भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’, ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’ आणि ‘झूल’ या कादंबऱ्या वाचताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवत असत. त्यांनी कादंबरीला एक वेगळे रूप दिले होते. ती कथानकप्रधान नव्हती. त्यात अनेक प्रसंग होते. नेहमी आढळणारे. पण त्याबद्दलची नायकाची दृष्टी आणि त्याचे चिंतन म्हणा ना. हा तर कादंबरीचा मुख्य गाभा होता. त्यासाठी लागणारी भाषाही त्यांनी कमावली होती. तत्कालीन घटनांचा मागोवा घेणे हे नेमाडेंच्या कादंबऱ्या करतच. कादंबरीलेखनाला देण्यात आलेले हे वळण पुढे अनेकांनी गिरवले. परंतु त्यामागील चिंतनशीलता आणि त्यासाठी लागणारा व्यासंग यांमुळे नेमाडे हे नेमाडे ठरले..
ख रं वाटत नाही, परंतु भालचन्द्र नेमाडे पंचाहत्तर वर्षांचे होताहेत. खरं असणार. कारण त्यांच्या ‘कोसला’लाच पन्नास र्वष होताहेत या वर्षी. तेव्हा ‘तरुणाने तरुण वाचकांसाठी लिहिलेली तरुणांची कादंबरी’ म्हणून ‘कोसला’ गाजली होती आणि आजच्या तरुण वाचकांनाही ती आपलीच वाटते. तरी र्वष जात राहतातच की!
कादंबरीकार नेमाडे, कवी नेमाडे, समीक्षक-विचारवंत नेमाडे यांच्याविषयी लिहायला अशा वैयक्तिक प्रसंगाची आवश्यकता नाही. काही वेगळं लिहायचं झालं तर प्रचंड अभ्यास करावा लागेल असं त्यांचं लेखन आहे. तरीही त्यांच्याबद्दल सतत लिहिलं जात असतं. असं लेखन चिकित्सकपणे साधकबाधक व्हायला हवं. आता त्यांच्या जीवनातील या पाऊणशेच्या टप्प्यावर त्यांच्या कुटुंबीयांसोबत आनंद वाटून घेताना स्नेहभावच आळवायचा आहे.
हे करताना माझ्या दृष्टीने काही गोष्टी सोयीच्या आहेत. मी नेमाडेंना ओळखू लागलो तेव्हा काही मी त्यांचा प्रकाशक नव्हतो. ‘कोसला’ १९६२ साली प्रसिद्ध झाली ती देशमुख कंपनीतर्फे. तोवर देशमुखांनी खांडेकर- माडखोलकर- काणेकर यांच्या पिढीतील प्रामुख्याने यशस्वी लेखकांची पुस्तकं प्रसिद्ध केली होती. फार तर नंतरच्या पिढीतील अरिवद गोखले यांची एक-दोन पुस्तके. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर यांनाही त्यांनी हात लावला नव्हता. ‘नेमाडे’ हे सर्वस्वी नवे नाव त्यांच्या यादीत अगदी वेगळे वाटत होते. हे वेगळेपण प्रकाशकालाही जाणवले असणार. कारण देशमुख प्रकाशनांपकी दीनानाथ दलाल यांचे वेष्टन नसलेले मला वाटते हे पहिलेच पुस्तक असावे. एका अमूर्त (अॅब्स्ट्रॅक्ट) कव्हरचे पुस्तक हातात ठेवून रामभाऊ त्याचे वेगळेपण आणि मोठेपणा सर्वाना सांगत असत. बॉम्बे बुक डेपोत आमच्या नेहमी भेटी होत आणि वरचेवर ते या नव्या लेखकाबद्दल अभिमानाने आणि आत्मीयतेने बोलत. बहुधा हा बदल त्यांच्या सुविद्य पत्नी सुलोचनाबाई यांच्यामुळे असावा. प्रत्यक्ष ‘कोसला’ वाचली आणि का, ते लगेच कळलं. तेव्हाच वाटलं, की ही तर आपल्या घराण्याची.. म्हणजे ‘पॉप्युलर’ची कादंबरी. साहित्यातही घराणी असतात म्हणायचे! महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिली काही वष्रें माझा नेमाडेंशी परिचय ते एक श्रेष्ठ लेखक आणि मी एक त्यांचा चाहता- सामान्य वाचक असाच होता.
हा माझ्या प्रकाशकीय जीवनातील एक गमतीदार टप्पा होता. मी माझ्या सतरा-अठरा वयावर प्रकाशनाला सुरुवात केल्यामुळे तोवरचे माझे लेखक माझ्याहून वयाने बरेच मोठे असायचे. या दहा वर्षांच्या प्रकाशनानंतर माझे वय दहा वर्षांनीच वाढलं असलं तरी मला अनुभवानं खूप वयस्क झाल्यासारखं वाटत होतं. त्यावेळी १९६०-७० या दशकात नेमाडे, महानोर, ग्रेस असे माझ्याहून वयाने लहान लेखक माझ्यासमोर आले. लेखक-वाचक नात्यात वयाचा प्रश्नच येत नाही. नेमाडेंना मी भेटायचो तो वाचक या नात्याने. क्वचित गप्पामित्र म्हणून! त्यावेळी अनियतकालिकांच्या चळवळीतले त्यांचे बरेचसे साथीदार माझेही मित्र होते.
पुढे काहीतरी कारणाने नेमाडे देशमुखांच्या परिवारातून निसटले. तोवर नागपूरहून अमेय प्रकाशनने या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. सुरुवातीपासून त्यांनी ग्रेस, एलकुंचवार अशा माझ्या जिव्हाळ्याच्या लेखकांपासून सुरुवात केली. ग्रेस त्यांचे सल्लागार होते. चित्रकार सुभाष अवचट यांची सजावट, उत्तम मुद्रण या सर्व बाबतींत अमेय प्रकाशन आमचे सहोदर वाटत. अशा प्रकारे जाणीवपूर्वक चांगली पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या प्रकाशकांबद्दल मला स्पध्रेची भावना वाटत नाही, तर जवळीक वाटते. त्यांच्या यादीत नेमाडेंची ‘बिढार’ पाहून चुटपुट वाटली असणार; पण काहीसा आनंदही झाला. अमेयच्या सुरुवातीच्या दिवसांत माझी िपपळापुरे-मुंजे यांच्याशी गट्टी जमली. पुढे काही कारणांनी त्यांनी फक्त क्रमिक पुस्तकांवर भर द्यायचं ठरवलं आणि ललित वाङ्मयाचं प्रकाशन थांबवलं.
इतके दिवस मी संयम दाखवून नेमाडेंचा फक्त वाचक यावर संतोष मानला होता. आता गप्प राहणं कठीण वाटू लागलं. काही करून नेमाडेंची पुस्तकं योग्य ठिकाणी पोचली पाहिजेत- म्हणजेच आमच्याकडे यायला हवीत, असं तीव्रतेनं वाटू लागलं. सगळा इतिहास सांगायचं प्रयोजन नाही; पण माझा सहकारी मित्र कृष्णा करवार याचे नेमाडेंशी विशेष संबंध होते. त्याला मधे घातला. नेमाडे तेव्हा औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात होते. आम्ही मुद्दाम तिथे गेलो आणि तेव्हापासून नेमाडेंच्या कादंबऱ्या पॉप्युलरकडे आल्या. त्यात ‘कोसला’, ‘बिढार’च्या नवीन आवृत्त्या होत्याच; शिवाय ‘बिढार’चे पुढील भाग ‘जरीला’ आणि ‘झुल’ या नवीन कादंबऱ्याही होत्या. मग नेमाडे म्हणाले की, मुळात ‘बिढार’ ही चार भागांत लिहिलेली कादंबरी होती. प्रकाशकाच्या सोयीसाठी त्यातील दोनच भाग एकत्र छापून थांबलो होतो. पण ‘बिढार’मध्ये ‘हूल’ हा दुसरा भागही तसा उल्लेख न करता समाविष्ट होता. तेव्हा मग चांगदेव चतुष्टय़- ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’ आणि ‘झूल’ असे चार भाग आम्ही छापू लागलो. या कादंबऱ्या वाचताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवत असत. त्यांनी कादंबरीला एक वेगळे रूप दिले होते. ती कथानकप्रधान नव्हती. त्यात अनेक प्रसंग होते. नेहमी आढळणारे. पण त्याबद्दलची नायकाची दृष्टी आणि त्याचे चिंतन म्हणा ना- हा तर कादंबरीचा मुख्य गाभा होता. त्यासाठी लागणारी भाषाही त्यांनी कमावली होती. मामा वरेरकर म्हणायचे की, कादंबऱ्या या बखरीसारख्या असाव्यात. तत्कालीन घटनांचा मागोवा घेणे हे नेमाडेंच्या कादंबऱ्या करतच. कादंबरीलेखनाला देण्यात आलेले हे वळण पुढे अनेकांनी गिरवले. परंतु त्यामागील चिंतनशीलता आणि त्यासाठी लागणारा व्यासंग यांमुळे नेमाडे हे नेमाडे ठरले. त्यांनी समीक्षक या नात्याने पुढे ‘देशीवाद’ आणि ‘जीवनवाद’ यांना बरेच महत्त्व दिले. त्यांच्या कादंबऱ्यांतून कोणकोणते विशेष दिसतात, ही सहज जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट नाही.
हे झाले आमच्या नात्यातील लेखक-प्रकाशक या नात्याविषयी थोडेसे सांगण्यासाठी! पण नेमाडे हे खरे आमचे हीरो आणि आमचे दोस्त. ते आधी औरंगाबादला, मग गोव्याला, पुण्याला, लंडनला असे ठिकठिकाणी असायचे. एका अर्थी निदान अधूनमधून भेटायला मित्राचे मुंबईबाहेर असणे हेच श्रेयस्कर. मुंबई ही मुंबईकरांच्या दृष्टीने निवांत भेटायची जागा नव्हे. प्रत्येकजण आपापल्या घाईगर्दीत दंग. त्यामानाने बाहेरून कोणी आले की मुद्दाम भेट शक्य व्हायची. नेमाडेंशी अशा भेटी या महत्त्वाच्या ठरायच्या. काही लेखक फक्त साहित्याबद्दल बोलतात. काही तर फक्त स्वत:च्या साहित्याबद्दल. नेमाडे तसे नाहीत. अनेक विषयांवर ते बोलत असतात. काही वेळा आग्रहपूर्वक, काही वेळा निराग्रही अभ्यासू वृत्तीने. साहित्य, भाषा असे काही विषय त्यांच्याशी बोलायला आपलाही तसाच व्यासंग लागतो. याउलट, काही विषयांत त्यांच्यापेक्षा आपल्यालाच जास्त कळते अशी माझी भ्रामक समजूत. तेव्हा हे दोन प्रांत आपोआप टाळले जायचे. बाकी मग नामांतराचा प्रश्न, राजकीय घडामोडी यांसंबंधीही आमची चर्चा चालायची. कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश न बाळगता राजकारणाची चर्चा करणारे फार थोडे. नेमाडे त्यांपकी एक. त्यातील एक गमतीदार गोष्ट- जी नेमाडेंनाही माहीत नाही..
आम्हा दोघांचा एक मित्र ऑस्ट्रेलियन आहे. तो जवळजवळ दरवर्षी भारतात यायचा. जाताना चारमिनारची पाकिटं घेऊन जायचा. म्हणजे तो किती रुळलेला होता, ते पाहा! आणीबाणीच्या काळात जाताना तो म्हणाला, ‘आपण पत्रात या विषयावर जर लिहिलं तर ती पत्रं उघडली जाण्याची शक्यता आहे.’ तेव्हा आम्ही आणीबाणीसाठी एक कोडवर्ड ठरवला- ‘नेमाडे.’ कारण आठवत नाही. पण ते उगाच नसणार.
नेमाडेंशी महत्त्वाचा संपर्क आला तो १९८० साली. आम्ही भरवलेल्या कोल्हापूर सेमिनारच्या वेळी. ‘मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप (१९५०-७५)’ या विषयावर कोल्हापूर विद्यापीठाच्या सहकार्याने चर्चासत्र भरवले होते. बहुतेक सर्व व्यवस्था प्रा. गो. मा. पवार आणि प्रा. म. द. हातकणंगलेकर यांनी केली होती. वास्तविक या पंचवीस वर्षांच्या काळात खांडेकर-फडके यांच्यातील ‘जीवनासाठी कला’ की ‘कलेसाठी सारे काही’ हा वाद मावळून काहीसा कलावादाकडे झुकणारा समन्वय साधला गेला होता. परंतु या चर्चासत्रासाठी निबंध लिहिणाऱ्यांची निवड वेगळ्या प्रकारे करण्यात आली होती. हे चर्चासत्र ‘जीवनवादा’चे महत्त्व पुन:प्रस्थापित करणारे ठरले. त्यात भालचंद्र नेमाडे यांचा कादंबरीवरील प्रदीर्घ निबंध इतका प्रक्षोभक ठरला, की हे चर्चासत्र आज तीन दशकांनंतरही ‘नेमाडे सेमिनार’ म्हणून ओळखले जाते. या चर्चासत्रात ‘मौज-सत्यकथा’ गटाची किंवा आमच्या वा. ल. कुळकर्णी- गंगाधर गाडगीळ परंपरेतील थोडीच माणसे येऊ शकली. आणि तसे ते झालेही एकतर्फी. नेमाडे यांनी आपली भूमिका अभ्यासपूर्ण पद्धतीने ठामपणे मांडली होती. त्यामुळे त्यानंतरच्या काळात एकूणच साहित्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. सभोवतालच्या जीवनाचे कंगोरे तपासणारी, पण मुख्य पात्राचा सकारात्मक विचार प्रकर्षांने जाणवू देणाऱ्या लेखनाची प्रथा सुरू झाली. त्याचा आमच्या ‘पॉप्युलर’च्या जडणघडणीवरही थोडाफार परिणाम झालाच.
‘झूल’नंतर नेमाडेंशी प्रकाशक म्हणून संबंध आला तो कवी नेमाडेंशी. त्यांच्या ‘मेलडी’ आणि ‘देखणी’ या कवितासंग्रहांनी त्यांच्या प्रतिभेचा वेगळा पलू लक्षात आला. तरी त्यांची मूळ प्रतिमा कादंबरीकाराचीच राहिली. अगदी त्यांच्या समीक्षाग्रंथाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळूनही! सहज सांगण्यासारखी गोष्ट- साहित्य अकादमी पुरस्कार हे बव्हंशी श्रेष्ठ साहित्यकाराला दिलेले आहेत. पण त्यातही गंमत आहे. कथाकार गाडगीळांना आत्मचरित्रासाठी, कवी कुसुमाग्रज यांना नाटकासाठी, कवी ग्रेसला ललितबंधासाठी, कादंबरीकार पु. य. देशपांडे यांना ‘अनामिकाचे अंतरंग’साठी, तर नेमाडेंना ‘टीकास्वयंवर’साठी! तरीही वाचक नेमाडेंकडे कादंबरीकार म्हणूनच पाहत होते. सत्तरनंतरची पिढी ही ‘कोसला’ आणि ‘चांगदेव चतुष्टय़’वर पोसलेली आणि पुढील ‘िहदू’ची वाट पाहणारी. आमची कीर्ती वेळ लावणारे प्रकाशक म्हणून. मधे आमच्या एका मित्रानेच विनोदी लेख लिहिताना केशवसुत माझी भेट घेऊ पाहतात.. का, तर त्यांचा कवितासंग्रह अजून प्रसिद्ध झाला नाही म्हणून! तेव्हा ‘िहदू’ला एवढी वीस-तीस र्वष लागतात ती माझ्या सुशेगात स्वभावामुळे असे सर्वाना वाटायचे. मी अधूनमधून नेमाडेंना भेटून आग्रह करायचो. सृजनात्मक लेखनाच्या प्रसुतिवेदनांची कल्पना मी करू शकतो. तेव्हा माझा आग्रह काहीसा कमकुवत ठरायचा. पण जेव्हा नेमाडे ‘सुचत नाही’ किंवा ‘विचार करतो’ याऐवजी घरगुती कारणे सांगू लागले तेव्हा मी एकदा वहिनींना म्हटले, ‘प्रतिभावहिनी, आता तुम्ही तरी त्यांना सांगा ना- निदान माझी लाज राखण्यासाठी.’ वहिनी म्हणाल्या, ‘छे! छे! आत्ता इतक्यात शक्य नाही. आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे.’ मी म्हटलं, ‘अहो, वधूपरीक्षा तुम्हीही करू शकता. कादंबरी फक्त तेच लिहू शकतात ना!’ वहिनी लगबगीने म्हणाल्या, ‘उलट, कादंबरी पुष्कळ लोक लिहीत असतात. पण लग्नाचं मुलाच्या बापानेच पाहायचं असतं.’ सुदैवाने मुलांच्या नोकऱ्या, लग्न, संसार सारे काही सुरळीत पार पडून ‘िहदू’ चतुष्टय़ाच्या प्रकाशनाला सुरुवात झाली.
हे चालू होतं तेव्हा नेमाडे मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरातील बंगल्यात राहायचे. तिथे छोटेसे अंगण होते आणि मुंबईत अशक्य वाटेल अशी छान झाडे होती. त्यात एक माडही होता. नेमाडे सांगत होते की, ते या झाडाखाली बसून वाचत असतात. मी वर पाहिले. अचानक नारळ पडला तर! माझ्या डोळ्यांतील भीती पाहून नेमाडे म्हणाले की, ‘नारळ कधी माणसाच्या डोक्यावर पडत नाही. असं झाल्याचं कधी ऐकलं नाही.’ खरं-खोटं कोण जाणे; पण नेमाडे सुखरूप विद्यापीठातून निवृत्त झाले.
आत्ता नेमाडेंशी मीच नव्हे, तर माझ्या सहकाऱ्यांचाही संपर्क असतो. मी गेली पाऊणशे र्वष माझ्या भोवतालच्या मंडळींकडून काही ना काही शिकत आलोय. शिक्षक शिकवतो म्हणण्यापेक्षा विद्यार्थी शिकत असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. विशेषत: माझ्या थोर थोर लेखकांकडून त्यांना अजाणता मी ओरबाडून घेत असतो. नेमाडे यांच्याकडे देण्यासारखे खूप काही आहे. माझ्या परीने मी नेमाडे आणि त्यांच्या जवळचे यांच्याकडून खूप काही घेतले आहे. काही प्रमाणात माझे सहकारीही या सांस्कृतिक लुटालुटीत सामील आहेत. त्यामुळे ‘पॉप्युलर प्रकाशन’च्या धोरणातही काही चांगला फरक पडलेला आहे. माझ्या या न संपणाऱ्या विद्यार्थीवृत्तीमुळे मी निवृत्त होऊनही पॉप्युलरच्या शाळेत रेंगाळत असतो.- आता ‘िहदू’च्या पुढील भागांची वाट पाहत!