पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अस्तित्वाच्या उंबरठय़ावर उभ्या ठाकलेल्या वनस्पती व सजीवांच्या भविष्याची चिंता सारेच करतात. त्यावर अभ्यास होतात. चर्चासत्रे झडतात. लिखाण होते. सरकारी समित्या स्थापन होतात. अशांच्या रक्षणाच्या आणाभाका घेत त्यांच्यावर पाण्यासारखा पैसाही खर्च केला जातो. त्यांचे कागदी अहवाल तयार होतात. समस्येचे भीषण रूप समोर येते आणि नष्ट होऊ पाहणाऱ्या या ठेव्याच्या जतनासाठी काहीतरी केले पाहिजे असा निष्कर्ष काढून नव्या जोमाने तेच चक्र पुन्हा फिरू लागते. गेल्या कित्येक दशकांचा हा अनुभव दूर सारून प्रत्यक्ष काहीतरी करण्याची तळमळ दाखवणारी मोजकी मने आता जागी होऊ लागली आहेत. नाशिकच्या जुई पेठे यांनी त्यासाठी कंबर कसली आणि घर-संसाराची जबाबदारी वडीलधाऱ्यांवर सोपवून त्या रानोमाळ भटकू लागल्या. एका बाजूला नष्ट होणाऱ्या वनस्पती व जैवसृष्टीचा अभ्यास करत असताना आपण मिळवतो त्या पुस्तकी ज्ञानातून माहिती मिळते, पण जाणिवा जिवंत होत नाहीत याची त्यांना खात्री पटली. जंगलात राहणारे, पुस्तकापासून कोसो दूर असलेले आदिवासी केवळ जाणिवांच्या जोरावर या समस्या सोडवत आहेत, हे पाहून त्या भारावून गेल्या आणि या आदिवासींच्या साथीनेच त्यांनी स्वत:ला या कामात झोकून दिले. जुई पेठे यांच्या कामामुळे पश्चिम घाटातील नष्ट होऊ पाहणाऱ्या वनस्पती व जैवविविधतेला नवी संजीवनी मिळते आहे..
जंगलात चरण्यासाठी जाणाऱ्या गुराढोरांमुळेही जैवविविधतेचे नुकसान होते. जंगलातील नैसर्गिक संपदेचे जतन व्हावे हा विचार फारसे कोणी करत नाहीत. परंतु कळसुबाई, हरिश्चंद्रगड परिसरातील परंपरागत पशुपालक आदिवासी जमाती तसा विचार करतात. या पट्टय़ातील ग्रामस्थ देवराईंचे संरक्षण-संवर्धन करतात. शिवाय खास गुरांच्या चाऱ्यासाठी असलेल्या ‘राखण राना’ची पिढय़ान् पिढय़ा निगुतीने देखभाल करतात. राखण रानाच्या क्षेत्रात गुरांच्या चाऱ्याव्यतिरिक्त दुसरे काही पेरले जाणार नाही याची दक्षता घेतात. चराईस या क्षेत्रात प्रतिबंध आहे. हे गवत कापून गुरांना दिले जाते. उन्हाळ्यात टंचाईच्या काळात हा चाराच त्यांच्या पशुधनाची भूक शमवतो. गुरांना प्रवेश नसल्याने त्यांच्या चरण्यामुळे होणारे नुकसान टळते. अशा तऱ्हेने जैवविविधतेचे संवर्धन होत असल्याने गवताच्या अनेक वेगळ्या जाती येथे सापडतात. चाऱ्याचे शाश्वत उत्पादन मिळते. नैसर्गिक चाऱ्याच्या संवर्धनासाठी संपूर्ण पश्चिम घाटात कुठेही या स्वरूपाची संकल्पना अस्तित्वात नाही. पर्यावरण संशोधक जुई पेठे यांनी आदिवासी पाडय़ांत फिरून, राखण रानात वणवण करून या परंपरेचा अभ्यास केला आणि खुद्द पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी त्यांच्या कामावर शिक्कामोर्तब केले आहे. राखण रान ही टंचाईकाळात गुरांच्या चाऱ्याची समस्या सोडविण्याची आगळी योजना असू शकते, हे आता सरकारला उमगू लागले आहे..
जैवविविधतेचा अभ्यास व संवर्धनाच्या प्रक्रियेत अहोरात्र स्वत:ला बुडवून घेतलेल्या जुई पेठे यांच्याकडून निसर्गातील असे सूक्ष्म पदर उलगडू लागले की पर्यावरणाचा ऱ्हास, जैवविविधतेसमोरील संकटे यांचे विक्राळ रूप आपल्या डोळ्यांसमोर आ वासून उभे राहते. पश्चिम घाटातील जैवविविधतेचा अभ्यास आजवर अनेकांनी केला आहे. पण या घाटाच्या उत्तरेकडील टोकाच्या पट्टय़ाकडे मात्र फारसे कुणी फिरकलेले नाही. या परिसरातील जैवविविधतेचा नीटसा अभ्यास झालेला नाही. ही उणीव जुई पेठे यांना जाणवली आणि ती भरून काढण्यासाठी त्या झपाटून कामाला लागल्या. पर्यावरणाचा अभ्यास हा तर त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील ध्यास होताच; त्यामुळे महाविद्यालयीन जीवनातच त्या निसर्गाच्या सान्निध्यात रमल्या. गिर्यारोहण हा त्यांचा आवडता छंद. त्यामुळे निसर्गाशी नाळ जोडलेली राहील असेच करिअर निवडायचे हे त्यांचे ठरलेलेच होते. नाशिकमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी थेट वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कृषीशास्त्राची पदवी मिळवली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषीविकास शिक्षणक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. एका छोटय़ा औद्योगिक युनिटवर उभ्या असलेल्या त्यांच्या मध्यमवर्गीय घरात तत्पूर्वी शेती वा वनस्पतीशास्त्रावर साधी चर्चादेखील होत नसे, तिथे निसर्गाशी नाते जोडणारे प्रयोग सुरू झाले. पुढे लग्नानंतरही वेगळी वाट धुंडाळणाऱ्या जुईच्या सासरीदेखील तिच्या या कामाचे कौतुकच झाले. त्या विश्वासावरच लहानग्या मुलीला घरी ठेवून रानावनाचा वसा जुईने घेतला आणि मुक्त भटकंती सुरू झाली. कारण आपल्याला काय करायचे आहे, हे तिचे ठरलेलेच होते. त्यासाठी निसर्गाची नुसती ओळख पुरेशी नव्हती, तर निसर्गाशी थेट नाते जोडायचे होते..
या क्षेत्रात स्त्री-अभ्यासकांची संख्या तुलनेनं कमी. कारण प्रत्यक्ष भटकंतीसाठी वेळ देण्यास स्त्रियांना मर्यादा पडतात. जुईला ही अडचण जाणवली नाही. कारण घरच्यांचा पाठिंबा आणि स्वत:च्या नियोजनावर पूर्ण विश्वास यांचा भक्कम आधार सोबतीला होता.
इगतपुरी आणि आसपासच्या आदिवासी पट्टय़ांत डांग गुरांची स्थानिक प्रजाती आहे. लोकपंचायत सामाजिक संस्था या प्रजातीच्या संवर्धनार्थ काम करते. भरपावसातही जोमाने काम करण्याची या प्रजातीची क्षमता अचाट असते. ही गुरे जो चारा खातात, त्याचा अभ्यास करताना राखण रानाची नवी माहिती जुई यांनी समोर आणली. राखण रानाची संकल्पना पश्चिम घाटात कुठेही अस्तित्वात नाही. या अनोख्या संकल्पनेची माहिती मिळाल्यानंतर भीमाशंकर व परिसरात गवत संवर्धनाच्या या परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी आता आणखी हातांची साथ जुईला मिळाली आहे. पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनीही आता याकामी पुढाकार घेतला आहे.
पश्चिम घाटातील दक्षिण महाराष्ट्राच्या परिसरात लाल रंगाचा बेसॉल्ट दगड आढळतो, तर उत्तरेकडील भागात काळा दगड. दोन्ही ठिकाणच्या जमिनीचा पोतही वेगवेगळा. त्यात नाशिक जिल्ह्यचा परिसर त्याहूनच वेगळा. कारण इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी होते, तर लगतच्या सिन्नरमध्ये दुष्काळ. या सगळ्याचा स्थानिक जैवविविधतेशी निकटचा संबंध असतो. याचा प्रत्यय वन विभागाच्या सहकार्याने अंजनेरी प्रकल्पावर काम करताना जुई पेठेंना आला. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी हे प्रस्तावित संरक्षित वनक्षेत्र. अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासात स्पष्ट झाले. त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात. ‘सिरोपेजिया अंजनेरिका’ ही दुर्मीळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही. ज्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे अशा काही वनस्पती या ठिकाणी मात्र अद्यापि तग धरून आहेत. काळ्या कातळात अतिशय कमी मातीचा थर असतो. या परिस्थितीत अनेक वैशिष्टय़पूर्ण वनस्पती वाढतात. त्यात कंद, कीटकभक्षी वनस्पती आहेत. परंतु वाढत्या पर्यटनामुळे त्यांच्याही अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या डोंगरावर भाविकांबरोबर भटकंतीसाठी येणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. जागतिक मैत्र दिनी या ठिकाणी दहा हजारावर लोकांचा वावर होता. या पर्यटनात पायदळी तुडवल्या जाणाऱ्या दुर्मीळ वनस्पतींची काय अवस्था होईल, या विचारानेच जुई पेठे अस्वस्थ झाल्या. आणि त्यांनी माणसांचा हा मुक्त वावर दुर्मीळ वनस्पतींचे अस्तित्व नष्ट करणारा ठरेल, याची जाणीव त्यांनी स्थानिक युवकांना करून दिली. आता या वनस्पती काहीशा आश्वस्त झाल्या आहेत..
जुईची संजीवनी!
शिवाय खास गुरांच्या चाऱ्यासाठी असलेल्या ‘राखण राना’ची पिढय़ान् पिढय़ा निगुतीने देखभाल करतात.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-08-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व बावनकशी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspirational story of jui pethe