रघुनंदन गोखले

बुद्धिबळ हा बुद्धिवंतांचा खेळ. चौसष्ट घरांच्या या ‘सोंगटीपटा’ला आत्मसात करणे सोपे, पण त्यात असामान्य कौशल्य प्राप्त करणे भल्याभल्यांना अप्राप्य. हा खेळ मुलांना लहानपणापासून गांभीर्याने शिकविण्याकडे पालकांचा कल  जगभरात वाढत चालला आहे. वर्षभर माजी बुद्धिबळपटू आणि प्रसिद्ध प्रशिक्षक रघुनंदन गोखले या नव्या सदरातून या खेळामधील आपल्या अनुभवांसह अनेक किश्शांना सादर करणार आहेत.

आपण सगळे संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी जाणून आहोत. लहान वयात ‘ज्ञानेश्वरी’सारखा महान ग्रंथ लिहून वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी देहत्याग केला. इतक्या लहान वयात गीता आत्मसात करणं आणि त्याचं निरूपण सामान्य लोकांसाठी साध्या, सोप्या भाषेत करणं या सगळय़ासाठी दैवी देणगीच पाहिजे. कोणाचीही संत ज्ञानेश्वरांशी तुलना होणं शक्य नाही, पण वाचकांच्या लक्षात यावं यासाठी मी येथे लहान वयात मोठी कामगिरी करणाऱ्या किशोरवयीन बालकांना त्यांची उपमा दिली आहे.

बुद्धिबळातही अशा अनेक ज्ञानेश्वरांची कमतरता नाही. लहान वयात आपली चमक दाखवून सर्व जगाला थक्क करणारे खेळाडू ठायीठायी सापडतात. बुद्धिबळाशी संबंधित बातम्यांवर एक नजर टाकली तर भारतात असे अनेक बुद्धिबळपटू स्पर्धा गाजवत आहेत. प्रज्ञानंद, निहाल सरीन, गुकेश या मुलांनी वयाच्या १३ व्या वर्षांआधीच आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली होती.

अशा लहानग्या बुद्धिबळातील प्रज्ञावंतांपैकी पहिला मान जातो तो सॅम्युएल रेशेवस्की या पोलिश/ अमेरिकन ग्रँडमास्टरकडे! पहिल्या जागतिक महायुद्धानंतर सॅम्युएलच्या आई-वडिलांनी युद्धात बेचिराख झालेलं पोलंडमधील आपलं गाव सोडून फ्रान्समार्फत अमेरिकेकडे प्रयाण केलं आणि तिथेच आश्रय घेतला. पहिल्यांदा छोटा सॅम्युएल लोकांच्या नजरेत भरला तो पॅरिसमध्ये त्यानं केलेल्या उल्लेखनीय खेळानं! ८ वर्षांच्या सॅम्युएलनं एका वेळी तब्बल २० अनुभवी खेळाडूंशी लढत दिली आणि सगळय़ांना पराभूत केलं. तो दिवस होता १७ मे १९२० आणि २६ नोव्हेंबर १९११ ला जन्मलेला सॅम्युएल होता अवघ्या ८ वर्षांचा! हा छोटा खेळाडू एका पटावर आपली चाल करून मग पुढच्या पटावर जात असे. थोडक्यात, प्रत्येक खेळाडूला विचार करण्यास सॅम्युएल रेशेवस्कीपेक्षा २० पट अधिक वेळ  मिळत असे.

पुढची सॅम्युएलची गाजलेली कामगिरी म्हणजे अमेरिकेतील वेस्ट पॉइंट येथील मिलिटरी अकादमीच्या अधिकाऱ्यांशी दिलेली लढत. ९ वर्षांचा हा छोटा मुलगा एका वेळी २० अधिकाऱ्यांशी खेळला आणि त्यापैकी १९ डाव जिंकून फक्त एका डावात त्यानं बरोबरी साधली. नंतर सॅम्युएलनं संपूर्ण अमेरिकेचा दौरा करून तब्बल १५०० हून अधिक डाव खेळले आणि त्यातील तो फक्त ८ डाव हरला! अर्थात या खेळामुळे त्याला शाळेत जाणं शक्य नव्हतं आणि त्याच्या पालकांना अयोग्य पालकत्वासाठी मॅनहॅटनच्या कोर्टात खेचण्यात आलं होतं.

तिसरा जगज्जेता क्युबाचा जोस राउल कॅपाब्लांका. याच्याविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्याचे वडील बुद्धिबळ प्रेमी होते आणि आपल्या मित्रांसोबत खेळताना ४ वर्षांच्या कॅपाब्लांकाला जवळ बसवत. हा छोटा एकाग्रचित्तानं खेळ बघत असे. एकदा त्याच्या वडिलांनी चुकीची खेळी केली आणि छोटय़ा कॅपाब्लांकाला हसू आवरेना. वडिलांनी खेळ थांबवून विचारलं, ‘‘काय झालं?’’ तर त्यानं त्यांची चूक दाखवून दिली. वडिलांनी कॅपाब्लांकाला विचारलं, ‘‘तू कधी शिकलास बुद्धिबळ खेळायला?’’ त्यानं उत्तर दिलं, ‘‘रोज मी बघतो की तुम्हाला खेळताना!’’ मग वडिलांनी त्याला आपल्याबरोबर खेळायला बसवलं आणि त्यानं त्यांचा सहज पराभव केला. पुढे वयाच्या तेराव्या वर्षी कॅपाब्लांकानं क्युबाचा राष्ट्रीय विजेता जुआन कॉरजोला एका सामन्यात पराभूत केलं.

नंतर मला आठवतो बॉबी फिशर! घटस्फोटित आईनं वेळ घालवण्यासाठी आणून दिलेल्या बुद्धिबळ पटानं लहान बॉबीचं जीवनच बदलून टाकलं. सुरुवातीला आपल्या थोरल्या बहिणीकडून धडे गिरवणाऱ्या छोटय़ा बॉबीनं काही वर्षांतच अमेरिकन बुद्धिबळ जगतात खळबळ माजवली. डोनाल्ड बायरनविरुद्ध त्यानं वयाच्या १३ व्या वर्षी जिंकलेला डाव हा अजूनही २०व्या शतकातील सर्वोत्तम डाव मानला  जातो.

१४ व्या वर्षी बॉबीनं पहिलं अमेरिकन अजिंक्यपद जिंकलं आणि पुढच्या वर्षी तो जगातील सर्वात लहान ग्रँडमास्टर झाला. बॉबीच्या अनेक सुरस आणि रम्य कथा प्रसिद्ध आहेत. शालीनता आणि नम्रता यांचं त्याला कायम वावडं होतं. एकदा त्यानं उत्कृष्ट खेळ करून एक डाव जिंकला. त्याबरोबर एका चाहत्यानं म्हटलं, ‘‘बॉबी, तू म्हणजे बुद्धिबळाचा देव आहेस.’’ आता दुसरा कोणी असता तर म्हणाला असता की, मी काही एवढा महान नाही, वगैरे वगैरे. पण बॉबी काय म्हणाला माहीत आहे? तो म्हणाला, ‘‘खरं आहे तुम्ही म्हणता ते! पण केवढी जबाबदारी!!’’

आता वळूया भारताकडे! विश्वनाथन आनंद हा महान खेळाडू माहीत नाही असा भारतीय जगात नसेल. पण त्याच्या आधी सुलतान खान नावाचा एक अवलिया होऊन गेला हे फार कमी लोकांना माहीत असेल. सर उमर हयात खान नावाच्या पंजाबमधील एका संस्थानाच्या राजाला हा हिरा गुरं राखत असताना मिळाला. बुद्धिबळप्रेमी हयात खान यांनी त्याला आपल्याबरोबर इंग्लंडला नेलं आणि बघता बघता त्यानं बुद्धिबळ जगतात एकच खळबळ माजवून दिली. ज्या ब्रिटिश महासत्तेवर सूर्य मावळत नाही असं म्हटलं जायचं त्या  महासत्तेचा मीर सुलतान खान हा तीन वर्षे अनभिषिक्त बुद्धिबळ सम्राट ठरला. जगज्जेत्या कॅपाब्लांकालापण त्यानं धूळ चारली होती.

आपल्याकडे लहान मुलांनी बुद्धिबळ खेळणं म्हणजे वेळेचा अपव्यय असा एक समज होता! त्याला छेद दिला तो विश्वनाथन आनंदनं! भारताचा पहिला ग्रँडमास्टर होण्याचा बहुमानही त्यानं पटकावला. वयाच्या विशीपूर्वीच आनंद (ज्याला जग ‘विशी’ या टोपण नावानं ओळखतं) जगभरात प्रसिद्ध झाला. जागतिक जुनिअर स्पर्धा जिंकणाऱ्या आनंदनं लहान वयातच एकाहून एक राष्ट्रीय विक्रम नोंदवले. 

भारताचा दुसरा ग्रँडमास्टर दिब्येन्दू बारुआ यानं वयाच्या १६व्या वर्षी इंग्लंडमध्ये प्रसिद्ध लॉईड बँक बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेऊन त्या वेळचा जागतिक आव्हानवीर व्हिक्टर कोर्चनॉय याला हरवून जगात भारतीय प्रतिभेची नोंद केली होती. हरिकृष्ण, सूर्यशेखर गांगुली हेही असेच लहान वयात चमकलेले  ग्रॅण्डमास्टर्स!

मधल्या काही वर्षांच्या विश्रांतीनंतर अचानक भारतीय मुलांनी आपल्या प्रतिभेनं सगळय़ा जगात भारताला कुठल्या कुठे नेवून ठेवलं आहे. तमिळनाडूचा प्रज्ञानंद, केरळचा निहाल सरीन, तेलंगणाचा अर्जुन एरिगेसी आणि महाराष्ट्राचा रौनक साधवानी यामधील कोण भावी जगज्जेता होणार याची चर्चा आज जोरात आहे आणि  माजी जगज्जेते यावर आपली मतं मांडत आहेत. 

हंगेरीमधील पोलगार भगिनींच्या कहाणीवर मी भविष्यात लिहिणार आहेच, पण अलौकिक बुद्धिमत्ता उपजत नसते तर ती लहान मुलांमध्ये प्रयत्नपूर्वक विकसित करता येते या विषयावर आधी पुस्तक लिहून नंतर आपल्या तीन मुलींना जगजेत्या बनवणाऱ्या पोलगार दाम्पत्याकडून भारतीय पालकांना बरेच काही शिकता येईल. सुसान पोलगार अनेक वेळा जगज्जेती झाली, तर सर्वात लहान ज्युडिथ तब्बल २५ वर्षे जगातील सर्वोत्तम महिला खेळाडू राहिली होती. या पोल्गर दाम्पत्यानं आपल्या मुलींना ठरवून कसं जगज्जेतं केलं याची एक सुरस कहाणीच आहे.

भारतीय मुलीही काही कमी नाहीत. कोनेरू हम्पी ही जगातील सर्वात लहान ग्रॅण्डमास्टर्स पैकी एक. ४५ वर्षांपूर्वी खाडिलकर भगिनी आशियायी बुद्धिबळावर राज्य करत होत्या. अनुपमा अभ्यंकर-गोखले हिने वयाच्या १५ व्या  वर्षी एकाच वर्षांत आशियायी बुद्धिबळाच्या जुनिअर आणि महिला अजिंक्यपदाची सुवर्णपदके जिंकून भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. या वर्षीची अर्जुन पुरस्कार विजेत्या भक्ती कुलकर्णीनं वयाच्या १२ व्या वर्षी गोवा राज्याच्या पुरुषांचं अजिंक्यपद मिळवलं होतं आणि नंतर दोन वर्ष ते कायम राखलं होतं. असे हे बुद्धिबळातील लहानगे प्रज्ञावंत आणि त्यांच्या कर्तृत्वाची कहाणी.

gokhale.chess@gmail.com