चित्रपट आवडण्याच्या निकषांमध्ये त्याचे आकलन हा केव्हाही महत्त्वपूर्ण घटक म्हणून सक्रिय असतो. दिग्दर्शकांनी समोर जर चकवे उभे केले तर त्यांना पार करण्याची तयारी सर्वच प्रेक्षकांची नसते. मग अशा चित्रपटांनी जगभर गाजण्याचे कितीही मोठे विक्रम केले, तरी त्यांचे बुरखाधारी अस्तित्व त्यांना प्रेक्षकप्रिय बनवू शकत नाही. उदा. मेट्रिक्स चित्रमालिकेने प्रदर्शित होण्याआधी धडाडीच्या अॅक्शनची आणि चमत्कारी स्पेशल इफेक्ट्सची जंत्री प्रेक्षकांना आकर्षति करण्यासाठी वापरली. अॅक्शन, मारधाड आणि परीकथा यांचे मिश्रण असलेल्या या चित्रपटाचा मूळ हेतू चकचकीत गोष्टी दाखवणे यित्कचितही नव्हता. तंत्रज्ञानकृत नव्या जगात स्वप्न आणि वास्तव यांच्या सीमेवरील मानवी स्थिती दाखवणे हा त्याचा मुख्य अजेंडा होता. त्यामुळे केवळ भव्यदिव्यता पाहण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रेक्षकांना तांत्रिक संकल्पनांच्या ‘बाऊन्सर्स’सह तो पूर्ण पकडणे झेपले नाही. लपलेल्या आशयाच्या चित्रपटांची परंपरा १९१९ च्या ‘कॅबिनेट ऑफ डॉ. कॅलिगरी’ या मूकपटापासून ते २०१० च्या ‘शटर आयलंड’पर्यंत भरपूर मोठी आहे. कुठलाही रहस्यपट हा त्यातील रहस्याच्या पांघरुणामुळे एक प्रकारे बुरखाधारी चित्रपटच ठरू शकतो. मात्र इथे ही संकल्पना रहस्याव्यतिरिक्त अधिक आशयाच्या संदर्भात वापरली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आशयासाठी दिग्दर्शकांनी वापरलेल्या चकव्यांमध्ये आमूलाग्र वाढ झाली आहे. चित्रपटात प्रत्यक्षात दाखविले जाणारे घटक यांहून दिग्दर्शकाला सुचवायच्या गोष्टी यांमधील दरी अधिक वाढत चालली आहे. डेव्हिड िफचरच्या ‘फाइट क्लब’मध्ये हाणामारी आणि क्रौर्य जेव्हा आपला बुरखा काढून संवेदना निबर बनत चाललेल्या आजच्या समाजाचे दर्शन घडवायला लागते, तेव्हा त्या वास्तवाने गरगरायला होते. मनोज नाइट शामलनच्या ‘साइन्स’ या चित्रपटामध्ये परग्रहवासीयांनी पृथ्वीवर येण्याची गोष्ट पाश्र्वभूमीला असली, तरी सामान्य माणसाचा प्राप्त भीषण परिस्थितीत बदलत जाणारा दृष्टिकोन बुरख्याआड करणे हा तिचा मुख्य विषय होता. ‘साइन्स’, ‘फाइट क्लब’ किंवा ‘मेट्रिक्स’ ही बुरख्यातील चित्रपटांची उदाहरणे हॉलीवूडच्या बडय़ा बजेट्स व ताकदीच्या दिग्दर्शकांची अलीकडची निर्मिती म्हणून ओळखली जाते. आज युरोप, अमेरिकी इण्डिपेण्डण्ट चित्रपट प्रवाहामध्ये तर प्रयोगांचा सुळसुळाट आहे. अर्थपुरवठय़ातील टंचाई, स्टार नसलेले कलाकार, अनंत तडजोडी यांच्या आधारे थक्क करणारी आणि हॉलीवूडच्या महागडय़ा स्पेशल इफेक्ट्सना लाजविणारी चित्रपट निर्मिती त्यांच्याकडून होत आहे. टाइम मशीन या संकल्पनेशी खेळणारे प्रायमर (२००४), टाइमक्राइम्स (२००८), सेफ्टी नॉट गॅरंटेड (२०१२) हे चित्रपट त्यांतल्या बुरखाधारी चित्रपटगटाचे नेतृत्व करणारे ठरू शकतील. विज्ञानपटांमधील किचकटतेवर बुरखा टाकून विचारधारी मनोरंजनाचे अनपेक्षित सुख हे चित्रपट देऊ शकतात. या लेखाच्या विषयावरील बुरखा दूर करताना ‘पॉण्टिपूल’ (२००८) या कॅनडाच्या रहस्य-भीतीपटाची ओळख करून देणे आवश्यक आहे. पॉण्टिपूल ही अल्पबजेटसह करण्यात आलेली इण्डिपेण्डण्ट निर्मिती असली, तरी तिचे बुरखाधारी अस्तित्व प्रेक्षकाला जागीच खिळवून ठेवू शकते. त्यातील संकल्पना या त्याच्या चित्रप्रकाशी संबंधित सर्वच पूर्वग्रहांना आणि दृश्यकल्पनांना दूर ठेवतात. पॉण्टिपूल आहे कॅनडामधील शहरातील एका स्थानिक रेडिओ केंद्रात घडणारी विलक्षण भयकथा. तिची विलक्षणता तिच्या आशय आणि विषयावर बराच काळ राहणाऱ्या बुरख्यामध्ये सामवली आहे. या रेडिओ केंद्रामध्ये पहाटे बातम्या देणाऱ्या नायकापासून या चित्रपटाची कथा सुरू होते. ग्रँट मॅझी (स्टीव्हन मॅकहॅटी) नावाचा वृत्त निवेदक त्याच्या खास शैलीदार वाक्यांमध्ये त्या छोटय़ा शहरातील छटाकभर घटनांना शब्दसामर्थ्यांद्वारे मोठा करत चालला असतो. यात मांजर हरवल्याच्या घटनेपासून ते एका डॉक्टरच्या विरोधात निदर्शनासाठी जमलेल्या समुदायाची माहिती ऐकायला मिळते. सदा कातावलेली वरिष्ठ सिडने (लिसा हाऊल) आणि एक उत्साही साहाय्यक तरुणी यांच्या सान्निध्यात त्याचे वृत्तामध्ये हवा भरणे रंजकरीत्या चाललेले असते. मधल्या गाणी वाजण्याच्या काळात त्या तिघांच्या गप्पा सुरू असतात. वृत्तनिवेदनावरून, बातम्यांवरून, वैयक्तिक गोष्टींवरून सौम्यवादाच्या चर्चा झडत असतात. एकूणच वातावरण रेडिओ कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची वैश्विक आवृत्ती सादर करत असते. त्यांच्या गोष्टींतील चटकदार संवादाचा तपशील आवडायला लागतानाच रेडिओ केंद्रावर धडकणाऱ्या बातम्यांमधून बाहेर विचित्र गोष्टींची मालिका घडत असल्याची चाहूल यायला लागते. वृत्तप्रतिनिधीकडून फोनवरून धाडल्या जाणाऱ्या बातम्या हळूहळू अक्राळविक्राळ व्हायला लागतात आणि चित्रपटाने रेडिओ केंद्रातील तीन पात्रांद्वारे साध्याशा घटनांचा चढवलेला बुरखा सरकायला सुरुवात होते. २००८ साली हॉलीवूडच्या मेन स्ट्रीम सिनेमांपासून जगभरच्या इण्डिपेण्डण्ट चित्रजगताला ‘व्हॅम्पायर्स’ आणि ‘झॉम्बी’ यांचे कमालीचे आकर्षण वाटत होते. ‘पॉण्टिपूल’ हा उघडच त्या हंगामाच्या प्रवाहात तयार झालेला ‘झॉम्बी’पट आहे, मात्र झॉम्बीपटाच्या त्या वर्षी आलेल्या भरमसाट पिकामध्ये त्याला बसवता येऊ शकणार नाही. चित्रपटाच्या निम्म्याहून अधिक काळ झॉम्बी रहस्याच्या बुरख्याला त्याने जपले आहे आणि पारंपरिक झॉम्बीपटांचा मार्गही पूर्णपणे नाकारला आहे. झॉम्बींचे इथले दर्शन अत्यल्पात मोडणारे आहे. इथे कुठलीही बेतीव भीतिदायक दृश्ये दिसत नाहीत. पण घटनांच्या रेडिओ केंद्रावर आदळणाऱ्या बातम्या आणि फोनवरून मिळत जाणारी माहिती, यांचे थरारक नाटय़ घाबरवून टाकण्यासाठी पुरेसे आहे. शिवाय माणसे राक्षसरूपी झॉम्बी बनण्याच्या कारणांमध्येही एक चमत्कारिक कल्पना या चित्रपटात राबवली आहे. इंग्रजी शब्दांमध्ये काहीतरी घातक व्हायरसचा शिरकाव झाल्याने इंग्रजी भाषा बोलणाऱ्या व्यक्ती बिथरल्या जात असल्याचा शोध येथील व्यक्तिरेखांना लागतो. मग त्यांच्याकडून सुरू होतो इंग्रजी वाक्ये आणि संभाषण टाळून झॉम्बीकरणापासून लांब राहण्याचा आणि रेडिओ केंद्रावर दाखल होऊ पाहणाऱ्या संकटांना टाळण्याचा जोरदार प्रतिकार. एकाच वेळी गमतीशीर, विचित्र आणि थरारक बनलेली इथल्या व्यक्तिरेखांची स्थिती चित्रप्रकाराशी फटकून आहे. समाजातील उपभोगी संस्कृतीचे प्रतीक म्हणून येणाऱ्या झॉम्बीपटातली चांगली वैशिष्टय़े, शब्द आणि संवादाच्या वजनाला अचूक वापरणारे व्यक्तिघटक यांमध्ये या चित्रपटाचे देखणेपण दडले आहे. पॉण्टिपूल या छोटय़ाशा शहरातील अगदी छोटय़ा रेडिओ केंद्राच्या चष्म्यातून संपूर्ण जगावर पसरत जाणाऱ्या आजाराची ही कथा तिची व्याप्ती विस्तारताना पाहण्याचा अनुभव साधासुधा राहत नाही. हल्ली प्रेक्षकाला चकवत ठेवण्यासाठी विषयाला गरजेनुसार बुरख्याआड वा बुरख्याबाहेर करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. गेल्या वर्षी आलेल्या ‘एक्स्ट्राटेरेस्ट्रिअल’ नामक चित्रपटात परग्रहवासीयांचे पृथ्वीवर आक्रमण झाल्याची कथा खूपच वेगळ्या पद्धतीने मांडल्यामुळे गाजली होती. त्यात परग्रहवासीयांचे दर्शनही न घडविता तीन-चार व्यक्तिरेखांची परिस्थितिविसंगत वागण्याची कल्पना रंजक विनोदी झाली होती. ‘पॉण्टिपूल’ हा त्याच प्रकारच्या चित्रपटाशी जवळचे नाते सांगतो. चांगल्या कल्पनांच्या दुष्काळकाळात त्याचे सशक्त कथानक समाजाच्या सोयिस्करपणे मुखवटय़ात जगण्याच्या वाढत चाललेल्या प्रवृत्तीशी एकरूप ठरणारे आणि चित्रपट आवडीच्या सर्व निकषांना पुरून उरणारे आहे.
बुरखा पांघरलेला चित्रपट!
चित्रपट आवडण्याच्या निकषांमध्ये त्याचे आकलन हा केव्हाही महत्त्वपूर्ण घटक म्हणून सक्रिय असतो. दिग्दर्शकांनी समोर जर चकवे उभे केले तर त्यांना पार करण्याची तयारी सर्वच प्रेक्षकांची नसते. मग अशा चित्रपटांनी जगभर गाजण्याचे कितीही मोठे विक्रम केले, तरी त्यांचे बुरखाधारी अस्तित्व त्यांना प्रेक्षकप्रिय बनवू शकत नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-11-2012 at 06:18 IST
मराठीतील सर्व बर्डस व्ह्यू बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds view burkha movie