रघुनंदन गोखले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉबी फिशर हे जगातल्या बुद्धिबळ खेळणाऱ्या आणि न खेळणाऱ्यांनाही माहिती असलेलं नाव. त्याच्या विक्षिप्त वर्तणुकीच्या अनेक कथा आणि दंतकथा जगभर प्रसिद्ध आहेत. जगातील सर्व थोर खेळाडू उघड उघड कबूल करतात की, बॉबीचा उदय झाला नसता तर आजही बुद्धिबळ हा खेळ उपेक्षित राहिला असता. बुद्धिबळातला हा ‘कळा’वंत लहानपणापासून स्वत:ला कसा घडवत आणि घडत गेला, त्याची चर्चा पुढल्या काही लेखांमधून..
बॉबी फिशरला १९७२ साली जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत एकूण २,५०,००० डॉलर्स पैकी विजेता म्हणून १,५६,००० डॉलर्स मिळाले, तर बोरिस स्पास्कीची हरूनही ९४००० डॉलर्सची कमाई झाली. आता असं वाटेल की, यात काय मोठं? पण मंडळी, हे आकडे ५३ वर्षांपूर्वीचे आहेत. आणि या लढतीच्या तीन वर्षे आधी टायग्रान पेट्रोसिअनला हरवून जगज्जेता बनलेल्या त्याच स्पास्कीला किती मिळाले होते माहिती आहे? १४०० रुबल! म्हणजे अधिकृतपणे जरी २२०० डॉलर्स दाखवत असले तरी प्रत्यक्ष त्याची किंमत होती ३५० डॉलर्स!

बुद्धिबळाची दयनीय स्थिती

यावरून आपल्याला बुद्धिबळाच्या स्थितीची / दारिद्य्राची कल्पना येत असली तरी मी तुम्हाला आणखी काही आकडेवारी देतो. १९७१ सालच्या सोवियत अजिंक्यपदाची स्पर्धा झाली आणि त्या वेळच्या सर्वात बलाढय़ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचा सगळ्या बक्षिसांचा एकूण निधी होता २५० रुबल्स. ही परिस्थिती होती सोवियत संघराज्याची. भारतात तर त्याहून वाईट स्थिती होती. उदाहरणार्थ, १९६० साली दिल्ली येथे २० फेऱ्यांची २५ दिवसांची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकून विजेत्याला जितके बक्षीस होते त्यापेक्षा जास्त बक्षीस दिल्लीजवळच्या खेडय़ात झालेल्या बैलगाडय़ांच्या स्पर्धेच्या विजेत्याला होते.

स्पास्की -फिशर लढतीला एवढं महत्त्व का आलं होतं? याचं कारण एक म्हणजे त्या वेळची राजकीय परिस्थिती! या सामन्याला अमेरिका विरुद्ध सोवियत संघराज्य यांच्या शीतयुद्धाची किनार होती. त्यात कधी नव्हे तर बॉबी फिशरन्ं दोन बलाढय़ प्रतिस्पध्र्याना ६-०, ६-० अशा टेनिससारख्या स्कोअरनं हरवलं होतं. आणि त्यात होता मार्क तैमानोव हा सोवियत ग्रँडमास्टर! अनेक देश आणि उद्योगपती यांच्यात अहमहिका होती की कोण या स्पर्धेचं प्रायोजक बनतं? अखेर २,५०,००० डॉलसर्वंर आइसलँडनं बाजी मारली आणि त्यानंतर बुद्धिबळ खेळणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जाऊ लागलं. आज आपण बुद्धिबळाचं चित्र बदलून टाकणाऱ्या बॉबी फिशरच्या बालपणाचा आढावा घेऊ या!

बॉबीची बुद्धिबळाशी ओळख

बॉबीला त्याच्या विजिगीषू वृत्तीचा वारसा त्याचा आईकडून- रेजिनाकडून मिळाला असावा. रेजिना पदवी मिळवल्यानंतर शिक्षिका झाली. नंतर नर्स आणि मग परीक्षा देऊन डॉक्टरही झाली. नर्स ते डॉक्टर हा प्रवास सुरू असताना तिला दोन मुलांची काळजीही घ्यायची होती. बॉबीची मोठी बहीण जोन ही आई बरोबर नसताना त्याची काळजी घेत असे.
बॉबीच्या वडिलांविषयी खूप वदंता आहेत. १९३३ साली रेजिनाला मॉस्कोमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनी असताना तिचं लग्न बायोफिजिक्सचे प्राध्यापक जेरार्ड फिशर यांच्याशी झालं. १९३८ साली जोन हिचा जन्म झाला, पण स्टालिनच्या राजवटीखाली जन्मानं ज्यू असलेल्या रेजिनाला त्रास होऊ लागला आणि ती १९३९ साली अमेरिकेत परत आली. तिची मैत्री हंगेरियन गणितज्ज्ञ पॉल नेमेन्यी यांच्याशी झाली आणि त्यानंतर बॉबीचा जन्म (९ मार्च १९४३) झाला असला तरी तिनं आपलं फिशर आडनाव बदललं नाही. पॉल हाच बॉबीचा खरा बाप असावा असं लोकांचं मत होतं.
बॉबी घरी एकटाच राहत असे ते पाहून रेजिनानं ब्रूकलीन इगल या वृत्तपत्राला एक जाहिरात देण्याची विनंती केली – ‘‘बुद्धिबळ खेळण्यासाठी ७-८ वर्षे वयोगटातील मुलं पाहिजेत.’’ त्या वृत्तपत्रानं ती जाहिरात छापली नाही, पण अमेरिकन बुद्धिबळाचा तारणहार समजला जाणाऱ्या हर्मन हेम्सकडे पाठवली. हर्मननं बॉबीला एक प्रशिक्षक दिला. बॉबीचा पहिला प्रशिक्षक होता कारमेन निग्रो. त्याला बॉबीची प्रतिभा ओळखता आली आणि त्यानं बॉबीला आपल्या पंखाखाली घेतलं. १९५१ ते १९५५ या काळात बॉबी फिशर हजारो डाव खेळला इतकं त्याला बुद्धिबळानं वेड लावलं होतं. पण एका परदेशी दौऱ्यामुळे त्याच्या खेळात अविश्वसनीय प्रगती झाली. १९५६ साली मार्चमध्ये हॉथॉर्न चेस क्लबनं क्युबाचा दौरा केला. बॉबी छान खेळला, पण परत आला तो वेगळाच बॉबी होता. त्याच्या खेळात लक्षणीय सुधारणा झाली होती. (म्हणून मी पालकांना सल्ला देतो की शक्य असेल तर अधूनमधून आपल्या पाल्यांना परदेशी नाहीतर कमीत कमी परगावी तरी खेळवा. त्यांच्या निव्वळ खेळातच नव्हे तर एकूण दृष्टिकोनात चांगला फरक पडतो).

परदेशी स्पर्धेनंतर यशाची मालिका

बॉबीला पहिलंवहिलं यश चाखायला मिळालं ते क्यूबाहून आल्यावर तीन महिन्यांत! अमेरिकन २० वर्षांखालील जुनिअर अजिंक्यपद स्पर्धेत खेळणाऱ्या १३ वर्षांच्या बॉबीनं स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून सर्वाना धक्का दिला. हा विक्रम अजूनही अमेरिकेत अबाधित आहे. त्यानंतर बॉबी गेला ओक्लाहामा गावातली अमेरिकन खुली स्पर्धा खेळायला. स्पर्धेतील सर्वात लहान असूनही या पठ्ठय़ानं चौथा क्रमांक पटकावून सर्वाना धक्का दिला. त्या काळी एवढी लहान मुलं बुद्धिबळ स्पर्धा खेळण्याचा विचारही करू शकत नव्हती, बक्षिसं मिळवणं तर दूरच! त्याच वर्षी (१९५६) साली न्यू यॉर्क शहरात रोझेनवाल्ड चषक सामन्यात बॉबीला सन्मानपूर्वक बोलावण्यात आलं. फक्त १२ निमंत्रितांच्या या सामन्यात बॉबीचा खेळ रंगला नाही. मात्र त्यानं डोनाल्ड बायरन या आंतरराष्ट्रीय मास्टरविरुद्ध मिळवलेला विजय संपूर्ण बुद्धिबळ जगताला खडबडून जागं करून गेला! सोवियत संघराज्यातही त्याची नोंद घेतली गेली. हॅन्स कमोच नावाच्या अमेरिकन मास्टरनं तर या डावाला शतकातील सर्वोत्कृष्ट डाव असं म्हटलं. नंतर कधीतरी बॉबीला या डावाची आठवण करून दिली असता कधी नव्हे तर बॉबीनं विनय दाखवून मी फक्त योग्य त्या खेळी केल्या. आणि मी नशीबवान ठरलो असे उद्गार काढले.

अमेरिकेचा सर्वात लहान विजेता!

विनयशीलता आणि बॉबी यांचं कमालीचं वाकडं होतं. एकदा त्याच्या चाहत्यानं बॉबी जिंकल्यावर ‘‘बॉबी, तू म्हणजे बुद्धिबळाचा देव आहेस.’’ असे उत्स्फूर्त उद्गार काढले. त्यावर बॉबी म्हणाला, ‘‘खरं आहे ते! पण केवढी जबाबदारी आहे या देवत्वाची!!’’ बॉबीचा आणखी एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. त्याला कोणीतरी सांगितलं की, त्या वेळच्या अमेरिकन महिला विजेती लिसा लेनच्या मते, त्याचा खेळ जागतिक विजेत्यांच्या साजेसा आहे. बॉबी ताडकन् म्हणाला, ‘‘ती बोलतेय त्यात सत्य असलं तरी तिची लायकी नाही माझा खेळ जोखण्याची!’’
१९५७ साल उजाडलं आणि १४ वर्षांच्या बॉबीला अमेरिकन संघटनेनं मास्टर हा किताब दिला. माजी विश्वविजेते मॅक्स युवे अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांचा बॉबी विरुद्ध दोन डावांचा प्रदर्शनीय सामना ठेवण्यात आला. बॉबीनं दोनपैकी एक डावात हार मानली, पण एक बरोबरीत सोडवला. त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा अमेरिकन जुनिअर स्पर्धा सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जिंकली आणि क्लीव्हलॅण्ड इथं होणाऱ्या अमेरिकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी रवाना झाला. त्या स्पर्धेत त्यानं आणि आर्थर बिसगायर यांनी बारा फेऱ्यांत १० गुण मिळवले, पण टाय ब्रेकरवर बॉबी विजेता ठरला. आता बॉबीला खुणावत होतं ते अमेरिकेचं राष्ट्रीय अजिंक्यपद! जानेवारी १९५८ मध्ये झालेल्या या स्पर्धेत खेळणार होता सहा वेळा विजेता ठरलेला सॅम रेशेव्हस्की. त्या वर्षीचा जागतिक जुनिअर अजिंक्यवीर विल्यम लोम्बार्डी आणि फिशरचा प्रतिस्पर्धी बिसगायर! स्पर्धेआधी १४ वर्षांचा बॉबी फिशर कसा खेळेल या प्रश्नावर बिसगायर म्हणाला, ‘‘बॉबीनं अर्धे गुण मिळवले तरी खूप झाले.’’ आणि झालं भलतंच! बॉबी झपाटल्यासारखा खेळला आणि एकही डाव न गमावता (फक्त ५ बरोबरीत सोडवून आणि इतर ८ जिंकून) पहिला आला. या स्पर्धेमुळे बॉबी जगज्जेतेपदाच्या शर्यतीत आला आणि वर त्याला आंतरराष्ट्रीय संघटनेकडून आंतरराष्ट्रीय मास्टर किताबही मिळाला. आता फिशर निघाला होता पोटरेरो (स्लोव्हेनिया) येथील आंतरझोनल स्पर्धेसाठी.

मॉस्कोमधील धमाल!

प्रथम बॉबी गेला तो मॉस्कोत! एका टेलिव्हिजन निर्मात्यानं हा दौरा पुरस्कृत केला होता. पोचल्या पोचल्या बॉबी म्हणाला, ‘‘मला तिथल्या सेंट्रल चेस क्लबमध्ये घेऊन जा.’’ तिथं गेल्या गेल्या त्याची गाठ पडली ती (पुढे ग्रँडमास्टर झालेले) येवगेनी वासयूकॉव्ह आणि अलेक्सान्डर निकिटिन यांच्याशी! त्यानं दोघांचीही पार धुलाई केली. बिचाऱ्यांना विद्युत गतीनं खेळणाऱ्या बॉबीशी एकही डाव जिंकता आला नाही. अनुभवी ग्रँडमास्टर आलाटॉर्टसेव्हचीही तीच गत झाली. घरी जाऊन आलाटॉर्टसेव्ह आपल्या पत्नीला म्हणाला, ‘‘आज मी भावी विश्वविजेत्याशी खेळलो.’’
बॉबीला कोणाच्याही मानमर्यादेची जाणीव नव्हती. त्यानं क्लबमध्ये आज्ञा सोडली- जगज्जेत्या बोटिवनीकला माझ्याशी खेळायला बोलवा! त्याला सांगण्यात आलं की ते शक्य नाही. मग बॉबी म्हणाला, ‘‘कमीतकमी पॉल केरेसला तरी बोलवा.’’ आपल्या आदरणीय पाहुण्याला नाराज करू नये म्हणून पदाधिकाऱ्यांनी अखेर टायग्रॅन पेट्रोस्यानला बोलावलं. पेट्रोस्यान हा विद्युत गती प्रकारात तज्ज्ञ होता. त्यानं बॉबीला अनेक डावांत पराभूत केलं आणि त्याचा नक्षा उतरवला. मग बॉबी म्हणाला, ‘‘माझा अधिकृत सामना आयोजित करा.’’ त्याला सांगण्यात आलं की असं शक्य नाही. तुमच्या अमेरिकन संघटनेकडून विनंती आली तर बघू. बॉबी भयंकर रागावला आणि म्हणाला, ‘‘या रशियन डुकरांना धडा शिकवला पाहिजे.’’ यावर सोवियत अधिकारी भडकले. पाहुण्यांकडून ही भाषा! ते बॉबीला तुरुंगात पाठवू शकत होते, पण अशा वेळी युगोस्लाव्ह बुद्धिबळ संघटनेचे अधिकारी मधे पडले आणि त्यांनी आम्ही बॉबीला ताबडतोब युगोस्लाव्हियामध्ये घेऊन जातो असं सांगितलं आणि प्रश्न सुटला.
१५ वर्षांच्या बॉबीनं पोटरेरोला जाऊन काय केलं ते पुढील भागात पाहू!
क्रमश:

gokhale.chess@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bobby fischer chess the story legend amy