रघुनंदन गोखले

आपल्या विक्षिप्तपणाचे नमुने प्रत्येक ठिकाणी गोंदवून ठेवणारा बॉबी फिशर बुद्धिबळातील दंतकथा बनून राहिला. जगज्जेतेपदासाठी लढण्यासाठीही आपल्या अटी-शर्ती मांडत भांडणाऱ्या, आयोजकांच्या नाकीनऊ आणणाऱ्या बॉबीवरच्या विशेष लेखधारेतला हा शेवटचा लेख. धमक असतानाही लहर म्हणून जगज्जेतेपदाचा त्याग करून २० वर्षे अज्ञातवासात गेलेल्या या विलक्षण व्यक्तिमत्त्वाविषयी अधिक तपशील देणारा..

Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
village in Jalgaon district where Yatra of bride and groom celebrated for many years
देव-देवतांची नाही तर ‘या’ गावात भरते चक्क नवरदेव-नवरीची यात्रा
Viral Photo
Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत

गेल्या तीन लेखांमध्ये आपण बॉबी फिशरचा लहानपणापासून ते जगज्जेतेपदापर्यंत पोहोचण्याचा संघर्ष बघितला. तसंच बॉबी उपउपांत्य सामन्यात मार्क तैमनोवविरुद्ध कसा ६-० अशा एखाद्या टेनिस सामन्याप्रमाणे अपूर्व गुणांनी जिंकला तेही अनुभवलं. पण आता त्याचा प्रतिस्पर्धी होता डेन्मार्कचा तगडा ग्रँडमास्टर बेन्ट लार्सन! फिशरच्या अनुपस्थितीत त्याला बिगर सोवियत खेळाडूंमधील सर्वात सामथ्र्यवान खेळाडू मानण्यात येत होतं. त्याचे सगळ्या सोवियत जगज्जेत्यांविरुद्धचे विजयही साक्षी होतेच!

लार्सनचा धुव्वा!

बॉबी आणि बेन्ट हे १९५८ सालापासून एकमेकांशी लढत होते. आठ डावांमध्ये बॉबी जरी ५ जिंकला असला तरी पाल्मा येथे आदल्या वर्षीच झालेल्या आंतरझोनल स्पर्धामध्ये बेन्टनं त्याला आस्मान दाखवलं होतं. त्यामुळे ही लढत चुरशीची होणार यात शंकाच नव्हती. जगज्जेता बोरिस स्पास्की म्हणाला की, बेन्ट लार्सन चांगली लढत देईल. पण माजी जगज्जेत्या मिखाईल बोटिवनीकचं मत वेगळं होतं आणि आदल्या सामन्याप्रमाणे तो पुन्हा तोंडघशी पडला. दूरचित्रवाणीवर मुलाखत देताना बोटिवनीक म्हणाला, ‘‘बेन्ट म्हणजे तैमनोव नाही. त्यानं बॉबीविरुद्ध काहीतरी खास तयारी केली असणार. आणि मुख्य म्हणजे बॉबीचा स्वभाव! तैमनोवविरुद्ध ६-० जिंकला असल्यामुळे बॉबी तसंच जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि त्यात मार खाईल.’’
आपण सतत बघतो आहोत की या महान जगज्जेत्याला बॉबी दर वेळी खोटं पाडत आला होता. अमेरिकेतील कोलोरॅडो राज्याची राजधानी असणाऱ्या डेन्वर येथे १९७१च्या जुलै महिन्यात सामना सुरू झाला आणि बघता बघता संपलासुद्धा! पुन्हा एकदा बॉबीनं ६-० अशा टेनिस गुणांनी सामना जिंकला आणि समग्र बुद्धिबळ जगतानं तोंडात बोटं घातली. बॉबीनं आपला विजय कसा साजरा केला असेल? त्यानं मॅनहॅटन क्लबच्या जलदगती स्पर्धेत भाग घेतला आणि ती अतिशय कठीण स्पर्धा २२ पैकी २१.५ गुणांनी जिंकली! आता बॉबी आणि बोरिस स्पास्की यांमध्ये उभा होता फक्त माजी जगज्जेता टायग्रेन पेट्रोस्यान! अतिशय अखिलाडू वृत्तीनं त्यानं तरुण रॉबर्ट बनरला पराभूत केलं होतं. (याचा उल्लेख आपण ३० एप्रिलच्या जगज्जेतेपदाच्या सुरस कथांमध्ये वाचला असेलच). आव्हानफेरीचा अंतिम सामना होता अर्जेटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे!

पेट्रोस्यानची झुंज

पहिल्याच डावात माजी जगज्जेत्या पेट्रोस्यानला आघाडी मिळाली होती, पण कमालीच्या दडपणाखाली खेळणारा पेट्रोस्यान घोडचूक करून हरला. आता बॉबी सलग २० डाव जिंकला होता. यापूर्वी पहिला विश्व विजेता विल्हेम स्टाइनिट्झ १८७३ ते १८८२ यामध्ये सलग २५ डाव जिंकला होता. अनुभवी पेट्रोस्याननं स्वत:ला सावरलं आणि सामन्यातील दुसरा डाव जिंकून बॉबी फिशरची घोडदौड थांबवली. त्यानंतर सलग तीन डाव बरोबरीत सुटले आणि पेट्रोस्यानच्या जाळ्यात बॉबी अडकला असं वाटू लागलं. एक पत्रकार म्हणाला, ‘‘पेट्रोस्यान रटाळ खेळून बॉबीला उद्विग्न करेल आणि बॉबीचा तोल ढळला की सहज जिंकेल.’’ प्रत्येक खेळाडूला मधे विश्रांतीसाठी काही दिवस ठेवलेले असतात. बॉबीनं दोन दिवस मागितले आणि परत आला तेव्हा तो चवताळलेला वाघच होता जणू! त्यानं पटापट चार डाव सलग जिंकून सामना खिशात घातला. आता बॉबी बोरिस स्पास्कीचा आव्हानवीर झाला होता.

सामन्याआधीची सनसनाटी

बोरीसला खेळायचं होतं राईकजेविकला (आइसलँड ) तर बॉबीची पसंती होती बेलग्रेड (तेव्हाचं युगोस्लाव्हिया)! मग प्रस्ताव आला की दोन्हीकडे १२-१२ डाव खेळावेत. पण तेही कोणालाच पटेना! अखेर बॉबी तयार झाला आइसलँडमध्ये खेळायला. त्यानं बक्षिसाची रक्कम वाढवायची मागणी केली. प्रायोजक जिम स्लेटर या अब्जाधीशानं सव्वा लाख डॉलरचं बक्षीस वाढवून दुप्पट केलं. मग बॉबी राईकजेविकला अवतरला.
स्पर्धेच्या आधी स्वत:च्या शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देणारा बॉबी हा पहिलाच ग्रँडमास्टर होता. स्पर्धेच्या काळातही तो टेनिस खेळायचा आणि रात्री उशिरापर्यंत पोहायचा. त्याच्या बरोबर रेव्हरंड विल्यम लोम्बार्डी होता. स्पास्कीला हरवून १९५७ साली जागतिक ज्युनिअर विश्वविजेता झालेला लोम्बार्डी बॉबीला बुद्धिबळात मदत करत असेच, पण स्पर्धेदरम्यान बॉबीनं डोक्यात राख घालून स्पर्धा सोडून न जाण्यासाठी त्याचे प्रयत्न कारणीभूत होते.
११ जुलैला पहिला डाव खेळला गेला. अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगात हे डाव प्रसारित होत असत. भारतातसुद्धा वृत्तपत्रांनी हे डाव रोजच्या रोज प्रकाशित केले. सामन्याची सुरुवात इतकी सनसनाटी झाली की अमेरिकेत बुद्धिबळ खेळाडूंची संख्या शेकडय़ांनी वाढली. पहिला डाव बॉबी फिशर स्वत:च्या घोडचुकीमुळे हरला. त्यानंतर त्यानं मागणी केली की कॅमेरे हटवा. जरी ते कॅमेरे आवाज करत नसले तरी त्याला त्यांचा त्रास होतो आहे. आयोजक भडकले, कारण त्यांचे कॅमेरामन पायात बूट न घालता फक्त मोजे घालून काम करत होते. त्यांना त्यांच्या खिशात नाणी, पेन, लायटर आदी ठेवायला बंदी होती. इतके सर्व करूनही हा प्राणी आक्षेप घेतो याचा त्यांना संताप आला. त्यांनी बॉबीला नकार दिला आणि महाविक्षिप्त बॉबी दुसऱ्या डावासाठी आलाच नाही.

सामन्याच्या नियमाप्रमाणे बोरिस स्पास्की जिंकला होता. आणि त्यानं स्वत: पुढे खेळण्यास नकार दिला असता तरी त्याला कोणी दोष दिला नसता. पण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी स्वत: बॉबीला फोन करून खेळण्याची विनंती केली. मग बॉबीनं एक पत्र लिहून बोरिस स्पास्कीला आवाहन केलं की दुसरा डाव परत खेळावा. बोरिसच्या ते काही हातात नव्हतं, पण त्यानं खुल्या दिलानं बॉबीला माफी दिली आणि तिसरा डाव स्टेजच्या मागे खेळण्याचं ठरलं. बॉबी तिसरा डाव खेळण्यास आला आणि सर्वाना हायसं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे त्यानं काळ्या मोहऱ्यांकडून खेळून तो डाव जिंकला.

या नंतर सामना नियमितपणे सुरू झाला आणि ११ व्या डावाचा अपवाद वगळता बॉबीनं ७ डावांत विजय मिळवले. २१ व्या डावाअखेर २४ डावांचा हा सामना बॉबीनं १२.५- ८.५ असा जिंकला असं जाहीर करण्यात आलं. यामधील बॉबीचा सहाव्या डावातील विजय हा त्या सामन्यातील सर्वोत्तम डाव असे सगळ्याच बुद्धिबळतज्ज्ञाचं मत होतं. बोरिस स्पास्की किती उच्च प्रतीचा खिलाडूवृत्ती दाखवणारा होता याचं एक उदाहरण म्हणजे बॉबी तो डाव जिंकल्यावर प्रेक्षकांबरोबर टाळ्या वाजवण्यात बोरिसपण सहभागी झाला होता.

अव्वल पदावर विराजमान..

पाकिस्तानला हरवून जगज्जेतेपद मिळवल्यावर भारतीयांना जो आनंद होतो त्यापेक्षा किती तरी जास्त अमेरिकन लोक बॉबीच्या विजयानं आनंदी झाले होते. ३० वर्षांनंतर गॅरी कास्पारोव्हनं त्याचं समर्पक वर्णन केलं होतं. तो म्हणाला, ‘‘लोकशाही देशातला एक युवक एकहाती सोवियत मशीनशी लढत देतो आणि त्या महाकाय यंत्राला पराभूत करतो हे कौतुकास्पद होतंच!’’ बॉबीची बहीण जोन म्हणाली, ‘‘एखाद्या एस्किमोनं अंगणातील बर्फ बाजूला करून तेथे टेनिस कोर्ट उभारून, सराव करून मग जगज्जेता टेनिसपटू व्हावं तसंच झालं हे!’’

जगज्जेता बॉबी फिशर न्यूयॉर्कला परतला त्या दिवसाला ‘बॉबी फिशर डे’ जाहीर करण्यात आला. त्याला जाहिरातीसाठी विविध कंपन्यांनी मिळून ५० लाख डॉलर (आताचे साडेतीन कोटी डॉलर्स) देऊ केले. त्यानं त्या सगळ्यांना नकार दिला. त्यानं अनेक टेलीव्हिजन केंद्रांवर मुलाखती दिल्या.

जगज्जेतेपदाचा त्याग..

१९७५ सालच्या जगज्जेतेपदासाठी अनातोली कार्पोव आव्हानवीर म्हणून सगळ्या प्रतिस्पध्र्यावर मात करून आला होता. आता बॉबी फिशरनं जागतिक विजेतेपद लढण्यासाठी काही अटी ठेवल्या होत्या.
१. सामन्यासाठी डावांची मर्यादा नको.
२. पहिले ९ डाव जिंकल्यास बॉबी पुन्हा जगज्जेता ठरेल.
३. कार्पोवला मात्र १०-८ फरकाने जिंकला तरच जगज्जेतेपद मिळेल.
जागतिक संघटनेनं या अटी मान्य केल्या नाहीत आणि जुन्या नियमाप्रमाणे खेळण्यासाठी १ एप्रिल १९७५ पर्यंत संमतीपत्र मागवलं. ३ एप्रिलपर्यंत वाट पाहून अनातोली कार्पोवला विजयी घोषित करण्यात आलं.

अज्ञातवास आणि अस्त..

त्यानंतर तब्बल २० वर्षे बॉबी फिशर अज्ञातवासात गेला. तो परत आला स्पास्कीविरुद्ध १९९२ साली रिव्हेंज मॅचसाठी! या सामन्यासाठी ५० लाख डॉलरचं बक्षीस होतं. बॉबीला हा सामना जिंकून ३५ लाख डॉलर मिळाले. पण युगोस्लाव्हियावर लादलेले निर्बंध तोडून त्या देशात खेळल्याबद्दल अमेरिकेनं त्याच्याविरुद्ध अटकपत्र जारी केलं. अमेरिकेचा ग्रँडमास्टर यासर सैरावान हा स्वेती स्टीफन या ठिकाणी सामन्याच्या वेळी हजर होता. त्यानं बॉबीच्या खेळाविषयी लिहिलं आहे की, बॉबी गेली २० वर्षे बुद्धिबळ खेळलेला नाही असं त्याच्या खेळाकडे बघून वाटत नाही.

बॉबी २००० ते २००२ फिलिपाइन्समध्ये आशियाचा पहिला ग्रँडमास्टर युजीन टोरे याच्या घरी राहत होता. अमेरिकन पासपोर्टवर प्रवास करताना त्याला जपानमध्ये अटक करण्यात आली, पण आइसलँड सरकारनं त्याला मानद नागरिकत्व आणि आश्रय देऊ केला. त्यामुळे बॉबीचे अखेरचे दिवस जेथे त्याने १९७२ साली जगज्जेतेपद मिळवले त्या देशात गेले. अधूनमधून तो हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे जाऊन पोलगार भगिनी किंवा ग्रँडमास्टर पीटर लेको यांच्या घरी राहत असे.

स्वत: ज्यू असतानाही ज्यूविरोधी वक्तव्य, अमेरिकेवर झालेल्या ९/११ हल्ल्याबद्दल अमेरिकेलाच दूषणं देणं या गोष्टींमुळे बॉबी हळूहळू लोकांच्या मनातून उतरला. त्यानं मियोको वाताई या जपानी महिलेशी लग्न केलं आणि अखेर तिच्यासाठी २० लाख डॉलरची संपत्ती मागे ठेवून बॉबी १७ जानेवारी २००८ रोजी आइसलँडमध्ये मृत्युशरण गेला.

बुद्धिबळाला देणगी..

बॉबीनं खेळलेले अप्रतिम डाव तर आहेतच, पण बॉबीनं सुचवलेल्या दोन गोष्टी आजही जागतिक संघटनेनं मान्य केल्या आहेत आणि त्या वापरल्या जातात. एक आहे फिशरँडम किंवा ९६० बुद्धिबळ! यामध्ये पटावर सोंगटय़ा नेहमीप्रमाणे न लावता कुठेही ठेवल्या जातात. फक्त प्यादी जागा बदलत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे सामन्यासाठी वापरण्यात येणारी घडय़ाळे. बॉबीच्या सूचनेप्रमाणे इलेक्ट्रॉनिक घडय़ाळामध्ये प्रत्येक चाल खेळली की आपोआप काही सेकंद खेळाडूला मिळतात. या क्रांतिकारक घडय़ाळांमुळे खेळाडूंचे वेळेअभावी हरण्याचं प्रमाण कमी झालं आहे.
असा हा महान खेळाडू निव्वळ त्याच्या मानसिक अस्थिरतेमुळे आणि हेकट स्वभावामुळे वाया गेला असंच म्हणावं लागेल. पण अजूनही त्याचे डाव बघताना त्याच्या दैवी प्रतिभेची साक्ष पटते.

Story img Loader