‘अफलातून.. अमुचे गाणे’ हा लेख मी मागच्या गुरुवारी रात्री पूर्ण करून, शुक्रवारी त्यावर अखेरचा हात फिरवून ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयाला तो मेल केला. ताज्या लिहिलेल्या लेखाच्या विषयांशी संबंधित व्यक्तींच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मी विशेष उत्सुक असतो. त्यानुसार दिलीप प्रभावळकर, दिलीप कोल्हटकर, ‘अफलातून’ची टीम आणि माझा सुहृद विनय आपटेची प्रतिक्रिया ऐकायला मी उत्सुक होतो. आणि शनिवारी अकस्मात विनयच्या दु:खद निधनाची बातमी कळली. आणि दोन दिवसांपूर्वी लेख लिहिताना जगलेले ते क्षण पुन्हा एकदा मनात रुंजी घालू लागले. अनेकदा मुंबई दूरदर्शन केंद्रावरून विलेपाल्र्यापर्यंत त्याच्यासोबत त्याच्या मोटरबाइकवर बसून केलेला झंझावाती प्रवास आठवत राहिला. आणि ‘अफलातून’च्या तालमींचे झपाटलेले दिवस. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या मराठी युवदर्शन कार्यक्रमांतर्गत मराठी पॉप गाणी करताना संकल्पनेपासून ध्वनिमुद्रणापर्यंत त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या सुंदर स्मृती.. कलेच्या क्षेत्रात स्वत:ला अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून शोधताना स्वत:बरोबरच भोवतालच्या छोटय़ा-मोठय़ा धडपडणाऱ्या कलाकारांना निरपेक्ष बुद्धीनं सदैव मदतीचा हात देणारा, त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणारा विनय आपटे हा एकमेवाद्वितीयम. केवळ स्वत:च्याच उत्कर्षांकरता सदैव धडपडणारे कलाकार खूप असतात. पण विनयसारखा ‘समस्तांसी आधारू’ मित्र वाटय़ाला येणं हे आम्हा सर्वाचं परमभाग्य.
सुमारे वर्षां-सव्वा वर्षांपूर्वी ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयातून मला फोन आला. २०१३ मध्ये वर्षभर  ‘लोकरंग’ पुरवणीत मला सदर लिहिण्याविषयी सुचवलं. ‘दर आठवडय़ाला लिहिणं माझ्या संगीतकार कारकीर्दीमुळे मला शक्य होणार नाही. पण पंधरवडय़ातून एकदा लिहू शकेनसे वाटते,’ अशा पुष्टीसह मी होकार कळवला. सदराविषयी विचार करताना स्तंभाचं शीर्षक सुचलं.. स्मरणस्वर. वा.. स्मरणस्वर म्हणजे स्वरांची स्मरणे किंवा स्मरणांचे स्वर. माझा संगीतप्रवास- संगीताचा एक अभ्यासक आणि एक संगीतकार म्हणूनसुद्धा. ‘स्मरणस्वर’ या सदरातून मांडायचं ठरवलं. प्रत्येक पंधरवडय़ाच्या सदराकरिता वेगवेगळ्या विषयांची एक कच्ची यादीच तयार केली. सुमारे पस्तीसेक विषय यादीमध्ये होते. अकोल्यापासून सुरू झालेली स्वरांची स्मरणे पुढे पुण्यात येऊन रुजल्यावर आजपर्यंतचा प्रवास मांडत राहिली. सव्वीस भागांच्या ‘स्मरणस्वर’मध्ये संगीतकार म्हणून पन्नासहून अधिक चित्रपट, खासगी ध्वनिफिती, म्युझिक अल्बम्स आणि शब्दवेध या संस्थेच्या माध्यमातून सादर झालेले अभिजात कवितेचे सांगीतिक रंगमंचीय आविष्कार अशा विविध माध्यमांतील माझ्या (संगीतकार रूपातल्या) मुशाफिरीचा समावेश करता आला नाही. त्याचप्रमाणे चित्रपटगीतांचे चित्रपटातील प्रभावी दृश्यात्म रूप आणि योजन, प्रतिभावंत म्युझिक अरेन्जर्स, आवडते संगीतकार, चित्रपट संगीतातले एतद्देशीय आणि विदेशी संगीतप्रवाहांचे योगदान, मराठी भावसंगीत १९४०-२०१३, चित्रपटगीतांतले नवे प्रयोग असे अनेक विषय अभ्यासक म्हणून डोळ्यांसमोर होते. त्यावरही लिहायचे राहून गेले. तरीसुद्धा तुमच्याशी ‘स्मरणस्वर’मधून संवाद करता करता निरोपाची वेळ कधी आली कळलंच नाही. जैन धर्मामध्ये एक छान परंपरा आहे. ती म्हणजे क्षमायाचना दिवस. तर तुम्हा सर्वाचा निरोप घेताना सर्वप्रथम (केवळ स्मरणांवर विसंबून राहिल्यानं) कुंदनलाल सैगलऐवजी कृष्णलाल सैगल किंवा ‘चांदनी आई घर जलाने’ (गीतकार हसरत जयपुरीऐवजी शैलेंद्र) आणि ‘घर से चले गये थे खुशी की तलाश में’ (गीतकार राजेंद्र कृष्णऐवजी साहिर लुधियानवी) असे चुकीचे नामनिर्देश माझ्याकडून झाले. (त्यानंतर मात्र मी अधिक काटेकोरपणे सर्व तपशिलांची खातरजमा करूनच मग लेख पाठवले.) अर्थात तुमच्यातल्या जाणकार सुहृदांनी मला ई-मेलद्वारा अगर एसेमेसद्वारा ते माझ्या निदर्शनाला आणून दिलं. त्याबद्दल त्या सर्वाचे आणि तुम्हा साऱ्यांचेही मन:पूर्वक आभार. मात्र, माझ्या ‘सर्वव्यापी यमन’ या लेखात चित्रपटगीतात दुरान्वयेही- म्हणजे एखाद्या ओळीमध्ये जरी पाऊसविषयक प्रतिमा वा प्रत्यक्ष संदर्भ असेल तर मल्हार रागात ते गीत स्वरबद्ध करणाऱ्या एका ज्येष्ठ संगीतकारांचा (त्यांच्याविषयी वाटणाऱ्या निखळ आदरभावनेपोटी त्यांचा नामनिर्देश न करता) संदर्भ दिला असता त्यांच्या काही मनस्वी चाहत्यांच्या भावना अतिशय दुखावल्यानं अत्यंत तीव्र व असंस्कृत पद्धतीनं त्यांनी ई-मेलद्वारा त्या माझ्यापर्यंत पोहोचवल्या. त्यामध्ये ‘त्यांच्या लाडक्या संगीतकारांच्या तुलनेत मी किती फालतू आणि सुमार संगीतकार आहे’ इथपासून ते ‘दोन-चार प्रसिद्ध कलाकारांनी माझे विनाकारण स्तोम माजवले आहे,’ इथपर्यंत- तसेच ‘साऱ्या महाराष्ट्राला माझं एकही गाणं माहीत नाही इतका मी नगण्य आहे’ अशा शब्दांत माझ्या लायकीची आवर्जून जाणीवही मला करून द्यायला त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पण मी अगदी अंत:करणपूर्वक सांगतो की, साऱ्या संगीतकार पूर्वसुरींची गाणी- यात ‘ते’ही संगीतकार आले- ऐकताना मला नेहमी वाटत राहतं, की इतकं सुंदर गाणं माझ्या हातून कधी होईल? मी स्वत:ला नेहमी त्यांच्या पायाशीच ठेवतो. मी त्या मनस्वी चाहत्यांच्या भावनांचा त्यांच्या लाडक्या संगीतकारांइतकाच आदर करतो. त्या ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकारांच्या सांगीतिक कर्तृत्वाचा संपूर्णत: आदर करताना त्यांच्या एखाद्या न पटलेल्या गोष्टींविषयी प्रतिकूल मत व्यक्त करण्याचा एक सच्चा अभ्यासक म्हणून असलेला माझा अधिकार कुणीही नाकारू नये. ‘स्मरणस्वर’चे सर्व लेख लिहिताना माझे मन वर्तमानातून भूतकाळात झेपावताना तो- तो काळ.. ते- ते क्षण.. ती गाणी पुन्हा नव्यानं जगण्याचा, अनुभवण्याचा आनंद मिळाला. पाच मे’च्या ‘लोकरंग’मध्ये प्रकाशित ‘गाये लता.. गाये लता’ या लेखानंतर नेहमीप्रमाणे रसिकांच्या, मित्रांच्या कौतुकभरल्या प्रतिक्रिया सोमवार-मंगळवार येत राहिल्या. आणि बुधवार, आठ मे रोजी दुपारी एक फोन आला.. ‘नमस्कार. मी लता मंगेशकर बोलतेय..’ साक्षात् लतादीदी फोनवर होत्या. लतादीदींनी माझ्या लेखाचं खूप कौतुक केलं. सुमारे दहा मिनिटे त्या माझ्याशी बोलत होत्या. मी त्यांना म्हणालो, ‘माझ्यासाठी आजचा हा दिवस मी तुम्हाला ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ गाताना ज्या दिवशी अनुभवलं, त्या दिवसाइतकाच भाग्याचा आहे..’ आदरणीय लतादीदींच्या अशा सुंदर दादेपेक्षा मोठा पुरस्कार तो कोणता?
‘स्मरणस्वर’मधील लेखांच्या विषय-आशयाच्या अनुषंगाने अनुरूप चित्रे-रेखाटनांद्वारे लेखांच्या प्रस्तुतीत रंग भरणारे चित्रकार निलेश जाधव यांचाही मला कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावासा वाटतो.
खंत एकच राहिली. ती म्हणजे माझे हे लेख वाचायला माझ्या आईला फार आवडले असते. तिनेच शाळेच्या पहिल्या इयत्तेत मी जाण्यापूर्वी मला लिहायला, वाचायला शिकवले. वाचन व संगीताची आवड जोपासली. तसेच माझ्या आजवरच्या प्रवासातले संगीतवेडे सुहृद.. माझा मितवा मोहन गोखले, अलूरकर म्युझिक हाऊसचे सुरेश अलूरकर, सुरेल दोस्त अजित सोमण यांच्या ‘स्मरणस्वर’वरच्या प्रतिक्रिया मला कधीच मिळणार नाहीत. त्यांची उणीव प्रकर्षांनं जाणवते.
संगीत ही ईश्वरानं मनुष्यप्राण्याला दिलेली अमोल अशी देणगी आहे. मानवी जीवन अनेक अर्थानी संगीतानं समृद्ध केलंय. प्रतिभावंत गायक, गायिका, वादक यांच्या कलाविष्कारांनी कोटय़वधी माणसांची आयुष्यं समृद्ध केली आहेत. अजूनही उत्तररात्रीपर्यंत यू-टय़ूबवर जगातल्या नाना संगीतशैलींतल्या संगीताचा आस्वाद घेताना मी मनोमन ईश्वराचे आभार मानतो. बेथोवन, मोत्झार्त, शुबर्ट यांच्यासारख्यांच्या अभिजात सिम्फनीज् किंवा बीटल्स, आब्बा, स्टीव्ही वंडर्स, जीम रीव्ह्ज कारपेंटर्स, व्हिटनी ह्युस्टन, बेलाफोंटे, नील डायमंड अशा पाश्चात्त्य लोकप्रिय गायकांच्या गाण्यांबरोबरच आफ्रिकन/ लॅटिन अमेरिकन तसेच मध्यपूर्वेतले संगीत तसेच अतिपूर्वेकडील थाई, इंडोनेशियन, जपानी व चिनी संगीताचाही आस्वाद घेत राहतो. आणि आपल्या भारतातले विविध प्रांतांतील प्रादेशिक लोक/सुगम/चित्रपट संगीत तर केवढेतरी वैविध्यपूर्ण. त्याच्याच जोडीला बडे गुलाम अली खॉं साहेबांपासून अजय चक्रवर्तीपर्यंत.. केसरबाई केरकरांपासून आरती अंकलीकपर्यंत.. कुमार गंधर्वापासून उल्हास कशाळकरांपर्यंत.. उस्ताद अल्लाउद्दिन खॉं साहेबांपासून शहीद परवेझपर्यंत.. बिस्मिल्ला खॉंसाहेबांपासून हरिप्रसाद चौरासियांपर्यंत.. उस्ताद नजाकत अली/ सलामत अलींपासून उस्ताद रशीद खानपर्यंत आणि उस्ताद अहमदजान तिरखवा साहेबांपासून ते उस्ताद झाकीर हुसेनपर्यंत भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा वैविध्यपूर्ण अनमोल खजिना.. हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने माझ्या अक्षरश: हाताच्या बोटाशी उपलब्ध आहेत. विज्ञानाची ही केवढी मोठी देणगी आहे. साऱ्या वाटचालीत मी जमेल तेव्हा, जमेल तिथून सुरांची भिक्षा मागत आलोय. अजूनही मागतोय. आणि त्यातूनच समृद्ध होतोय. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या सुरेल वळणावर.. जुन्या स्मरणांच्या नव्या स्वरावलींसह. तूर्त तुम्हा सर्वाना येणाऱ्या नव्या वर्षांत उत्तम आरोग्य, मन:स्वास्थ्य व उज्ज्वल भविष्यासाठी माझ्यातर्फे अनेकोत्तम सुरेल शुभेच्छा.                
(समाप्त)