आज ८ सप्टेंबर. आशा भोसले नामक सूरसम्राज्ञीचा ८० वा वाढदिवस. जगभरातील लाखो-करोडो चाहत्यांच्या सुखदु:खांना,
हर्ष-खेदांना, भावविभोर अन् धुंद क्षणांना ज्यांच्या गाण्यांनी कायम साथ केलीय, कित्येक पिढय़ा ज्या सूर-तालावर आजही लट्टू आहेत, अशा या चिरतरुण स्वराला अभिवादन करणारा लेख..    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रानं दोन भोसल्यांना सतत वंदन केलंय. छत्रपती शिवाजीराजे भोसले आणि दुसऱ्या आशा भोसले. मा. दीनानाथांसारख्या पित्याकडून लाभलेले स्वरांचे अनमोल धन आणि विलक्षण जिद्दी मन घेऊन आशाताईंनी पाश्र्वगायनाच्या प्रांतात पाऊल टाकलं त्याला आता पासष्ट वर्षे झाली. आणि याच आठवडय़ात (८ सप्टेंबर) त्या वयाची ऐंशी पूर्ण करताहेत. आजही आपल्या रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद या आवाजात कायम आहे.
आशाताईंच्या जिद्दीपणाची एक आठवण माझ्या मनात आहे. पाच वर्षांपूर्वी पुण्यातल्या रमणबाग शाळेच्या पटांगणात ‘मी.. आशा’ कार्यक्रम सुरू होता. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. आशाताई चिंब भिजू लागल्या. मी आणि नाना पाटेकरनं पटकन् त्यांच्या डोक्यावर एक छत्री मिळवून धरली. तशी पटांगणातल्या हजारो रसिकांसमोर येत त्यावेळी पंचाहत्तरीत असलेल्या आशाताई रसिकांना उद्देशून म्हणाल्या, ‘मी आजवर अनेक संकटांना सामोरी गेलीय. पाऊस तर काही क्षणांचा आहे. मी त्याला भीत नाही. तुम्ही मंडळी पावसाला भिऊन घरी जाणार की गाणं ऐकणार?’
‘गाणं.. गाणं ऐकणार..’ समूह कोरसमध्ये किंचाळला. बाईंनी पदर खोचला. छत्री बाजूला करायला सांगितली. पाऊस कोसळतच होता. आशाताईंनी नखशिखान्त भिजत तब्बल बावीस गाणी गायली. वाद्यं पावसासाठी झाकावी लागलेली. एका पेटीच्या साथीवर बाईंचं गाणं चालूच. भिजत भिजत ऐकणाऱ्या श्रोत्यांचे सामूहिक अखंड चीत्कार आणि टाळ्या. प्रेक्षक आणि आशाताईंच्या परस्परप्रेमाचं दर्शन घडवणारा आणि त्यांची जिद्द दाखवणारा हा अविस्मरणीय अनुभव. आम्ही त्याचे साक्षीदार होतो. आशाताईंच्या स्वरांचा, उत्साहाचा, जिद्दीचा तो चैतन्यदायी आविष्कार होता. मरगळ झटकणारा. नवी उभारी देणारा. आपल्या दैनंदिनीत श्वासाइतकाच सहजतेनं एकरूप झालेला. सळसळत्या स्वरांचा खळाळता झरा असलेला या शतकातला प्रार्थनीय सूर म्हणजे आशा भोसले! त्यांच्या ऐंशीपूर्तीबद्दल त्यांना तमाम रसिकांच्या वतीने प्रेमाचा प्रणाम!
त्यांची मुलगी वर्षां हिच्या निधनाला अद्याप वर्ष पूर्ण व्हायचंय. त्यामुळे त्या यंदा वाढदिवस साजरा करणार नाहीएत. त्या भारतातही नसतील. बहारीनला असतील. पण वयानं ८० पूर्ण केलीय असं जरासुद्धा वाटणार नाही, इतका नवनव्या कामांचा उरक, उत्साह आणि भोवतालच्या मंडळींमध्ये आशावादी वृत्ती निर्माण करण्याचा त्यांचा झपाटा मात्र आजही कायम आहे.
गेल्याच आठवडय़ात त्या भेटल्या. तर म्हणाल्या, ‘‘४५ वाद्यांच्या सिंफनी ऑर्केस्ट्राबरोबर माझी हिंदी गाणी गाण्यांचा शो मी बहारीनमध्ये करतेय. गुजरातीतले ज्येष्ठ संगीतकार अविनाश व्यासजींकडे मी १९५० पासून गायले. त्यांची ४०० गाणी तरी मी गायले असेन. ते आता आपल्यात नाहीत. पण त्यांच्या निवडक फिल्मी आणि बिगरफिल्मी गाण्यांची कॅसेट करतेय. येत्या नवरात्रात दांडियाच्या निमित्ताने अहमदाबादला ती कॅसेट रीलीज होणार आहे. नंदूची मुलं- माझी नातवंडं अकरा वर्षांची होतायत. यंदा त्यांच्या नशिबाने अकरावं हॉटेल ‘आशाज्’ सुरू करतेय. मध्यंतरी श्रीधर फडकेंच्या काही रचना गायल्या. त्या रेकॉर्डला नुकतंच बक्षीस मिळालं. आता एका शोमध्ये नातीबरोबर गाणार आहे. आत्मचरित्राचंही काम सुरू आहे. मराठीतल्या पुस्तकाचं तर तुम्हीच शब्दांकन करताय. इंग्लिशमध्ये माझी एक मैत्रीण लिहितेय. आणखी नवं काय सांगू? दिवाळीत पहाटेचा गप्पांचा कार्यक्रम लवकर ठरवा. मजा करू..’’
आशाताईंचा हा उत्साह नेहमीचा आहे. कायम वेळेनुसार फ्रेश रंगाची साडी झट्दिशी बदलून ‘शो’मध्ये आणि एरवीही रसिकांना सामोऱ्या येणार. केसांत टवटवीत हसरं फूल असणार. क्वचित रॅम्पवरून लयीत चालण्यातही बाजी जिंकणार. त्यामुळेच त्यांचं स्टेजवरचं, वाहिन्यांतलं, प्रत्यक्षातलं प्रसन्न दर्शन समोरच्या आपल्यासारख्या अनेक ताणांनी व्यग्र असलेल्या सामान्यांच्या मनात क्षणात आनंद निर्माण करतं.
मी आशाताईंना एकदा विचारलं होतं, ‘‘तुम्हाला कधी ताण येतच नाही का? आणि जर येत असेल, तर तुम्ही कायम हसतमुख कशा असता?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘समोर जमणारी माणसं आपले प्रश्न, आपल्या अडचणी, आपली संकटं सोडवू शकत नाहीत. आपल्या प्रश्नांना आपल्यालाच सामोर जावं लागतं. मग त्यांना अडचणींचं रडगाणं ऐकवण्यापेक्षा ते आपुलकीने भोवती जमलेत, तर गाणं गाऊन, गप्पा मारून त्यांना घटकाभर आनंद तरी द्यावा.’’ आशाताईंचं हे वक्तव्य पुलंच्या विचारसरणीशी जवळ जाणारं आहे. पुलं म्हणत, ‘‘जन्म आणि मृत्यू- दोन्हीच्या तावडीत सापडून नियतीनं चालवलेली आपली फसवणूक पाह्य़ली की चार घटका आपुलकीने भोवती जमणाऱ्यांची हसवणूक करण्यापलीकडे आपल्या हाती काय उरतं?’’
मिश्कील बोलण्यानं तर त्या गाण्याइतक्याच रसिकांना जिंकतात. १९९९ मध्ये अमेरिकेतल्या सॅन होजेच्या मराठी महोत्सवात मी आदल्या दिवशी माधुरी दीक्षित यांची मुलाखत घेतली होती आणि दुसऱ्या दिवशी आशाताईंचं गाणं व गप्पा होत्या. शोच्या आरंभालाच प्रेक्षकांकडे बघत त्या म्हणाल्या, ‘‘काल तुमच्या डोळ्यांना आनंद (संदर्भ : ‘माधुरीसौंदर्य’) मिळाला असेल. आज तुमच्या कानांना (गाऊन) मी आनंद देणार आहे.’’ आशाताईंच्या बोलण्यातला हा खटय़ाळपणाच आपल्याला नेहमी ताजंतवानं करतो.
बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या वयाच्या सर्व टप्प्यांत पहाटेच्या भूपाळीपासून रात्रीच्या अंगाईगीतापर्यंत, कुठल्याही वेळी, दैनंदिनीच्या कुठल्याही वळणावर आशाताईंच्या स्वरांनी आपल्या सगळ्यांना उभारी दिलेली आहे. स्वररचनेचे आकार बदलले, रुची बदलली, पण आशाताईंचा आवाज बदलत गेलेल्या प्रत्येक वळणावर अनोखं रूप घेऊन आपल्यासमोर आलाय.
नवनवी आव्हानं स्वीकारत, वादळांना तोंड देत, त्या- त्या पिढीचे ढंग समजावून घेत अनेक शब्दकार- संगीतकारांच्या स्वरांना आशाताईंनी आपल्या सुरांनी ताजा गंध दिलाय. लावणी ते अभंग अन् पॉप ते भावगीत असं सारं वैविध्य त्यांनी आजवर मांडलंय. हसता हसता गाणं आणि गाता गाता हसणं- इतक्या सहजतेनं  आशाताईंनी अकरा हजारांहून अधिक गाण्यांचा उच्चांक प्रस्थापित केलाय.
‘उठी श्रीरामा’सारख्या भूपाळीतून आपली पहाट प्रसन्न केलीय. ‘पंढरीनाथा झडकरी आता’, ‘ये गं ये गं विठाबाई’सारख्या लालित्यपूर्ण भक्तिगीतांनी दुपारच्या शांत वातावरणात पोटात खड्डा निर्माण केलाय. ‘नाच रे मोरा’नं शाळकरी सवंगडी भेटल्याचा आनंद दिलाय. ‘विचारल्यावीन हेतू कळावा, त्याचा माझा सूर जुळावा’ म्हणत आलेल्या आशाताईंच्या तानेनं अचानक आलेल्या वळवाच्या प्रसन्न सरीचा आनंद दिलाय. ‘सुवासिनी’तल्या ‘जिवलगा, कधी रे येशील तू’ या बाबूजींनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यात आशाबाईंनी ‘दिवसामागून..’ हा शब्द वर चढवत नेला की बाप्या माणसाच्या पोटातही खड्डा पडलाय. ‘का रे दुरावा’तलं आर्जव असो किंवा ‘आ.. आ.. आजा’मधला खळाळ, ‘केव्हातरी पहाटे’मधला भाव तरलपणे व्यक्त करणं असो, किंवा ‘रेशमाच्या रेघांनी’ ही लावणी असो- तांबडय़ा मातीतल्या मऱ्हाठमोळ्या साध्या माणसांना जगण्याचं बळ आशाताईंच्या सुरांनी दिलंय.
त्या गुलाम अलींचा ढंग दाखवतात. लतादीदींची नक्कल पेश करताना हुबेहूब त्यांच्यासारखी लकेर घेतात. ‘मुहब्बत क्या कहीये’ म्हणत गझलचा ट्रेंड पकडतात. ‘हाल कैसा हे जनाब का’ गात जुन्या सुरेल काळात क्षणात घेऊन जातात. ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’सारखी गाणी म्हणून रसिकांना टाळ्यांचा ठेका धरायला लावतात. ‘आईये मेहरबाँ’पासून ‘जरा सा झूम लूँ मैं’ म्हणत प्रत्येक पिढीतल्या नायिकेला आवाज देतात. ‘जवानी जानेमन हसीन दिलरुबा’नंतरचं त्यांचं ठसकेबाज हसणं, ‘हुस्न के लाखों रंग’मधला खटय़ाळ भाव, ‘बुगडी’मधलं ‘हाऽऽय’ उच्चारणं, ‘पान खाये सैंय्याँ’ किंवा ‘येणार नाथ आता’मध्ये वरच्या पट्टीत जाणारी तान ऐकणाऱ्याचं भान हरपून टाकते.
नाटकाचा विषय काढताच त्या थेट बाबांच्या (मा. दीनानाथ) काळात जातात. उंचेपुरे, धोतरातले दीनानाथबाबा भरदार ताना घेत रीयाज करत बसलेले.. गंधर्वानी त्यांची गायकी जाणून गोव्यातून फुलांच्या पायघडय़ा घालत आमंत्रित केलेले.. विनामाइक ऑपेरा हाऊसमधला आवाज गिरगाव नाक्यापर्यंत पोहोचवणारे.. सारे सारे ‘बाबा’ त्यांना आठवतात. माईंच्या मांडीवर बसून विंगेतून त्यांचं काम बघितल्याचं आशाताईंना आठवतं. नाटय़गीत आणि नाटक ही म्हणूनच त्यांच्या मर्मबंधातली ठेव आहे. ‘नाही मी बोलत नाथा’, ‘दे हाता शरणागता’, ‘सन्यस्त खङ्ग’ ते ‘मानापमान’ ते ‘भावबंधन’मधली पदं त्यांना म्हणायला फार फार आवडतात. वीरवृत्तीच्या मा. दीनानाथांच्या गायकीचा दीपोत्सव त्यांना निरंतर तेवत ठेवावासा वाटतो.
‘‘त्या- त्या नायिकेची ढब तुम्ही त्यांच्या गाण्यात नेमकी कशी आणता?,’’ असं एकदा मी आशाताईंना विचारलं असता त्या म्हणाल्या- ‘‘पूर्वी शूटिंगअगोदर सर्व कलाकार रेकॉर्डिग रूममध्ये यायच्या, बसायच्या. किंवा त्यांचा एखादा चित्रपट आम्ही आधी बघितलेला असायचा. त्या- त्या अभिनेत्रीशी मी गप्पा मारायचे. त्यातून त्यांच्या आवाजाची कल्पना यायची. त्यांची तोंड उघडण्याची पद्धत लक्षात यायची. यात हेलनचं नि माझं सर्वात जास्त टय़ुिनग जमलेलं होतं. मी गाण्यातून जे एक्स्प्रेशन द्यायची, ते सही सही ती पडद्यावर उतरवायची.’’
आशाताई सोळा-सतरा भाषांतून गाणी गायल्या आहेत. त्यांच्या मते, भाषा समजून घेणं अवघड आहे, पण गाण्याचे शब्द नीट कळले तर ते गाणं त्या भावासकट म्हणणं सोपं जातं. भाषा म्हणजे केवळ शब्द नव्हेत. ते व्यक्त करणाऱ्या लोकांची संस्कृती- ती समजून घ्यावी लागते.
संगीतकाराने शब्द कुठे तोडले आहेत, हरकत घेताना आवाजाला कुठे आळवून घ्यायला हवं, हे नव्या गायकांनी शिकायला हवं असं आशाताईंना वाटतं. नुसती चाल पाठ करून चालणार नाही. मुळात गाण्याचा अर्थ व त्यातला भाव समजावून घ्यायला हवा. शब्द कसा म्हटला जातो, हे ध्यानात ठेवायला हवं.
बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे उच्चारण आणि भाव व्यक्त करणं नेमकं समजावून देत, असं आशाताईंचं मत. ऱ्हस्व-दीर्घ उच्चार नेमके येण्यावर त्यांचा कटाक्ष असे. ‘जाळ्यात गावलाय मासा’ हे बाबूजींकडे म्हटलेलं आशाताईंचं पहिलं गाणं.
‘नभ उतरू..’ म्हणताना त्यांना आजोळची- खानदेशची आणि स्मिता पाटीलची आठवण येते. ‘जिवलगा..’ म्हणताना त्यांना जाणवतं, की हृदयनाथची गाणी म्हणजे सर्वात अवघड. दम निघतो. वसंत प्रभू- पी. सावळारामांची गाणी म्हणताना काटकरांचा लिंबाचा मळा आठवतो. वसंत मोहितेंबरोबर फक्त एकच सिनेमा- ‘भाऊबीज’ त्यांनी केला, पण ‘सोनियाच्या ताटी’सारखी सर्वच गाणी हिट्.
मोठय़ा मुलाची म्हणजे हेमंत भोसलेची रचना समजावून घेताना (‘शारद सुंदर चंदेरी राती’) त्यांना सर्वात जास्त आनंद झाला. आनंद मोडकची ‘लाल पैठणी’ गाताना आई आणि लेक दोघींचे आवाज एकाच गाण्यात काढण्याची कमालही आशाताईंनी केलीय. वसंत पवारांच्या काळात पुण्यातल्या पहिल्या ट्रॅक मशिनवर एका दिवसात सात गाणी त्या गायल्यात. रेकॉर्डिगच्या मधल्या वेळात जादूचे प्रयोग करणारे वसंत पवार आशाताईंना आठवतात. दत्ता डावजेकर हे आशाताईंचे पहिले संगीतकार. ‘चला चला नवबाला’ ही पहिली रचना. पन्नासच्या दशकाच्या आरंभी एका वैदर्भीय कवीची कविता- राजा बढेंची ‘चांदणे शिंपीत जाशी’ म्हणताना आशाताईंना बढे यांच्याकडचा पोपट आठवतो. पण त्यांचे आवडते कवी आहेत- सुरेश भट. मैत्र जुळलं शांता शेळकेंशी आणि गाणी हिट् झाली हृदयनाथांची!
परदेशी चित्रपटांतील गाणी, ऑपेराज्च्या सुरांची गोडी त्यांना सी. रामचंद्रनी लावली आणि आशाताईंचा गाण्याचा ढंगच बदलून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं. आशाताई म्हणतात, ‘‘अण्णा उत्तम गाऊन शिकवत. नोटेशनला ते पक्के होते. ‘शब्द चावू नका, हृदयापासून मोकळं गा..’ म्हणत.’’
‘‘आम्ही जे स्वर बांधतो, त्यापेक्षा वेगळी नजाकत करून गाणं म्हणणारी गायिका.. बिस्मिल्लांच्या शहनाईसारखी मिंड गळ्यातून घेणारी गायिका!’’ असं संगीतकार राम कदम त्यांच्या गाण्याबद्दल म्हणत. कदम-पवारांवरून आठवलं- आनंदघन म्हणजे लता मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या ‘रेशमाच्या रेघांनी’पासून ‘लोणावळा-खंडाळा’सारख्या बाळ पळसुलेंच्या लावणीपर्यंत फक्त लावण्यांचाच ‘शो’ करण्याचं गेली काही वर्षे आशाताईंच्या मनात आहे.
ओ. पी. नय्यर पेटीवर चाल बांधत. त्यांचं ऑर्केस्ट्रेशन पियानोवर वर्कआऊट करत. ओ. पी. च्या मते, आशाताईंच्या आवाजातला व्हॉल्युम आणि फोकस कमाल आहे. ‘नया दौर’पासून या जोडीची सर्वच गाणी गाजली. आशाताईंना त्यांचं ‘आईये मेहेरबाँ’ फार आवडतं.
आर. डी. बर्मनदांसमवेत ‘दी ट्रेन’मध्ये पहिलं गाणं आशाताईंनी गायलं. ताईंच्या मते, पंचमदांसाठी उंच आवाज लावावा लागे. ते कधी ताल बदलत, कधी सूर. ते नीट लक्ष देऊ ऐकावं लागे.
शांता शेळके सांगत, की ‘१९४८-४९ मध्ये मी ‘स्वराज्याचा शिलेदार’साठी कोल्हापूरच्या आराम हॉटेलमध्ये राहिले होते. तेव्हाचं तिचं (आशाताईंचं) उंच स्वरातलं लगबग बोलणं, खळखळ हसणं, माइकपुढे जीव ओतून गाणं, रीटेक्सना न थकणं- हे सारं आठवतं.’ ‘मागे उभा मंगेश’च्या रेकॉर्डिगच्या वेळी शांताबाई आशाताईंच्या या आठवणी जागवीत होत्या. त्यांच्या मते, आशा ही गाण्याइतकीत खाण्यात रस घेणारी. भोपळ्याचे घारगे ती छान बनवीत असे. सुरेश भटही सांगत की, आशा ही हौसेनं चवदार स्वयंपाक करून घालणारी उत्तम गृिहणी आहे. तिच्या हातची मासळी मला आवडत असे. नाशिकचे मधुकर झेंडे सांगतात की, सप्तशृंगी गडावर टेंभ्याच्या प्रकाशात त्यांनी अप्रतिम पिठलं भात आणि बुर्जी बनवली होती.
पण खुद्द आशाताईंना काय आवडतं? त्या मटण-मासे उत्तम बनवत असल्या तरी त्यांना तुरीच्या डाळीची आमटी, गरमागरम भात, लिंबू, लोणकढं तूप हा मेनू फार आवडतो. पुरणपोळी, बासुंदी, शाही तुकडा, दुधी हलवा असेल तर उत्तमच. त्यांच्या स्वयंपाकाचा- उत्तम पाककौशल्याचा अनुभव मी स्वत:ही घेतलेला आहे. अशावेळी मला त्यांचा स्वयंपाकघरातला जुना साथीदार नाना आठवतो. ‘खाणं’ असो, वा ‘गाणं’- जमत नाही म्हणजे काय? हे आव्हान त्या कायम स्वीकारत आलेल्या आहेत. ‘अशक्य’ हा शब्द त्यांच्याकडे नाहीच.
आशाताई म्हणतात की, ‘‘जसा जमाना आला तशी मी बदलत गेले. त्या- त्या जमान्यातल्या स्टाईलमध्ये अडकले असते तर संपले असते. माइक हाच माझा परमेश्वर आणि गाणं हीच माझी पूजा आहे. सतत नवनव्या आव्हानांना सामोरं जात गात राह्य़ले म्हणून आज ऐंशीच्या घरात गाऊ शकतेय.. जराही थकलेली नाही.’’
‘लेकीन’च्या वेळी मला गुलजारसाहेबांनी आशाताईंबद्दल एक छान गंमत सांगितली होती. ते म्हणाले, ‘गाना गाने से पहले वो फिल्म के कॅरेक्टर के बारे में पूछती है. अ‍ॅक्ट्रेस कौन है, ये पता करती है. नतीजा ये- के पर्देपर उनकी आवाज फिल्म का हिस्सा बन जाती है. हीरॉइनचं ‘वय’ही त्या विचारून घेतात..’ हे विशेष. रिहर्सलच्या वेळी आशाताई चहा मागवतील. चहा येईतो मोठमोठी अक्षरं काढून गाणं स्वत:च्या हाताने लिहितील. त्यावर नाना खुणा करतील. गाणं पूर्ण होईतो ते गाण्याच्या कागदाचं पान म्हणजे ‘अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंग’ बनलेलं असतं.
शेवटी जाता जाता- माझ्या त्यांच्यासमवेतच्या २७ वर्षांच्या कार्यक्रमांच्या अनुभवानंतर मी एवढंच म्हणेन, की मरगळ झटकणारा, परस्परांतला अबोला पुसून टाकणारा, आपल्यासारख्या रसिकांची संगीतसंस्कृती आकाराला आणणारा, सुरांचा चैतन्यदायी झंझावात म्हणजे आशा भोसले!
आजही लाल, हिरव्या, केशरी काठाच्या सिल्क साडय़ा गाण्यागणिक बदलत, डोईवरचं फूल बदलत, कधी नवग्रहांची माळ ठसठशीतपणे गळ्याभोवती पेहेनत, कधी पाचू, कधी पोवळं, माणिक, मोती अशा माळा बदलत, कधी हिऱ्यांची कुडी, तर कधी मनगटावरचं हिऱ्या-मोत्यांनी चमकणारं ब्रेसलेट आकाशाच्या दिशेनं थिरकवत आशाताई हातातल्या माइकवरून ऐंशीच्या घरात ‘ले गई.. ले गई.. मुझको हुई ना खबर..’ देशोदेशीच्या रंगमंचावरून म्हणू लागतात तेव्हा त्यांची नातवंडं शोभतील अशा वयाची श्रोत्यांमधली जनरेशनही बेभान होते.. डुलायला लागते.
ही ताकद लक्षात घेऊनच सुरेश भट म्हणतात-
‘तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो
वार्धक्य तुझ्या जगण्याला, हे असेच विसरत जाओ..’