तेरा वर्षांपूवी- २००३ च्या जुलै महिन्यातले पावसाळ्याचे ऐन भरातले दिवस. समुद्रही बेफाम उधाणलेला. अशा वेळी एक तरुण त्याच्या काही जिगरबाज मित्रांना साथीला घेऊन छोटय़ाशा बोटीतून त्या उसळत्या लाटांवर स्वार होतो. काही अंतरावर खोल समुद्रात हेलकावे खात असलेलं ‘अल मूर्तदा’ हे लेबनीज जहाज किनाऱ्यावर सुखरूप आणण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली असते. खवळलेल्या सागरावर स्वार होऊन ही मोहीम फत्ते करणं सोपं नसतं. नौदल आणि तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरसह आधुनिक साधनांच्या मदतीने या जहाजाची सुटका करण्याचे पंधरा दिवसांचे प्रयत्न अपयशी ठरलेले असतात. छोटय़ा बोटीतून या भरकटलेल्या जहाजाजवळ जाऊन दोर टाकून त्याला कह्यत आणायचं असतं. हे काहीसं उधळलेल्या घोडय़ावर मांड ठोकण्यासारखंच. कारण भोवताली पंधरा-वीस फूट उंचीच्या लाटांचं तांडव. दोर टाकताना जरा जरी अंदाज चुकला तरी बोट आणि जहाजाच्या मध्ये चिरडलं जाऊन मागमूसही उरणार नव्हता. पण समुद्राची गाज ऐकत जन्मलेल्या, त्याच्या लाटांच्या झोक्यावर कित्येक दिवस आणि रात्री घालवलेल्या त्या तरुणालाही त्याच्याशी मस्ती करण्याची जणू खुमखुमी असते. तो हे आव्हान स्वीकारतो. अशा कारवाईचा पूर्वानुभव आणि कौशल्य पणाला लागतं. चिकाटीच्या प्रयत्नांनंतर मोहीम फत्ते होते. समुद्री लाटांच्या कराल दाढांमधून स्वत:सह जहाजाची सुखरूप सुटका करत सर्वजण किनाऱ्यावर येतात. रत्नभूमीच्या या साहसी सुपुत्राचं नाव असतं- मरीनर कॅप्टन दिलीप भाटकर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अर्थात हे केवळ नशीब बलवत्तर असल्यामुळे घडलं नव्हतं. दर्यावर्दी घराण्याचा वारसा, तंत्रज्ञानावर हुकमत आणि जन्मजात साहसी वृत्ती यांच्या मिलाफातून हे साध्य झालं होतं. रत्नागिरीजवळ एकेकाळी मिठाचं आगर असलेलं भाटय़े हे लहानसं गाव. तीन बाजूंनी काजळी नदी आणि एका बाजूला समुद्र. त्यामुळे भाटकरांचं जन्मापासूनच खाडी आणि समुद्राशी अतूट नातं जुळलेलं. भरती-ओहोटीच्या पाण्यात मासे व खेकडे पकडणं, छोटय़ा होडय़ा वल्हवणं, शेतीची कामं करणं अंगवळणी पडून गेलेलं. घरची आर्थिक स्थिती बेताची. पण आजोबांच्या काळी त्यांचा शिडाच्या गलबतांमधून मालवाहतुकीचा व्यवसाय होता. मुंबई ते कालिकत या सागरी मार्गावर रेशनचं धान्य, मंगलोरी कौलं, बर्फ, कारवारी लाकूड इत्यादी या गलबतांमधून कोकणातल्या खाडय़ा व समुद्राकाठच्या बंदरांपर्यंत पोचवलं जायचं. वडीलही छोटय़ा होडय़ांचं बांधकाम व सुतारकाम करायचे. त्यामुळे मच्छिमारीच्या होडय़ांचं बांधकाम व दुरुस्ती जवळून पाहिलेली. स्वाभाविकपणे कॅ. भाटकरांचा शालेय जीवनापासूनच तांत्रिक शिक्षणाकडे कल होता. रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनातून १९७२ मध्ये त्यांनी प्रथम श्रेणीत पदविका संपादन केली आणि त्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थितीशी झुंज चालूच होती. वडील दरमहा पन्नास रुपयांची मनिऑर्डर पाठवायचे, तर दोन आत्यांनी अभ्यासाची पुस्तकं व कपडे पुरवण्याची जबाबदारी उचलली. गुणवत्तेच्या बळावर भाटकरांनी राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळवल्यामुळे शिक्षण सुकर झालं आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी मिळवत त्यांनी पदवी संपादन केली.
आता अर्थार्जनाला सुरुवात करून कुटुंबाला हातभार लावण्याचा दबाव होता. त्यांनी रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. पण भाटकरांचं मन त्यात रमत नव्हतं. अखेर नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईत माझगाव डॉकमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कालावधी पूर्ण करून १९७६ मध्ये ते मोगल लाइन्स कंपनीत रुजू झाले. या कंपनीच्या जहाजांवर काम करताना जगातल्या सर्व समुद्र आणि महासागरांमधून भ्रमंती तर झालीच; शिवाय त्यातून मिळालेला कार्यानुभव भावी वाटचालीसाठी अतिशय मोलाचा ठरला. १९८१ मध्ये मरीन इंजिनीअरिंगमध्ये द्वितीय श्रेणी आणि १९८४ मध्ये प्रथम श्रेणीत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना सेकंड इंजिनीअर या पदावर बढती मिळाली आणि ते ‘मरीनर कॅप्टन दिलीप भाटकर’ झाले. दरम्यान, मोगल लाइन्स कंपनी र्मचट्स शिपिंग कापरेरेशन ऑफ इंडिया या कंपनीत विलीन झाली. भाटकरांना तिथेही कामाची संधी होती, पण अशा देश-विदेशाच्या सफरींपेक्षा त्यांना कोकणातील आपल्या घरालगतचा बालपणापासून सखा असलेला समुद्र खुणावत होता. ते १९८५ मध्ये गोव्याच्या चौगुले स्टीमशिप्स कंपनीत रुजू झाले. पाच र्वष कंपनीच्या जहाजांवर मुख्य अभियंता म्हणून काम करताना जगाची सफर घडली. १९९० अखेरीस कंपनीच्या जहाजांच्या व्यवस्थापन विभागात त्यांचा समावेश झाल्याने कंपनीसाठी परदेशात जाऊन जहाजं बांधून घेणं, खरेदी करणं आणि त्यांच्या सागरी चाचण्या घेऊन भारतात आणण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या कॅप्टन भाटकर यशस्वीपणे पार पाडू लागले. त्यातून जहाज- बांधणी, खरेदी-विक्री, सुक्या गोदीमध्ये जहाजांच्या तळाची दुरुस्ती इत्यादी अंगांचा मौलिक अनुभव त्यांना मिळाला आणि तोच पुढे एकविसाव्या शतकातल्या त्यांच्या वाटचालीची शिदोरी ठरला.
नौकानयन क्षेत्रात जागतिक पातळीवर वावरत असतानाही भाटकरांची नाळ कोकणातल्या मातीशी घट्ट जुळलेली होती. त्यामुळे अशा प्रकारे परदेशातल्या कंपन्यांकडून जहाजं बांधून घेण्यापेक्षा कोकणच्या किनाऱ्यांवरील बंदरांमध्ये जहाजदुरूस्ती प्रकल्प उभे करण्याचा प्रस्ताव त्यांनी चौगुले कंपनीच्या संचालक मंडळापुढे मांडला. त्यासाठी रत्नागिरी, जयगड, विजयदुर्ग या ठिकाणी स्वत: ही जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही दाखवली. भाटकरांच्या कर्तबगारीवर चौगुले मंडळी खूश असल्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि १९९७ च्या मे महिन्यात चौगुले कंपनीचं जहाज विजयदुर्गच्या धक्क्य़ाला लागलं. तत्पूर्वी १९६८ मध्ये ‘रोहिदास’ हे प्रवासी जहाज या धक्कय़ावर आलं होतं. त्यानंतर तब्बल २९ वर्षांनी या परिसराला ऊर्जितावस्था येण्याची सुचिन्हं दिसू लागली आणि इथल्या माणसांनी अक्षरश: दिवाळी साजरी केली.
यापाठोपाठ रत्नागिरी तालुक्यात सांडेलावगण गावच्या किनाऱ्यावर बारमाही बंदर उभारण्यासाठी चौगुले कंपनीने लावगणच्या परिसरात सुमारे ३०० एकर जमीन खरेदी केली आणि १९९९ पासून आंग्रे पोर्टची उभारणी सुरूझाली. ‘चौगुले स्टीमशिप्स’ या बंदर प्रकल्पात स्थानिक मंडळींनी एकत्र येत युनायटेड उद्योगसमूहाच्या बॅनरखाली जहाजदुरुस्तीची कामं सुरू केली. त्याबरोबर लावगण बंदरातून मालाची निर्यातही सुरूझाली. या प्रक्रियेत निरनिराळ्या लहान घटकांना एकत्र आणून कॅप्टन भाटकरांनी २००१ मध्ये ‘मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लि.’ या कंपनीची स्थापना केली. एव्हाना चौगुले घराण्याची तिसरी पिढी व्यवसायात आली होती. बंदर उभारणी व विकासाच्या कामात स्थानिकांना संधी न देता परदेशी तंत्रज्ञ नेमण्याचं धोरण कंपनीतर्फे स्वीकारण्यात आलं. त्यामुळे कॅ.भाटकरांनी तिथून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि २००५ पासून जयगड खाडीतल्या काताळे गावच्या किनाऱ्यावर ‘युनायटेड डॉकयार्ड’ या नव्या बंदर प्रकल्पाची उभारणी केली. या बंदरातून कोल्हापूर जिल्ह्यतून बॉक्साईट आणि कोकणातून जांभा दगडाची निर्यात होऊ लागली. पण पश्चिम घाट विकास अभ्यास समितीच्या शिफारशींमुळे या खनिजांच्या उत्खननावर बंदी आली. स्वाभाविकपणेच त्यांची निर्यातही रोडावली. यावर उपाय म्हणून भाटकरांनी जहाजदुरुस्तीच्या कामांवर लक्ष केंद्रित केलं आणि अल्पकाळात त्यातही यश मिळवलं.
नादुरुस्त जहाजं किनाऱ्यालगतच्या पाण्यात उचलून त्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्यासाठी ‘फ्लोटिंग ड्राय डॉक’ची गरज असते. यापूर्वी आपल्या देशात काही कंपन्यांनी परदेशातून अशा प्रकारची डॉक बांधून आणली होती. पण आपल्या देशात असा प्रकल्प साकारला नव्हता. कॅ. भाटकरांनी हे आव्हान स्वीकारलं आणि देशातल्या पहिल्या ‘फ्लोटिंग ड्राय डॉक’चं गेल्या मे महिन्यात यशस्वी जलावतरण झालं. काताळे शिपयार्ड कंपनीसाठी मरीन सिंडिकेटने ही कामगिरी केली. रत्नागिरीपासून ४८ कि. मी. अंतरावर जयगड खाडीतील काताळे बंदरात हा प्रकल्प साकारला असून, या गोदीची लांबी ८० मीटर, रुंदी २४ मीटर, तर उंची ९.२ मीटर आहे. समुद्रात विहरणाऱ्या सर्व प्रकारच्या जहाजांना पाण्याखालील तळाची दुरुस्ती करण्यासाठी सुक्या गोदीची गरज असते. ही जहाजं या गोदीमध्ये घेऊन, पाण्याबाहेर संपूर्ण वर उचलून त्यांची दुरुस्ती केली जाते. मुंबई बंदरात अशा प्रकारच्या दुरुस्ती कामासाठी ब्रिटिशकालीन गोदी आहे. पण स्वातंत्र्यानंतर देशात उभारण्यात आलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.
भारतीय जहाजांच्या दर्जेदार बांधणीसाठी नियमन करणाऱ्या इंडियन रजिस्ट्रार ऑफ शिपिंगने घालून दिलेल्या नियमावलीनुसार या गोदीचं बांधकाम केलेलं असून गोव्याचे नेव्हल आर्किटेक्ट राजेश बेळगावकर यांच्या ‘आर्कटाइप’ या कंपनीने प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार खास रासायनिक प्रक्रिया आणि भौतिक गुणधर्म असलेल्या पोलादाचा वापर करून सर्व बांधणी किनाऱ्यावर पूर्ण झाल्यावर आणि आयआरएसतर्फे त्याचं सर्वेक्षण केल्यानंतर प्रत्यक्ष जलावतरण झालं आहे. येत्या काळात आयआरएसच्या मार्गदर्शनाखाली पाण्यातील या गोदीच्या विविध तपासण्या व अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता केली जाईल. त्यानंतर जयगड खाडीत विशिष्ट जागी दहा मीटर खोल पाण्यात ही गोदी स्थिर करून प्रत्यक्ष जहाजदुरुस्तीची कामे सुरू होतील. १२५० टन वजनाच्या या गोदीवर १८०० टन वजनापर्यंतची जहाजे उचलून दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.
जुनी, निकामी झालेली जहाजं तोडून त्यांचे सुट्टे भाग भंगार म्हणून विकले जातात. हा मोठी उलाढाल असलेला व्यवसाय आहे. पश्चिम किनारपट्टीवर अशी जहाजं तोडण्याची सुविधा माझगाव डॉक आणि गुजरातमध्ये अलंग इथे आहे. पण कोकण किनारपट्टीवर या सेवेची असलेली उणीव लक्षात घेऊन जयगडच्या या बंदर प्रकल्पामध्ये याही सुविधेसाठी सध्या जुळवाजुळव सुरू आहे.
रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील स्थानिक तंत्रज्ञ, वेल्डर, फिटर यांच्यासह कंपनीतील तंत्रशिक्षण घेतलेल्या मुलींचाही या बंदर प्रकल्पाच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा आहे. यात अरुंधती सावंत- इलेक्ट्रिकल, अरुणा मायनाक- मेकॅनिकल ड्राफ्ट्समन आणि संज्योक्ती सुर्वे व्यवस्थापकीय जबाबदारी सांभाळत आहेत. कंपनीतले सर्व कर्मचारी कंपनीचे भागधारक आहेत. त्यांच्यापैकी काहीजण संचालकही आहेत. आपल्याबरोबर काम करणारे सर्व कुशल-अर्धकुशल कामगार स्थानिकच असले पाहिजेत, ही भूमिका भाटकरांनी सुरुवातीपासून ठेवली आहे. त्यातून दोन-अडीचशे लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून, ‘कोकणवासीयांचा कोकणातील स्वत:चा बंदर प्रकल्प’ ही संकल्पना इथे प्रत्यक्ष साकार झाली आहे. याचबरोबर भविष्यात भाटय़ाच्या खाडीमध्ये हाऊसबोटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचं आणि उत्कृष्ट दर्जाचं ‘मेरीटाइम म्युझियम’ उभं करण्याचं कॅ. भाटकरांचं स्वप्न आहे.
आपली जीवनप्रेरणा उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून व्यवहारातही यशस्वीपणे विकसित होण्याचं भाग्य फार थोडय़ा लोकांना लाभतं. कॅप्टन भाटकर त्यापैकी एक आहेत. निसर्गाच्या अथांग, अद्भुत रूपाशी तादात्म्य पावत त्यांनी ही किमया साधली आहे.
pemsatish.kamat@gmail.com
dinesh.gune@expressindia.com