डॉ. अनंत देशमुख
सामाजिक आणि राजकीय स्थित्यंतराने ब्राह्मणी वर्चस्वाला धक्के दिले होते आणि बहुजन समाजातील लेखकही सत्त्व आणि स्वत्व लाभल्याने आपले अनुभव त्यांच्या त्यांच्या बोलीत लिहू लागले. साहित्यातही बोलींना प्रतिष्ठा मिळू लागली. ‘मालवणी नाटक’, ‘झाडी बोलीतील नाटक’ असे नाटय़ प्रकारही अस्तित्वात येऊ लागले. परिणामत: बोलींच्या अभ्यासाला चालना मिळू लागली. अलीकडेच पालघरकडील वाडवली भाषेचा कोशही सिद्ध झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलींसंबंधी विचार करणारे काही प्रबंध आणि अभ्यासपूर्ण पुस्तकेही प्रकाशित होऊ लागली आहेत.
‘बोधी नाटय़ परिषद, मुंबई’ यांनी करोनाच्या काळात नाशिक येथे बोलीभाषांविषयी एक परिसंवाद आयोजित केला होता. त्याला कारण प्रसिद्ध नाटककार आणि विचारवंत प्रेमानंद गज्वी यांना या विषयाचे असलेले आकर्षण आणि त्यासंबंधी अधिकाधिक अभ्यास व्हावा याची असलेली ओढ होय. तो काळच असा होता की, माणसं माणसांना दुरावत चालली होती. परिणामत: परिसंवाद होऊ शकला नाही, परंतु त्यांनी निबंधवाचनाकरिता ज्या अभ्यासकांना पाचारण केले होते त्यांनी प्रामाणिकपणे आपले निबंध तयार करून संयोजकांकडे पाठविले होते. त्यामुळे परिसंवाद जरी झाला नाही तरी त्यासाठी लिहिल्या गेलेल्या निबंधांचे पुस्तक मात्र तयार होऊ शकले. यातून ‘बोलीभाषा: चिंता अणि चिंतन’ हे पुस्तक सिद्ध झाले.
हेही वाचा >>>वास्तवदर्शी व्यक्तिचित्रांचा नजराणा
यात मालवणी (डॉ. महेश केळुसकर), मुरबाडी (गिरीश पांडुरंग कुंटे), पुणेरी (नीती मेहेंदळे), कोल्हापुरी (डॉ. सुनंदा शेळके), मराठवाडी (डॉ. आवा मुंढे), अहिराणी (मंदाकिनी पाटील), वऱ्हाडी (डॉ. प्रतिमा इंगोले), गोंडी (राजेश मडावी), झाडी ( डॉ. हरिश्चंद्र बोरकर) आणि वैदर्भी ( डॉ. श्रीकृष्ण काकडे) बोलींवर जाणकारांनी लेखन केले आहे.
यातील पहिलाच लेख मालवणी बोलीसंबंधीचा असून तो डॉ. महेश केळुसकर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परिश्रमपूर्वक सिद्ध केला आहे. वि. का. राजवाडे, रा. गो. भांडारकर, आ. रा. देसाई, डॉ. इरावती कर्वे, रा. वि. मतकरी, गुं. फ. आजगावकर, दत्ताराम वाडकर, डॉ. प्रभाकर मांडे, अ. ब. वालावलकर, विद्या प्रभू, डॉ. द. दि. पुंडे यांच्या मतांचा परामर्श घेत मालवणी बोली, कुडाळी बोली.. इत्यादी संज्ञांनी निर्माण होणारी संदिग्धता त्यांनी स्पष्ट केली आहे. मालवणी बोलीभाषेतील व्याकरण विषयक निरीक्षणे सोदाहरण मांडली आहेत, मालवणी बोलीत कथा-कविता-कादंबरी आणि नाटक या ललित वाङ्मय प्रकारात लक्षणीय भर घातलेल्या लेखकांच्या लेखनाची दखल घेतली आहे. वि. कृ. नेरुरकर यांच्या कविता, श्यामला माजगावकर यांचं काव्यगायन, कुडाळदेशकरांचा इतिहास, गावकर, मतकरी यांचं समाजातील स्थान याविषयी त्यांनी फारशी ज्ञात नसलेली माहिती पुरवली आहे.
गिरीश पांडुरंग कुंटे यांनी ‘मुरबाडी बोलीभाषा’ या विषयावर लेखन केले आहे. मुरबाड हे कल्याणच्या पुढे सुमारे ५५ किलोमीटरवरील गाव. तालुक्याचे ठिकाण. एका बाजूला कल्याण, दुसऱ्या बाजूने अंबरनाथ- बदलापूर- कर्जत, एकीकडे पालघर अशा तालुक्यांनी वेढलेला हा परिसर. हा उत्तर कोकणचा परिसर. इथं इतर पिकं आणि वनस्पतींबरोबर जंगली झाडपाला खूप. साग, शेवर, मोह यांची झाडं भरपूर. या परिसरात वारली, कातकरी, आदिवासी लोकांचा भरणा जास्त. हा समाज आता कुठे शिकू लागला आहे; पण इथल्या लोकांनी त्यांची परंपरागत आलेली बोली अजून तरी टिकवली आहे. इथले सण, उत्सव आणि त्या वेळची गाणी, धवळे, होळीगीतं अजूनही त्यांच्या मुखांवर असतात. ठाणे, मुंबई ही शहरे जवळची असल्याने शहरी भाषेशी यांचा संबंध येणे अपरिहार्य. या बोलीचे व्याकरण, वाक्प्रचार, म्हणी, शिव्या, लग्नादी विवाहाची गीतं, कवनं यांची तपशीलवार माहिती आहे.
‘पुणेरी बोलीभाषे’वर निबंधलेखन करणं हे सर्वात अवघड होतं. पुण्याच्या परिसरात आळंदीला ज्ञानेश्वर महाराज, देहूला तुकाराम महाराज, चाफळला रामदासस्वामी, बारामतीला मोरोपंत असे संत आणि पंडितकवी झाले. वारकरी संप्रदायानं संतांच्या रचना मुखोद्गत केल्या. त्यातून बहुजन समाजातील संतांची वाणी आणि त्यांचे अभंग घडले. पेशवाईत, विशेषत: उत्तर पेशवाईत पोवाडे- लावणी- तमाशाला राजाश्रय मिळाला. शाहीर मंडळी पुण्यात आली. त्यांची भाषाही पुणेरी भाषेत मिसळली. मराठय़ांच्या बखरी, राजपत्र व्यवहार यांच्या साहाय्याने गद्य वाङ्मयाने बाळसे धरले. हा पेच ‘पुणेरी बोली’ या विषयावर लेखन करणाऱ्या नीती मेहेंदळे यांच्या लक्षात आला आणि त्यांनी पुण्याला लाभलेल्या संत-पंत आणि एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील सारस्वतांच्या परंपरा, पुणे परिसरातील विविध आध्यात्मिक क्षेत्रांचा- ऐतिहासिक स्थळांचा झालेला विकास, तिथल्या बोलींनी घेतलेली रूपं यांचा धांडोळा आपल्या लेखनात घेतला आहे.
हेही वाचा >>> पाण्याबद्दलचे अनुभवनिष्ठ, पण अपुरे चिंतन
‘कोल्हापुरी बोलीभाषा’ या विषयावर डॉ. सुनंदा शेळके यांनी लेखन केलं आहे. त्यात कोल्हापूर, गडिहग्लज, आजरा अशा भवतालच्या परिसरांतील बोलीभाषांसंबंधी विचार केलेला आहे. तिच्यातील भौगोलिक रूढी, परंपरा, चाली-रीती, मानवी स्वभाव, उपदेश, उपहास, विनोद यांचे जे दर्शन होते त्याचा उल्लेख येतो. तिच्यातील खास शब्द, म्हणी, वाक्प्रचार यांची नोंद लेखिका करते. त्या परिसरातील शेतकीविषयक साधनं, मापं, स्वयंपाकघराशी निगडित शब्द सांगत असतानाच तिथल्या साहित्यात ते कसे आलेत हे स्पष्ट व्हावं म्हणून डॉ. अरिवद शेनाळेकर, नीलम माणगावे यांच्या कृतींतील उतारे दिले आहेत.
‘मराठवाडी बोलीभाषा’ हा डॉ. आशा मुंढे यांनी निबंध लिहिला आहे. ‘भाषा हे समाजजीवनाचा आरसा असते’ यासंबंधी विवेचन करीत असताना डॉ. मुंढे यांनी Edverd Sapir या भाषावैज्ञानिकाच्या विधानांचा आधार घेतलेला आहे. मराठवाडा परिसरावर निजामी राजवटीचा प्रभाव असल्याने उर्दू-फारसी भाषेचा संस्कार असल्याचे, नांदेड जिल्हा आंध्रच्या सीमारेषेवर असल्याने तिथल्या स्थानिक बोलींवर तेलुगू आणि कानडीचा प्रभाव असल्याचे लेखिकेने निदर्शनास आणून दिले आहे. त्यातही परभणीकडील बोली नजाकतीने बोलली जाते हे नोंदवून तिच्यातील म्हणी, वाक्प्रचारही स्पष्ट केले आहेत. परभणी, अहमदनगर जिल्हा, बीड जिल्ह्यातील व्यावसायिक, कर्नाटकाच्या सीमेलगतचे भाग, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्हा यातील बोलीभाषांचा बदलता नकाशा आणि व्याकरणिक रूपं यांचा सुंदर परिचय लेखिकेने करून दिला आहे.
‘अहिराणी बोलीभाषा’ या मंदाकिनी पाटील यांच्या निबंधाच्या सुरुवातीचे चार दीर्घ परिच्छेद बोलीभाषांविषयी साधारण माहिती देणारे आहेत. त्यानंतर ‘हेमाद्री’ ऊर्फ ‘हेमाडपंत’ या केशव पाध्ये यांनी १९३१ साली लिहिलेल्या पुस्तकात अहिराणीसंबंधीच्या आलेल्या उल्लेखाचा निर्देश त्यांनी केला आहे. ही बोलीभाषा कोणत्या प्रदेशात बोलली जाते आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा त्यांच्यावर कसा परिणाम झाला आहे याचे त्यांनी विवेचन केले आहे. विशेषत: गुजराती भाषेचा परिणाम त्यांनी नोंदवला आहे. अहिराणी भाषेची मृदुता, खुमासदारपणा, तरल काव्यात्मकता अशी वैशिष्टय़े स्पष्ट करीत असताना लग्नातील विधीगीतं, गोगलं, वही, शोकगीतं ही वैशिष्टय़े सोदाहरण सांगितली आहेत. त्या बोलीभाषेसंबंधी आणि त्या भाषेत लिहिणाऱ्यांचे उल्लेख पानापानांवर करण्यात आले आहेत. त्या भाषेतील साहित्य, वृत्तपत्रं यांचीही आवर्जून नोंद केली आहे. नाटक आणि रंगभूमी याविषयीच्या तिच्यातील लेखनाला निबंधात स्थान दिले आहे. आजच्या काळात तिचं अस्तित्व टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत आणि अधिक काय करायला हवे यासंबंधी कळकळीने लेखन केले आहे.
‘वऱ्हाडी बोलीभाषा’ या लेखात डॉ. प्रतिमा इंगोले यांनी सुरुवातीला संस्कृत काळापासून येणाऱ्या संदर्भाचा आलेख काढला आहे. डॉ. सुरेश डोळके, डॉ. ग. मो. पाटील, डॉ. प्र. रा. देशमुख, डॉ. वसंत वऱ्हाडपांडे, अ. का. प्रियोळकर यांच्या संशोधनाचा हवाला देत त्यांनी महानुभाव साहित्यातील संदर्भ दिले आहेत. वऱ्हाडी बोलीभाषेतील लोककथांचे विवेचन करताना त्यांनी सादर केलेली ‘पाच शब्दांची लोककथा’ विलक्षण आहे:
‘‘जाईजुईचा केला मांडो
गंगेचं आणलं पानी
अशी राणूबाई शायनी
पाचा शबुदाची कायनी.’’
‘गोंडी बोलीभाषा’ या विषयावर राजेश मडावी यांनी लेखन केले आहे. गोंडी बोलीभाषेचे मूळ शोधताना मडावी यांनी सुरुवातीलाच महात्मा फुले यांचा अभंग उद्धृत केला आहे. जागतिकीकरण आणि गोंडी बोली, गोंडी बोलीवरील संकट, गोंडी बोलीतील लेखन परंपरा, गोंडी भाषेच्या संवर्धनासाठी, महाराष्ट्रातील पहिली गोंडी- इंग्रजी पारंपरिक शाळा या विषयांवरील आपले अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. ते वाचले की गोंडी बोलीभाषेसंबंधी त्यांचे ज्ञान आणि अधिकार यांची पूर्ण कल्पना या निबंधावरून आपल्याला येते. ‘झाडी बोलीभाषा’ या डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या लेखात प्रथम ही बोली कोणत्या प्रदेशात बोलली जाते ते सांगून तिच्या संदर्भातील वाङ्मयीन संदर्भाची मांडणी करण्यात आली आहे. त्यात त्या बोलीचा इतिहास आला. म्हणजे तेराव्या शतकापासून नकाशा काढणे आले. पुढे तिच्यातील म्हणी, वाक्प्रचारांचा, लोककथांचा, कथांचा विषय आलाच. ‘दुर्गाबाई आणि तिचे सात भाऊ’ ही कथा, गावोगावच्या कथा, लोकगीते, त्यांचे वर्गीकरण, लोकगीतांचे स्वरूप, त्यांची तपशीलवार माहिती, छंदनामे, पारिभाषिक शब्द, पोवाडे, लोकव्यवहार, बलुतेदारांची शब्दसंपदा, झाडी बोलीतील कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध, धानाची नावे, मनोरंजनाची साधने, व्याकरण विचार, विविध साहित्य प्रकारांतील लेखन असे विविधांगाने हे लेखन झाले आहे.
‘वैदर्भी बोलीभाषा’ या निबंधात डॉ. श्रीकृष्ण काकडे यांनी त्या बोलीभाषेला जो पुराणकाळापासून परंपरा आणि इतिहास आहे त्याचा सविस्तर परामर्श सुरुवातीला घेतला आहे. भोज राजाची बहीण इंदुमती, तिचे लग्न राजा अजाशी होते, नंतर नल-दमयंती स्वयंवर, कालिदास, भट्ट, राजशेखर, दंडी हे संस्कृत कवी, तेराव्या शतकातील महानुभाव साहित्य, नाथ संप्रदायीन संत यांनी पुनित झालेला विदर्भाचा परिसर, तिथली वऱ्हाडी बोली, तिचा अभ्यास करणाऱ्या या. मा. काळे, वा. ना. देशपांडे यांची नोंद करून वऱ्हाडीतील लोकगीतांचा उल्लेख करण्यात आला आहे.
मराठीच्या बोलीभाषांचा नकाशा तयार करताना संपादकांनी सर जॉर्ज गिअर्सनचा ‘लिंग्विस्टिक सव्र्हे ऑफ इंडिया (१९०३-१९२३)’ हा सव्हे, प्रा. रंगनाथ पठारे समितीचा २०१३ सालचा अहवाल, डॉ. गणेश देवींचा ‘पीपल्स लिंग्विस्टिक सव्र्हे ऑफ इंडिया’चे २०१० साली प्रकाशित झालेले सर्वेक्षण, रेव्हरंड एस. बी. पटवर्धन यांचे ‘गोंडी मॅन्युअल’ यांचा पुरेसा संदर्भ देत मराठी बोलीभाषांचा उगम आणि त्यांची आजची स्थिती याविषयीची निरीक्षणे व्यक्त केली आहेत.
‘बोलीभाषा : चिंता आणि चिंतन’ हे प्रेमानंद गज्वी आणि डॉ. महेश केळुसकर यांनी सिद्ध केलेले संपादन म्हणजे त्यांच्या प्रस्तुत विषयाची तळमळ आणि त्यांनी निवडलेल्या अभ्यासू सहकाऱ्यांचे मन:पूर्वक सहकार्य यातून सिद्ध झालेला एक मौलिक प्रकल्प आहे.
‘बोलीभाषा : चिंता अणि चिंतन’-
संपादन : प्रेमानंद गज्वी, डॉ. महेश केळुसकर, पाने-२५५ , किंमत-३५० रुपये.