वर्गातला दिनू बाईंना फारसा कधीच आवडायचा नाही. विस्कटलेले केस, तेलाचा लवलेश नाही, बटणे तुटलेला शर्ट, अर्धवट खोचलेला, वरच्या खिशाला पडलेला शाईचा डाग, भकासलेले डोळे, अभ्यासही बेताबेताचा. भिडेबाई टापटिपीच्या, शिस्तीच्या भोक्त्या. एके दिवशी दिनूची तक्रार बाईंनी मुख्याध्यापकांकडे केलीच. सर हसले आणि म्हणाले, ‘‘बाई, तुम्ही जरा त्याच्या घरी का जाऊन येत नाही? त्याच्या पालकांशी बोलून घ्या.’’ भिडेबाई दिनूच्या घरी गेल्या. वडील स्वर्गवासी. आई टी. बी. आणि दम्याची रुग्ण. घरात अठराविश्वे दारिद्रय़! टांगलेल्या दोरीवर वाळणारा सकाळचा शाळेतला शर्ट.. पुन्हा उद्या घालण्यासाठी. बाई घरी आल्या म्हणून गुळाच्या खडय़ाचा चहा करण्यासाठी दिनूची धडपड सुरू झाली. बाईंच्या लक्षात सारी परिस्थिती आली. बाईंनी दिनूला जवळ घेतले. त्या दिवशी संध्याकाळी बाईंनी दिनूला साधी शर्ट-पॅन्ट घेतली. थोडय़ाच दिवसांत दिनूची आई देवाघरी गेली. भिडेबाईंनी दिनूवर मायेची पाखर अधिक घट्ट केली. दिनू आता त्यांचा मानसपुत्र झाला. दिनूची शाळेतली प्रगती सुधारली. वर्गात त्याचे मन घरापेक्षा अधिक रमू लागले. दोन वर्षांनी एस. एस. सी.चा रिझल्ट लागला. दिनू शाळेत पहिला आला. त्याचे पेढे भिडेबाईंनी वाटले. कॉलेजात प्रवेश करण्यापूर्वी दिनू बाईंकडे गेला. त्याने त्यांना खाली वाकून नमस्कार केला. पेपरच्या वेष्टणात गुंडाळलेली एक भेटवस्तू त्याने बाईंना दिली. बाईंनी कौतुकाने उघडून पाहिले. दिनूच्या आईने वापरलेला छोटा कुंकवाचा करंडा आणि दोन खडे जडवलेल्या साध्या बांगडय़ा. जडवलेले दोन-चार खडे पडून गेले होते. वस्तू वापरलेल्या असल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. बाईंच्या डोळ्यांत अश्रू आले. बाईंनी लगेच त्या दोन्ही बांगडय़ा आपल्या दोन्ही हातांत घातल्या. दिनूच्या अन् बाईंच्या वाटा येथून वेगळ्या झाल्या. बाईंनी दिनूच्या हातात आत्मविश्वासाच्या वज्रमुठी घातल्या होत्या. पुढचा प्रवास करायला तो समर्थ होता..
आयुष्याच्या योग्य त्या टप्प्यावर ‘भिडेबाई’ भेटणे हे ज्यांच्या नशिबात होते, ते भाग्यवंतच म्हणायला हवेत. आज आपल्यापकी काहीजण डॉक्टर, इंजिनीअर, वकील, तंत्रज्ञ, कारखानदार अशा वेगवेगळ्या रूपांत असतील. पण त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम शाळेत कोणत्यातरी शिक्षकाने/ शिक्षिकेने केले असेल. आणि ते तुम्ही मनाच्या कप्प्यात खोलवर दडवून ठेवले असेल. आजच त्याची आठवण का यावी? आज काही शिक्षक दिन नाही. पण खरे तर त्या शिक्षिकेची आठवण काढायला कोणता विशिष्ट दिवस का लागावा? ती तर पावलापावलांवर तुमच्याबरोबर तुमच्या मनात आहे. ती तुमच्या श्वासात आहे. ती तुमची न दिसणारी सावली आहे. तिने तुमचे मन जपले आहे. निराशेची राख आपल्या फुंकरेनं झटकून तिने तुमच्यातील आत्मविश्वासाचा अंगार फुलवत ठेवला आहे. तिने तुमच्या मुठी वळवल्या आहेत. तिने आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवरचा तुमचा विश्वास वाढवला आहे.
आज सक्षम समाज घडवायचा असेल तर अनेक भिडेबाईंची गरज आहे. व्हॉट्स अॅप, ट्विटरच्या या जमान्यात सकाळच्या गोष्टी दुपारी शिळ्या होतात. तेव्हा अक्षय मूल्ये म्हणजे काय? आणि त्यांची रुजवात कशी करायची, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. त्याचे उत्तर भिडेबाई देतात. वय वर्षे आठ ते १४ या कालावधीत मुलांना शाळेतल्या बाई या आई-वडिलांपेक्षा अधिक विश्वासार्ह आणि वंदनीय वाटतात. वष्रे उलटली, पिढय़ा बदलल्या; ‘बाईंना विचारेन’ हे वाक्य ‘टीचरने सांगितलंय’ एवढेच बदलले. शब्द नवे, पण अर्थ तोच आहे. तेव्हा विचार आणि संस्कार पेरणाऱ्या भिडेबाईंचे स्थान काळातला बदल हिरावू शकणार नाही. वाचकांना विस्मय वाटेल, की मी गुरुजींना का विसरतो आहे? नाही, इथे भिडेबाई या प्रातिनिधिक आहेत. आणि तरीही स्त्री-शिक्षकाचे महत्त्व मला विशेष अधोरेखित करावयाचे आहे. ‘बाई’ या ‘सरां’पेक्षा जवळच्या वाटतात. कारण तेथे कर्तव्याच्या खडय़ाला ममतेचे कोंदण लाभलेले असते. बाईंनी आपल्यात दडलेली आई कधीच पुसून टाकली नाही. स्वत:च्या बंद तुटलेल्या पर्समधून पसे काढून विद्यार्थ्यांसाठी खर्च करणाऱ्या बाई मला दिसतात. वर्गातल्या मुलांच्या निबंधाच्या वह्य़ा पाहताना त्यांच्या हातावर उमटलेले वळ बाईंना कासावीस करतात. आंतरशालेय स्पध्रेसाठी दूरच्या शाळेत जाण्यासाठी रिक्षाला हात करणाऱ्या बाईंना कधी टी. ए./ डी. ए. मिळाल्याचे ऐकिवात नाही. अशाच एका बाईंचा मी मुलगा आहे, ही माझ्या दृष्टीने आयुष्यातली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आणि आईचा शाळेतल्या शिक्षिकांचा- मत्रिणींचा गोतावळा घरी आला की त्यांच्या गप्पा ऐकताना ऐंशीच्या घरात पोहोचलेल्या या ‘बाई’ शाळेच्याच आठवणींत रमतात, हे मी अनुभवलेले आहे.
प्रश्न असा उरतो की, ही दुर्मीळ वस्तू जपण्यासाठी, हा वारसा नव्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आम्ही काय करतो आहोत? तुटपुंजा पगार- तोही कधी कधी महिनोन् महिने थकलेला. निवडणुका आल्या, धरा शिक्षिकांना. आरोग्य अन् इतर राष्ट्रीय योजना राबवायच्या आहेत.. आहेत ना हे फुल अधिकारी, बिनपगारी हक्काचे वेठबिगार. त्यांच्या संपांना, उपोषणांना चिरडणे सोपे. संस्कारांमुळे ते दगड उचलणार नाहीत. शाई ही त्यांच्या लेखी सरस्वतीची देणगी. ती त्या पेनात भरतील; नेत्यांवर फेकणार नाहीत. उलट, संपामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते, म्हणून त्यांच्याच मनाची तगमग होते.
आपणही आता बदलणे गरजेचे आहे. या पेशाचा मोबदला इतका वाढावा, की ‘मेहनताना’ या शब्दाला खरा अर्थ प्राप्त व्हावा. हे पगारी नोकर नाहीत, तर भावनेने भारलेले हात आहेत- जे एका शाडूच्या मूर्तीला आकार देत आहेत. त्यांना गृहकर्ज, वाहनकर्ज, आरोग्यविमा देताना हप्त्यांमध्ये सवलत असावी. त्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर शिक्षणही मोफतच असावे. ‘‘मास्तरांच्या घरात बायकोच्या गळ्यात नाही, पण डोळ्यांत मोत्ये पडली!’’ हे चितळे मास्तरांचे पु. लं.नी केलेले वर्णन वाचून आमची पिढी मोठी झाली. आता बदलायची वेळ उद्याच्या शिक्षणधोरणांवर आहे, हे आम्ही जाणले पाहिजे. हे शक्य आहे. आणि बाई कधीही ‘कोण म्हणतो देणार नाय? घेतल्याबिगर जाणार नाय!’ या पातळीवर उतरणार नाहीत. पण म्हणून त्यांचा मूक आक्रोश ऐकायचाच नाही? सोशिकांची सहनशीलता दाबणारा समाज वर येत नाही. तेव्हा हे आता बदलू या.
..दिनू इंजिनीअर झाला. त्याला अमेरिकेतल्या एका विद्यापीठातून एम. एस., पीएच.डी. मिळाली. सहचारिणी त्याने स्वत:च शोधली. लग्नाचे आमंत्रण भिडेबाईंना गेले. भिडेबाई आल्या. सारा हॉल खचाखच भरला होता. मुंगीला पाय ठेवायला जागा नव्हती. पहिल्या रांगेतील एक खुर्ची राखीव होती. त्या खुर्चीच्या पाठीवर स्टीकर होता- ‘आई’. दिनूने भिडेबाईंना सन्मानाने तेथे बसविले. जोडीने पाया पडला. कुर्त्यांच्या खिशातून त्याने दोन हिऱ्याच्या बांगडय़ा काढल्या. भिडेबाईंच्या हातात भरल्या. बाईंच्या हातातील १२ वर्षांपूर्वीच्या खडे पडलेल्या बांगडय़ांच्या जोडीला आता नव्या बांगडय़ा लखलखू लागल्या. बाईंनी दिनूच्या कपाळावर हात फिरवत मुका घेतला अन् त्या म्हणाल्या, ‘‘माझा हिऱ्याचा खडा तो!’’
भिडेबाई
वर्गातला दिनू बाईंना फारसा कधीच आवडायचा नाही. विस्कटलेले केस, तेलाचा लवलेश नाही, बटणे तुटलेला शर्ट, अर्धवट खोचलेला, वरच्या खिशाला पडलेला शाईचा डाग, भकासलेले डोळे, अभ्यासही बेताबेताचा.
आणखी वाचा
First published on: 17-08-2014 at 06:28 IST
मराठीतील सर्व जनात...मनात बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhide madam