वयाच्या विशी-बाविशीतील अट्टूपुरथु मॅथ्यू अब्राहम हा मल्याळी मुलगा केरळमधून पदवी घेऊन मुंबईला नोकरीसाठी म्हणून आला. लहानपणापासूनच त्याला, पत्रकार, वर्तमानपत्र, त्यातले लेख, चित्रं, आवृत्त्या, लाखो प्रतींचा खप याविषयी अतोनात कुतूहल होतं. वर्तमानपत्र नेमकं कसं चालतं याबद्दल त्याला काडीचीही माहिती नव्हती, पण उत्सुकता मात्र भरपूर होती. वर्तमानपत्रात छापून आलेली एखादी बातमी एकाच वेळी हजारो, लाखो लोक वाचताहेत ही कल्पनाच त्याला फार अद्भुत वाटायची.
मुंबईला त्यावेळी बॉम्बे सेन्टेनल या नावाचं एक सायंदैनिक निघायचं. तिथं यानं आपली नोकरी सुरू केली. एक दिवस पहिल्या पानावर जेव्हा त्यानं लिहिलेला रिपोर्ट छापून आला तेव्हा त्याला तोच अद्भुत आनंद झाला. एप्रिल १९४६ची ही गोष्ट. लहानपणी शाळेत असताना चित्रकलेची खूप आवड होती पण चित्रकलेचं रीतसर शिक्षण मात्र कधी घेतलं नाही. नंतर व्यंगचित्रकला जवळची वाटायला लागली आणि मुंबईतल्या ब्लिट्जमध्ये त्यावेळी त्याची काही व्यंगचित्रं छापूनही आली.
स्वातंत्र्यापूर्वीचा तो काळ होता आणि स्वातंत्र्य अगदी समोर येऊन ठेपलं होतं. अनेक मोठमोठ्या नेत्यांची भाषणं, सभा, पत्रकार या नात्यानं त्यानं अनुभवल्या. स. का. पाटील यांचा त्यावेळी प्रचंड बोलबाला होता आणि मोरारजी देसाई हे तर कोणाच्या खिजगणतीतही नव्हते, हे त्याचं निरीक्षण होतं.१४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री बाळासाहेब खेर यांनी ओव्हल मैदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर केलं आणि पुढचे चार दिवस मुंबईकर उत्साहानं नुसते नाचत होते अशी आठवण या मुलानं म्हणजे अब्राहम यानं लिहून ठेवली आहे.
आणखी वाचा-आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: कोडे सोडवण्याची गंमत…
मुंबईत किरकोळ ठिकाणी प्रसिद्ध होणारी अब्राहम याची राजकीय व्यंगचित्रं दिल्लीला असलेल्या ज्येष्ठ व्यंगचित्रकार शंकर पिल्ले यांच्या पाहण्यात आली आणि त्यांनी अब्राहमला दिल्लीला बोलावून घेतलं. मुंबईनं मला जीवनाविषयी नवा दृष्टिकोन दिला असे भावपूर्ण उद्गार अब्राहम यानं मुंबई सोडताना काढले.त्या काळात ‘शंकर्स विकली’मध्ये देशभरातले अनेक व्यंगचित्रकार व्यंगचित्रं काढत असत. त्यातही शंकर हे केरळचे असल्यानं केरळच्या अनेक व्यंगचित्रकारांनी आपल्या कारकीर्दीला तिथून सुरुवात केली. अब्राहम हा त्यापैकी एक.
१९५३ च्या सुमारास एके दिवशी फ्रेडरिक जोस हा ब्रिटिश व्यंगचित्रकार भारतात भटकण्यासाठी आणि चित्रं काढण्यासाठी म्हणून आला होता. सहजच त्यानं शंकर्स विकलीला भेट दिली. अनेक व्यंगचित्रकारांना तो अनौपचारिकरीत्या भेटला. गप्पा मारल्या. चित्रांची देवाण-घेवाण झाली. त्यावेळी अब्राहम याची व्यंगचित्रं आणि शैली पाहून तो म्हणाला की, ही व्यंगचित्रं इंग्लंडमधील वृत्तपत्रं सहज स्वीकारतील! या एका वाक्यानं अब्राहमचा उत्साह चांगलाच वाढला. जोस नंतर इंग्लंडला निघून गेला. पुढे काही दिवसांनी जोस यानं दोन ओळींचं पत्र अब्राहमला पाठवलं. त्यात इतकंच लिहिलं होतं, तू केव्हा येतोयस? जुलै १९५३ मध्ये अब्राहम इंग्लंडला बोटीनं गेले. तिथे गेल्यावर जोस यांनी त्याची ओळख अनेक संपादक, लेखक आणि व्यंगचित्रकारांशी करून दिली. आणि पहिल्या आठवड्यातच अब्राहमचं एक व्यंगचित्र प्रख्यात व्यंगचित्र साप्ताहिक ‘पंच’मध्ये प्रसिद्ध झालं.
मात्र पुढचे काही दिवस फार अवघड गेले. चित्रं इथे तिथे क्वचित प्रकाशित होत होती. परंतु त्यात सातत्य नव्हतं. भारतात परत यावं असं त्याला वाटत होतं. अचानक एके दिवशी ब्रिटिश वृत्तपत्र ‘ऑब्झर्वर’ च्या संपादकांनी अब्राहम यांना स्टाफ कार्टूनिस्ट म्हणून आमंत्रण दिलं. ऑब्झर्वरकडे त्यापूर्वी दीडशे वर्षांत एकही व्यंगचित्रकार नव्हता. त्याचं अब्राहमना खूप आश्चर्य वाटलं. त्यातून सावरल्यावर त्यांनं संपादकांना विचारलं, ‘‘व्यंगचित्रकाराचं स्वातंत्र्य कितपत असेल?’’ त्यावर संपादकांचं उत्तर फार महत्त्वाचं होतं. संपादकांनी अब्राहम यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं, ‘‘तुम्ही काढलेलं प्रत्येक व्यंगचित्र आम्ही छापूच असं नाही. पण तुमच्या स्वत:च्या तत्त्वप्रणालीच्या किंवा विचारांच्या विरोधात तुम्ही एखादं व्यंगचित्र काढावं असं आम्ही तुम्हाला कधीही सांगणार नाही.’’ हा दोन सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तींमधला संवाद होता असं अब्राहम यांचं मत बनलं. वृत्तपत्राच्या विचारधारेबरोबरच किंवा अग्रलेखाप्रमाणेच मी व्यंगचित्र काढावं असा आग्रह ऑब्झर्वरनं कधीही धरला नाही असं अब्राहम यांनी लिहून ठेवलं आहे.
आणखी वाचा-दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
एप्रिल १९५६ ची ही गोष्ट आहे. तेव्हा व्यंगचित्राखाली ते ‘अब्राहम’ अशी सही करत असत. परंतु संपादकांनी त्यांना दुसरं एखादं टोपण नाव घ्यायला सुचवलं. त्यांच्या मते, युरोपमध्ये अब्राहम हे नाव ज्यू लोकांमध्ये असतं. आणि त्यामुळे या व्यंगचित्रांकडे अनावश्यकपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जाईल. अब्राहम यांना हा मुद्दा पटला आणि लहानपणापासून त्यांचे मित्र त्यांना ज्या नावाने हाक मारत ते ‘अबू’ हे टोपणनाव घेतलं आणि ‘अशा रीतीनं माझं ६ एप्रिल १९५६ रोजी पुन्हा एकदा बारसं झालं,’ असं ते गमतीनं म्हणतात.
पुढे त्यांनी गार्डियन या वृत्तपत्रासाठीही अनेक वर्षे व्यंगचित्रं काढली. १९६९ साली ते भारतात आले मग इंडियन एक्स्प्रेससाठी व्यंगचित्रं काढू लागले आणि देशाला एक नवा दृष्टिकोन देणारा व्यंगचित्रकार मिळाला. १९७२ साली त्यांची नेमणूक राज्यसभेवर झाली. पुढे १९७५ साली आलेल्या आणीबाणीमध्ये त्यांची अनेक व्यंगचित्रं सेन्सॉर केली गेली.
अनेक देशांना विशेषत: युद्धग्रस्त देशांना भेट देऊन तिथली परिस्थिती पाहून त्यावर व्यंगचित्र काढणारे अबू हे देशातील एकमेव व्यंगचित्रकार असावेत. उदाहरणार्थ, बांगलादेशची निर्मिती होत असताना ते तिथे गेले. व्हिएतनामवर हल्ले होत असताना अमेरिकेतर्फे ते व्हिएतनामला जाऊन आले. गल्फ वॉरमध्ये गल्फ भागात जाऊन आले. इतकंच नव्हे तर ते इस्रायल भूमीवरचा संघर्षही पाहून आले. यातल्या काही देशांवर त्यांची लेखांची आणि व्यंगचित्रांची पुस्तकंही आहेत.
पण त्यांचं सगळ्यात अप्रतिम पुस्तक आहे ते म्हणजे १९७७ ते ८० या दरम्यान भारतातल्या जनता पार्टीच्या सरकारवरचं! या कालखंडावर त्यांनी काढलेल्या निवडक व्यंगचित्रांच्या पुस्तकाचं नाव अगदी समर्पक आहे- ‘अरायव्हल्स अॅण्ड डिपार्चर्स.’
आणखी वाचा-बालमैफल: स्वच्छ सुंदर सोसायटी…
कसा होता हा कालखंड? जनता पक्षाचं सरकार हे स्वतंत्र भारतातील पहिलं बिगर काँग्रेसी सरकार होतं. आणीबाणीची पार्श्वभूमी आणि त्यामुळे निर्माण झालेला निव्वळ काँग्रेस विरोध या मुद्द्यांवर एकत्र आलेले भिन्न विचारसरणीचे नेते या प्रयोगात होते. त्यांची नावं जरी नमुन्यादाखल पाहिली तरी हे सगळे काही काळ एका सरकारमध्ये होते याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. उदाहरणार्थ, पंतप्रधान मोरारजी देसाई, चरणसिंग, जगजीवनराम, जॉर्ज फर्नांडिस, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी बाजपेयी, राजनारायण, चंद्रशेखर, मधु लिमये इत्यादी इत्यादी. त्याशिवाय भजनलाल, बन्सीलाल, यशवंतराव चव्हाण, देवराज अरस, एमजीआर हेही अधूनमधून होतेच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक हरलेल्या आणि नंतर जिंकलेल्या इंदिरा गांधी होत्या! एवढी स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्त्व एकाच कालखंडामध्ये असणं म्हणजे एक प्रकारे अराजकच! प्रचंड अंतर्विरोध असणारे, दिशाहीन आणि अहंकारानं घेरलेलं आणि त्यामुळे हळूहळू स्वनाशाकडे जाणारं हे सरकार होतं असं म्हटलं तरी चालेल.
अबू यांची चित्रशैली तत्कालीन व्यंगचित्रकारांपेक्षा फारच वेगळी. लक्ष्मण, ठाकरे वगैरे ब्रशप्रेमी मंडळी किंबहुना डेव्हिड लो यांचे शिष्य या काळात फॉर्ममध्ये होते. या ब्रशपासून अबू एकदम फटकून राहिले आणि स्वत:ची शैली त्यांनी प्रस्थापित केली. ते साध्या पेनानं चित्रं काढायचे. हातानं धावत्या लिपीत कॅप्शन्स लिहायचे. अर्कचित्र मोठी काढायचे, परंतु ती ढोबळ वाटतील अशी असायची. चित्रात इतर तपशील जवळपास नाहीतच. मुख्य भर हा व्यक्तिरेखेवर! चेहऱ्यावर हावभावसुद्धा फारसे नाहीत. प्रथम पाहणाऱ्या वाचकाला हे चित्र फारच बेसिक वाटू शकेल असं होतं. पण अबू यांचं सर्वात मोठं टॅलेंट होतं ते म्हणजे राजकीय समज. राजकीय घटना आणि राजकारणी यावर त्यांनी केलेलं भाष्य खूपच भेदक असायचं! म्हटलं तर विनोदी किंवा म्हटलं तर चिरफाड करणारं. उदाहरण म्हणून त्यांची काही पॉकेट कार्टून्स आणि काही मोठी चित्र अभ्यासता येतील.
अबू यांच्या पॉकेट कार्टून्सच्या सदराचं नाव होतं ‘प्रायव्हेट व्ह्यू’. या सदराचा फॉरमॅट अबू यांनी खूपच साधा ठेवला होता. चित्रात नेहमी फक्त दोनच व्यक्ती. एक उंच तर दुसरी बुटकी. उंच माणसाने टोपी, चष्मा, अर्ध जॅकेट, धोतर नेसलेलं होतं. तर बुटक्याने चष्मा, थोडीशी मिशी, शर्ट, पायजमासदृश पॅन्ट. या सर्व रेषासुद्धा अगदी जेमतेम. शास्त्रीयदृष्ट्या शरीररचना, परस्पेक्टिव्ह, अनेक व्यक्तिरेखा, प्रसंग कुठे घडतोय याचा तपशील इत्यादी काही त्यांच्या चित्रात दिसत नाही. पात्रांच्या हातात क्वचित वर्तमानपत्र, कधी बॅग, कधी टीव्ही इत्यादी अगदी मोजकाच तपशील. या दोघांच्या चेहऱ्यावरही काही विशेष भाव नाहीत. काही चित्रांत दोघेही बोलतायत असंही दाखवलं आहे. कॅप्शन चित्राच्या चौकटीच्या आतमध्ये आणि हातानं लिहिलेल्या इंग्रजी कॅपिटल लिपीमध्ये. वरती कोपऱ्यात अबू अशी सही. या एवढ्या (खरं तर एवढ्याशा!) सामग्रीवर अबू फार मोठे स्टेटमेंट करतात. ही चित्रं मजेशीर, खदाखदा हसवणारी असतीलच असं नाही. मात्र ती भेदक, टोचणारी आणि विसंगती दाखवणारी आणि सत्य सांगणारी जरूर आहेत. एखाद्या विजेसारखी ही चित्रं चमकतात. भाष्य हेच अबू यांचं सामर्थ्य. त्यांच्या कालखंडातील ते फार उच्च दर्जाचे, महत्त्वाचे दृश्यभाष्यकार होते हे निश्चित.
आणखी वाचा-चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
त्यांच्या पॉकेट कार्टून्सचे काही नमुने बघता येतील. जनता पक्षाचा कालखंड हा सर्वार्थानं प्रचंड गोंधळलेला होता. मधूनच बातमी यायची की (पक्षातील असंतोष कमी करण्यासाठी) पंतप्रधान बहुधा लवकरच कॅबिनेट रिशफल किंवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना करतील. यावर अबू यांचं पॉकेट कार्टून म्हणतं की बहुतेक मंत्रिमंडळच पंतप्रधानांना रिशफल करतील!!
जनता पक्षातील नेत्यांमधील हेवेदावे, भांडणं, अहंकार कमी करण्यासाठी सतत बैठका व्हायच्या. पण त्यातून काही विशेष निष्पन्न व्हायचं नाही हा भाग वेगळा. परंतु अबू यांनी हे सगळं फक्त एका वाक्यात म्हटलंय. या (म्हणजे जनता युनिटी टॉक्स) बैठकीचे पाच वेगवेगळे वृत्तांत आपल्याला उद्या पाहायला मिळतील! लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष असणं खूप महत्त्वाचं असतं हे वाक्य सगळ्यांचं आवडतं आहे. परंतु अबू यांनी सोबतच्या व्यंगचित्रात त्याला आणखीन एक वाक्य जोडून वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे.
‘गोहत्या’ हा विषय आजही अगदी ताजा आहे. तसा तो पन्नास वर्षांपूर्वीही होताच. त्यावेळी विनोबा भावे यांनी या प्रश्नावर आमरण उपोषण करू असं जाहीर केलं आणि एकच खळबळ उडाली, धावाधाव झाली. त्यावेळी अबू यांनी एक कार्टून काढलं. चित्रात त्यांनी उकिरड्यावरचं अन्न खाणाऱ्या काही हडकुळ्या गाई दाखवल्या होत्या. त्या म्हणतात, ‘‘गेली अनेक वर्षं आम्ही हे असलं खाऊन भुकेने मरतो आहोत. आमची व्यथा फक्त (आमरण उपोषण करणाऱ्या) विनोबाजीनाच समजली!!’’ त्याच सुमारास देशाच्या काही भागांत हिंसाचार होऊन सामान्य लोक बळी पडले अशी बातमी होती. त्यावरचं हे सोबतचं अबू यांचं व्यंगचित्र. सर्वांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं होतं.
जनता पक्षातील असंख्य समस्या आणि मोरारजींचा हेकटपणा अबू यांनी सोबतच्या चित्रात फारच अप्रतिमपणे आणि नेमकेपणाने रेखाटला आहे. कुणाही पत्रकाराने त्यांना जनता पक्षातील क्रायसेसविषयी विचारलं की मोरारजी तुसडेपणानं म्हणायचे, ‘‘व्हॉट क्रायसिस?’’ त्या अनिश्चिततेच्या काळात चमचेगिरीनं अगदी कळस गाठला होता. इंदिरा गांधी आणि बन्सीलाल, चरण सिंग आणि देवीलाल, जगजीवनराम आणि भजनलाल यांचे अशा प्रकारचे नातेसंबंध अबू यांनी अधोरेखित करताना चित्राद्वारे फारच भेदक भाष्य केलंय.
आणखी वाचा-सर्जनाच्या वाटेवरील प्रवास
राजकीय व्यंगचित्रकार शक्यतो राष्ट्रपतींवर व्यंगचित्र काढत नाहीत किंवा त्यांना व्यंगचित्राचा विषयही बनवत नाहीत. परंतु जेव्हा संपूर्ण व्यवस्था रसातळाला जात असते तेव्हा व्यंगचित्रकाराला असं धाडस करण्यावाचून पर्याय राहत नाही. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद हे फारच दबावाखाली होते. त्यांच्याकडून अनेक वेळेला विविध वटहुकूम किंवा कायद्यांवरती सह्या घेतल्या जात असत. त्या वेळेचं हे सोबतचं चित्र त्या काळात आणि आजही लोकांच्या स्मरणात राहिलेलं आहे. हा एखादा मास्टरपीसच म्हणावा लागेल.
१९७७ साली रायबरेलीतून पंतप्रधान इंदिरा गांधी निवडणूक हरल्यानंतर आता काँग्रेस संपली आणि इंदिरा गांधीही संपल्या असं मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग होता. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी कर्नाटकातल्या चिकमंगळूरमधून इंदिरा गांधी पुन्हा एकदा लोकसभेवरती निवडून आल्या. त्यावेळी इंदिरा गांधी आता पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत आणि त्यांचा आता प्रभाव वाढू शकतो हे सूचित करणारं व्यंगचित्र अबू यांनी काढलं. रेल्वे स्टेशन या प्रतीकाचा वापर करून त्यांनी मोठ्या खुबीनं हे सर्व दाखवून दिलं आहे. यातली छोटी परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे पाठीराखेही आता हळूहळू त्यांच्या मागे येताना दाखवले आहेत.
अबू यांच्या प्रतिभेचा आणखी एक आविष्कार बघायला मिळतो तो त्यांच्या मार्च १९८० च्या निवडणुकीच्या संदर्भात. राजकारण कमालीचं अस्थिर झालेलं होतं. समाजकारणाचा तर पत्ताच नव्हता. जनतेत वेगवेगळ्या गोष्टींवरून असंतोष होता. यावेळी राजकारणी हे अत्यंत धोकादायक युती करत होते. अर्थातच पक्षाच्या तत्त्वांचा किंवा विचारप्रणालीचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. हे सारं संपूर्ण अनैसर्गिक होतं. होता तो फक्त संधीसाधूपणा!
या सगळ्या पार्श्वभूमीवर अबू यांचं हे चित्र फारच भेदक आणि कोडग्या राजकारण्यांवर ब्रशचे कोरडे ओढणारं आहे. तत्कालीन बहुतेक सर्व राजकीय नेत्यांना त्यांनी विविध पक्षांच्या रूपात दाखवलं. उदाहरणार्थ, चरणसिंग, चंद्रशेखर, जगजीवनराम, देवराज अरस, राजनारायण, देवीलाल, अडवाणी इत्यादी इत्यादी आणि या एका मोठ्या झाडावरच्या फांद्यांवर हे सारे बसले आहेत. या चित्राला नाव दिलंय ‘मेटिंग सीजन’. याचा अर्थ इतकाच आहे की विविध जातींचे पक्षी अनैसर्गिकरीत्या एकत्र येऊन लोकशाहीची अंडी घालू शकतात! देशातील सद्या:परिस्थिती लक्षात घेता अबू यांचं हे ४५ वर्षांपूर्वीचं चित्र अगदी ताजं वाटू शकतं आणि समयोचितसुद्धा!
prashantcartoonist@gmail.com