दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणावर एका विदेशी दिग्दर्शिकेने बनवलेल्या ‘इंडियाज् डॉटर’ या माहितीपटाने हलकल्लोळ माजला. त्यात या प्रकरणातील आरोपी व त्यांच्या वकिलाने उधळलेल्या मुक्ताफळांनी भारतीय समाजाची नैतिकता जणू रसातळाला गेली आहे अशी जगाची समजूत होईल, या भीतीपोटी सरकारने त्याच्यावर बंदी घातली. परंतु तरीही तो प्रदर्शित झालाच. त्यावर मग उलटसुलट चर्चा व प्रतिक्रियांचे पेव फुटले. यासंदर्भात विचारशील तरुणाईचे नेमके काय म्हणणे आहे, हे जाणून घेणारे तरुण रंगकर्मीचे लेख..
काही वेळापूर्वी फेसबुकवर एकाने लिहिलेलं वाचलं- ‘BBC should make a documentary named ENGLAND’S SLAUGHTER.काही वेळाने कळलं, की हा संदर्भ क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडचा बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा होता. ते जरी असलं तरी पहिला संदर्भ हा ‘India’s Daughter’चाच होता. त्यानंतर मी असे अनेक ‘स्टेटस’ वाचले. काहींनी तर त्या माहितीपटाच्या दिग्दíशकेला उद्देशून पत्रे लिहिली होती. अगदी आकडे देऊन मुद्देसूद पत्र. त्यामध्ये असं काहीसं लिहिलं होतं की, इंग्लंड-अमेरिकेमध्ये भारतापेक्षा जास्त बलात्कार कसे होतात, वगरे वगरे. म्हणजे ‘आधी स्वत:चं बघा, आम्हाला शिकवायला येऊ नका!’ थोडक्यात काय, तर देशाभिमान दुखावला गेला होता. एका वृत्तपत्राने तर हा माहितीपट करताना त्या दिग्दर्शिकेने आणि तिच्या कंपनीने कसे गरप्रकार केले होते, यावर सविस्तर, तपशीलवार लेख लिहिला होता. आपल्या सरकारने तर या माहितीपटाच्या प्रक्षेपणावरच बंदी घातली. या सगळ्यामुळे बाकी काही घडलं नसेल, पण एरवीपेक्षा जास्त लोकांनी तो माहितीपट पाहिला, हे मात्र नक्की!
मी पण तो माहितीपट नुकताच पाहिला. ‘चांगला-वाईट’ हे वैयक्तिक मत झालं. त्याबद्दल काही बोलायला नको. पण प्रत्येक कलाकृतीतून काहीतरी मिळतंच! तर या कलाकृतीतून अपराध्यांपकी एकाचे विचार आणि त्याचबरोबर त्यांच्या वकिलांचेही विचार कळले. १६ डिसेंबरला जे घडलं ते नि:शंक घृणास्पदच होतं. चीड आणणारंच होतं. आणि कोणाला तरी अपराध्यांची बाजू घ्यावीशी वाटली, आणि नंतर आपल्या भूमिकेबद्दल ठाम राहावंसं वाटलं, हे पाहून धक्काच बसला. सगळ्यांनी पुरोगामीच असावं हे तर शक्य नाही; पण त्यांचे विचार ऐकून आणि त्या विचारनिर्मितीची प्रक्रिया पाहून नि:शब्द व्हायला झालं.
पण एक गोष्ट मला अजून कळली नाही, ती ही की, या माहितीपटाला इतका विरोध का? आणि माहितीपट पाहून तर अजूनच विचारात पडलोय. म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आपल्याकडे नाही, हे तर आता कळून चुकलंच आहे. पण या माहितीपटात असं काय आहे, की त्याला विरोध व्हावा? आणि तोही इतका! म्हणजे थेट सरकारनेच त्यावर बंदी आणावी! आणि त्या बंदीचं समर्थन हे असं फेसबुकवर लोकांनी करावं. आधी मला वाटायचं की, याचा संबंध थेट शिक्षणाशी आहे. जसा शिक्षितवर्ग वाढेल, तसं हे कमी होईल. पण फेसबुक वापरू शकताहेत म्हणजे किमान शिक्षण तर झालंच असणार!त्यापलीकडे जाऊन माझं म्हणणं असं आहे की, जी वस्तुस्थिती आहे ती त्यांना का मान्य करवत नाही? १६ डिसेंबरला ही घटना घडली हे खोटं आहे का? मुकेश नावाच्या अपराध्याचे जे विचार आहेत ते खोटं आहे का? त्याच्या वकिलांचे जे विचार आहेत ते खोटं आहे का? जे खरं आहे ते मान्य केलंच पाहिजे! त्याची एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून, एक पुरुष म्हणून आपल्याला लाज वाटत असेल तर ती वाटलीच पाहिजे! आणि याबाबतीत आपण खरंच काही देशांच्या बरेच मागे आहोत, हेही मान्य केलंच पाहिजे. जर्मनीमध्ये हिटलरच्या काळचे concentration camps अजूनही टिकवून ठेवले गेले आहेत. या जागा तर नीचपणाचं सगळ्यात मोठं प्रतीक आहेत. ‘त्या टिकण्यामागे खरं तर अमेरिका आहे..’ वगरे वक्तव्ये केली जाऊ शकतात. पण वस्तुस्थिती ही आहे, की तिकडे सगळ्यांनी त्यांचा हा इतिहास मान्य केलेला आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणावरील ‘इंडियाज डॉटर’ या माहितीपटाचं प्रक्षेपण व्हायच्या आधीच लोकांनी त्याला नावं ठेवायला सुरुवात केली, त्याच्याविरुद्ध लिहू लागले, चर्चा होऊ लागल्या! आणि नेमका मुद्दा काय आहे, कशामुळे ते इतके चिडलेत, हेच कळेना! ज्या बाईने ही डॉक्युमेंटरी दिग्दíशत केली ती भारतीय नाही म्हणून, की आपल्या देशाची जागतिक पातळीवर मानहानी झाली म्हणून? आणि यामुळे खरंच झाली का आपली मानहानी? हा माहितीपट तिला का करावासा वाटला, याचा थोडं थांबून कोणी विचार केला का? का केला असेल हा माहितीपट? एक सामूहिक बलात्कार झाला म्हणून? बलात्काऱ्यांनी विकृत पद्धतीने त्या मुलीला जखमा केल्या म्हणून? त्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला म्हणून? हे लिहिताना अत्यंत लाज वाटते. पण हे असं काही घडायची ही पहिलीच वेळ नव्हती आणि शेवटचीही नाहीये. याआधी आपल्याकडे अगदी पुण्यात नयना पुजारी केस झाली आहे. यानंतरही बदाऊनमध्ये असे प्रकार झालेच आहेत!
तो माहितीपट पाहून मला असं वाटतं, की तो करावासा वाटला, याचं कारण त्यानंतर जी उत्स्फूर्त लोकप्रतिक्रिया होती ती जगावेगळी होती. अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेणारी होती. इकडे अजूनही लोकशाही जिवंत आहे हे दाखवून देणारी होती. हे झाल्या झाल्या देशभर.. खासकरून दिल्लीत निदर्शनं झाली; जी खरोखरच भावनिक होती. लोकांना याबद्दल काहीतरी ठोस घडावं असं खरंच मनापासून वाटत होतं. त्यामागे इतर कोणताही सुप्त हेतू नव्हता. आणि हे विलक्षण होतं! त्यामुळेच या घटनेला इतकं महत्त्व मिळालं.
जे झालं त्याच्याविरुद्ध संवेदनशील माणसांनी खवळून उठणं बरोबरच आहे. पण हे का झालं, याचाही विचार होणं गरजेचं आहे. हा फक्त लंगिक भूक शमवण्याचा प्रकार होता का? हे कळण्यासाठी त्या अपराध्यांशी, त्यांच्या वकिलांशी, जेलमधल्या मानसोपचारतज्ज्ञांशी बोलणं गरजेचं आहे. त्यांचे विचार समजणं गरजेचं आहे. आणि हे सगळं या माहितीपटाने नक्कीच केलं. या माहितीपटात मुकेश, पवन, अक्षय, राम, विनय आणि तो १८ वर्षांखालील तरुण यांच्याबद्दल जास्त माहिती मिळाली. ते कुठे राहत होते, कसे राहत होते, एरवी काय करायचे, त्यांचं कुटुंब कसं होतं, इत्यादी. हे सगळं वाचून याआधी माहिती होतंच; पण ते दृश्य स्वरूपात पाहणं हा एक वेगळा अनुभव आहे. हे सगळं दाखवताना कोणीही त्यांची बाजू घेत नाहीये. आणि तशी कोणाचीच अपेक्षा पण नाहीये.
काही लोकांचं यावर असं म्हणणं होतं की, भारतीय पुरुषांचा, त्यांच्या मानसिकतेचा जागतिक पातळीवर या माहितीपटाने अपमान झाला. त्याच्या जोडीला मग नुकताच घडलेला जर्मनीतल्या एका प्राध्यापकाचा किस्सा सांगितला जातो. त्याने एका भारतीय तरुणाला internship द्यायची नाकारली. आणि त्यासाठी असं कारण दिलं की, आपल्याकडे बलात्काराची संस्कृती आहे. मग या घटनेतून सगळ्या जर्मन लोकांच्या मानसिकतेबद्दल आपण बोललं पाहिजे आणि त्याच्याही पुढे त्यांच्या राजदूताने त्या प्राध्यापकाला एका जाहीर पत्राद्वारे चांगलंच झोडपलं, त्याकडे काणाडोळा केला पाहिजे. त्यामुळे या आपल्या लोकांच्या मुद्दय़ाशी मी सहमत नाही. मानहानी झाली असेल तर ती त्या अपराध्यांची आणि त्यांच्या वकिलांची झाली आहे.. जी रास्तच आहे.
‘India’s daughter’ या नावाबद्दल आक्षेप आहे का मग? आता पुन्हा प्रत्येक कलाकृतीची जी एक समस्या असते ती इथे उद्भवते- प्रेक्षकाचा दृष्टिकोन. जर असा दृष्टिकोन असेल, की या नावाचा अर्थ म्हणजे ‘भारतातल्या मुलींचं एक प्रतीक’; तर त्याचा असाही अर्थ असू शकतो, की ‘सर्व भारतीयांनी जिला आपली मुलगी मानलं ती!’ एकंदरीत त्या घटनेनंतर पेटलेल्या सगळ्यांच्या भावनांनंतर ती खरोखरच आपलीच कोणीतरी आहे असा भास झाला होता. हो की नाही?
आणि आपण अत्यंत चवीने ‘Fahreneit 9/11’ सारखे माहितीपट बघतोच की! ते चालतं! तो बघताना स्तुती करायची- ‘असा असला पाहिजे देश. सरळ त्या देशाच्या अध्यक्षांच्या छुप्या कारभाराबद्दल माहितीपट बनवला! हे सगळं ते स्वत: अध्यक्ष असताना! अशी लोकशाही असायला हवी..’ वगरे वगरे.
मग आता हे असं वागून आपणच आपल्याला मागे नेतोय. देशाची प्रगती ही त्या- त्या देशाच्या माणसांच्या प्रगतीवर अवलंबून असते. माणसांची प्रगती ही फक्त आíथक तराजूवर तोलता येत नाही. त्यांच्या प्रगल्भतेवर पण ती ठरते. माणूस म्हणून आपण किती प्रगल्भ आहोत, हे फार महत्त्वाचं आहे. आणि माणूस म्हणून आपली प्रगती होण्यासाठी आपल्यावरील टीका ऐकून घेऊन, त्या टीकेप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्वत:मध्ये आवश्यक ते विधायक बदल घडवणं अत्यंत गरजेचं आहे. या माहितीपटावरच्या आपल्या चुकीच्या प्रतिक्रियेमुळे आपण याबाबतीत अजून बरेच मागे आहोत हे प्रकर्षांनं जाणवतं.