मेट्रिक्सच्या यशानंतर मनतळात बागडणाऱ्या किचकट कल्पनांना एकप्रकारे हिरवा कंदिलच मिळाला आणि माइण्ड गेम्स खेळणाऱ्या चित्रपटांची निर्मिती घाऊक प्रमाणात होऊ लागली. ‘व्हॅनिला स्काय’ (२००१), ‘आय हार्ट हकबीज’ (२००४), ‘सायन्स ऑफ स्लीप’ (२००६), ‘स्ट्रेन्जर दॅन फिक्शन’ (२००६) हे आपल्याकडे गाजावाजा न झालेल्या, तर ‘इन्सेप्शन’(२०१०), ‘अवतार’ (२०१०) या जगभरात सारख्याच प्रमाणात गाजलेल्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे स्मृती आणि स्वप्नांबाबतचे कुतूहल शमवले.
विज्ञान, अॅक्शन, थ्रिलर्स, हेरपट आदी सर्वच चित्रप्रकारांमध्ये आज ‘माइण्ड गेम’ महत्त्वाचा बनत चालला आहे. या चित्रपटांच्या सादरीकरणामधील सफाईदारपणा त्याला किचकट आणि सोप्याच्या सीमारेषेवर आणून ठेवतो. त्या रेषेच्या कोणत्या बाजूला प्रेक्षक झुकलेला असतो, त्यावरून चित्रपटाशी समरस होणे सहज किंवा अवघड होऊन जाते. उदाहरणासाठी ‘इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माइण्ड’ (२००४) या चित्रपटातील माइण्ड गेम चर्चाविषय करता येईल. वेडसर चाळ्यांनी परिचित व प्रसिद्ध जिम कॅरी आणि टायटॅनिकने लोकप्रियता आंदण मिळालेली केट विन्स्लेट या दोघांचा किचकटोत्तम कल्पना वापरणारा हा चित्रपट सगळ्यांना पहिल्या दर्शनातच पूर्ण कळण्याची शक्यता कमी आहे. जिम कॅरी हसवत नाही म्हणून, केट विन्स्लेट कुरूप दिसते म्हणून आणि पडद्यावर काय चाललेय, हे स्पष्ट होत नाही, म्हणून अध्र्याच्या आधीच चित्रपट समजण्याचे युद्ध हरल्याची परिस्थिती प्रेक्षकांची होऊ शकते. पण तो समजून घेण्याचा हट्ट दाखवला, तर अशक्य कोटीतला गंमतीदार स्मृतीखेळ पाहिल्याचा अनुभव मिळू शकतो.
वर उल्लेखलेला माइण्ड गेम ‘इटर्नल सनशाईन..’चा मूळ गाभा आहे. ही एक प्रेमकथा आहे, एक दुजे के लिए छापाची. पण नायक-नायिकांची भेट, मैत्री, प्रेम, ताटातुट, पुनर्भेट हे प्रेमपटांनी घालून दिलेले टप्पे येथे सरधोपटपणे येत नाहीत.
जोएल (जिम कॅरी) आणि क्लेमेण्टाईन (केट विन्स्लेट) या एकमेकांपासून पूर्ण अनोळखी असलेल्या व्यक्तिरेखा व्हेलेण्टाईनच्या दिवशी एकमेकांना समुद्र किनाऱ्यावर पाहतात. महामुश्किलीने त्यांच्यात बोलाचाली होते. परतीच्या प्रवासामध्ये आढेवेढे घेत त्यांच्यात दूरध्वनी क्रमांकाची देवाण-घेवाण होते. पुढे बर्फाळ रात्रीचा सहप्रवास घडतो आणि सुसंवादातून प्रेमाची शक्यताही तयार होते. चित्रपट या वळणावरून थेट मागे जातो आणि वेगळ्याच प्रकारचे सत्य दाखवतो. तेथे क्लेमेण्टाईन आणि जोएल यांच्यात प्रचंड वादविवादानंतर ताटातुट झालेली असते. जोएल ही ताटातुट सावरण्यास जातो, तेव्हा क्लेमेण्टाईन त्याला चक्क ओळखण्यास नकार देते. पुढे जोएलला आणखी धक्कादायक माहिती मिळते की, हवी ती स्मृती मेंदूतून पुसून टाकणाऱ्या क्लिनिकमधून क्लेमेण्टाईनने त्याच्याबाबतच्या सर्व आठवणी नष्ट केल्या आहेत. त्यामुळे तिच्या लेखी जोएल हा संपूर्ण अनोळखी व्यक्ती बनला आहे. दु:खाने पोळलेला जोएल मग स्मृतींबाबत हाच प्रकार स्वत:वर करण्याचे ठरवतो आणि स्मृती संपवण्याचा त्याचा खेळ चित्रपटभर चमत्कारी दृश्यांची उघडझाप करत राहतो.
क्लेमेण्टाईन आणि जोएल यांच्यातील संबंध भांडणाने विकोपाला जाण्यापासून उलटय़ा क्रमाने जोएलच्या मनातील स्मृती खोडण्याचा कार्यक्रम दिसायला लागतो. अर्धजागृत अवस्थेत असलेला जोएल चांगल्या स्मृतींच्या टप्प्यावर येताना मात्र त्यांना गमावू इच्छित नाही. त्या तशाच राहाव्यात यासाठी ही विस्मृतीकरणाची प्रक्रिया बंद करण्याची याचना तो करू लागतो. मग क्लेमेण्टाइन आणि तो यांचा स्मृतिबंध, दुसऱ्याच वेगवेगळ्या स्मृतींचा आधार घेऊन या प्रक्रियेमध्ये बाधा आणू लागतो. क्लेमेण्टाईनबाबतच्या सर्व स्मृती नष्ट करण्याचे काम करणाऱ्या स्टॅन (मार्क रफालो), पॅट्रिक (एलाया वुड) आणि मॅरी (किर्स्टन डन्स्ट), डॉक्टर हॉवर्ड (टॉम विल्किन्सन) यांचीही उपकथानके समांतरपणे घडत राहतात आणि स्मृतींचे माणसाच्या आयुष्यातील नेमके स्थान पक्के करत जातात.
क्लेमेण्टाईनबाबतच्या चांगल्या स्मृतींना जपण्याची जोएलची तडफड आणि या प्रक्रियेशी त्याने स्मृतीतील क्लेमेण्टाईनला घेऊन केलेली बंडखोरी फार काळ टिकणारी नसते. पण मुळात ही प्रेमकथाच सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एक दुजे के लिए छापाची असल्याने ती तशी पूर्ण होण्यासाठी कटिबद्ध राहते. नातेसंबंधांच्या गंमतीदार चर्चा, त्यांच्याकडे पाहण्याचा तिरकस दृष्टिकोन, स्मृतींना वाचवण्यासाठी आटापिटा करताना दिसणारा दृश्यचमत्कार, तत्त्वज्ञानी संदर्भ यांची एकत्र बांधणी येथे पाहायला मिळते.
माणसाची कुठल्याही कार्यातील धडपड दु:खाला लांब ठेवण्याची आणि आनंदाला कवटाळण्याची असते. स्मृतींबाबत दु:खद स्मृतींना मनतळाच्या तिजोरीत दडवून ठेवण्यात येते आणि चांगल्या क्षणांच्या आठवणी बोलण्यात व मनात कायम जिंवत ठेवल्या जातात. आपल्या स्मृती किती महत्त्वाच्या असतात, वियोगानंतर व्यक्तीच्या स्मृतींचे महत्त्व किती असते, विस्मृती प्रक्रिया राबवल्यानंतरही एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून हद्दपार करणे सोपे असते का, आदी सर्वसामान्य ते असामान्य प्रश्नांच्या अनेक फैरी ही माइण्ड गेमर प्रेमकथा प्रेक्षकांवर आदळवते. आपापल्या वकुबानुसार त्यांची उत्तरे शोधण्यास मदतही करते. नेहमीचीच प्रेमकथा किती वेगळ्या प्रकारे घडवता येऊ शकते, याचा हा अजब नमुना आहे.
पटकथाकार चार्ली कॉफमन या असामीने हॉलीवूडमध्ये गेल्या दशकापासून लोकविलक्षण कल्पनांचा जनक म्हणून आपल्याभोवती वलयाचे कडे निर्माण केले आहे. इटर्नल सनशाईन ऑफ स्पॉटलेस माइण्ड ही त्याची त्यातल्या त्यात सोपी तरीही किचकट निर्मिती आहे. ती समजली तर उत्तम. न समजल्यास सोप्या माइण्ड गेमर चित्रपटांचे पर्याय आज थोडके राहिलेले नाहीत.
’‘१ंल्लॠ@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा