पहाटेस पूर्वेकडे फटफटू लागलं की खिडकीबाहेरच्या आंब्यातून कुकुटकुंभ्याचा (भारद्वाज) धीरगंभीर हुंकार कानावर पडे- आणि आणखी एक दिवस सुरू होई. त्या हुंकारण्याच्या जोडीला वर्षांऋतूमध्ये पावशाचं ‘पेर्ते व्हा, पेर्ते व्हा’चं पालुपद असे, तर वसंतात कोकिळाच्या तारसप्तकातल्या तानांचं पाश्र्वसंगीत चालू असे. थोडं उजाडलं की समोरच्या फणसाच्या फांदीवरून पिवळ्या पानांआड दडलेला सुभग सुरेल शीळ घालू लागे. तो नसला तर त्याच्या जागी बसून काळा-पांढरा दयाळ मंजुळ गाणं सुरू करे. लगोलग फांद्यांवर छोटय़ा छोटय़ा उडय़ा मारत किडे शोधणाऱ्या शिंपी पक्ष्याची ‘ट्विट ट्विट’ ऐकू येई. लाकडी कुंपणातून वर आलेल्या काठीवर बसून तुकतुकीत काळा गप्पीदास गप्पा मारत बसे. त्याला प्रतिसाद म्हणून की काय, राखी वटवटय़ाची ‘टी-टी’ सुरू होई. कुठूनशा उडत आलेल्या, फांद्यांमध्ये लपलेल्या साळुंक्या, जंगली मैना किंवा ब्राह्मणी मैना कलकल करू लागत. हिवाळ्यात त्यात दूरदेशीहून येणाऱ्या गुलाबी पळसमैनांची भर पडे. भरीस भर म्हणून मागच्या ओढय़ाकाठच्या झुडपांच्या दाटीतून पाणकोंबडय़ांचं ‘क्व्ॉक क्व्ॉक’ कानावर येई. या साऱ्या पाश्र्वसंगीताच्या साथीनं आवरून शिकवणीसाठी घराबाहेर पडलं, की एखाद्या डहाळीवर अंगाला अंग चिकटवून, पिसं फुगवून दाटीवाटीने बसलेले वेडे राघू दिसत. थंडी पडू लागली की रस्त्याकडेच्या तारांवर शेकडो भिंगऱ्यांची शाळा भरे. पिंपळाच्या पानांमधून बाणासारखे सुसाट निघालेले पोपट ‘चीर्र चीर्र’ ओरडत क्षणार्धात नजरेआड होत. कवठीचाफ्यावरून बुलबुल अन् सावरीच्या शेंडय़ावरून कोतवाल एकमेकांशी गुजगोष्टी करत असत. कधी बोरीवर बसलेला नकल्या खाटिक मिनिटा-मिनिटाला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढून आपलं नाव सार्थ ठरवत असे. देवळामागच्या भल्यामोठय़ा बकुळीवरचा अखंड बडबड करणारा सातबायांचा थवा चाहूल लागताच गप्प गप्प होऊन जाई. आणि चष्मेवाला (व्हाइट आय) विस्फारलेल्या डोळ्यांनी एकटक बघत राही. एवढय़ात काजूच्या लागातून मोहक शीळ घालत सुवर्णपक्षी हळद्या बाहेर पडे आणि पल्याडच्या आमराईत जाऊन गडप होई.  रस्त्याच्या बाजूला मातीतून किडामुंगी टिपत चरणारे कवडे (स्पॉटेड डव्ह) जवळ जाताच भुर्रकन् उडून जात. वाटेवरल्या सुकत चाललेल्या पऱ्ह्य़ाजवळ, चिखलाणीत तीन-चार प्रकारचे धोबी, खंडय़ा, नदीसुरय, शेकाटय़ा, भुरे बगळे, गायबगळे, राखी बगळे, पाणकावळे, कुदळ्या, क्वचित रंगीत करकोचे, कधीमधी चमचा (स्पूनबिल) अन् दुर्मीळ म्हणावा असा लाल तापस (बिटर्न) दर्शन देई. पलीकडच्या कापणी झालेल्या भातशेतीत लालतोंडी टिटवी स्तब्ध उभी असलेली दिसत राही.
शाळेत जाता जाता नेहमीच यातलं काही काही दिसत राही. शाळा होती उंच टेकडीवर. गर्दहिरव्या आमराईत. त्यामुळे झाडांच्या सहवासात रमणाऱ्या पाखरांची तिथे सारखी चहलपहल. पानावळीत लपून जाणारा हिरवागार हरेवा (लीफ बर्ड), दोन-तीन प्रकारचे निखार, हळद्या, शेंडीवाला बुलबुल, जंगली सातभाई, लाल सातभाई, सुरेल शामा, सोनपाठी सुतार, कस्तुर, ब्लॅकबर्ड, रानखाटिक, ककू-श्राईक असे कित्येक पक्षी अवचित दर्शन देत असत. कधीतरी देखणा नवरंग झलक दाखवून जात असे. तर कधी दुरून ऐकू येणाऱ्या खोडावरील टकटकीचा माग काढत गेल्यावर दुर्मीळ काळा सुतारपक्षी दृष्टीस पडे. शाळेच्या जुन्या इमारतीच्या कौलारांतून हमखास पिंगळे नजर रोखून बघत असत. तर प्रयोगशाळेच्या मागचं पिवळ्या-केशरी डोळ्याचं मोठं शृंगी घुबड उरात धडकी भरवून जाई. साऱ्या आमराईत तांबटाच्या सततच्या पुरपुकीबरोबर कुतुग्र्याचीही (व्हाइट चीक्ड् बार्बेट) कुटुर-कुटुर कानांवर पडत राही.
शनिवारी सकाळची शाळा असली की चढणीवरच्या वाकणावरचा सरळसोट सुरू हरियालांनी (ग्रीन पीजन) भरलेला असे. सायकलींची चाहूल लागताच त्यांचा सारा थवा पंखांची जोरात फडफड करत क्षणार्धात गायब होई. मात्र, कुणाच्या पंखांचा आवाज कायमचा लक्षात राहिला असेल, तर तो म्हणजे ककणेरांचा! ‘ककणेर’ किंवा ‘काकण’ म्हणजे काळ्या-पांढऱ्या रंगांचे, भल्यामोठय़ा चोचीचे ‘पाइड हॉर्नबिल’! आमराईतल्या भल्यादांडग्या वृक्षांमुळे तिथे हॉर्नबिल म्हणजे धनेशांची घरटी होती. काळ्या-पांढऱ्या धनेशांबरोबरच मलबारी राखी धनेशही नेहमी दर्शन देई. मधल्या सुटीत तासाभराच्या वेळात धनेशाची, तांबटाची, सुताराची घरटी  शोधायचा उपद्व्याप करता करता नाचणांचं (फॅनटेल फ्लायकॅचर) वाटीसारखं घरटं सापडून जाई. कधी तारे जोरावर असले तर हातभर लांब शेपटीचं पांढरंशुभ्र  अतिसुंदर ‘बाणपाखरू’ म्हणजे ‘स्वर्गीय नर्तक’ही नजरेस पडे. त्या दिवशी त्याच्याबरोबरीने आम्हीही हवेत तरंगत असू. वर्गाच्या खिडकीवर झुकलेल्या नाजूक डहाळीवर राखी टिटच्या मागोमाग टोपीवाला पिवळा-काळा टिटही उगवे. वटवटे अन् फुलटोच्या एकमेकांबरोबरच हिंडत राहत. इवला जांभळा सूर्यपक्षी तर नेहमीचाच. पण कधीतरी रत्नजडित ‘क्रिम्झन सनबर्ड’ डोळ्यांचे लाड करून जात असे.
अशातच एखाद्या तापलेल्या दुपारी झाडांतून दिसणाऱ्या निळ्याभोर आकाशाच्या तुकडय़ात तुरेवाला सर्पगरूड शीळ घालत घालत उंचावर डौलाने विहरताना दिसे आणि मी भारावल्यासारखा त्याच्याकडे पाहत राही. त्याचं ते डौलानं वाऱ्यावर स्वार होणं पाहून आंजल्र्याच्या कडय़ावरच्या गणपतीपासून खाली दिसणाऱ्या नारळी-पोफळींच्या हिरव्यागार पाचूसमान समुद्रावर तरंगणाऱ्या पांढरपाठी गिधाडांची, त्यांच्या गरम हवेच्या झोतांवर तरंगत गोल गोल फिरत वरवर जाण्याची हमखास आठवण होई. शाळेतून घरी येता येता साकवाजवळ घुमणाऱ्या पारव्यांवर सुसाट सूर मारून विद्युत्वेगाने झेपावणारा शिक्रा डोळ्याचं पारणं फेडत असे. साकवावरून खाली चिखलात घरटय़ासाठी ओल्या मातीचे छोटे छोटे गोळे चोचीतून नेणारी लालबुडी भिंगरी (रेड-रंपड् स्व्ॉलो) दिसे. चिखलापासून घरटय़ापर्यंतच्या तिच्या चकरा मोजता मोजता सूर्य मावळतीला झुकून जाई. सायंकाळी रातथाऱ्याकडे परतणाऱ्या, डोक्यावरून संथपणे उडत चाललेल्या बगळ्यांच्या माळा निरखत आम्हीही घरी परतत असू.
सुटीच्या दिवशी दुपारी घरच्यांची नजर चुकवून हिंडायला जाण्यासाठी एक खूप मोठं प्रलोभन आम्हाला साद घालत असायचं, ते म्हणजे दापोलीपासून जवळच असणारा समुद्र! आठ-दहा कि. मी. अंतरावर असणारी लाडघर, बुरोंडी, हर्णे, मुरूड, आंजर्ला, थोडी लांबची कोळथरे, दाभोळसारखी छोटी छोटी गावं अन् त्यांचा आपापलं वेगळं वैशिष्टय़ जपणारा शांत, स्वच्छ, निवांत समुद्रकिनारा. या समुद्रांत तुडुंब डुंबण्याबरोबर, पुळणीवर भटकण्याबरोबरच पोटभर पक्षीनिरीक्षणही होत असे. हिवाळ्यात हे सारे समुद्रकिनारे तीन-चार प्रकारच्या पांढऱ्याशुभ्र सी-गल्स अन् ‘सुरय’ म्हणजे टर्नस्च्या मोठाल्या थव्यांनी फुलून जात. त्यांच्याबरोबर दरवर्षी हजारो मैलांचं स्थलांतर करून येणारे विविध प्रकारचे प्लोव्हर्स, सँडपायपर्स, डनलिन, गॉडविटस्, रेडशँकस्, टर्नस्टोन्स, कल्र्यू, व्हिम्ब्रेला, स्टिंटस्, अ‍ॅव्होसेटस् असे कित्येक पाणथळीतले पक्षी समुद्रकिनारे सजवीत. सगळ्या किनाऱ्यांवर पक्ष्यांचं संमेलन भरल्याचा भास होई. नेहमीच्या तपकिरी घारींसोबत अतीव देखण्या लालसर ब्राह्मणी घारी सदोदित आभाळात असत. हिवाळ्यात त्यांच्या जोडीला केस्ट्रेल, दोन-तीन प्रकारचे हॅरियर्स- ससाणे, क्वचित् ‘ऑस्प्रे’सुद्धा भक्ष्याच्या शोधात उडत जात. मात्र, या साऱ्यांपेक्षा मला सर्वात जास्त आकर्षण वाटे ते एकाच राजबिंडय़ा पक्ष्याचं.. तो होता समुद्रकिनाऱ्याचा राजा- ‘व्हाइट बेलीड सी-ईगल’! पाण्यात डुंबून, पुळणीवर खेळून दमलो, की वाळूवर पडून निळ्याभोर आकाशात डौलाने विहरणारा पांढऱ्या पोटाचा समुद्रीगरूड डोळ्यात साठवताना वेळ कसा घरंगळून जाई, ते कळतही नसे. त्याचं हवेत तरंगणं, वरवर चढत जाणं, अचानक सूर मारून पाण्याच्या पृष्ठभागावरून अल्लाद पंजात महाविषारी समुद्रसाप पकडून पुन्हा वर उठणं, उंच सुरूच्या आडव्या फांदीवर बसून त्याचे तुकडे करून त्याला मटकावणं.. असं बघता बघता उन्हं कलून पाणी चमचम करू लागे. गर्द स्लेटग्रे रंगाचे काळे समुद्री बगळे किनाऱ्यावर ध्यान लावून बसलेले असत. संधिप्रकाशात घरी परतताना रात्रीच्या मासेमारीसाठी पाणवठय़ाकडे उडत जाणारे काळ्या डोक्याचे रातबगळे दिसत. एखाद्या ओढय़ाकाठच्या गचपणातून गर्द तपकिरी ‘हुमण’ (फिशिंग आऊल) ‘घू-घू’ करत घुमत असे. रोजच्या ठरलेल्या खांबावर बैठक जमवून गव्हाणी घुबड तंद्री लावून बसलेलं असे. अंधाऱ्या पाखाडीवरून सायकली हाणताना क्वचित शतब्यांचं ‘चक्कू चक्कू’ ऐकू येई आणि आपसूक सायकली घराच्या दिशेने जोरात पळू लागत.
कोकणचं महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या दापोलीसारख्या टुमदार गावाच्या शांत, निवांत पंचक्रोशीत लहानपणी अनुभवलेलं हे पक्षीजीवन! आता इथल्या पक्ष्यांच्या संख्येत आणि वैविध्यात काहीशी घट झाली असली तरी कोकणातल्या चारही जिल्ह्य़ांमध्ये कमी-जास्त, अधिक-उणेपणाने या पक्षीगणांची भेट होतेच होते. वारंवार कोकणच्या वाऱ्या करता गरूडा-गिधाडांचे, घुबडा-रातव्यांचे, बदका-बगळ्यांचे, लावा-तित्तरांचे, खाटिक-कस्तुरांचे, वटवटे-सातभाईंचे, मुनिया-बंटिंग- फ्लायकॅचर्सचे, मैना-चंडोलांचे, बुलबुल-सुतारांचे, भिंगऱ्या-पाकोळ्यांचे कित्येक उपप्रकार सापडत राहतात. एकीकडे फेसाळणारा दर्या आणि दुसऱ्या बाजूला सह्य़गिरीचे बेलाग कडे असलेल्या कोकणच्या भूमीतलं पक्षीवैभव तिथल्या सागराइतकंच अथांग आहे. तोंडावर आलेल्या दिवाळीच्या सुटय़ांमध्ये, नंतरच्या नाताळात कोकणची लाल माती पावलांवर उडवून घ्यायला कोकणात जाणार असाल तर मजा करता करता, हिंडता-फिरताना थोडंसं लक्ष या पाखरांकडेही द्या. आपण स्वत:, आपलं कुटुंब अन् आपली एन्जॉयमेंट या मर्यादित चौकटीतून बाहेर पडून या पक्ष्यांकडे पाहिलं तर तेदेखील भरभरून आनंदाच्या क्षणांची उधळण आपल्यावर करतील यात शंकाच नाही.

tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
experienced cold temperatures for past few days cold will remain in Mumbai till end of month
मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
Firing from pistols Kondhwa, pistol Kondhwa ,
कोंढव्यात दहशत माजविण्यासाठी पिस्तुलातून गोळीबार, पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा
Shocking video Shark attacks crocodile carcass australia terrifying scene video goes viral on social
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
winter will take break Meteorological Department predicts
थंडीला लागणार ‘ब्रेक’, हवामान खात्याचा पावसाचा अंदाज
CM Devendra Fadnavis and Pankaj Bhoyar will visit Datta Meghes residence in Khamla
असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…
Story img Loader