अरुंधती देवस्थळे

बर्था वेगमन (१८४७- १९२६) हे नाव डेन्मार्कबाहेर अनेकांना अपरिचितच! कोपनहेगनच्या डॅनिश आर्ट गॅलरीत ती भेटते. सोबत पेर किर्केबीसारखा बालवाङ्मयाचा चित्रकार असल्याने मला तिच्याबद्दल अनेक कथा ऐकायला मिळतात. जवळच्याच हर्षस्परंग म्युझिअममध्ये डेनिश सुवर्णयुगात (१८००-१८५०) स्थान निर्माण करणारी तिची चित्रं पाहून तिच्याबद्दल जाणून घ्यावंसं वाटतं. तिथल्या आणखी एका जाणकार मित्राला फारसं इंग्लिश येत नाही म्हणून पेर त्याचंही म्हणणं मला इंग्लिशमध्ये समजावून सांगत असतो, ‘निडर वृत्तीची, समाजमनाचा बाऊ न करता कलाकार मैत्रिणीशी विवादास्पद मैत्री निभावणारी.’ किंवा ‘ती निसर्गचित्रेही सुंदर काढत असे आणि काहीही झालं तरी रोज थोडा वेळ चित्र जरूर काढत असे.. अगदी प्रवासात असली तरी!’ व्यावसायिक स्त्री-चित्रकार ही कल्पना डेन्मार्कला अनोळखी असताना,केवळ अंत:प्रेरणेच्या बळावर आपली ओळख बनवणाऱ्या बर्थाने निर्भय वृत्तीने आणि मेहनतीने जिवंतपणी मिळवलेलं यश कलांच्या पुरुषप्रधान क्षेत्रांत प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणींसाठी प्रेरणा बनलं. अनेक समकालीन प्रसिद्ध व्यक्तींची तिने पोर्ट्रेटस काढली; तशीच कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचीही. नंतर जेव्हा तिच्या कामाचं पुनर्मूल्यांकन होत राहिलं; तेव्हा तिने केलेल्या पोर्ट्रेटमध्ये पॅलेट आणि प्रकाशाचा अतिशय कौशल्यपूर्ण वापर हा महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय बनला. तिचं वेगळेपण एवढय़ावर थांबत नाही, तर डेन्मार्कच्या रॉयल आर्ट अकादमीची चेअर पर्सन बनण्याचा सन्मान मिळवणारी ती पहिली स्त्री!  The Danish royal Ingenio et arti medal हा उत्कृष्ट कला किंवा विज्ञानातल्या योगदानासाठीचा सन्मान मिळवणारीही ती पहिलीच स्त्री. तरीही अनेक वर्ष डॅनिश कलेच्या इतिहासात तिच्या कामाचा उल्लेख नव्हता. तिची चित्रं प्रदर्शनांत लावलेल्या रॉयल अ‍ॅकॅडेमीनेही तिच्या जीवनकाळात तिची चित्रं संग्रहालयासाठी विकत घेतली नव्हती, कारण कदाचित हेही की ती जन्माने स्वीस आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणामुळे टिपिकल डॅनिश परंपरेत बसणारी नव्हती. डॅनिश कला संग्रहालयांनी तिची चित्रं विकत घेतली ती तिच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी!

Navri Mile Hitlarla
Video: एजेची काळजी पाहून लीला झाली भावुक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Abhinav, Raosaheb Gurav , Raosaheb Gurav passed away, loksatta news, pune,
‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन
Ankita Walawalkar New Car
अखेर अंकिताच्या घरी ‘ती’ आलीच! ‘कोकण हार्टेड गर्ल’ने घेतली आलिशान गाडी, होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केला फोटो
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
Deepika Padukone salm L and T chairman SN Subrahmanyan
Deepika Padukone : “एवढ्या वरिष्ठ पदावरील लोक…”, दीपिकाची L&T अध्यक्षांच्या रविवारी काम करण्याच्या सल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया

हेही वाचा >>>अभिजात : साऱ्या गावाचं नाटक ओबेरामेरगाऊ

बर्थाचं कुटुंब मूळचं स्वीस, पण तिच्या लहानपणीच ते कोपनहेगनला येऊन स्थायिक झाले. आई लहानपणीच वारली आणि वडील स्वत: फारसे नावारूपाला आलेले नसले तरी चित्रकार होते. घरच्या जबाबदाऱ्यांमुळे बर्थाचं कलाशिक्षण जरा उशिराच म्हणजे विसाव्या वर्षी सुरू झालं. त्यांना बर्थातल्या कलागुणांची जाणीव होती. पैशांची सोय करून तिला नामवंत संस्थेत शिकायची संधी उपलब्ध करून द्यायचीच होती. पुढल्या शिक्षणासाठी ती म्युनिकच्या सुप्रसिद्ध कला विद्यालयात दाखल झाली. अ‍ॅकॅडेमिक शिस्तीच्या वातावरणात शिक्षण झालं. इथे एक हुशार विद्यार्थिनी म्हणून बर्थाचं कौतुक व्हायचं. पण त्याच दरम्यान इम्प्रेशनिस्टिक मूव्हमेंट सुरू झाली. मोकळय़ा हवेत चित्रं काढणं- अगदी पोर्ट्रेटससुद्धा मनाला पटलं. मजा म्हणजे, इथे शिक्षिका आणि विद्यार्थिनींना एकमेकांचं मॉडेल बनावं लागे, कारण बाहेरची मॉडेल्स महाग पडत. ती १३ वर्ष म्युनिकमध्ये राहिली. इथेच तिला जीन बौख ही तिची वर्गमैत्रीण भेटली. दोघींच्या तारा जुळल्या. दोघींनी इटलीच्या अनेक वाऱ्या करून ओल्ड मास्टर्सची कामं पाहत आपापली तंत्रं शिकून घेतली आणि पॅरिसला जाऊन आपलं नशीब आजमावावं असं ठरवलं. दोघी आधी म्युनिक आणि नंतर पॅरिसमध्ये एकच स्टुडिओ भाडय़ाने घेऊन काम करत, एकमेकींच्या कामाच्या समीक्षकही असत. इतकंच नव्हे तर जेनची पियानो वादक दत्तक बहीण हॅना अनेकदा या दोघींची मॉडेल बनायची. म्युनिकमधल्या शिक्षण आणि व्यावसायिक सुरुवातीबद्दल बर्था म्हणते, ‘‘ Back then,  I did not consider for a moment becoming a portrait painter,  but I was rather interested in what one could call k situation painting.  Not the genre painting,  with anecdotes inside,  which I always hated.  But just the situation image:  ‘‘An Artistl s Garret’’, ‘‘ Mother with Her Child in a Gardenll  and so forth,  whatever you may call it,  my old paintings from the days of youth!  That I turned out to be a portraitist simply happened when I had used a model for one of my situation paintings and people found the likeness characteristic and good.’’ दोन परदेशी कलाकार तरुणींनी पॅरीसमध्ये येऊन रहावं आणि काम शोधावं हे तिथल्या कलावर्तुळात चर्चेचा विषय बनलेलं. तिच्या पहिल्याच चित्राची पॅरिस सलोंमध्ये वाहवा झाली आणि तिचं सलोंशी आयुष्यभराचं नातं जोडलं गेलं.

हेही वाचा >>> अभिजात : पॉल क्लेई अमूर्ततेतून संवाद

रॉयल डॅनिश अ‍ॅकॅडेमी ऑफ फाइन आर्टस्ला ती अधूनमधून प्रदर्शनात भाग घेण्याच्या निमित्ताने चित्रं पाठवत राहिली.  मायदेशीही तिचं नाव होऊ लागलं. १८८०च्या दशकांत, शार्लटनबर्गची वार्षिक कलाप्रदर्शनं गाजवणारी आणि तीनदा ज्युरींची पदकं मिळवणारी ती एकमेव नॉर्डीक स्त्री कलाकार ठरली. कलात्मक पोर्ट्रेटस करणाऱ्या बर्थाला खूप काम मिळायचं आणि पैसाही. म्हणून ती जीनला वेळोवेळी आर्थिक मदत करत असे. जीनमध्ये अधीरपणा होता, पण दोघींना एकमेकींची शैली इतकी छान समजली होती की तिने अर्धवट सोडलेली चित्रं बर्था पूर्ण करत असे. अशा मोजक्या लॅण्डस्केप्सवर  दोघींच्या सह्य आहेत. ती मूलत: पोर्ट्रेटस्करता प्रसिद्ध असली तरी कलेत वैविध्य आणण्यासाठी निसर्गचित्रं, शहरांची चित्रं, स्टील लाइफ  फुलं आणि घरातील दृश्यही करत असे, शैलीतही वेगवेगळे प्रयोग करीत असे. तिने तिच्या बहिणीच्या काढलेल्या पोर्ट्रेट्सला म्हणजे ‘अ‍ॅना सिकॅ म्प, आर्टिस्ट्स सिस्टर’ला (ऑइल ऑन कॅनव्हास १०९ x १००. ५ सें. मी., १८८२)  डेन्मार्कचं कलेसाठी सर्वोच्च पारितोषिक असलेलं ‘तोरवाल्डसन पदक’ मिळालं. अ‍ॅना काही सुंदर वगैरे नव्हती, तिने पोशाखही सधन कुटुंबातल्या चारचौघींसारखाच घातलाय, चेहऱ्यावर विशेष भाव नाहीत, पण काळय़ा- करडय़ा पार्श्वभूमीवर ती करत असलेलं पिवळट पांढऱ्या लोकरीतलं विणकाम, तिची अकृत्रिम देहबोली आणि लोभस आत्मविश्वास बर्थाने छानच उचललाय. तैलचित्रं असूनही त्याला एक छायाचित्राच्या कॉम्पोजिशनची सफाई आहे. या नंतर तिला सगळीकडूनच पोर्ट्रेट्स काढण्याचं काम मिळत गेलं आणि तिची चित्रं मुख्यत: खासगी संग्रहांत दाखल झाली. स्कँडिनेव्हिया, इतर युरोप आणि अमेरिकेतील कलाप्रदर्शनांतही ती भाग घेई. आपलं काम देशोदेशीच्या पारखी लोकांसमोर मांडायला तिला आवडायचं.

‘मालेरीन जेनी बौख’  (१०६  ८५ सें.मी. ऑइल ऑन कॅनव्हास, १८८१) हे चित्रं पोर्ट्रेट पेंटिंग्जमध्ये एक वस्तुपाठ ठरलं. कारण इथे मॉडेलच्या चेहऱ्यावर प्रकाशाचा अक्षरश: अद्भूत खेळ घडवून आणलाय. मागे ऊन असल्याने नैसर्गिक प्रकाश चेहऱ्यावर मागून येतोय. कोनात झुकवलेल्या डोक्याच्या अर्ध्या भागातले पिंगट सोनेरी केस उन्हात चमकताहेत. चेहऱ्याचा अगदी थोडासा भागही उन्हाने उजळून निघालाय. चेहऱ्यावर कॅमेरासमोर असावा तसा प्रकाश, हा अगदी योग्य कोण साधणं किती अवघड असतं हे छायाचित्रकारांनाच  माहीत असतं. नवशिक्यांना त्याच्यासाठी बरीच झटापट करावी लागते आणि इथे तर पेंटिंगमध्ये हा खेळ पकडायचा होता. मॉडेलच्या, जेना बौखच्या चेहऱ्यावरही मंद, अकृत्रिम हास्य, प्रकाशाच्या वेगवेगळय़ा छटा, दोन्ही डोळय़ात वेगळा प्रकाश.. हे बारकावे वेगमनच्या असामान्य कौशल्याची साक्ष देणारे. विषय पोर्ट्रेट असला तरी पुस्तक पकडलेल्या तिच्या हातावरच्या शिरा (हातातल्या पुस्तकाने कला शिक्षक बौखच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असलेली एक वैचारिक डूब चित्राला मिळते), पोषाखावरल्या काळय़ात चमकदार धारा, बाजूच्या भिंतीवरलं चित्रं आणि शेजारी असलेलं रंगकामाचं सामान- त्यात एक पुसायचं फडकंसुद्धा- असं सगळं अतिशय सहजगत्या टिपलेलं आहे, चित्राचाच भाग असल्यासारखं. बाकी मागची हिरवी वेल, धुरकट छटांची पार्श्वभूमी आणि चित्राची एकंदर रंगसंगती.. कोपनहेगन आणि पॅरिसच्या कलावर्तुळात हे चित्र स्तुती आणि चर्चेचा विषय ठरलं. या चित्राबद्दल ख्यातनाम कलासमीक्षक कारीना  रेच Becoming Artists’ या त्यांच्या पुस्तकांत म्हणतात, ‘‘Ultimately,  the portrait can be read as a mediated self- representation depicting a shared existence. Wegmann fashioned an image of the woman artist that represented herself just as much as it represented Bauck. Consequently, I would argue that the artist and the sitter fashioned a collective rather than a solitary artistic identity’’ ‘टू विमेन ड्रिंकिंग टी इन द आर्टिस्ट्स स्टुडिओ’ हे बर्थाने काढलेलं तैलचित्रंही त्या दोघींचं आहे असं म्हटलं जात असे. मृत्यूनंतर बर्थाच्या इच्छेनुसार, हे चित्रं नॅशनल म्युझियमला दान करण्यात आलं.

स्त्रियांना आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते त्या काळात. स्वत:साठी हवा तो व्यवसाय निवडून, आपल्या आवडणाऱ्या मार्गावर कायम वाटचाल करणारी, पॅट्रन्सबरोबर स्वतंत्र बाण्याने पत्रव्यवहार आणि पैशांची बोलणी करणारी, कणखर वृत्तीची आणि नात्यांचे धागे जपणारी बर्था, मागाहून येणाऱ्या पिढीसाठी एक दीपस्तंभ होती. कामावर उत्कट प्रेम असलेल्या बर्थाला इच्छामरण आलं, तिने शेवटचा श्वासही तिच्या कोपनहेगेनच्या स्टुडिओत चित्र रंगवताना घेतला.

arundhati.deosthale@gmail.com

Story img Loader