‘ट्रिंग ट्रिंग’ माझ्या फोनची िरग वाजते.
‘‘हॅलो?’’ मी प्रश्नार्थक स्वागत करते.
‘‘तुमच्या आयुर्वेदात डोळ्यांसाठी हमखास उपाय असतात का हो?’’ आता ही चौकशी आहे की मुलाखत की उलट तपासणी की टाइमपास.. कसं कळणार? नाव, गाव काही न सांगता लोक थेट चालू होतात. त्यात ‘तुमच्या आयुर्वेदात’, ‘हमखास उपाय’ अशा स्फोटक शब्दांची पेरणी.. तरी, रुग्ण आधीच पिडलेले असतात अशा भावनेनं मी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून बोलत असते.
‘‘आपण कोण बोलताय?’’ मी शांतपणे विचारते.
‘‘मी एक पेशंट बोलतोय.’’ स्वत: फोन करून नाव गुप्त ठेवण्याची धडपड करणाऱ्या अशा लोकांची मला गंमत वाटते. ‘‘मला जरा डोळ्यांच्या उपचारांबद्दल माहिती हवी होती. तुम्ही काय औषध देता डोळ्यांवर?’’ माझा पदवीचा किमान दोन महिन्यांच्या आणि
२०० गुणांच्या अभ्यासाचा कस पुढच्या दोन मिनिटांत लागणार असतो.
‘‘आयुर्वेदात डोळ्यांच्या आजारासाठी औषध आहे. पण रुग्ण बघावा लागेल. कुठला आजार झालाय..’’
‘‘ते मी सांगतो की diabetic retinopathy आहे बघा.. काय औषध आहे त्याला?’’ हद्द झाली.
‘‘हो. पण आजार किती गंभीर आहे ते..’’
‘‘फारसा गंभीर नाही हो. ती सगळी कामं करते घरातली.’’
‘‘ती करते म्हणजे? मगाशी तर तुम्ही म्हणालात की पेशंट तुम्ही आहात!’’ माझ्याकडचं बर्फ आणि साखर दोन्ही वितळायला सुरुवात झालेली असते.
‘‘रुग्ण बघूनच काय ते नक्की सांगता येईल.’’ शेवटी सगळा कनवाळूपणा बाजूला ठेवून, स्पष्टपणे असं सांगावं लागतं. इतक्या चौकशा करूनही नियोजित वेळी रुग्ण येतीलच याची शाश्वती नसते.
पण आश्चर्य म्हणजे पावले कुटुंबातले सहा सदस्य दुसऱ्या दिवशी माझ्या पुण्यशालेत हजर झाले. दुर्दैवानं त्या सहाही जणांना डोळ्याची कुठली ना कुठली समस्या होती. आजींना diabetic retinopathy, आजोबांना वार्धक्यजन्य दृष्टिदोष, सुनेला वारंवार डोळे लाल होण्याचा आणि खाजण्याचा त्रास, मुलाला कम्प्युटर आय सिंड्रोम, नातवाला dry eye, तर नातीला चष्म्याचा वाढता नंबर.. कमी दिसण्याची समस्या तर थोडय़ाफार फरकाने प्रत्येकाला होती! बाब फारच गंभीर होती.
‘डोळ्याच्या अनेक आजारांसाठी आयुर्वेदात औषधे आहेत. काही आजार पूर्ण बरे करता येतात, तर काही गंभीर आजारांत दृष्टी वाचवता येते. तुम्ही सर्वजण गरजेनुसार पंचकर्म आणि औषधं घेणार आहात हे चांगलं आहे. पण त्याच्या जोडीला तुम्ही जीवनशैलीत विशेषत: आहारातही बदल करावे. डोळ्यांना अहितकारक ते सोडून द्यावं आणि हितकर तेच खावं. आजार लवकर बरे व्हायला यामुळे मदत होईल.’
‘तुम्ही सांगाल तसे बदल मीच करते की स्वयंपाकात. म्हणजे प्रश्नच मिटला,’ आई पावले यांनी बिनशर्त सहभागाचं
आश्वासन दिलं.
‘आमची तयारी आहे पथ्य पाळायची,’ आजी-आजोबांचा बाहेरून पाठिंबा मिळाला.
‘आम्हाला काय, आई बनवेल ते खावंच लागेल!’ विरोधी पक्षानं मवाळ भूमिका घेतली. त्यामुळे मला उपचार करणं सोपं जाणार होतं.
‘आंबट आणि खारट पदार्थाचा वापर कमी करा. उदा. दही, चिंच, टोमॅटो, विनेगर, सॉस, लोणचं, पापड, वेफर्ससारखे खारवलेले पदार्थ, पाणीपुरी, चाटमसाला वगरे. मद्याचे पदार्थही नकोत.. जसं पाव, ब्रेड , पिझ्झा, बिस्किटं..’
‘तुम्ही आमच्या मुलाचं आणि आजी-आजोबांचं खाणंच बंद करताय की!’ माझं बोलणं मध्येच तोडत बाबा पावले म्हणाले.
‘मुलाचं ठीक आहे.. पण आजी-आजोबांचं काय? ते खातात हे सगळं!’
‘हो. आमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्ये आमचे आजी-आजोबा ‘सुधारलेले’ म्हणून फेमस आहेत. घरी, हॉटेलमध्ये त्यांची काहीही कटकट नसते खायची. इतर आजी-आजोबांसारखे ते बुरसटलेल्या विचारांचे नाहीत.’ चिरंजीव पावले उवाच. मी दोन मिनिटं खऱ्या अर्थानं ‘अवाक्’ झाले. हितकर अशा आहाराविषयक सवयी सोडणाऱ्या या ज्येष्ठांचं ‘पुरोगामी, जुळवून घेणारे, लवचीक’ म्हणून कौतुकही करता येईना.
‘अहो, आजी-आजोबा नवीन गोष्टी स्वीकारतात हा त्यांचा मोठेपणा झाला. पण त्यांच्या जुन्या सवयीच आरोग्याला उपयुक्त असतात. त्यामुळे त्यांना आपल्याप्रमाणे बदलायला लावू नये, आपणच त्यांचं अनुकरण करावं.’ कुणालाही न दुखावता समजूत काढणं खरंच अवघड असतं.
‘पण आंबट, खारट का नको?’
‘डोळा हा तेज महाभूताचा उष्ण अवयव आहे. त्याला ‘कफापासून’ जपावं लागतं असं शास्त्र सांगतं. खारट आणि आंबट हे रस कफ वाढवणारे आहेत.’
‘आंबट एक वेळ बंद करता येईल, पण मिठाशिवाय जेवणार कसं?’ आजींचा प्रश्न.
‘मीठ बंद करायचंच नाही. त्यासाठी मीठाऐवजी सैंधव म्हणजे शेंदेलोणाचा वापर अधूनमधून करावा. ते डोळ्यांना हितकारक आहे. काही लोणचीसुद्धा सैंधवाचा वापर करून घरी बनवावी. विशेषत: आवळा आणि ओली हळद यांचं लोणचं.’
‘हो आवळ्यात ‘विटामिन सी’ आहे ना! ते डोळ्यांना चांगलं,’ बेबी पावलेला हे शाळेत नुकतंच शिकवलं असावं.
‘असं नाही बरं का! क जीवनसत्त्वयुक्त सगळेच पदार्थ डोळ्यांसाठी लाभदायक असतात असं नाही काही. संत्रं, दही, टोमॅटो हे नाहीच चालत. तो आवळ्याचा गुणधर्म आहे,
क जीवनसत्त्वाचा नाही,’ मी म्हणाले.
‘रात्री झोपताना आम्ही सगळे दूध घेतो. कुणीतरी सांगितलं की, ते डोळ्यांसाठी चांगलं असतं.’ बरं झालं, बाबांनीच हा विषय काढला.
‘कुणी तरी? असं कुणाचं तरी ऐकून आपल्यावर प्रयोग करू नयेत हो. एखाद्या वैद्यांनी सांगितलं तरच ऐकावं. रात्री झोपण्यापूर्वी अडीच तास आधी जेवण झालेलं असावं आणि एक तास आधी पाणी, तेही तहान असेल तर. रात्री उशिरा जेवून लगेच झोपल्यानं झोपण्यापूर्वी पाणी किंवा दूध प्यायल्यानं कफ वाढतो. आणि मी मगाशीच सांगितलं की डोळ्यांना भय कफाचं. पुन्हा पुन्हा गरम केलेलं अन्न किंवा पाणीही दृष्टीला घातक असतं असं आयुर्वेदात सांगितलं आहे. तेव्हा..’
‘अहो, आम्ही चहा जरी थंड झाला तरी मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करून घेतो. आता हे बंद.’ आजींनी फर्मान सोडलं. त्यांचा मायक्रोवेव्हला आधीपासूनच विरोध असावा.
‘पण आम्ही पाणी नाही तसं गरम करत हं. रात्री उकळून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी तसंच थंड पितो,’ काकू अभिमानानं म्हणाल्या.
‘एकदा पाणी उकळलं की दुसऱ्या दिवशी ते शिळं होतं. पचायला जड, डोळ्यांना अहितकर.’ रुग्णांच्या अशा अज्ञानजन्य गर्वहरणाची जबाबदारी परमेश्वरानं वैद्यवर्गावर सोपवली असल्यानं, मला नाइलाजानं रुग्णांच्या बऱ्याच सवयींवर आक्षेप घ्यावा लागतो.
‘इतका सूक्ष्म विचार केलाय या शास्त्रात आणि आपण मात्र हातचं सोडून पळत्याच्या मागं लागतो,’ आजोबांचा जुन्याचा अभिमान उफाळून आला.
‘आता दृष्टीसाठी हितकर काय ते सांगते. गहू, हातसडीचे तांदूळ, गायीचं दूध, घरी केलेलं लोणी आणि तूप, खडीसाखर, मध, डािळब, द्राक्ष, आंबा, आवळा, खजूर, काळ्या मनुका, साळीच्या लाह्य़ा, कोवळा मुळा, लसूण, जिरे, पालेभाज्यांपकी फक्त तांदुळजा- चंदनबटवा-वसूची भाजी, कोहळा, कोिथबीर, पडवळ, सुरण, शेवग्याच्या पानांची आणि फुलांची भाजी.. हे सगळे पदार्थ नियमित खाऊ शकता.’
‘हे सगळे पदार्थ आपल्या खाण्यात कमी प्रमाणात असतात नाही का? पण काहींची
तर आपण चवही चाखलेली नाही,’
काकू म्हणाल्या.
सगळी माहिती यथास्थित घेऊन पावले कुटुंबीय, बरे होण्याच्या मार्गावर डोळसपणे पावले टाकू लागले आणि वर्षभरात खऱ्या अर्थाने डोळस झाले.
दृष्टी हे मनुष्याचं प्रधान इंद्रिय आहे. मरेपर्यंत उत्तम ‘दृष्टी’ हवी असेल तर आपल्या आहारावर ‘दृष्टिक्षेप’ही टाकावा. अपथ्य दृष्टीआड करावं, पथ्यावरून दृष्टी हलवू नये. शेवटी ‘हमसे है खाना, खाने के लिये हम नही है’ ही दृष्टीच आरोग्य आणि दीर्घायुष्य देते.