऱ्या विकल्या जात आहेत. आता महाराष्ट्राबरोबरच विदेशातही या भाकरीची विक्री होते.
महिला बचतगटांचे काम सुरू झाले तेव्हा या संस्थेचे नाव ‘उद्योगवर्धिंनी’ असे ठेवावे असे नानाजी देशमुख यांनी सुचवले होते. संस्था नोंदणी करताना त्यांनी ‘उद्योगवíधनी’ हेच नाव निश्चित केले. महिलांना उद्योगाची प्रेरणा देणे हे तिचे प्रमुख काम. भाकरी, शेंगाची चटणी याबरोबरच लसूण, कारळ, जवस अशा विविध प्रकारच्या चटण्या, काळा मसाला, शेवया, पापड, भरली मिरची असे विविध खाद्यपदार्थ २०० महिला तयार करतात. प्रत्येकीचा गट आहे. या गटाने तयार केलेल्या मालाची उद्योगवíधनीमार्फत विक्री होते. संस्थेची एकूण उलाढाल आज कोटीच्या घरात गेली आहे. सध्या संस्थेकडे ३५ शिलाईयंत्रे आहेत. रोटरी क्लबमार्फत १०० वृद्धांना तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्येही सुमारे १०० जणांना दररोज एक वेळचे जेवण पुरवले जाते. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून २००८ पासून उद्योगवर्धिंनीतर्फे ही सेवा सुरू आहे. याशिवाय दीड हजार शालेय मुलांचा पोषण आहार दररोज शिजवला जातो. ‘जैन रोटी घर’ हा शंभर व्यक्तींसाठी गरम पोळी-भाजी तयार करून देण्याचा उपक्रम २०१२ पासून सुरू झाला आहे.
याशिवाय गरजू लोकांना दोन वेळचे जेवण मोफत पुरवले जाते. त्यात ७३ व्यक्तींचा समावेश आहे. चंद्रिकाताईंनी आतापर्यंत आठ हजार महिलांना शिलाईकाम शिकवले असून त्यापकी अडीच हजार महिलांना त्यातून रोजगाराचा हक्काचा मार्ग गवसला आहे. यापैकी १८२ महिला उद्योजिका बनल्या आहेत. ज्या वृद्धांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही अशांचे मातृ-पितृपूजन केले जाते. त्यांच्या एकसष्टीपासून सहस्रचंद्रदर्शनाचे कार्यक्रम केले जातात. दरवर्षी २०० ते २५० वृद्धांसाठी हे कार्यक्रम होतात. वंचित लोकांसाठी दिवाळीच्या फराळाचे वाटप केले जाते. ५०० ते ८०० महिलांना भाऊबीज दिली जाते. समाजातून साडी-चोळी गोळा करून त्या गरजूंपर्यंत पोहोचवल्या जातात. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहाव्यात, सक्षम बनाव्यात, पाककलेत तरबेज व्हाव्यात यासाठी प्रशिक्षण उपक्रम राबविले जातात. लातूरच्या विवेकानंद संस्कार केंद्रात गुणवंतीबेन महिला सक्षमीकरण केंद्रासोबतही चंद्रिकाताई काम करत आहेत. लातुरात त्यांनी कडक भाकरीचे प्रशिक्षण वर्ग घेतले. पहिल्याच दिवशी तब्बल २५० महिला त्यात सहभागी झाल्या. सोलापूरनंतर आता आसपासच्या ठिकाणी जाऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपला वेळ देण्याचे चंद्रिकाताईंनी ठरवले आहे. १८ लाख रुपयांचे कर्ज खिशात दमडा नसताना स्वत:च्या कर्तृत्वावर चंद्रिका चौहान या महिलेने केवळ आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर फेडले. आज त्या कुटुंबीयांबरोबर समाजाच्याही आधारस्तंभ बनल्या आहेत आणि कसे जगावे, याचा वस्तुपाठ देत आहेत.
प्रदीप नणंदकर /pradeepnanandkar@gmail.com
दिनेश गुणे dinesh.gune@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा