सुरेश पांडुरंग वाघे यांनी अपार कष्ट घेऊन एकहाती तयार केलेल्या पंचखंडात्मक संकल्पनाकोशाचं थक्क करणारं काम पाहून कोणीही अचंबित व्हावं. व्यवसायाने केमिकल इंजिनीअर असणाऱ्या वाघे यांनी कादंबरी, कथासंग्रह, ललित गद्य वगरे लेखनही केलेले असले तरी आता ‘संकल्पनाकोशा’मुळे त्यांची वेगळी ओळख होत आहे.
माणसाचं ज्ञानाबद्दलचं अपार कुतूहल त्याला कोठे नेईल सांगता येत नाही. एकेका प्रश्नाच्या जिज्ञासेने वाघे माहितीचा वेध घेत गेले नि मिळालेल्या माहितीची टिपणे काढून ठेवता ठेवता वह्य़ा साठत गेल्या. या प्रचंड टिपणांतून कोशनिर्मितीची कल्पना त्यांच्या मनात तरळून गेली. रॉजेचा थिसॉरस पाहून त्यांनी मराठीतील कोशवाङ्मय धुंडाळायला प्रारंभ केला. काही कोश त्यांना पाहायला मिळालेही; पण त्यांच्या मनात असलेली किंवा साकार होत असलेली कल्पना काही वेगळीच होती. ती कल्पना प्रत्यक्षात आणावी असे त्यांच्या मनात येत होते, पण धाडस होईना. त्यांच्या शेजारी राहणारे कोकणी साहित्यिक देवराय बैंदूर यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. वाघेंनाही त्यांची कल्पना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी कोशकार्याला त्यांनी प्रारंभ केला. मग मात्र माणसे, संदर्भ, ग्रंथालये, तज्ज्ञ, हितचिंतक भेटत गेले. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळता मिळता कोशकार्य इतके विस्तारले, की त्याचा आवाका एखाद्या कोशकार्याच्या संस्थेला मागे टाकेल इतका झाला.
या कोशाला कोणाकोणाची प्रेरणा मिळाली, याचे रोचक वर्णन वाघे यांनी ‘ऋण नक्षत्रांचे’ या प्रस्तावनेत केले आहे. या कोशाच्या प्रकाशनाची वाटचालही दीर्घ आहे. अर्थात असे अवघड कार्य छापील स्वरूपात साकारताना इतका कालावधी लागणे स्वाभाविकच म्हणायला हवे. १९९० मध्ये वाघे यांची ग्रंथालीच्या दिनकर गांगल यांच्याशी भेट झाली नि चर्चा घडत घडत ‘रुची’च्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात ग्रंथालीची या कोशासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि २५ जानेवारी २०१३ रोजी- म्हणजे बरोबर २० वर्षांनी या कोशाचे पाचही खंड एकदम एकत्रित प्रकाशित झाले.
हा पंचखंडात्मक कोश दहा विभागांत विभागलेला आहे. ‘धर्म, काल, विश्व, प्राणी व वनस्पती’ असे चार भाग पहिल्या खंडात, ‘मानवी शरीर व कुटुंबसंस्था’ हे पाच व सहा विभाग दुसऱ्या खंडात, तर ‘नागरिक जीवन’ या एकाच विषयासाठी (विभाग सातवा) खंड तिसरा खर्ची पडला आहे. याचप्रमाणे ‘गुणावगुण’ या आठव्या विभागासाठी चौथा खंड, तर ‘मन व स्वभाव’ हा नववा विभाग आणि ‘ललितकला’ या विषयाचा दहावा विभाग पाचव्या खंडात समावेश केलेला आहे. सलग पृष्ठ क्रमांक न देता प्रत्येक विभागाला स्वतंत्र पृष्ठ क्रमांक दिलेला आहे. त्यामुळे एकत्रित पृष्ठसंख्या मिळत नसली तरी अंदाजे २५०० ते ३००० पृष्ठांचा ऐवज होईल इतका या कोशाचा आवाका आहे. पहिल्या खंडाला वाघे यांनी प्रस्तावना लिहिली असून इतर खंडांच्या मानाने ती दीर्घ आहे. ‘कोश कसा बघावा?’ याबाबतची मार्गदर्शक पृष्ठे प्रत्येक खंडात देऊन, कोशाची रचना अत्यंत सुलभतेने नमूद केलेली आहे. ती वाचून वाचकाला कोश हाताळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. पहिल्या खंडात पाच पृष्ठांची इंग्रजी-मराठी संदर्भग्रंथांची यादी देण्यात आलेली आहे. ही यादी अभ्यासकांना उपयुक्त ठरू शकते.
कोणत्याही कोशाची रचना हे त्याचे अंगभूत वैशिष्टय़ असते. वाचनसुलभता, सुटसुटीतपणा यादृष्टीने ही रचना महत्त्वाची ठरते. विविध प्रकारचे ठसे, खुणा, चिन्हे यांचा वापर कोशात भरपूर करावा लागतो, तसा तो या खंडांमध्येही केलेला आहे. उदा. परिच्छेद आहे हे कळण्यासाठी ‘’ असे चिन्ह वापरले आहे किंवा आद्याक्षरे बदलली आहेत हे कळण्यासाठी ‘n’ हे चिन्ह वापरले आहे. नोंदींच्या शीर्षभागात संकल्पना दिली असून त्या प्रत्येक संकल्पनेला क्रमांकही देण्यात आलेला आहे. संकल्पना दिल्यानंतर स्वरांनी सुरू होणाऱ्या आद्याक्षरांच्या शब्दांचा गट दिला आहे, तर त्यानंतर व्यंजनांचा गट दिला आहे. अर्थात हे गट समानार्थी शब्द आहेत, हे नव्याने सांगायला नको. कारण हा पंचखंडात्मक कोशच मुळी समानार्थी शब्दकोश आहे. परंतु इतर समानार्थी शब्दकोश व हा कोश यांतील फरकाचा प्रारंभ इथूनच सुरू होतो. उदा. संकल्पनांचे प्रकार, संकल्पनांशी निगडित साधित नामे, विशेषणे, क्रियाविशेषणे, क्रियापदे इत्यादी व्याकरणाचा तपशील, विरुद्धार्थी शब्द, विज्ञानविषयक माहिती, व्याख्या, उपविषय इत्यादी.
समानार्थी शब्दांनंतर येणारी संकल्पनेविषयीची माहिती थक्क करणारी तर आहेच; पण ती सर्व माहिती सर्व प्रकारांतील आकारविल्हे लावलेली आहे. ‘समानार्थी शब्दकोश’ हा प्रकार या प्रकारच्या माहितीमुळे मागे पडून सदर कोशाचे स्वरूप वेगळ्याच प्रकारात समोर येते. ‘समानार्थी शब्दकोश’ ही संकल्पना मराठीला नवीन नाही. विशेषत: मो. वि. भाटवडेकर यांचा ‘मराठी पर्यायी शब्दांचा कोश’ आणि वि. शं. ठकार यांचा ‘पर्याय शब्दकोश’ हे उपयुक्त तर आहेतच; पण नावाजलेही गेले आहेत. हे कोश ‘शब्दकोश’ या संकल्पनेत अचूक बसणारे आहेत. मात्र, वाघे यांचा कोश ‘शब्दकोश’ संकल्पनेत न मावणारा आहे. ‘एन्सायक्लोपिडिक डिक्शनरी’ नावाच्या संकल्पनेशी जुळणारी जातकुळी म्हणून या कोशाचं वेगळेपण सांगता येईल. या प्रकारातील शब्दकोश हेही शब्दकोशच; पण ते केवळ शब्दाचा अर्थ देणारे नसतात, तर त्या शब्दाची, शब्दाविषयीची ज्ञानकोशसदृश अधिक माहिती देणारेही असतात. अर्थात या प्रकारालाही ओलांडून जाणारा हा कोश वाघे यांनी तयार केला आहे.
या कोशाचे जे नामकरण केले गेले आहे (‘संकल्पनाकोश’) ते मात्र वाचकाची दिशाभूल करणारे आहे. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. संकल्पना म्हणजे concept. इंग्रजीत असे कोश भरपूर आहेत. Literary terms म्हणून हा प्रकार वाङ्मयात प्रसिद्ध आहे. डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या संपादकत्वाखाली मराठी वाङ्मयकोशाचा चौथा खंड महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे, त्यात अशा वाङ्मयाच्या संकल्पना स्पष्ट केल्या गेल्या आहेत. वाघे आपल्या कोशाला ‘संकल्पनाकोश’ म्हणत असले तरी Concept, terms या अर्थाने ते प्रत्येक संकल्पना मांडत नाहीत, तर ते काही शब्दांचे समान अर्थ आणि त्या शब्दाची (शब्दसमूह म्हणून वा गट म्हणूनही) अधिक माहिती देतात. शब्दाविषयी अशी माहिती सहजासहजी कोणत्याही शब्दकोशात दिली जात नाही. ती इथे सापडते. ‘ज्ञानकोशसदृश समानार्थी शब्दकोश’ असे वाघे यांच्या या कोशाचे वर्णन करता येईल. या कोशात व्यक्तींविषयीची माहितीही सापडते. व्यक्ती ही ‘संकल्पना’ या अर्थाने गृहीत धरणेच शब्दकोशाच्या व्याप्तीला खरे तर मर्यादा आणणारे ठरते. तसेच त्याच्या शीर्षकालाही बाधा आणणारे ठरते. भले मग ती माहिती कितीही रोचक, उद्बोधक व वाचनीय का असेना. वाघे यांना त्याबाबतीत कोशवाङ्मयाचा अभ्यास असणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळायला हवे होते. ते मिळाले असते तर अशा गफलती झाल्या नसत्या.
एखाद्या शब्दाविषयी माहिती जमा करण्याची पद्धत, ती मांडण्याची रीत आणि त्यातून मिळणारे ज्ञान यात मात्र वाघे यांनी नव्याने भर टाकली आहे. पाच खंडांत येणारे विविध शब्द पाहता त्यात अधिकाधिक शब्दांची भर टाकता येणे शक्य आहे, अशी दृष्टी ठेवणारे ते आहेत. उदा. पहिल्या खंडात बोलींचे शब्दकोश नाहीत, असे मत त्यांनी मांडले होते. पुढे त्यांच्या निदर्शनास मराठीतील काही तसे कोश आले आणि त्यांनी प्रामाणिकपणे तसा उल्लेख दुसऱ्या खंडात केला. हीच प्रामाणिक दृष्टी त्यांना त्यांच्या कोशाचे व्यापकपण साकारण्यात होऊ शकते यात शंका नाही. मराठीत असे काही कार्य झालेले आहे, ते वाघे यांना उपयुक्त ठरू शकते. पुढच्या काळात ते त्याचा उपयोग करतीलही. मात्र, त्यांनी ‘संकल्पना’ या संकुचित संकल्पनेतून स्वतला मुक्त करून घ्यायला हवे व शब्दाच्या मुक्त प्रांगणात शिरायला हवे. तसेच आपल्याला व्याकरणाचे ज्ञान नाही, कोशकार्याचा अनुभव नाही, इत्यादीची त्यांना प्रारंभी भीती वाटत होती, ती किती निराधार होती हे त्यांच्या या कार्यावरून सिद्ध झाले आहे.
अत्यंत देखणी छपाई, बांधणी आणि निर्मिती करणारे प्रकाशक, संपादकांना सहाय्यभूत होणारे त्यांचे मित्र, कोश प्रसिद्ध व्हावा यासाठी धडपडणारे हितचिंतक या सर्वाचे कष्ट या कोशनिर्मितीत सत्कारणी लागले आहेत. मराठीत एक उत्तम कोश दिल्याबद्दल अभ्यासक त्यांच्या ऋणात राहू इच्छितील.
‘संकल्पनाकोश’ (खंड १ ते ५)- सुरेश पांडुरंग वाघे, ग्रंथाली, मुंबई, पृष्ठे (सर्व खंड )- ३०००, मूल्य- २५०० रुपये.
शीर्षकाची दिशाभूल , पण कोशकार्य उत्तम!
सुरेश पांडुरंग वाघे यांनी अपार कष्ट घेऊन एकहाती तयार केलेल्या पंचखंडात्मक संकल्पनाकोशाचं थक्क करणारं काम पाहून कोणीही अचंबित व्हावं.
आणखी वाचा
First published on: 11-08-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boko reivew of sankalpanakosh