समीर गायकवाड

जेमतेम पाच एकराचं रान असूनही गोरखचा जीव तिथंच गुंतलेला असायचा. मोहिते वाडय़ाच्या वरल्या अंगानं गावदेवाभवताली वळसा घालून जाताच गोरखच्या शेताकडं जाणारी गाडीवाट लागायची. वाटंनं गावातल्या अन्य कुणबाटांची शेतं लागायची. पैकी पवाराचं लांबलचक रान नजरंत मावणारं नव्हतं. मशागत करून एक नंबरमध्ये आणलेलं, पिकांनी टरारून गेलेलं असायचं. पुढं भोसल्यांची बरडपट्टी लागायची अन् त्याच्याही पुढं गणू पाटलाचं पडीक शेत लागायचं. त्यांच्या खंडकऱ्यानंदेखील कसायला घेतलेलं शेत सोडलेलं. फुफुटा तुडवत बरंच चालून गेल्यावर बेडग्याचा निर्मनुष्य माळ लागायचा. सगळीकडे खुरटी झुडपं, अधूनमधून वाढलेल्या वेडय़ा बाभळी आणि पिवळंफटक गवत. मधोमध लागणारे दगडधोंडय़ांचे ढिगारे ओलांडून वाटसरूंनी बनवलेल्या जुनाट पाऊलवाटा एकमेकींना छेद देत माळाच्या चारी अंगाला भिडायच्या. या रानात बेडगं चालवलं तरी त्याचे बल मरतात अशी वदंता असल्याने, रान तसंच पडीक पडलेलं आणि त्याचं रूपांतर पडीक माळात झालेलं. अन् नावदेखील बेडग्याचा माळ पडलेलं.

बैलगाडीने गावात ये-जा करायची असली की सगळ्या इलाख्याला गोल वळसा घालावा लागे. मात्र असे प्रसंग क्वचित घडत असल्याने पाऊलवाटेनेच सगळी तंगडतोड चालायची. बेडग्याच्या माळापासून दोनेक फर्लाग चालत गेलं की बारमाही हिरवीकंच झाडी असलेला कुणालाही भुरळ पडावा असा केसकरांचा मळा लागायचा. चिंचंच्या झाडाखाली बाजलं टाकून बसलेल्या दत्तू केसकरासंग दोन कानगोष्टी होत. लख्ख पितळी तांब्यातल्या थंडगार पाण्यानं तहान भागवून मळ्यालगतचा ओढा ओलांडून गोरख पुढे जायचा. या ओढय़ापायीच त्याची गाडीवाट निपटत नव्हती. पावसाळ्यात कंबरेइतक्या पाण्यातनं ओढा ओलांडावा लागे. गोरखला त्याची सवय होती. गोरख शेताकडे निघाला की गावाला त्याचं अप्रूप वाटे, कारण इतका थकलेला म्हातारा एवढय़ा लांबचं अंतर चालून जाई ही नवलाची आणि चिंतेचीही बाब होती. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता तो शेताकडे निघाला की सगळ्यांच्या मनात त्याच्याबद्दल कणव दाटून येई. याला कारणही तसंच होतं.

बांधालगतच्या काळ्या ढेकळाचं रान तुडवून पुढं जाताच ढासळत आलेल्या पांडवाच्या कडंला रुख्माईची समाधी होती. म्हातारा गोरख तिथं दिसभर बसून राहायचा. रापलेला तांबूस चेहरा अनेक दिवसांपासून डोईला तेल नसल्यानं विस्कटून गेलेले केस, डोळ्याच्या गारगोटय़ा, कोरडेठाक पडलेले करडे काळपट ओठ, नाकाच्या पसरट टोकावर पडलेले करडे तांबडे ठिपके, कपाळावर समांतर रेषेतल्या सात-आठ आठय़ा, खाली झुकलेल्या दाट पांढऱ्या मिशा, दाढीचं वाढलेलं पांढुरकं खुंटं अशा तोंडवळ्याच्या गोरखच्या अंगात उसवलेल्या नशिबाची कळा दर्शवणारं फाटकं धोतर अन् भोकं पडलेली बंडी असायची. रबरी टायरचे सोल खिळे ठोकून बसवलेल्या वहाणा त्याच्या पायात असत. पिंडऱ्याची उंडीव लाकडं झालेली, दांडगंदुंडगं मनगट पिचून गेलं होतं. हाताच्या भेगाळलेल्या झिजलेल्या ताटलीभर पंजावर जागोजागी घट्टे पडलेले. हातातलं तांब्याचं कडं काळं पडत आलेलं. एका दशकापूर्वी त्याची बायको रुख्माई देवाघरी गेली तेव्हापासून तो सरभर झालेला. गाव म्हणायचं म्हातारपणी गोरखला चकवा लागला. रुख्माईनं झपाटलंय. त्याच्या काळजात आर पडलीय ती थंड व्हायला पाहिजे. जुनेजाणते म्हणत की गोरख भ्रमिष्ट झालाय. यात अतिशयोक्ती नव्हती. बायको गेल्यापासून तो माणसातनं उठला होता. गोरख गावात असला तरी कुणाशी बोलत नसायचा. आग्रह करून कुणी थांबवलंच तर घटकाभर पारावर बसायचा. समाधी लावल्यागत मुकाट राहायचा. पुतळ्यागत थिजायचा. पारावरचा गप्पांचा फड रंगत आला की सर्वाच्या नकळत तो उठून यायचा. तो गेल्याचं बऱ्याच उशिराने ध्यानात आल्यावर त्याचा विषय निघे. मग सगळेजण त्याच्याबद्दल हळहळत.

पारावरनं घराकडं निघालेला गोरख आपल्याच धुंदीत असायचा. चालतानाही त्याचं ध्यान नसायचं. त्यामुळं रस्त्यात गोरख दिसला की समोरचाच नीट मापात चालायचा. त्यातूनही चुकून कुणी धडकलं तर सानथोर न बघता गोरखच त्याचे पाय धरायचा. समोरच्याला बोलण्याची संधीही न देता तो पुढं निघून जायचा. मग लोकांच्या जीवाला रुखरुख लागायची. तराट घराकडं सुटलेला गोरख धुळमाखल्या पायांनी घरात यायचा. मोरीत चार तांबे पायावर ओतायचा. तोंडहात धुऊन पटकुराने पुसून होताच ओसरीआडच्या खोलीत येऊन बसायचा. खोलीत येताना डाव्या बाजूला असलेल्या देवघराकडं कटाक्ष टाकायचा. इच्छा असूनही हात जोडत नसायचा, नुसती मान तुकवून पुढं यायचा. धागे निघालेल्या लालपिवळ्या पट्टेरी सतरंजीवर बसून अस्पष्ट पुटपुटायचा. आढय़ाकडं नजर रोखून बसायचा. त्याला तिथं काय दिसायचं हे कधी कुणाला कळलंच नाही, एकदोनदा तो काय पुटपुटतो याचा कानोसा घेतल्यावर रुख्माईचं नाव सोडता काहीच अर्थबोध झाला नव्हता.

घरी मन लागत नसलं की कुणालाच न सांगता तो देवळात जायचा. ओळी झालेले डोळे जीर्ण पिवळट धोतराच्या सोग्यानं पुसत बसायचा. सांज होताच वेड लागल्यागत करायचा. रात्र झाल्यावर बाजंवर पडून चान्न्या मोजत पडायचा. दुसऱ्या दिवशी रामप्रहरी उजाडलं की पुन्हा शेत गाठायचा. भर उन्हातही बांधावर बसून राहायचा. कधी काळी म्हतारी कारभारीण डोईवर उतळी घेऊन यायची, ती याद त्याच्या काळजात सुरा खुपसून बसावी तशी होती. मग पोरेसोरे येऊन त्याला भाकरी देत. बळेच भाकरी खाताना मधूनच तो भाकरी बांधून आणलेलं फडकं हुंगत बसायचा. एकाएकी हसायचा. डोळं विस्फारून बघायचा. हिवाळा असला की वडिपपळाच्या बुंध्यापाशी जायचा. माती सावडावी तसा पालापाचोळा उचकत बसायचा. कधीकधी गावाबाहेरल्या ओढय़ाच्या काठावर गुडघ्यात मान खुपसून बसायचा. एके काळी हाच गोरख एकदम टेचात पखवाज वाजवायचा. चढय़ा आवाजात भजन म्हणायचा. गोऱ्यापान चेहऱ्यावर गोपीचंदन अष्टगंध लावून फिरायचा. शुभ्र फेटा घालून काकड आरतीला सज्ज असायचा. गोरखला लिहिता-वाचता यायचं. छान कवनं म्हणून दाखवायचा.

आता मात्र त्याच गोरखसाठी सगळं गाव हळहळत होतं. दवाखाना करूनही त्याला फरक पडला नव्हता. गावातली जाणती माणसं त्याच्या पोरांना सुनवायची, ‘‘पोराहो, राहू द्यारे त्याला असाच. त्याच्या जीवाचं हाल करू नगासा. त्याचा जीव घुटमळलाय रुख्मावैनीच्या जीवात. त्याचं दिस राहायलेत तरी किती? आधीच त्यो वंगाळ झालाय. तवा त्येचं अजून हाल करू नगासा..’’ त्याची पोरं, नातवंडं, पोरीबाळी, सुना सगळ्यांचं त्याच्यावर बारीक लक्ष असायचं. त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून ते मांडय़ाचा कोंडा करत, पण त्याला जपत. उन्हाळ्यात हिवाळ्यात गपगुमान असणारा गोरख पावसाची चाहूल लागताच भिर्र होई. एखादं अवकाळी भुरंगट जरी पडलं तरी गोरखला उचंबळून यायचं. बिनमोसमाच्या पावसात त्याच्या डोळ्यालाही धारा लागलेल्या असायच्या. त्यामुळं पावसाळा सुरू होताच घरातल्यांच्या जीवाचं पाणीपाणी व्हायचं. एरव्ही सगळ्यांचं ऐकणारा, कुणाला न दुखावणारा, आपल्याच नादात दंग असलेला गोरख कुणाचंही ऐकत नसायचा. धुंवाधार पावसात रानात जायचा. ‘‘मला रानात भिजत हुभं ऱ्हाऊ द्या!’’ म्हणून अडून बसायचा. पाऊस कोसळू लागताच  झाडाझुडपांखाली किंवा वस्तीतल्या खोलीत तो थांबत नसे. त्याला अडवणं कठीण व्हायचं. गावात रातीला जरी पाऊस लागला तरी रानात जाण्यासाठी तो दोसरा काढायचा. अर्ध्या रात्री शेताकडं जाऊं द्या म्हणून तान्ह्या पोरागत हट्ट करायचा. खूपच इरेला पेटल्यावर कुणाची तरी मोटरसायकल आणून पोरं त्याला भर पावसात शेतात नेत. तिथं मन तृप्त होईपर्यंत तो पावसात भिजायचा. पार ओलाचिंब होऊनही भिजल्यानं तो कधी आजारी पडला नव्हता. हे असं तब्बल दशकभर चाललं. अखेर परवाच्या पावसात रुख्माईच्या समाधीजवळ अंगावर वीज पडल्याचं निमित्त होऊन गोरख देवाघरी गेला.

त्याच्या तेराव्याला त्याच्या पोरांनी गाव गोळा केलं. जेवणावळी झाल्यावर गोरखने लिहिलेला एक कागद जीर्ण बंद लिफाफ्यातून बाहेर काढला. जमलेल्या लोकांना उद्देशून थोरला म्हणाला, ‘‘आबानं सांगितलं होतं की त्याच्या तेराव्याला हा कागद वाचून दाखवायचा.’’ हे ऐकताच सगळ्यांनी कान टवकारले. त्यात काय लिहिलं असेल याचे अंदाज बांधले जाऊ लागले. सगळ्यांची कुजबुज सुरू झाली, बायकापोरींच्या चुळबुळीने अस्वस्थता वाढत गेली.  पाकिटातला कागद उघडला तर त्यात चारच ओळी लिहिलेल्या.

‘‘मी गोरख गायकवाड. माझ्या रुख्माईवर जर माजा मनापासून जीव असंल तर माझाबी जीव शेतात वीज पडूनच जाईल.. माझ्यामागं कुणी खुडायचं नाय.. मी रुख्माईपाशीच हाय.. पोरबाळं न भांडता गुण्यागोविंदानं एकत्र राहिले तरच आम्हा दोघांच्या जीवाला शांती मिळंल.’’ मजकूर वाचून होताच बायांनी हंबरडे फोडले. पुरुष मंडळी अवाक् झाली. जो तो आश्चर्य करू लागला. अनेकांनी आभाळाकडं बघत हात जोडले. पिकल्या पानांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. जुनेर इरकली पदर सुरकुतलेल्या गालावरून डोळ्यापाशी फिरले. सगळा माहौल शोकात बुडून गेला तरी त्याला एक आत्मतृप्तीची किनार लाभली होती, जी सर्वाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होती.

गोरखच्या अंगावर जिथं वीज पडली होती तिथंच वाकडातिकडा झालेला अर्धवट जळालेल्या अवस्थेतला विळा सापडला होता. रुख्माईच्या समाधीजवळच एका खड्डय़ात गोरखनं खुरपं, कुदळ, फावडं लपवून ठेवलं होतं. रानात पाऊस आला की यातलं हाताला लागेल ते औजार घेऊन तो रानाच्या मधोमध उभा ऱ्हायचा. परवाच्या अवकाळी पावसानं त्याचं गाऱ्हाणं ऐकलं. त्याचा कोळसा झाला. त्याच्या हातातला विळा विजेच्या आघाताने वेडावाकडा झाला. तो कागद वाचल्यावर या गोष्टींचा उलगडा झाला. अस्मानातून कोसळणाऱ्या विजेवर आणि रुख्माईवरच्या प्रेमावर गोरखचा जीवापाड विश्वास होता यावर गावाने नवल केलं.

sameerbapu@gmail.com