संघर्ष, साहस, प्रेरणा, अस्वस्थता, वेदना, अद्भुतता, वेगळेपणा आणि परमोच्च यशस्विता यांपैकी कोणतीही एक बाब आपण गृहीत धरली तर कवी गोविंद काळे लिखित ‘मी आणि माझा ७/१२’ या आत्मचरित्रामध्ये आपल्याला काहीच सापडत नाही.
एक तर एका कवीचे आत्मचरित्र म्हणून आपण वाचले तर कवीबद्दल, कवी म्हणून घडण्याची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल, कवीच्या निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात किंवा कवी म्हणून कवीची जी एक भूमिका असते त्याबद्दल किंवा समकालीन काव्यविश्वाबद्दल कसलाच उल्लेख या आत्मचरित्रामध्ये नाही.
दुसरे असे की, आत्मचरित्राचे शीर्षक आणि मुखपृष्ठावर छापलेला सातबाराचा उतारा बघून या आत्मचरित्रामध्ये शेतीविषयी, कृषीजिवनाविषयी काही असेल असे म्हणावे तर त्या संदर्भानेही हाती काही लागत नाही. शेती-मातीचे कुठलेच संदर्भ येत नाहीत.
तिसरे असे की, आत्मचरित्र हेच लेखकाचे मनोगत असते. तरी लेखकाने स्वतंत्र मनोगत जोडले आहे. त्यात एक वाक्य आहे, ते असे-‘‘मला जातीचं भांडवल करायचं नाही. पण जात सांगितल्याशिवाय माझं आत्मचरित्र पूर्णच होत नाही.’’ आत्मचरित्राच्या सुरुवातीलाच हे वाक्य वाचल्याने या संदर्भाने काही असेल असे वाटते; पण संपूर्ण आत्मचरित्रात या संदर्भाने काहीच येत नाही. त्यामुळे या तिन्ही पातळ्यांवर वाचक म्हणून निराशाच होते.
पण एका सामान्य कुटुंबातील सामान्य माणसाची ही प्रामाणिकपणे सांगितलेली कहाणी आहे. लेखकाने शक्य तेवढा प्रामाणिकपणा पाळला आहे. म्हणजे भ्रष्टाचार कसा केला, दारू कशी घेतली, अपमान कसे सहन केले, अधिकाऱ्यांची बोलणी कशी खाल्ली, लाच कशी दिली, आयुष्यात चुका कशा केल्या आणि त्या सुधारल्या कशा, हे सर्व अतिशय प्रामाणिकपणे मांडले आहे.
तसेच सुरुवातीच्या भागात ‘ईर’, ‘जळ’, ‘खेळ’, ‘बाणी’ इत्यादी ग्रामीण भागातील विविध विधींबद्दल माहिती आलेली आहे. काळाच्या ओघात लुप्त होणाऱ्या या विधींबद्दल पुढेही काही येईल असे वाटते, पण पुढे आत्मचरित्र संपेपर्यंत काहीच येत नाही.
संपूर्ण आत्मचरित्रामध्ये पाटबंधारे खात्यात जी नोकरी लेखकाने केली त्या संदर्भानेच सर्व माहिती येते. अधूनमधून काही कौटुंबिक संदर्भ येतात. पण संपूर्ण आत्मचरित्र पाटबंधारे खात्यातील नोकरीभोवतीच फिरते.
यात १९७२ च्या दुष्काळाचा संदर्भ आहे. पण दुष्काळाची झळ काय असते याचा कुठे उल्लेख आलेला नाही. याच दुष्काळामध्ये उजनी कालव्याचे काम सुरू होते व लेखक नोकरीच्या निमित्ताने याच कामावर देखरेखीचे काम करीत होते. पण त्या संदर्भाने मजूर व शेतकरी या बाबतही काही उल्लेखनीय नोंदी नाहीत. अर्थात त्या याव्यातच असेही काही नाही. पण यामुळे थोडा वेगळेपणा आला असता आणि काही संदर्भमूल्य प्राप्त झाले असते.
महत्त्वाचे म्हणजे या पुस्तकात जी पात्रे आलेली आहेत, त्यांचे स्वभाव-रेखाटन व शारीरिक ठेवण याविषयी काहीच उल्लेख नाहीत. त्यामुळे संबंधित पात्रे वाचकांच्या डोळ्यापुढे उभी राहत नाहीत. मुद्रितशोधनही नीट झालेले नाही.
लेखक काही स्थानिक भाषेतील शब्द आले की लगेच त्याचा अर्थ सांगतात. उदा. अनवाळीपणा- म्हणजे खोडकरपणा, वगैरे. सुशीलकुमार या साध्या नावाचा अर्थही ते सांगतात. ए.एस.के. म्हणजे काय, हे तर पुस्तकात दोन वेळा आले आहे. असे सांगण्याची खरे तर काही गरज नव्हती. लेखकाने वाचकांना गृहीत धरलेले आहे. काही शब्दांचे अर्थ सांगतात, तर काही शब्दांचे अर्थ सांगत नाहीत. उदा. लोंपाटसारख्या शब्दाचा अर्थ सांगितलेला नाही. या सगळ्यामुळे सलग वाचनात अडथळा निर्माण होतो. त्यापेक्षा एक वेगळी शब्दार्थ सूची शेवटी दिली असती तर चांगले झाले असते.
या आत्मचरित्रासाठी लेखकाने वापरलेली भाषाही वाचकाला बांधून ठेवणारी नाही. वाचक किमान भाषेमुळे तर गुंतून राहील याची खबरदारीही लेखकाने घेतलेली नाही. एकंदरीत या आत्मचरित्राचे पुनर्लेखन झाले नाही, हेही स्पष्टपणे जाणवते. थोडक्यात काय, तर या आत्मचरित्रामध्ये प्रामाणिकपणा असला तरी हे आत्मचरित्र वैयक्तिक पातळीवरच राहते; काही वेगळेपणा देत नाही. किंवा प्रभावीपणे कशाचे प्रतिनिधित्वही करीत नाही.
‘मी आणि माझा ७/१२’
– गोविंद काळे, गवळी प्रकाशन, इस्लामपूर, पृष्ठे- २०२,
मूल्य – २१० रुपये.
वैयक्तिक पातळीवरचे आत्मचरित्र
संघर्ष, साहस, प्रेरणा, अस्वस्थता, वेदना, अद्भुतता, वेगळेपणा आणि परमोच्च यशस्विता यांपैकी कोणतीही एक बाब आपण गृहीत धरली तर कवी गोविंद काळे लिखित ‘मी आणि माझा ७/१२’ या आत्मचरित्रामध्ये आपल्याला काहीच सापडत नाही.
आणखी वाचा
First published on: 29-06-2014 at 01:02 IST
TOPICSबायोग्राफी
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biography about personal experience